অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

EduDonorImages

EduDonorImages

(१७ सप्टेंबर १९१५–९ जून २०११). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय चित्रकार. त्यांचा उल्लेख भारताचा‘पिकासो’ म्हणून केला जातो. चित्रकारिता, छायाचित्रण, चित्रपटनिर्मिती, काव्य अशा अनेक क्षेत्रांत आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटविणारे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव मकबूल फिदा हुसेन; पण एम्. एफ्. हुसेन या नावानेच सर्वपरिचित. त्यांचा जन्म पंढरपूर (महाराष्ट्र) येथे सुलेमानी बोहरा जमातीत फिदा हुसेन आणि झूनाइब या दांपत्यापोटी झाला. लहानपणीच त्यांच्या आई निवर्तल्या. वडिलांनी दुसरे लग्न केले व ते इंदूरमध्ये स्थायिक झाले. त्यांचे सासरे सिद्धपूर (गुजरात) येथे धर्मगुरू होते. वडिलांनी त्यांना इस्लाम धर्माची शिकवण घेण्यासाठी आपल्या सासऱ्यांकडे पाठविले. पुढे त्यांचे शालेय शिक्षण इंदूर येथेच झाले.

इंदूरमधील होळकर प्रदर्शनात त्यांच्या चित्राला सुवर्णपदक मिळाले. नंतर व्ही. डी. देवळालीकर यांच्या कलाशाळेत हुसेन यांनी काही काळ कलाशिक्षण घेतले होते. ते इंदूरमध्ये शिकत असताना अभिजात शैलीतील चित्रे रंगवायला त्यांनी सुरुवात केली.

१९३४ मध्ये हुसेन मुंबईत आले, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये द्वितीय वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडले आणि तेथे ते चित्रपटांची भव्य भित्तिपत्रके (पोस्टर्स) रंगवू लागले. त्या दरम्यानच त्यांची विख्यात ज्येष्ठ चित्रकार  ना. श्री. बेंद्रे यांच्याशी ओळख झाली. त्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. मोठमोठ्या आकारांतील चित्रे रंगवायचा सराव त्यांना झाला; तथापि त्यात अर्थप्राप्ती अधिक होत नव्हती. त्यामुळे त्यांनी लाकडी खेळणी तयार करण्याची नोकरी स्वीकारली. इंदूरचा ऐटबाज टांगा आणि लाकडी हिरवेगार पोपट त्यांनी बनवले. खेळण्याचे अभिकल्प स्वतः करण्याच्या सवयीचीही पुढे त्यांच्या चित्रशैलीस मदत झाली.

हुसेन मुंबईत वास्तव्यात असताना महमुदा बीबी नामक विधवा स्त्रीच्या खानावळीत जेवत असत. तिची मुलगी फाजिला हिच्याशी त्यांचा निकाह झाला (११ मार्च १९४१). त्यांना सहा अपत्ये झाली. विख्यात चित्रकार शमसाद हुसेन हे त्यांपैकी एक होत.

या सुमारास हुसेन यांची चित्रे लोकांसमोर येऊ लागली. बाँबे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात सुनहरा संसार हे त्यांचे चित्र झळकले (१९४७); तर त्याच सुमारास कुंभार हे चित्रही प्रदर्शित झाले. ग्रामीण जीवनाच्या पार्श्वभूमीवरील त्यांची ही चित्रे विशेष गाजली. त्यानंतर ?फ्रान्सिस न्यूटन सोझा या क्रांतिकारक विचारसरणीच्या चित्रकाराने स्थापन केलेल्या ‘बाँबे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ या प्रागतिक चित्रकार संघात ते सामील झाले. या प्रागतिक चित्रकार गटाच्या सर्व कलावंतांचा कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आधुनिक होता. रंगांकडे आणि आकारांकडे पाहण्याची त्यांची पाश्चात्त्य धाटणी व पाश्चात्त्य तंत्र हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य होते. पुढे सोझा, रझा आणि अकबर पदम्सी हे ‘प्रोग्रेसिव्ह ग्रूप ‘मधील चित्रकार पॅरिसला गेले आणि हा गट संपुष्टात आला; पण हुसेन यांची कलासाधना मात्र चालूच राहिली. हुसेन यांच्या चित्रांचे पहिले स्वतंत्र चित्रप्रदर्शन १९५० मध्ये झुरिक येथे भरले. त्यांचा जीवनाभिमुख विषयांकडे ओढा असल्यामुळे मानवी आकृतींतून तो अभिव्यक्त होत राहिला. अमूर्त अभिव्यक्तिवादी पाश्चात्त्य शैलीतून भारतीय परंपरेला अनुसरणारे विषय त्यांनी चितारले. होळी, बाळाराम स्ट्रीट, मराठी स्त्रिया, टोपलीतील मूल, बाहुलीचं लग्न, रेड न्यूड इ. त्यांच्या चित्रांना विशेष कीर्ती लाभली. लॉर्ड अँड लेडी रिसीव्ह्ड बाय हिज हायनेस महाराजा होळकर या चित्रात इंदूरचा संदर्भ आहे. हुसेन यांना १९५२ मध्ये चीनला जाण्याची संधी मिळाली. तेथील प्रसिद्ध चित्रकार चि पै हंग यांची घोड्यांची चित्रे पाहून त्यांना प्रेरणा मिळाली व त्यांनी घोड्यांची चित्रमालिकाच बनविली. घोडे हा त्यांचा आवडता चित्रविषय होता. त्याचे मूळ मोहरममध्ये निघणाऱ्या एका ताबूतात नाचविण्यात येणाऱ्या ‘टुलटुल’ या घोड्यात आहे. त्यांनी आतापर्यंत पन्नास हजारांहून अधिक चित्रकृती घडविल्या असून, त्यांत स्पायडर अँड द लँप, इमेजिस ऑफ द राज, मदर तेरेसा, पोट्रेट ऑफ अ‍ॅन अम्ब्रेला, घाशीराम कोतवाल (विजय तेंडुलकरांच्या नाटकावर आधारित) आदी गाजलेल्या चित्राकृतींचा समावेश होतो. रामायण, महाभारत आणि हाजयात्रा या त्यांच्या चित्रमालिका जगभर गाजल्या. पैकी रामायण व महाभारत या मालिका त्यांनी राम मनोहर लोहियांच्या सूचनेवरून चितारल्या होत्या. जपानच्या वतीने, ‘नेव्हर अगेन’ या हीरोशीमा-नागासाकी शहरांच्या विध्वंसाच्या स्मृत्यर्थ भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारावरील सु. दहा मीटर (३३ फुट) कॅन्व्हॉस हुसेन यांनी रंगविला होता. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांना भेटीदाखल देण्यात आलेले महात्मा गांधींचे चित्रही हुसेन यांनीच चितारले होते.

हुसेन यांच्या रंगयोजनेत अमूर्त अभिव्यक्तिवादी (अ‍ॅबस्ट्रॅक्ट एक्सप्रेशनिझम) चित्रशैलीचा प्रभाव असल्याचे जाणकारांचे मत आहे. गडद रंग व मुक्त तथा दमदार रेषा ही त्यांची वैशिष्ट्ये असून अ‍ॅक्रिलिकसारख्या माध्यमाचा प्रभावी वापर त्यांनी केला आहे. सेरीग्राफ व सुलेखन यांचाही उत्कृष्ट वापर त्यांनी केला आहे. त्यांच्या चित्रकृती प्रतिमांकित असतात, तसेच त्यांत प्रतीकात्मकताही असते. जलरंगात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या चित्रांत, चित्र रंगविण्यात आणि त्यांच्या जगण्यात एक तीव्र आसक्ती (पॅशन) दिसून येते. व्यक्तिचित्रे, भित्तिचित्रे, चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) यांसारखे चित्रप्रकारही त्यांनी सारख्याच सामर्थ्याने हाताळले असून, तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनीही त्यांना व्यक्तिचित्रासाठी बैठक (सिटिंग) दिली होती.

मद्रास (चेन्नई) येथील कलासंग्रहालयात जाऊन हुसेन यांनी चोल-शिल्पे व खजुराहो-शिल्पे यांची २०० रेखाटने केली (१९५४). १९८७ मध्ये त्यांनी विख्यात भारतीय भौतिकीविज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांना आदरांजली म्हणून ‘द रामन इफेक्ट’ (रामन परिणाम) यावर चित्रमालिका केली. हुसेन यांचे वेगळ्या प्रकारचे काम म्हणून त्याची दखल घेतली गेली.

हुसेन यांच्या चित्रांची प्रदर्शने देश-विदेशांतील अनेक प्रमुख शहरांत भरली. साऊँ पाउलू (ब्राझील) येथे भरलेल्या द्वैवार्षिक चित्रप्रदर्शनात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते (१९७१). तेथे त्यांनी महाभारतावरील चित्रमालिका प्रदर्शनात मांडली. महान स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो यांनाही तेथे निमंत्रण होते. पुढे १९९२ मध्ये मुंबईत हुसेन यांनी भरविलेल्या ‘श्वेतांबरी ‘प्रदर्शनाने कलाजगतात चांगलीच खळबळ उडवून दिली होती.

चित्रपटसृष्टीशीही हुसेन यांचा निकटचा संबंध राहिला आहे. ‘फिल्म्स डिव्हिजन’ (प्रभाग) करिता त्यांनी थ्रू द आइज् ऑफ अ पेंटर (१९६७) हा लघुपट निर्माण केला होता. त्यासाठी त्यांना बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात ‘गोल्डन बेअर’ हे सर्वोच्च पारितोषिक मिळाले. गजगामिनी (२०००) व मीनाक्षी : अ टेल ऑफ थ्री सिटीज याहिंदी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही त्यांनी केले. त्यांनी काही इंग्रजी कविताही केल्या आहेत. सूफी काव्याचे वाचन करून त्यांनी त्यावर चित्रमालिका तयार केली होती (१९७८).

हुसेन यांच्या चित्रांसंबंधी अनेक पुस्तके प्रकाशित झाली. त्यांपैकी अयाझ एस्. पीरभॉय यांचे पेंटिंग्ज ऑफ हुसेन (१९५५) हे उल्लेखनीय पुस्तक. टाटा स्टील इंडस्ट्रीजने त्यांच्यासंबंधी तब्बल पाच किग्रॅ. वजनाचे एक पुस्तक प्रकाशित केले (१९८८). १९८३ मध्ये ‘पंडोल आर्टगॅलरी ‘ने स्टोरी ऑफ अ ब्रश हे पुस्तक हुसेन यांच्यावर प्रकाशित केले असून, त्यात त्यांची कहाणी त्यांच्याच हस्ताक्षरात छापण्यात आली आहे. त्यांच्या चित्रांचे आणखी एक दुर्मिळ पुस्तक म्हणजे ट्रँगल्स. हुसेनसह ब्रिटिश लेखक डेव्हिड वार्क आणि ज्योतसिंग या तिघांचे हे संयुक्तपुस्तक; मात्र त्याच्या केवळ ५०० प्रतीच छापल्या गेल्या.

हुसेन यांना चित्रकलेतील त्यांच्या योगदानाबद्दल अनेक मानसन्मानलाभले; त्यांत ‘पद्मश्री’ (१९५५), ‘पद्मभूषण’ (१९७३) व ‘पद्मविभूषण’ (१९९१) हे राष्ट्रीय सन्मान; मध्य प्रदेश सरकारचा ‘कालिदास सन्मान’ (१९८८); केरळ सरकारतर्फे मानाचा ‘राजारविवर्मा’ पुरस्कार (२००७) हे महत्त्वाचे पुरस्कार होत. ‘रॉयल इस्लामिक स्ट्रॅटेजिक स्टडीज सेंटर ‘ने हुसेन यांचा मुस्लिम प्रभावी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणून गौरव केला (२०१०). चीन येथे भरलेल्या जागतिक शांतता परिषदेत (१९५२) डॉ. सैफुद्दिन किचलू यांच्या अध्यक्षतेखाली सहभागी झालेल्या ६० सदस्यीय शिष्टमंडळात हुसेन यांचा समावेश होता. १९८६ मध्ये त्यांची राज्यसभेवर नेमणूक झाली होती; तथापि एवढी उदंड लोकप्रियता व मानमरातब लाभूनही हुसेन यांचे व्यक्तिमत्त्व सदैव वादग्रस्त राहिले. त्यांच्या हिंदू देव-देवतांच्या चित्रांच्या संदर्भात हिंदू संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातच त्यांनी २००६ मध्ये ‘भारताच्या नकाशास व्यापून राहिलेली नग्न स्त्री’ असे भारतमातेचे तथाकथित चित्र काढले. विविध हिंदू संघटनांनी या चित्राला आक्षेप घेतल्याने हुसेन यांना जाहीर माफी मागून, प्रदर्शनातून ते चित्र मागेघ्यावे लागले. त्याच वर्षी हरिद्वार न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक--वॉरंट जारी केले होते. त्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे ते तथाकथित भारतमातेचे वादग्रस्त चित्रकेवळ कलेचा एक नमुना-अभिव्यक्ती असल्याचा निर्णय देऊन त्यांना निर्दोष ठरविले (२००८); तथापि हुसेन यांना २००९ मध्ये देश सोडावा लागला. भारत सोडल्यानंतर ते दुबईत वास्तव्यास होते. तेथे त्यांनी नंतर ‘रेडलाइट म्यूझीयम’ची स्थापना केली. भारतीय नागरिकत्व त्यागूनत्यांनी नंतर कतारचे नागरिकत्व स्वीकारले (२०१०). तेथे त्यांनी अरबी संस्कृतीचा इतिहास व भारतीय संस्कृतीचा इतिहास या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम केले.

हुसेन हे नेहमी अनवाणी चालत. ‘ज्या पृथ्वीचा मी एक भाग आहे, तिच्याशी माझं नातं जोडलं जावं’, असा त्यामागचा त्यांचा दृष्टिकोन होता. आयुष्याची अखेरची काही वर्षे त्यांनी दोहू, कतार आणि लंडन येथे वास्तव्य केले; मात्र भारतात परतण्याची तीव्र इच्छाही त्यांनी व्यक्त केली. संवेदनशील, सच्चा कलावंत असलेल्या हुसेन यांचे सतत प्रयोग-शील असणे, हीच त्यांची ताकद होती. त्यांच्या प्रत्येक चित्रांत एक आश्चर्यचकित करणारा दृश्य-परिणाम आहे. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य भाग होता. विषयात पूर्णपणे शिरून व्यक्त होत रहाणे, आयुष्यात ध्येयाप्रती झोकून देणे, यश-अपयश पदरात काय पडेल याकडे लक्षन देता, निर्भयपणे वाटचाल करीत राहणे हा त्यांचा स्वभावधर्म होता.जात, धर्म, देश यांच्या पलीकडे जाणारे वैश्विक माणूसपण त्यांच्यात होते. सगळ्यांपासून अलिप्त असलेला माणूस या अर्थाने हुसेन यांचे व्यक्तिमत्त्ववैश्विक होते.लंडन येथे त्यांचे निधन झाले.

लेखक : प्रभाकर कोलते, सु. र. देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate