অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंद्रीय खतांची निर्मिती हवी मोठ्या प्रमाणात

शेतीची शाश्‍वतता टिकवून ठेवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांच्या निर्मितीची गरज आहे. ग्रामीण भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन याच्या निर्मितीस व्यवसायाचे स्वरूप देण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या गरजेइतकी तरी सेंद्रिय खते आपल्या शेतावर उपलब्ध स्त्रोतांमधून तयार केल्यास खर्चात बचत होईल.

आपल्या राज्यात सेंद्रिय शेतीच्या धोरणांस शासनमान्यता मिळाली असून, त्यानुसार जवळपास 10 टक्के क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. मुळातच कोणत्याही शेतीसाठी सेंद्रिय निविष्ठांची अत्यंत गरज असतेच. शेतीसाठी सतत तीव्रतेने वापर होत असणाऱ्या जमिनीत सेंद्रिय खतांचा वापर जवळपास नाहीसा किंवा तुलनेने कमी झाला आहे. त्यामुळे जमिनीची प्रत खालावली आहे. वापरण्यात येणाऱ्या कोणत्याही निविष्ठांचा कार्यक्षम वापर होत नाही. खरं तर जमीन आरोग्यासाठी नियमित सेंद्रिय खताच्या वापराच्या शिफारशी आधीपासून केल्या गेल्या; परंतु सेंद्रिय खतांच्या कष्टदायक निर्मितीस आळा देऊन बाजारात सहज उपलब्ध कृत्रिम खतांचा फक्त वापर केला गेला.

शेतीची शाश्‍वतता टिकवून ठेवण्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खतांच्या निर्मितीची गरज आहे. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी पुढाकार घेऊन त्या निर्मितीस व्यवसायाचे स्वरूप देण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या गरजेइतके तरी सेंद्रिय खते आपल्या शेतावर उपलब्ध स्त्रोतांमधून निर्माण करण्याची गरज आहे. 

पीक अवशेषांचा वापर वाढवायला हवा

शेतावरील उपलब्ध काडीकचरा, पिकांचे अवशेष आदींचा सेंद्रिय खतांच्या निर्मितीस मोठ्या प्रमाणात वापर करण्याची गरज आहे. शेतावर उपलब्ध पीक अवशेषांचे कर्ब-नत्र गुणोत्तर यावर त्यांचे कुजणे अवलंबून असते. सर्वसाधारणपणे द्विदल पिकांचे अवशेष किंवा मूग, उडीद, तूर, सोयाबीन आदींचे कुटार, त्यांच्यातील कमी कर्ब-नत्र गुणोत्तरामुळे सहजासहजी आणि लवकर कुजते. गव्हांडा, कापसाच्या पराठ्या, उसाचे पाचट यांच्यामधील कर्ब-नत्र गुणोत्तर तुलनेने जास्त असून, ते कुजायला जास्त वेळ लागतो. परंतु या सर्व पीक अवशेषांमध्ये जमीन सुधारण्याची मोठी क्षमता आहे. त्यांच्यामध्ये पिकांसाठी आवश्‍यक मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असतात. रासायनिक खतांना काही अंशी पर्याय म्हणून किंवा त्यांची मात्रा कमी करण्यासाठी या पीक अवशेषांचा शेतीत पुनर्वापर करणे गरजेचे आहे.

पीडीकेव्ही डी-कंपोजरची घ्या मदत

  1. शेतावरील पिकांचे अवशेष जाळून न टाकता त्यांच्या उत्तम प्रकारचे कंपोस्ट करण्यासाठी वापर करणे गरजेचे आहे. शेतावरील पिकाचे अवशेष लवकर कुजून कंपोस्ट तयार करण्यासाठी जिवाणू खते वापरणे फायद्याचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने असे "पीडीकेव्ही डी-कंपोजर' बनविलेले आहे. एक किलो "पीडीकेव्ही डी-कंपोजर' प्रती टन काडीकचऱ्यासाठी वापर करावा.
  2. काडीकचऱ्यापासून शेतावरच तयार केलेल्या कंपोस्टमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांच्यासह इतरही अन्नद्रव्ये असतात.
  3. राज्यामध्ये शासनाने जमीनसुधारणा कार्यक्रमांतर्गत 60 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जस्ताची व लोहाची कमतरता असलेल्या तालुक्‍यांत त्यांचा वापर प्रत्येकी 30 किलो प्रती हेक्‍टरी करण्याचे योजिले आहे. या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जमिनीमध्ये का आली, याचासुद्धा विचार करणे गरजेचे आहे.
  4. जस्ताच्या कमतरतेसाठी झिंक सल्फेटचा वापर हा कायमचा उपाय नाही. खऱ्या अर्थाने जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. किंबहुना शेतीच्या शाश्‍वततेसाठी दूरदृष्टीपूर्वक उपाय म्हणून सेंद्रिय निविष्ठा वापरणे जास्त गरजेचे आहे. उर्वरित जमिनीमध्येसुद्धा या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भविष्यात येऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपायाच्या दृष्टीने सेंद्रिय निविष्ठांच्या वापराची गरज आहे.

शेतीसाठी आज सर्वांत महत्त्वाची निविष्ठा म्हणजे सेंद्रिय खत असून, सध्या ते अतिशय दुर्मिळ आहे. कष्टाचे आणि त्रासदायक असल्यामुळे त्याची निर्मिती पाहिजे तेवढ्या प्रमाणात दिसत नाही. परंतु या निविष्ठांच्या नियमित वापरामुळे निश्‍चितच प्रथम जमिनीची प्रत सुधारता येईल. या निविष्ठांची प्रतदेखील चांगली असणे गरजेचे आहे. राज्याच्या कृषी विभागांतर्गत निविष्ठा व गुण नियंत्रण विभागाद्वारा सेंद्रिय निविष्ठा व त्यांच्या गुणवत्तेसाठी निकष ठरविले आहेत. त्यांचे पालन करून योग्य गुणवत्तेच्या निविष्ठा जमिनीत वापरावयास हव्यात. हळूहळू पुन्हा शेतकरी सेंद्रिय पदार्थाचे जमिनीसाठी महत्त्व जाणून घेऊन त्यांचा वापर वाढविण्यास काही ठिकाणी सुरवात झालेली दिसत आहे. पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अलीकडील काही वर्षांत रासायनिक खतांच्या कमी झालेल्या वापरामागील हे एक महत्त्वाचे कारण आहे. सेंद्रिय खतांच्या वापराचे जमीनसुधारणेत महत्त्व आणि एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाबाबतचा प्रचार प्रसार आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये वाढलेली जागरुकता याचा हा परिणाम आहे, असे म्हणावयास हरकत नाही.

सेंद्रिय कर्ब हवा, तर सेंद्रिय खतांचा वापर वाढवा

  1. आपल्याकडील उष्णकटिबंधीय प्रदेशातील जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी जतन करणे, हे फार मोठे आव्हान आहे. त्यासाठी नियमित सेंद्रिय खतांचा वापर जमिनींसाठी करण्याची गरज आहे. तरच जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारून जमीन सुपीकता वाढते आणि जमिनीचे आरोग्य चांगले राहते.
  2. रासायनिक खतांमधून पिकास अन्नद्रव्ये प्राप्त होत असली तरी जमिनीस कर्ब मिळत नाही. त्यामुळे एकूणच शेतीच्या शाश्‍वततेसाठी सेंद्रिय खतांच्या निर्मितीस फार मोठे अभियानाचे स्वरूप देण्याची गरज आहे. त्यासाठी अनुदान प्राप्त करून देऊन शेतकऱ्यांना शेतावरच या खतांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
  3. सेंद्रिय खतांच्या निर्मितीस खूप मोठा वाव असून, त्यासाठी उपलब्ध स्त्रोतही आहेत. त्यासह मनुष्यबळ, बाजारभाव आणि वापरावयाचे ठिकाण या सर्वच बाबी गावातच उपलब्ध असल्यामुळे, हा लहान व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना प्रोत्साहनाची गरज आहे.

जमिनींची टिकवा सुरक्षा, शाश्‍वतता

  1. संपूर्ण देशामध्ये दीर्घमुदतीय संशोधनावर आधारित निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यात पिकांची शाश्‍वत उत्पादकता, उत्पादनाची प्रत आणि जमिनीचे आरोग्य हे सेंद्रिय खतांसोबतच संतुलित खतवापरामुळेच टिकले असल्याचे दिसून आले आहे.
  2. अन्नधान्याच्या सुरक्षिततेसाठी जमिनींची सुरक्षा आणि शाश्‍वतता यास प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. म्हणूनच सेंद्रिय निविष्ठांच्या टंचाईवर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्यांची निर्मिती आणि त्यांचा नियमितपणे वापर गरजेचा आहे.

 

स्त्रोत: अग्रोवन

 

 

 

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate