অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वाशिमच्या लेडी सिंघम ज्योती विल्लेकर

वाशिमच्या लेडी सिंघम ज्योती विल्लेकर

वाशीम शहर. एक लाख लोकसंख्येचं. दुचाकी १८ हजार तर चार चाकी दोन ते अडीच हजाराच्या आसपास. ही फक्त खाजगी वाहनं. प्रवासी वाहनांची संख्या वेगळी. इतक्या वाहनांची रोज शहरातून ये-जा. यातल्या ४०टक्के वाहनांवर फॅन्सी नंबर तर काहींवर नंबर प्लेट्सच नाहीत. हे सगळं प्रथम हेरलं ज्योती विल्लेकर यांनी. चार महिन्यांपूर्वी वाहतूक शाखेत सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून त्या रुजू झालेल्या. पदभार स्वीकारताच वाशीम शहरातल्या नियम न पाळणार्‍या वाहनावर त्यांनी धडक कारवाई सुरु केली. बेशिस्त वाहन चालवणारा दिसला की कारवाई ठरलेलीच.

जी वाहनं नंबर प्लेटविना धावत होती त्यांवर नंबर प्लेट लागल्या. बाकी नियमभंग करणारेही शिस्तीने वागू लागले. आणि वाशिम शहर वाहतूक विभागाच्या चांगल्या कामाची दखल घेणं सुरू झालं. लेडी सिंघम अशी ज्योतीताईंची ओळख बनली. मात्र, पोलीस विभागाची दहशत लोकांना बसावी, असं ज्योतीताईंना नको होतं. त्यांना शिस्त आणायची होती. म्हणून लोकसंवादाचे अनोखे मार्ग शोधले. रक्षाबंधनाच्या दिवशी विभागातील सर्व महिला पोलिसांना घेऊन शहरातील दुचाकी प्रवासी, विनापरवाना वाहन चालवणारे, अवैध प्रवासी वाहनचालक, बेशिस्त वाहनचालक या सगळ्यांना सुरक्षाबंधन बांधलं. तर पोळ्याच्या दिवशी सर्व जनावरांच्या शिंगांना रेडियम लावून शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं. गणपती उत्सवात वाहतुकीवर खूप ताण येतो. या वर्षी पहिल्यांदाच शालेय विद्यार्थ्यांना मदतीला घेऊन वाशीम शहरात वाहतूक व्यवस्थापन केलं गेलं.
समस्या सोेडवण्यासाठी लोकांचाच सहभाग घेतला की लोक आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडतात, हे वाशीम वाहतूक विभागाने दाखवून दिलं.

एक महिला आणि सोळा पुरूष वाहतूक शिपाई एवढा विल्लेकर यांचा स्टाफ. या चार महिन्यात त्यांनी ४,०२८ वाहनांवर केसेस केल्या. रु ३,९२,६००रुपये दंड वसूल करण्यात आला. आता नव्वद टक्के वाहनांवर नंबर प्लेट लागल्या आहेत. 
२०१४ सा्ली १३,८६१ केसेस केल्या गेल्या आणि १४,५६,८००रुपये दंड आणि २०१५ मध्ये १२,८९६ केसेस झाल्या आणि १२,४५,८५०रुपये दंड जमा झाला. 
या तुलनेत ज्योती विल्लेकर यांचं काम खरोखरच उठून दिसणारं आहे.

लेखक - मनोज जयस्वाल,

वाशीम

 

अंतिम सुधारित : 7/31/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate