অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामान बदलाचे परिणाम

यंदा प्रथमच धुळीच्या वादळाचा फटका महाराष्ट्राला बसला. आखात - पाकिस्तानसह पश्‍चिमी चक्रावात आखाती देशांतून पाकिस्तान, राजस्थान, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, चोपडा, पश्‍चिम महाराष्ट्र, पुणे, नाशिक, नगर, सातारा, मुंबई, मराठवाड्यातील परळी वैजनाथ, परभणी, पाथ्री, सोलापूर जिल्ह्याचा भाग या संपूर्ण परिसरात ता. 20 मार्च रोजी सुरू झालेली धुळीची वादळे दिसून आली.

आकाशातील हवा भुरकट, दुहीसारखी (ज्यास इंग्रजीत "हेज' असे म्हणतात), तसेच त्यामध्ये बाष्पाचे अतिसूक्ष्म कण आणि नेहमीपेक्षा पाच ते सहा पट अधिक प्रमाणात धुळीचे कण असल्याचे दिसून आले. धुळीच्या कणांचे प्रमाण हवेत 200 पी.पी.एम. इतपत असते (इंग्रजीत "एरिसॉल' म्हणून संबोधतो) ते वाढून 1200 पी.पी.एम.पर्यंत वाढल्याने जळगाव आणि चोपडा भागात 1000 मीटर अंतराच्या पुढील भाग दिसत नव्हता; तसेच मुंबई शहरात ते 21 मार्चला अधिक प्रखर होते. तेथे 100 मीटर अंतराच्या पुढील भाग स्पष्ट दिसत नव्हता.

अशी घडतात धुळीची वादळे

पृथ्वीभोवती असलेल्या हवेला विशिष्ट दाब असतो. तो मिलीबार किंवा हेप्टापास्कलमध्ये मोजला जातो. वातावरणात सूर्यप्रकाशाची किरणे पडताच पृथ्वीचे तापमान वाढण्यास सुरवात होते. पृथ्वीच्या जवळचे हवेचे थर तापतात आणि त्यावरील थर थंड असतात, त्यामुळे तेथे हवेचा दाब जास्त असतो. नैसर्गिकपणे हवा वरून खाली वाहते; मात्र त्या थरात काही उंचीवर थंड हवा असल्याने ती हवा पुन्हा आणखी खालच्या दिशेने वाहते. यालाच "एअर इन्व्हर्जन' म्हणतात. त्यातून धुळीचे कण मोठ्या प्रमाणात पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या थरात येऊन लोंबकळत राहतात. राजस्थान, गुजरात आणि उत्तर महाराष्ट्र प्रदेशात हवेचा दाब कमी झालेला होता, त्यामुळे आखाती प्रदेशाकडून हवेबरोबर वाहत येणारे धुळीचे कण हवेत तरंगत राहिले.

मुंबईभोवती हवेचा दाब 1010 हेप्टापास्कल होता; तर मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशकडे तो 1012 हेप्टापास्कल होता. त्यामुळे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत राहिली. या भागात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात जमा झाले. राजस्थानात मार्च महिन्यात अशी धुळीची वादळे सतत होत असतात. त्याचा प्रभाव आजपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्रापर्यंत होत नव्हता. धुळीसोबत हवेतील बाष्पही लोंबकळत राहिल्याने "हेज'चे वातावरण अनुभवण्यास मिळाले. ते दिवसभर टिकून राहिले.

21 मार्चला सूर्य विषुववृत्तावर असतो. त्यापुढे त्याचा प्रवास उत्तर गोलार्धाच्या दिशेने म्हणजेच कर्कवृत्ताच्या दिशेने होतो. त्या दिवशी मार्च महिन्यातील किमान तापमानाची नोंद झाली. धुळीमुळे पिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढेल, तसेच मानवामध्ये श्‍वसनाचे आजार, स्वाइन फ्लूचे प्रमाण वाढणे, फुफ्फुसाचे आजार आणि अस्थमिक विकार वाढू शकतात. मार्च महिन्यात अशा प्रकारे दूषित हवामान होण्याचे हे पहिलेच उदाहरण असावे.

हवामान बदलाचे पीकनिहाय परिणाम

द्राक्ष

9 फेब्रुवारी रोजी शून्यानजीक पोचलेल्या नीचांकी तापमानामुळे व आठवडाभर अतिथंडीने द्राक्ष पिकाचे मोठे नुकसान झाले. राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर, नगर, पुणे या द्राक्ष उत्पादक जिल्ह्यांतील 30 टक्के द्राक्षांची काढणी अद्याप बाकी आहे. गतवर्षाच्या तुलनेत दर 30 ते 40 टक्‍क्‍यांनी कमी आहेत. या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून थंडी वाढण्यास सुरवात झाली. जानेवारी महिन्यात किमान तापमान सहा ते सात सेल्सिअसच्या दरम्यान राहिल्याने सफेद वाणांच्या फुगवणीवर व साखर निर्मितीवर विपरीत परिणाम झाला, त्यामुळे द्राक्ष हंगामही लांबला.

ज्या भागात संजीवकांचा अतिवापर झाला, त्या भागातील बागा अतिथंडीला प्रामुख्याने बळी पडल्याचे दिसून आले. गोडीवरही थंडीचा परिणाम झाला. कमी गोडीमुळे बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगाल, जम्मू-काश्‍मीर येथील बाजारपेठेतील मागणी घटली. परदेशात ढाका (बांगलादेश), काठमांडू (नेपाळ), मलेशिया, हॉंगकॉंग, दुबई, रशिया या देशांत काळ्या रंगाच्या द्राक्षांना चांगला प्रतिसाद लाभला; मात्र युरोपमध्ये इंग्लंड, जर्मनी येथे दर वर्षीच्या तुलनेत 30 टक्के मालाचा उठाव झाला. द्राक्षमालाच्या निर्यातीवर या वर्षी मोठा परिणाम झाला. हा सर्व हवामान बदलाचाच परिणाम असल्याने शेती क्षेत्रावर आणि द्राक्ष बागायतदारांच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामाचा विचार शासन पातळीवर होणे गरजेचे आहे.

ऊस

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट झाल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील हिरवेगार उसाचे पीक वाळू लागले. आजरा तालुक्‍यातील वाटंगी, सिरशिंगी, एमेकोड, किणे, शेळप या परिसरातील सुमारे 100 एकर क्षेत्रावरील ऊस पिकास मोठा फटका बसला. थंडीमुळे या परिसरातील खोडवा पिकाची वाढ खुंटल्याचे आढळून आले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात मोठे चढ-उतार पाहावयास मिळाले. हवा कोरडी आणि थंड वारे यामुळे उसाची सुरळी वाळणे, पानावर डाग पडणे अशा स्वरूपाचे परिणाम दिसून उसाचे पीक वाळू लागले. साधारणपणे 1 मार्च ते 4 मार्च या कालावधीत किमान तापमान 8.4 ते 9.5 सेल्सिअस म्हणजेच 10 सेल्सिअसपेक्षा कमी होते. यावरून 48 ते 72 तास हवेचे दिवसाचे व रात्रीचे तापमान कमी राहिल्यास असे परिणाम होत असून, ऊस पीक किमान तापमानास संवेदनक्षम असल्याचे अनुमान निघते.

घोसाळी - दोडका

किमान तापमानास संवेदनक्षम असणारी ही दोन्ही पिके आहेत. या दोन्ही पिकांवर थंडीचा मोठा परिणाम झाल्याने बाजारात पिकांचे उत्पादन दिसत नाही. यावरून थंड हवामानाचा वेलवर्गीय पिकांवर मोठा परिणाम होतो हेच अनुमान निघते.

काकडी

गेले दोन महिने काकडीचे थंड हवामानामुळे नुकसान झाले. बाजारात काकडीचा मागणीनुसार पुरवठा होत नाही. थंडीमुळे लागवड केलेले बियाणे अथवा रोपे वाढू शकली नाहीत.

आंबा

या वर्षी कोकणातील हापूस आंब्यावर फुलकिडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून, मोहराचे नुकसान झाले आहे. किडीची पैदास वाढण्यास हवामान अनुकूल ठरले असून, देशावर आणि मराठवाड्यात या किडीचा प्रादुर्भाव वाढणे शक्‍य आहे, त्यासाठी उपाययोजना करावी.

 

स्त्रोत: अग्रोवन ३१ मार्च २०१२

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate