অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘अन्नदाता सुखी भव्’

‘अन्नदाता सुखी भव्’

मंगळवारी, मुंबईत झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बस, लोकल रेल्वेसेवेचं वेळापत्रक कोलमडलं आणि लोक अनेक ठिकाणी अडकून पडले. पावसामुळे अडकून पडलेल्या लोकांना मुंबापुरीत ठिकठिकाणी अन्न, निवारा विविध सामाजिक संस्था - दानशूरांनी उपलब्ध करुन दिला. राज्याच्या कारभार जिथून चालतो त्या मंत्रालयात अडकून पडलेल्या नोकरदारांना आणि मंत्रालयात आलेल्या अभ्यागतांना ऐनवेळी मंत्रालय उपहारगृहाने चांगले गरमागरम जेवण उपलब्ध करुन दिले. वेळ, काळ आणि ड्युटीच्या तासापलीकडे जाऊन कमी वेळेत रुचकर, चविष्ट अन्न अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन देणाऱ्या या उपाहारगृहातील महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, कॅन्टीन सुपरवायझर ते वेटर, आचाऱ्यांचा सेवाभाव कौतूकाचा विषय ठरला..

29 ऑगस्टला मुंबईत तुफान पाऊस बरसला.. मुंबईची लाईफलाईन ठप्प झाली.. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे सेवा बंद झाल्याने मुंबई शहरात कामानिमित्ताने आलेली नोकरदार मंडळी कार्यालयांमध्ये अडकून पडली… सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे मंत्रालयात नोकरी करणारा कर्मचारी वर्गही त्याला अपवाद नव्हता. मंत्रालयाच्या मुख्य आणि प्रशासकीय इमारतीत फार मोठ्या संख्येने कर्मचारी - अधिकारी काम करतात… ठाणे, नवी मुंबई, पनवेल, डोंबिवली, विरार, पालघर, शहापूर, उल्हासनगर, बोरिवली, कर्जत अशा विविध भागातून मंत्रालयात दररोजच्या ड्युटीसाठी अनेकजण येतात.. त्या दिवशीही ते तसेच आले होते… पण सतत पडणारा मुसळधार पाऊस, बंद पडलेल्या ट्रेन यामुळे त्यांना घरी जाता आलं नाही आणि ते मंत्रालयातच अडकून पडले.

पावसाची संततधार, दाटून आलेलं आभाळ, सतर्कतेचे येणारे संदेश, बंद पडलेल्या ट्रेनस्, ट्रॅफिक जॅम या सगळ्याचा विचार करून बहुतांश मंडळींनी मंत्रालयातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.. खरं तर अशावेळी मंत्रालयासारखा सुरक्षित निवारा नाही हे त्यांनाही मान्य होतं. मंत्रालयात राहण्याचा निर्णय घेतला खरा पण संध्याकाळच्या जेवणाचे काय? कारण दुपारचे डबे तर खाऊन झाले होते… मग आता करायचं काय? सगळ्यांच्याच मनात हा विचार आला असताना कॅन्टिन सुरु असून तिथे गरमागरम कांद्याची भजी आणि इतर नाश्ता मिळत असल्याची बातमी सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास कानावर आली…

अरे वा! कर्मचाऱ्यांचे शब्द कानावर पडले.. मंत्रालय उपहारगृहात गरमागरम भजी, उपमा, ब्रेड बटर, सॅण्डविच, चहा-कॉफी, सगळच मिळत गेलं..

आता संध्याकाळी जेवायला नाही मिळालं तरी चालेल अस वाटत असतांनाच उपहारगृहात रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची नवी बातमी कळाली…. सुखाचा आणि समाधानाचा मार्ग पोटातून जातो असं म्हणतात… ज्यांना जेवणाचे काय होईल ही भीती सतावत होती त्यांची ही काळजी ही दूर झाली…

खरं तर उपहारगृहातला सकाळच्या पहिल्या शिफट्चा स्टाफ घरी निघून गेला होता.. दुसऱ्या शिफ्टचे काहीजण आले नव्हते. त्यामुळे उपलब्ध असलेल्या उपहारगृह कर्मचाऱ्यांच्या मदतीने चक्क दोन अडीच हजार अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी जेवण तयार झालं. उपहारगृहाचे जे क्लास फोर कर्मचारी बढती मिळून क्लास थ्री मध्ये गेले होते त्यांनी “टॉप क्लास” सहकार्य दिलं.. आणि सगळ्यांचीच भूक भागवली… या सगळ्या ज्ञात- अज्ञान हातांचे ऋण मान्य करण्यासाठी मी या सगळ्यांशी बोलले. अगदी स्वंयपाकघरात जाऊन भात शिजवणाऱ्या माणसापासून जेवणावर ताव मारणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांसह या सर्वाचं यशस्वी नियोजन करणाऱ्या उपहारगृह महाव्यवस्थापकांपर्यंत सगळ्यांची भेट घेतली… जेवणाचा लाभ मिळाल्याने आनंदित झालेल्या कर्मचाऱ्यांनी कशासाठी “अन्नदाता सुखी भव्” म्हटलं हे ही जाणून घेतलं. या सर्वांची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात..…

जोपर्यंत अधिकारी-कर्मचारी जेवायला येतील तोपर्यंत आम्ही सेवा देणार - दादासाहेब खताळ, महाव्यवस्थापक मंत्रालय उपहारगृह

सकाळपासून सतत पाऊस पडत होता.. दुपारी तिन्ही मार्गावरील ट्रेन बंद पडल्याची माहिती मिळाली.. घरी जाण्याचं कोणतचं साधन उपलब्ध नसल्याने आता मंत्रालय आणि प्रशासकीय इमारतीतील अधिकारी- कर्मचारी घरी जाऊ शकणार नाहीत हे स्पष्ट झालं. जे कर्मचारी चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनला गेले होते ते ही परत मंत्रालयात येऊ लागले… मग आपत्कालीन परिस्थितीचा विचार करत आम्ही सायंकाळी चार वाजता भजी, उपमा, शिरा, सॅण्डविच, चहा-कॉफी, बिस्किट असा नाश्ता देण्यास सुरुवात केली. साधारणत: 800 ते 900 लोकांनी या अल्पोपहाराचा लाभ घेतला. जस जसा वेळ गेला तसं तशी परिस्थिती आणखीनच बिकट होत असल्याचं लक्षात आलं. लोकांना घरी जाता येत नव्हतं… त्यांच्या रात्रीच्या जेवणाची सोय करणं भाग होतं… उपहारगृहातील सकाळच्या पाळीतले अर्धे कर्मचारी घरी गेले होते. ट्रेन बंद पडल्याने दुपारच्या पाळीतील काहीजण येऊ शकले नव्हते… याची जाणीव होती तरीही कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या रात्रीच्या जेवणाचे काम नियोजनपूर्वक करण्याचे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ठरवले… मुख्य दोन आचारी, तीन-चार सहाय्यक आचारी, हेल्पर अशा दहा ते बारा जणांच्या टीमने रात्रीचे जेवण तयार करण्याचा निर्णय घेतला. तत्काळ बनवता येऊ शकेल अशा पद्धतीने भात, पिठलं, पापड, लोणचं आणि तळलेल्या मिरच्या असा साधाच मेनू निश्चित केला. महेंद्र जाधव, शिवाजी आव्हाड, धर्मचंद जाधव या माझ्या सहकाऱ्यांची मला मदत झाली. आमचा अंदाज हाता की जेवणासाठी मंत्रालय आणि प्रशासकीय इमारतीतील मिळून दीड ते दोन हजार अधिकारी - कर्मचारी जेवणास येतील. प्रत्यक्षात कामानिमित्ताने आलेले आणि नंतर मंत्रालयातच अडकून पडलेले इतर लोकही नाश्ता आणि जेवणासाठी उपहारगृहात आले. त्यांना ही नाश्ता, जेवण देणं कर्तव्यच होतं.. नव्हे ती मनोमन इच्छा ही होती. एकदम चांगली नाही पण थोडी तरी चांगली जेवणाची सोय व्हावी हा उद्देश होता. माझा उपहारगृहातला क्लास फोर स्टाफ जो बढती घेऊन क्लास थ्रीमध्ये गेला होता त्यात भरत वाझे, रघुनाथ महाडिक, शरद कासारे, सुधाकर कासारे पुरंदर करकेरा, सीताराम माझे, सुबोध शिर्के, दिनानाथ पारधी यांना मी सहकार्याची साद घातली. त्यांनी टॉप क्लास सहकार्य केलं… स्वखुषीने ते या कामात सहभागी झाले. साधारणत: दोन ते अडीच हजार लोक जेवतील एवढी आम्ही तयारी केली. सातवाजता स्वयंपाकाला सुरुवात केली. आठ ते सव्वा आठ वाजता आम्ही अधिकारी कर्मचाऱ्यांना गरमागरम भात, पिटले, लोणचं आणि पापड असं जेवण देण्यास सुरुवात केली… आतापर्यंत दीड हजारापेक्षा अधिक अधिकारी कर्मचारी जेवले आहेत… तुम्हाला सांगतो मॅडम, जोपर्यंत अधिकारी – कर्मचारी जेवणासाठी उपहारगृहात येतील तोपर्यंत आम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करणार…. मंत्रालय उपहारगृहाचे महाव्यवस्थापक दादासाहेब खताळ बोलत होते… मी त्यांची ही धावपळ आणि गरम जेवण मिळाल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे समाधानी चेहरे माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले होतेच… तरीही न राहून विचारलं… इतके लोक एकावेळी जेऊ शकतील एवढी सामग्री असते का आपल्याकडे? यावर सर्वसाधारणपणे जेवण तयार करण्याच्या सगळ्या वस्तू आपल्याकडे असतात. भाजी दर दिवशी सकाळी येते त्यामुळे ती आता रात्री देणं आम्हाला जमलं नाही आणि कडधान्य भिजायला कमीत कमी दोन ते तीन तासाचा वेळ जातो. ते ही शक्य नव्हतं म्हणून मग आम्ही पिटलं, वरण आणि भात देण्याचा निर्णय घेतला… श्री. खताळ यांनी सांगितलं… मनात विचार आला उत्तम नियोजनतून अंमलात आणलेला एक चांगला निर्णय, सहकार्याचे अनेक हात अडचणीत असलेल्या किती लोकांना मदत करू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे… अर्थात मी ही मंत्रालय अधिकारीच असल्याने या गरमागरम वरण-भाताचा लाभ घेतला हे वेगळ्याने सांगायला नको..

काही प्रतिक्रिया

प्रियंका प्रसाद काकडे- महिला कर्मचारी

अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवेल असा विचारच मनात आला नव्हता. तीन वाजल्यानंतर सगळ्यांना घरी जायला सांगितलं होतं. पण ट्रेन बंद असल्याने जाता नाही आलं. जेवणासाठी मी सर्वात प्रथम मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते, त्यांनी आमच्या जेवणाची सोय केली. धन्यवाद. आज तर आम्ही इथेच मंत्रालयात आहोत मुक्कामी. उद्या पाहूया काय होते ते, पाऊस थांबल्यानंतर जाऊ आम्ही.

श्री. अनिल सोनार नियोजन विभाग

आज अभूतपूर्व असा पाऊस पडला. ट्रेन बंद पडल्याने मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं, आज काय होईल हे सांगता येत नाही, घरी पोहोचू की नाही हे माहित नव्हतं. पण मुक्कामाला राहावं लागलं तरी जेवणाची सोय झाली, निवासाची ही व्यवस्था करण्यात आली आहे. खूप आनंदी आणि समाधानी वाटत आहे. दुसरं असं की बाहेर जाण्यापेक्षा कार्यालयात थांबणं अधिक सुरक्षित आहे त्यामुळे इथेच बरं आहे. शेतकरी अन्न पिकवतो म्हणून आपण त्यांना अन्नदाता म्हणतो. आज शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यातून ताटात अन्न देणारे हे सगळेजण आमच्यासाठी अन्नदाताच आहेत… हीच भावना मनात आहे. आता ट्रेन सुरु होईपर्यंत मंत्रालयातच थोडा आराम करणार, गाड्या सुरु झाल्या की जाणार.

एक महिला कर्मचारी

मंत्रालयात रहावं लागलयाने आम्हाला अजिबात अडचण वाटत नाही कारण बाहेर पावसा पाण्यात अडकण्यापेक्षा आम्ही मंत्रालयात अधिक सुरक्षित आहोत, गाड्यात अडकून पडण्यापेक्षा इथे व्यवस्थितपणे राहता येतं. तसंच आमची जेवणाची जी इतकी उत्तम सोय केली, भले ही पिठलं भात दिला असेल पण ज्यावेळी तो मिळाला त्या वेळेला फार महत्त्व आहे. विभागाने क्वाटर्समध्ये राहण्याचीही सोय केली आहे. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देऊ इच्छितो.

सुशील तुकाराम मुळम - महसूल विभाग

आज दिवसभर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्याला घरी जाता आलं नाही. पण शासनाने जेवणाची कॅन्टिनमध्ये सोय केली आहे आणि आमदार निवासात रात्रभर राहू शकता असंही म्हटलं आहे. यामुळे लेडीज आणि जेन्टसची पण सोय झाली. तसंच नऊ वाजता मंत्रालय गेटसमोर जे कर्मचारी चेंबूर शिवाजीनगरपर्यंत जाऊ इच्छितात त्यांच्यासाठीपण बसची सोय केली आहे. ही खूप चांगली सोय आहे. गेल्या वेळेला जी घटना झाली होती तेव्हा एवढी सोय झाली नव्हती पण यावेळेला चांगली सोय झालेली आहे. त्यामुळे मी शासनाचे आभार मानतो.

लेखिका: डॉ. सुरेखा मधुकर मुळे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 4/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate