Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 18:51:50.639657 GMT+0530
शेअर करा

T3 2019/06/16 18:51:50.644787 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 18:51:50.665894 GMT+0530

धर्मशाळा

वाटसरूंना उतरण्याकरिता व विश्रांतीकरिता असलेली वास्तू.

वाटसरूंना उतरण्याकरिता व विश्रांतीकरिता असलेली वास्तू. यात्रा, व्यापार व देशपर्यटन इ. कारणांनी गवोगाव फिरणाऱ्या वाटसरूंना व निराश्रितांना निवाऱ्याची जागा असावी, या हेतूने गावोगावी धर्मशाळांची निर्मिती झाली. जनसेवा हीच ईश्वरसेवा या जाणिवेमुळे या कार्यास धर्माचे अधिष्ठान प्राप्त झाले. आपल्या राज्यात येणाऱ्या कोणत्याही पांथस्थाची किंवा यात्रेकरूची गैरसोय होऊ नये, म्हणून भिन्नभिन्न काळात राज्यकर्त्यांनी धर्मशाळा बांधल्या. गावातील लोकांच्या संघटित प्रयत्नांनी बांधलेल्या धर्मशाळा, मठ इ. लोकोपयोगी संस्थांचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आढळतो. भूतदया हाच खरा धर्म असे मानणाऱ्या सम्राट अशोकने अनेक धर्मशाळा बांधून निराश्रितांची व प्रवाशांची सोय केली. गुप्तकाळात एक खास अधिकारी धर्मशाळांवर देखरेख ठेवीत असे. ह्युएनत्संगच्या वर्णनानुसार हर्षवर्धनाच्या काळात मंदिरांबरोबरच धर्मशाळाही बांधण्यात येत व तेथे आवश्यकतेनुसार खाण्यापिण्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था केली जाई. अनेक सधन लोक आपल्या मानसिक समाधानाकरिता आणि पापक्षालनाच्या हेतूने धर्मशाळा बांधत. मृत आप्तांच्या स्मृतिप्रीत्यर्थही धर्मशाळा बांधण्यात येत.

सकृत्‌दर्शनी धर्मशाळा

सकृत्‌दर्शनी धर्मशाळांची निर्मिती धार्मिक प्रेरणेतून झाली असली, तरी समाजकल्याणाच्या दृष्टीने त्यांची कामगिरी विशेष महत्त्वाची ठरते. भारतासारख्या विस्तृत देशात सांस्कृतिक ऐक्याची भावना विकसित करण्याच्या दृष्टीने तीर्थयात्रांना विशेष महत्त्व आहे व त्यादृष्टीने यात्रेकरूंना निवारा व प्रसंगी भोजनादींची व्यवस्था करणाऱ्या धर्मशाळांचे कार्य महत्त्वाचे ठरले.

शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी

शैक्षणिक क्षेत्रातही धर्मशाळांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. अनेक धर्मशाळांना पाठशाळा जोडलेल्या असत. त्यांतून धार्मिक शिक्षण देण्यात येई. विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय तेथेच करण्यात येत असे. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी आपद्‌ग्रस्तांच्या तात्पुरत्या वसाहतींकरताही धर्मशाळांचा उपयोग होत असे. निराश्रितांकरिता तर धर्मशाळा हे एक वरदानच ठरले होते. अशा रीतीने कालांतराने धर्मशाळांना व्यापक कार्यक्षेत्र असलेल्या समाजसेवाकेंद्राचे स्वरूप प्राप्त झाले.

आधुनिक काळात विशिष्ट संस्थांकडे धर्मशाळांचे कार्य हस्तांतरीत झालेले आढळते. संत गाडगे महाराजांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा उभारल्या आहेत.

लेखक:पु. ल. भांडारकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

2.94736842105
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/16 18:51:50.964192 GMT+0530

T24 2019/06/16 18:51:50.970932 GMT+0530
Back to top

T12019/06/16 18:51:50.526465 GMT+0530

T612019/06/16 18:51:50.547569 GMT+0530

T622019/06/16 18:51:50.628159 GMT+0530

T632019/06/16 18:51:50.629115 GMT+0530