অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिर्डीजवळच्या डाऊच गावाची ग्रामविकासाकडे वाटचाल

शिर्डीजवळच्या डाऊच गावाची ग्रामविकासाकडे वाटचाल

शासनाच्‍या योजनांचा एकत्रित लाभ, ग्रामसेवकाचा पुढाकार ठरला महत्‍वाचा

अहमदनगर जिल्ह्यातील डाऊच गावातील ग्रामस्थांनी एकत्रित प्रयत्नांतून गावाला नवे रूप दिले आहे. लोकसहभागातून जलसंवर्धनाच्या कामाने प्रारंभ केलेल्या गावात पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना, निर्मल ग्राम, कृषीविषयक योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. स्‍मार्ट ग्राम योजनेच्या सहभागाने गावाची सर्वांगीण ग्रामविकासाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. दुग्धव्यवसायाच्या आधाराने गावचे अर्थकारणही बदलू लागले आहे. तंटामुक्‍त, सांडपाणीमुक्‍त, हागणदारीमुक्‍त, कुपोषणमुक्‍त, धूरमुक्‍त गावासोबतच बायोगॅसचे गाव अशी गावाची नवी ओळख निर्माण झाली आहे.

शिर्डीपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर डाऊच बुद्रूक नावाचे छोटेशे गाव आहे. नगर- मनमाड महामार्गावर मुख्य रस्त्यापासून सुमारे दहा किलोमीटर आत आहे. डाऊच जवळपास 1250 लोकसंख्‍येचे गाव. गावातील 80 टक्‍के शेतकरी अल्पभूधारक आहेत. गावचे 609 हेक्‍टर भौगोलिक क्षेत्र असून 1972 पूर्वी गावातील शेतकरी कायम उसाचे पीक घ्यायचे. त्यानंतर मात्र पीक पद्धतीत कमालीचा बदल झाला. सातत्याने कमी होत गेलेल्या पावसाच्या डाऊचचे शेतकरी कापसासोबत आता कमी पाण्यात येणारे मका, गहू, सोयाबीन आदी पिकांकडे वळले आहेत. गावचे सरपंच विमलताई दहे, उपसरपंच बाबासाहेब दहे यांच्‍यासह सर्व ग्रामपंचायत सदस्‍य व ग्रामसेवक महेश काळे यांच्या पुढाकाराने गावात विकासकामांना सुरुवात झाली. 2 ऑक्‍टोबर 2015 रोजी गावात विकासाला दिशा देणारी ग्रामसभा घेण्यात आली. सन 2016 मध्ये गावाने स्‍मार्ट ग्राम योजनेत सहभाग घेतला.

गावातील विकासकामे

गावात ग्रामपंचायत व सोसायटीचे कार्यालय आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढावे यासाठी लोकसहभागातून जलशुद्धीकरण प्रकल्‍पाची उभारणी करण्यात आली आहे. डाऊच गावासह लगत असलेल्‍या दोन गावांनाही पिण्‍याचे स्‍वच्‍छ व शुद्ध पाणी 25 पैसे प्रति लीटर दराने उपलब्‍ध करून दिले आहे. गावात अंतर्गत सिमेंट रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्‍यात आले आहेत. जलसंवर्धनासाठी दोन वनराईबंधारे व एक नालाखोलीकरण करण्यात आले आहे. आमदार स्‍नेहलता कोल्‍हे यांनी उपलब्‍ध करून दिलेल्‍या चार लाख रुपयांच्‍या निधीतून स्‍मशानभूमीत विधीशेडची उभारणी करण्‍यात आली आहे. बंदिस्‍त गटारीसोबतच घर तेथे शोषखड्डे अभियान राबविण्‍यात आले असून यातून गाव सांडपाणीमुक्‍त करण्‍यात ग्रामस्‍थांना यश आले आहे. संपूर्ण गावात रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूंनी उंच नारळाची 250 झाडे तर इतरही 3500 झाडांची लागवड करण्‍यात आली आहे. गावातील 230 कुटुंबापैकी 220 कुटुंबाकडे शौचालय आहेत. गावात सामुहिक शौचालयांची उभारणी करण्‍यात आली आहे. शेती, शिक्षण, स्वयंरोजगार, सामाजिक स्वास्थ्य, आरोग्य या पंचसूत्रीवर आधारित गावाचा विकास करण्यासाठी 2016 मध्ये स्‍मार्ट ग्राम योजनेतून गावातील अनेक विकामकामेही प्रतीपथावर आहेत.

सेंद्रिय शेती योजनेत सहभाग

गावातील सुमारे 609 हेक्‍टर एकूण क्षेत्रापैकी 580 हेक्‍टर क्षेत्रावर कापूस, मका, गहू, ऊस अशा उत्पादनांसोबतच चाऱ्यासाठी लसूणघासही घेण्यात येतो. कृषी विभागाच्‍या माध्‍यमातून सेंद्रिय शेती प्रकल्‍पाअंतर्गत 16 प्रकल्‍पांची निवड करण्‍यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाच्‍या माध्‍यमातून गावातील सर्व जनावरांची मोफत तपासणी करण्‍यात आली असून त्‍यांना जंतूनाशके, चारा बियाणे वाटपासोबतच कडबाकुट्टी सयंत्र, मुरघास युनिटचे वाटप करण्‍यात आले आहे. गावातील प्रत्‍येक शेतकऱ्‍याला मोफत माती तपासणी करून शेतीची आरोग्‍यपत्रिका देण्‍यात आली आहे.

बचतगटाने कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍थेला बळकटी

महिलांच्‍या आर्थिक सक्षमीकरणासाठी गावात 10 बचतगट स्‍थापन केले आहेत. गटांच्या माध्यमातून छोट्या व्यवसायाला सुरवात झाली आहे. बचतगटांमुळे गावातील कौटुंबिक अर्थव्‍यवस्‍था सुधारू लागली आहे.

दुग्धव्यवसायाचा आधार

गावात पूर्वीपासून दुग्ध व्यवसाय केला जातो; मात्र दुष्काळानंतर यात विस्कळितपणा आला होता. गावातील शेतकऱ्‍यांनी पाणी व्‍यवस्‍थापन केल्‍याने जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था प्रत्येकाला करता येऊ लागली. आजघडीला गावात 668 दुभत्या व 90 भाकड अशा एकूण सुमारे 758 संकरित गाई, तर काही कालवडी आहेत. गावात दररोज सुमारे साडेचार हजार लिटर दूधाचे संकलन होते. सहकारी व खासगी संस्थांच्या माध्यमातून दूध संकलन होते. दुधाला प्रतिलिटर सरासरी 30 रूपयांपर्यंत दर मिळतो. दूध विक्रीतून गावात दररोज सव्‍वा लाख रुपयांचे उत्पन्न येते. महिन्याकाठी 35 लाख रुपयांचे उत्पन्न दुग्ध व्यवसायाच्या रूपाने गावात येते. यातूनच गावातील बहुतांश कुटुंबांला आर्थिक आधार मिळाला आहे.

संस्‍काराची शाळा आणि अंगणवाडी

डाऊच गावातील अंगणवाडीच्‍या माध्यमातून पाच वर्षांपर्यंतच्या 54 मुलांना शिक्षणासोबतच संस्कारांचे धडेही दिले जात आहेत. सोबतचजिल्‍हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंतची सेमी इंग्रजी माध्‍यमाची शाळा आहे.

संपूर्ण गावाचा सहभाग

स्‍मार्ट ग्राम योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी ग्रामस्तरीय समिती, ग्रामपंचायत, सेवा सहकारी सोसायटी, दूध संस्था, बचतगट, शेतकरी मंडळ व गावातील प्रतिष्ठित व्यक्‍ती, तरुणांसह स्त्रियांचाही सहभाग महत्त्वाचा ठरला. सरपंच, उपसरपंच यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष जयवंत दहे, ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष धर्मा दहे यांच्‍यासह संपूर्ण गावातील प्रत्‍येकाचा सहभाग महत्त्वाचा ठरतो आहे. स्‍मार्ट ग्राम योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचा निधी गावाला मंजूर झाला आहे.

ग्रामसेवकाची धडपड

2 ऑक्‍टोबर 2015 रोजीच्या ग्रामसभेत ग्रामसेवक महेश काळे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी डाऊच गावाला आदर्श गाव म्हणून नावारूपास आणण्याचा संकल्प केला. पुढे गाव आदर्श बनवायचे कसे या विचारातून चर्चा झाली आणि चर्चेतून कोपरगाव तालुक्‍यातील दहेगाव बोलका गावाचा पाहणी दौरा केला. यामध्ये ग्रामस्थ सहभागी झाले होते. या दौऱ्यातून गावाला आदर्श बनविण्याची दृष्टी मिळाली. श्री.काळे गावच्‍या सर्वांगिण विकासासाठी कायम प्रयत्‍नशील असतात, शासनाच्‍या विविध विभागाच्‍या संपर्कात राहून गावासाठी आवश्‍यक योजना आणता येतील, यासाठीची त्‍यांची धडपड कौतुकास्‍पद आहे.

कामात लोकसहभाग तर गावात एकोपा

लोकसहभाग एकोप्याचे महत्त्व पटल्याने ग्रामस्थांनी 2012 मध्ये झालेली ग्रामपंचायत निवडणूक अविरोध केली, त्यामुळे निवडणुकीतून होणाऱ्या लाखोवधीच्या खर्चाला ब्रेक लागला. "इको व्हिलेज' योजनेत सतत तीन वर्षे सहभाग नोंदविल्याने गावाला या योजनेचाही निधी मिळाला. त्याच वेळी ग्रामविकासाचा हुरूप वाढलेल्या ग्रामस्थांनी उर्वरित विकासकामे स्‍मार्ट ग्राम योजनेतून पूर्ण करण्याचा संकल्प केला.

गावकऱ्यांनी उभा केला 8 लाखांचा निधी

गावात विकासकामे करताना लोकसहभाग महत्‍वाचा आहे, हीच बाब थेट कृतीत उतरवित गावात शाळा खोली बांधकाम, जलशुद्धीकरण प्रकल्‍प, मंदिर सुशोभिकरण आदी कामे करण्‍यात आली आहेत. जवळपास 8 लाखांचा निधी लोकसहभागातून उभा राहिला आहे. दलित वस्‍ती सुधार योजने अंतर्गत गावात सिमेंटचे रस्‍ते करण्‍यात आली आहेत.

सांडपाण्याचे नियोजन

स्‍मार्ट ग्रामच्‍या दिशेने वाटचाल करणाऱ्या डाऊच गावातील संपूर्ण सांडपाणी भूमिगत गटार योजनेद्वारा गावाबाहेर काढले आहे. गावात काही टप्प्यांवर गटार योजना, स्‍वच्‍छतेसाठी शोषखड्डे देण्यात आले आहेत. याही पुढे जाऊन ग्रामस्थांनी या सांडपाण्याचे पुन्हा नियोजन करून ते वृक्षांना देण्याची तयारी चालविली आहे.

गावातील इतर विकासकामे

गावातील जवळपास सर्वच रस्ते सिमेंटचे आहेत. सुसज्ज ग्रामपंचायत भवन उभे झाले आहे. गाव 98 टक्‍के गाव हागणदारीमुक्‍त असून 100 टक्‍के हागणदारीमुक्‍तीकरिता गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजेने अंतर्गत 10 किलोमीटरचा रस्‍ता झाल्‍याने गाव मुख्‍य रस्‍त्‍याशी जोडण्‍याची मदत झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत 29 आदीवासी बांधवांना घरकुलाचा लाभ देण्‍यात आला आहे. गावात पाणीपुरवठा योजनेसाठी चौदाव्‍या वित्‍त आयोगा अंतर्गत मुख्‍यजलवाहीनीचे काम पुर्ण करण्‍यात आले आहे. सोबतच जिल्‍हा परिषद शाळेच्‍या संरक्षण भिंतीचे कामही प्रगतीपथावर आहे.

मुलीच्‍या जन्‍माचे स्‍वागत करणारे गाव

डाउच गावात बेटी बचाव, बेटी पढाव, अभियाना अंतर्गत मुलीच्‍या जन्‍माचे स्‍वागत केले जाते. ग्रामपंचायत स्‍वउत्‍पन्‍नातून एक हजार रूपये बचत प्रमाणपत्राचे वाटप करते. गावात 639 पुरूषांमागे 632 मुलींचे प्रमाण आहे. 2015 नंतर सुरू केलेल्‍या या उपक्रमाचा 35 मुलींना लाभ देण्‍यात आला आहे.

बायोगॅसचे गाव नवी ओळख

गावात दुग्‍धव्‍यवसाय करणा-या 61 कुटुंबाकडे बायोगॅस बसविण्‍यात आला आहे. यामुळे जळाऊ इंधनाची बचत झाली असून धूरमुक्‍त गावासोबतच बायोगॅसचे गाव अशी गावची ओळख निर्माण झाली आहे.

- गणेश फुंदे, उपमाहिती कार्यालय, शिर्डी

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 10/20/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate