অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नागपूर पोलिसांचे प्रगतीपुस्तक

नागपूर पोलिसांचे प्रगतीपुस्तक

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात चर्चा झाली तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्ह्यांची संख्या, तपासकाम यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या गुन्ह्यांची संख्या आणि न्यायालयात अपराध सिद्ध होण्याचे प्रमाण या तीन पारंपरिक निकषांसोबतच पोलिसांबाबत आणि एकूणच सुरक्षेबाबत जनमत काय आहे हे पाहिले पाहिजे, त्यादृष्टीने Security Perception Index (SPI) आधारे वस्तूस्थिती समोर आली म्हणजे पोलिसांच्या कामात नेमकी सुधारणा घडवून आणणे शक्य होईल, अशी भूमिका मांडली होती. या भूमिकेची आठवण काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी करुन दिली आणि राज्यातील प्रमुख शहरात शास्त्रशुद्ध सर्वेक्षणाधारे (SPI) निर्धारित केला जाईल, असे सांगितले. प्रसंग होता तो नागपूर पोलिसांच्या प्रगतीपुस्तकाच्या सादरीकरणाचा, असे सादरीकरण बहुदा पहिल्यांदाच अनुभवता आले. हे सादरीकरण तुलनात्मक होते. म्हणजे असे की, नागपूर शहर पोलिसांच्या कामाबाबत 2014 मध्ये एक सर्वेक्षण झाले होते. त्या मर्यादित सर्वेक्षणाचे निष्कर्ष उपलब्ध असून 2017 मध्ये झालेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्षही हाती आले आहेत. त्याचे सादरीकरण काल (रविवार, दि. 3 सप्टेंबर 2017) मुख्यमंत्र्यांच्यासमोर झाले. हे निष्कर्ष काय सांगतात?

जागरुकता या निकषावर 2014 च्या सर्वेक्षणात 33 टक्के गुण प्राप्त झाले होते. यंदाच्या सर्वेक्षणात त्यात 36 टक्के वाढ झालेली असून 45 टक्के गुण नोंदले गेले आहेत. नागरिकांची पोलिसांना पाठिंबा देण्याची तयारी या निकषावर तेव्हा 34 टक्के गुण प्राप्त झाले होते ते आता 85 टक्क्यांनी वाढून 63 टक्के झाले आहे. संपर्क क्षमता या निकषावरील गुण 24 टक्क्यांवरुन 50 टक्क्यांवर पोहचले आहेत. ही वाढ 108 टक्के एवढी आहे. कार्यात्मक परिणामकारकता या निकषावर तेव्हा 20 टक्केच गुण नोंदले गेले आता त्यात 135 टक्क्यांची वाढ होऊन ते 47 टक्के एवढे झाले. पोलिसांची वागणूक या निकषावरील गुणात 147 टक्क्यांची वाढ झाली आहे. या निकषावर 2014 साली 17 टक्केच गुण प्राप्त झालेले होते. ते आता 42 टक्के झाले आहेत. सर्वाधिक वाढ पोलिसांची जनसामान्यातील प्रतिमा या निकषावरील गुणात झाली असून 2014 साली अवघे 19 टक्के असणारे गुण 157 टक्क्यांनी वाढून 49 टक्क्यांवर पोहचले आहेत !

येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, नागपूर पोलीस दलासंदर्भातील हे सर्वेक्षण तिरपुडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या त्रयस्थ संस्थेने केलेले आहे. अशा प्रकारच्या सर्वेक्षणासाठी आवश्यक असणारी शास्त्रीय पद्धत संस्थेने अंगीकारली आणि याबाबतचे एक महत्त्वाचे गमक म्हणजे सर्वेक्षणातून प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करण्यात आली. ज्याला Data Validation या पारिभाषिक शब्दांनी ओळखले जाते, ती प्रक्रिया करण्यात आली. सादरीकरणाच्या वेळी संस्थेचे प्रा. खुल्लर यांनी ही बाब आवर्जून नमूद केली. संस्थेचे 175 विद्यार्थी आणि जवळपास 25 प्राध्यापक या प्रक्रियेत सहभागी होते. पोलीस दलातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांखेरीज सर्वेक्षण प्रक्रियेबाबत कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. शहरातील सर्व थरांना प्रतिनिधीत्त्व मिळेल अशा पद्धतीने ‘Sample Size’ ठरविण्यात आला.

सर्वेक्षणातून जे चित्र समोर आले त्याचे श्रेय पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आहे. कालच्या सादरीकरणाच्या वेळी मुख्यमंत्री महोदयांनी या टीमच्या अथक परिश्रमाचा उल्लेख केला तर आयुक्तांनी श्रेय विविध समाजघटकांचे आहे, असे सांगितले.

नागपूर पोलिसांनी गेल्या तीन वर्षात विविध उपक्रम राबवले. त्यात भरोसा सेल, बडी कॉप्स, एन कॉप्स एक्सलन्स अशा उपक्रमांचा जरुर उल्लेख करावा लागेल. ‘एन कॉप्स एक्सलन्स’ या उपक्रमात पोलिसांचे प्रशिक्षण, त्यांच्या वर्तणुकीत अपेक्षापूर्तीच्या दिशेने बदल घडवून आणणे आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या बाबींवर भर देण्यात आला.

बडी कॉप्स/पोलीस सखी या उपक्रमात शहरातील विविध वसतिगृहात म्हणजे घराबाहेर राहणाऱ्या मुलींशी संपर्क साधून त्यांच्याशी एक विश्वासाचे नाते निर्माण करण्यात आले. व्हॉट्स ॲप ग्रुप्सच्या माध्यमातून संवाद आणि संपर्कात सातत्य राखण्यात आले.

गुन्हेगारी प्रवृत्ती विरुद्ध कडक भूमिका घेतली जाते याचा नागपूरकरांना ‘भूमाफिया’ प्रकरणात अनुभव आला असून त्याचा मुख्यमंत्री महोदयांनीही विशेष उल्लेख केला. पोलीसांबाबतच्या अपेक्षा आणि आकलन या अनुषंगाने राज्यात अशाप्रकारे सर्वेक्षणाधारे तुलानात्मक निष्कर्ष प्रथमच समोर आले आहेत. हे निष्कर्ष सकारात्मक असून ते पोलिसांचा उत्साह आणि त्यांच्यावरील जबाबदारी वाढवणारे आहेत.

आपल्या चुका किंवा उणीवा लपवून उपयोग नसतो. कामात सुधारणा होण्यासाठी आपल्या उणीवा समजावून घेणे आणि त्या दूर करणे आवश्यक असते हे काल मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले. तर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने पुढे आलेल्या सूचनाही संस्थेने नमूद केल्या असून त्याची नोंद पोलिसांनी घेतली आहे. याचा चांगला परिणाम पुढील सर्वेक्षणात दिसून येईल अशी अपेक्षा आहे.

लेखक: राधाकृष्ण मुळी

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate