অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वंचितांच्या घरांत प्रकाश फुलवणारी सौभाग्य योजना

वंचितांच्या घरांत प्रकाश फुलवणारी सौभाग्य योजना

अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा. मात्र आजच्या काळात वीज हीदेखील एक मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय विकासाची कल्पना करता येत नाही. मात्र देशाच्या अनेक घरांत आजही वीज पोहोचलेली नाही. विजेपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने सौभाग्य योजना सुरू केली आहे. केवळ शहरच नव्हे तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि वाड्यावस्त्यांमधून राहणाऱ्या शेवटच्या घटकांनाही वीजजोडणी देऊन आधुनिक भारताच्या विकासात समाविष्ट करून घेण्याची संकल्पना म्हणजेच केंद्र शासनाची ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात 'सौभाग्य'.

देशातील नागरिकांना २४ तास वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी २५ सप्टेंबरला 'सौभाग्य' योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत डिसेंबर-२०१८ पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रात या योजनेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गतवर्षी डिसेंबर महिन्यात झाले. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात सौभाग्य योजनेच्या कामाने वेग घेतला आहे.

राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६ वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे १ कोटी ३७ लाख ९२ हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्यापाडे व घरांना सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून डिसेंबर २०१८ पर्यंत वीज देण्याचे काम वेगात सुरू आहे. राज्यात ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे १ कोटी ४० लाख २६ हजार ३५३ आहे. त्यापैकी १ कोटी ३७ लाख ९२ हजार १२५ घरात यापूर्वीच वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहे. उर्वरित २ लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य व दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार असून याबाबतची कामे मोठ्या प्रमाणात सूरू आहेत. मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार ९२८ असून महावितरणने या सर्व गावांत वीज पोहोचविली आहे. यात २०१८ मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचाही समावेश आहे.

महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदुरबार, पालघर जिल्हा तसेच मेळघाटासारख्या काही अतिदुर्गम भागासह राज्यातील इतर भागांतही अनेक घरे अजूनही विजेपासून वंचित आहेत, ज्यांच्याकडे दारिद्र्यरेषेखालील लाभार्थीचे ओळखपत्र नाही किंवा वीजजोडणीचा खर्च करण्याची क्षमता नाही. अशांच्या घरकुलांनासुद्धा सौभाग्य योजनेअंतर्गत नि:शुल्क वीजजोडणी देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अतिदुर्गम भागातील २१ हजार ५६ घरकुलांना महाऊर्जाद्वारे स्वतंत्र सौर ऊर्जा संचामार्फत वीजजोडणी देण्यात येणार आहे.

देशभरातील तब्बल ४ कोटी घरांना वीजजोडणी देण्यासाठी, गावागावात वीज पोहोचावी यासाठी केंद्र शासनाने तब्बल १६ हजार कोटींपेक्षा अधिकच्या निधीची तरतूद केली आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत तर इतरांना केवळ ५०० रुपयांत वीज जोडणी देण्यात येणार आहे. या रकमेचा भरणा वीजग्राहकाला १० सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीजजोडणी दिली जाणार असल्याने रोजगारांच्या संधीत वाढ होऊन स्त्रियांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणांचे नवीन दालन उघडणार आहे. सौभाग्य योजनेतून गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील कुटुंबाच्या घरांपर्यंत वीज पोहोचली आहे. आयुष्यात प्रथमच वीज पाहिलेल्या या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. राज्यात महावितरण कंपनीतर्फे माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्राहकांना अत्यंत पारदर्शक व चांगली सेवा देण्यासोबतच कामकाजात सुलभता व प्रभावीपणे कार्यशैली वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या सेवेचा ग्राहकांना चांगला लाभ मिळणार आहे. गरिबांना मोफत वीजजोडणी देण्यासाठी सौभाग्य योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या गावात अद्याप वीज पोहोचली नाही, तेथे वीज पोहोचविण्याचे काम गतीने सुरू आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

* सन २०११ च्या सामाजिक आर्थिक आणि जाती जनगणनेमध्ये नोंदविण्यात आलेल्या गरिबांना मोफत वीज कनेक्शन दिले जाईल.

* जनगणनेत नावे नसलेल्यांनाही दहा टप्प्यांमध्ये वीज बिलाच्या स्वरूपात पाचशे रुपये भरून वीज कनेक्शन दिले जाईल.

* दुर्गम क्षेत्रात व‌िजेपासून वंचित असलेल्या घरांना बॅटरी बँक उपलब्ध करून दिली जाईल. ही बॅटरी म्हणजे २००-३०० डब्ल्यूपी सौरऊर्जेचा पॅक असून तिच्या माध्यमातून पाच एलईडी बल्ब, एक पंखा आणि एक पॉवर प्लगसाठी वीजपुरवठा केला जाईल.

योजनेचा फायदा

* सौभाग्य योजनेतून प्रत्येक गरीबाच्या घरात वीजजोडणी मिळणार.

* योजनेचा लाभ घेण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही.

* महिलांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडणार.

* विजेवरील उपकरणांच्या वापरामुळे जीवन सुकर होणार.

* रोजगारांच्या संधीत वाढ होणार.

राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा किंवा १९१२, १८००-१०२-३४३५, १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

- ज्ञानेश्वर आर्दड

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate