অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोल्ट्री व्यवसायाची जोड

अभयखेडा (ता. मानोरा, जि. वाशीम) येथील धनंजय राऊत यांनी आपल्या 20 एकर शेतीला पोल्ट्री व्यवसायाची सुरेख जोड दिली आहे. शास्त्रीय पद्धतीने पक्ष्यांचे संगोपन करताना मार्केटची कुशलता साधत त्यांनी किफायतशीर व्यवसायाचा मार्गच शेतकऱ्यांसमोर आपल्या कृतीतून ठेवला आहे. आमीन चौहान
धनंजय राऊत आपल्या वीस एकरांत कपाशी, सिमला मिरची, सोयाबीन, तूर, ज्वारी आदी पिके घेतात. गेली 15 वर्षांपासून सिमला मिरची घेताना शेडनेट व ठिबक सिंचनाची जोड दिली. एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन व दीड ते दोन लाख रुपये निव्वळ नफा मिळायचा. मानोरा परिसरात सिमला मिरची उत्पादकांची संख्या वाढली आहे. जादा भाव असणाऱ्या एकाच मार्केटकडे सारे शेतकरी धाव घेत असल्याने दरही कमी झाला. साहजिकच राऊत यांनी जोडधंद्याचा विचार केला. 

त्यांचे म्हणणे असे, की...

  • निव्वळ शेती फायदेशीर नाही.
  • वाढत्या महागाईला उत्पन्नाची जोड आवश्‍यक.
  • उप-उत्पादनातून शेतीस मदत मिळायला हवी.
या दृष्टीने पोल्ट्रीची निवड राऊत यांनी केली. तीन वर्षांपासून ते आपला फार्म चालवतात. सुमारे पाच हजार पक्ष्यांचे संगोपन ते करतात. पाच स्टेजचे प्रत्येकी 1000 पक्ष्यांची देखभाल होते. दर 45 दिवसांनी एक हजार पक्ष्यांच्या मोठ्या बॅचची विक्री करून एक दिवसाच्या एक हजार पक्ष्यांची खरेदी केली जाते. फार्मसाठी सात लाख रुपयांची भांडवली गुंतवणूक केली आहे. 

पक्ष्यांचे व्यवस्थापन

सर्वाधिक खर्च खाद्यावर होतो. त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. 
  • खाद्य वाया जाण्याचे प्रमाण कमी ठेवले जाते.

...या गोष्टींवर दिला भर

फार्ममध्ये हवा खेळती ठेवणे 
  • पक्ष्यांची विष्ठा वेळीच साफ केली जाते.
  • पक्ष्यांची चोच साफ असणे.
  • सहाव्या आठवड्यात पक्ष्यांची विक्री
  • पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करून नुकसान कमी करता येते.
  • उत्तम गुणवत्तेच्या पिल्लांची खरेदी लाभदायक ठरते.
  • 11 व्या दिवशी लासोटा ही राणीखेत प्रतिबंधक लस एक थेंब पिल्लांच्या नाकात किंवा डोळ्यांत टाकतात. नवीन बॅच येण्यापूर्वी कंपार्टमेंटची चांगल्या प्रकारे स्वच्छता केली जाते. पाण्याची व खाद्याची भांडी दररोज धुतली जातात. कंपार्टमेंटच्या भिंती, पडदे, लोखंडी पाइप स्वच्छ करतात. फार्मचा परिसरही स्वच्छ ठेवला जातो.
  • जमिनीवर चुन्याच्या पाण्याची फवारणी. शेणामातीने सारवण. फॉम्यॅलीनचीही काळजीपूर्वक फवारणी.
  • पिण्याच्या पाण्याची वेळीच व्यवस्था. पाण्याच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते.

संगोपनगृह रचना

शेतातील रस्त्याला लागून 10 गुंठे जागेत विहिरीलगत फार्म आहे. जमिनीपासून तीन फूट उंच विटांनी बांधकाम केले असून छतापर्यंतचा भाग मोकळा आहे. या मोकळ्या भागात लोखंडी जाळी लावली आहे. फार्मचे विभाजन समान आकाराच्या तीन कंपार्टमेंटमध्ये केले आहे. फार्मला टीन पत्र्याचे छप्पर असून त्यावर तुराट्याचे आच्छादन आहे. लोखंडी जाळीला प्लॅस्टिक कापडाचा व हिरव्या रंगाचा पडदा आहे. 
  • सुमारे 45 दिवसांपर्यंत पक्ष्यांचे संगोपन करून स्थानिक व्यापाऱ्यांना त्यांची विक्री केली जाते. दरमहा तीन बॅचची विक्री राऊत करतात. मालाचा दर्जा टिकवणे व ग्राहकांच्या मागणीएवढा माल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ते करतात. भारनियमन असल्याने इन्व्हर्टर आहे.
  • खर्डा येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. रामटेके यांच्याच मार्गदर्शनातून राऊत यांनी पोल्ट्री फार्म सुरू केला असून, त्यांचा तांत्रिक सल्ला वेळोवेळी मिळतो.

उत्पादन, विक्री व्यवस्था

तालुक्‍यातील परिसरात चिकन विक्री करणारे किरकोळ व्यापारी राऊत यांचे ग्राहक आहेत. अभयखेडा गाव परिसरातील 25 गावांतील सुमारे 25 व्यापारी 40 किलोपासून दीड क्विंटलपर्यंत पक्ष्यांची खरेदी करतात. स्थानिक आठवडी बाजारातून चिकनची विक्री केली जाते. प्रति कोंबडीला सुमारे 170 रुपयांपर्यंत दर मिळतो. बहुतांश विक्री नगदीच केली जाते. 
28.5 रुपयाने प्रति पक्षी खरेदी केली जाते. खाद्यासाठी प्रति पक्षी सुमारे 128 रुपये खर्च होतो. एका बॅचच्या फवारणीसाठी 85 रुपये, तर दरमहा 3000 रुपये वीजबिल येते. सुमारे 150 रुपये प्रति पक्ष्याच्या संगोपनासाठी खर्च होतो. कोंबड्यांची विक्री फार्मवरूनच होत असल्याने वाहतूक खर्च येत नाही. कुटुंबातील भाऊ व पत्नी यांची व्यवस्थापनात मदत होत असल्याने मजुरीवरील काही खर्च वाचतो. 
प्रति पक्षी 15 ते 20 रुपये, तर प्रति बॅच किमान 15 ते 20 हजार नफा मिळतो. महिन्याला सुमारे 40 हजारांपर्यंत नफा मिळू शकतो.

उप-उत्पादन

कोंबडी खत हे महत्त्वाचे उप-उत्पादन मिळते. एकात्मिक खत व्यवस्थापनात त्याचे महत्त्व आहे. दरवर्षी 10 ट्रॉली खत उपलब्ध होते. घरच्या 20 एकर शेतात एकरी दीड ट्रॉली असे वापरले जाते. एकूण पीक व्यवस्थापनाला या खताची जोड दिल्याने उत्पादनात चांगली वाढ झाल्याचे खालील आकडेवारीवरून दिसते.

पीक पूर्वीचे उत्पादन सुधारित शेतीतील उत्पादन

कपाशी 10-11 क्विंटल 17 क्विंटल 
सोयाबीन 7-8 क्विं. 13 ते 14 क्विंटल 
तूर 3-4 क्विं. 6 क्विंटल

व्यवसायातील जोखीम, अपेक्षा

भरपूर चढ-उतार असणारा पोल्ट्री व्यवसाय आहे. खाद्यांवर दरमहा किमान लाख रुपये खर्च होतो. माल विक्रीला येईपर्यंत खर्चाचा अंदाज येत नाही. ग्राहकांमध्ये सातत्य हा महत्त्वाचा भाग. काही वेळा तोटा सोसून विक्री करावी लागते. ग्राहकाच्या गरजेएवढे उत्पादन न झाल्यास अन्य ठिकाणांहून माल खरेदी करावा लागतो. सरासरी अडीच किलोपर्यंत वजन प्रति पक्ष्यापासून मिळते. हे वजन तापमान वा हवामान घटकांवर अवलंबून असते. जास्त थंडी किंवा जास्त ऊन याचा फटका बसतो. पावसाळ्यात कोंबड्यांचे वजन चांगले मिळत असले तरी अन्य ऋतूंच्या तुलनेत ग्राहक कमी असतात. मालाचा दर्जा चांगला ठेवल्यास अन्य बाबींचा फारसा त्रास नाही. फार्मची क्षमता आणखी पाच हजार पक्ष्यांनी वाढविणार असल्याचे राऊत म्हणाले.

टिप्स

  • सुरवातीला भांडवली खर्च खूप.
  • व्यवसायात उतरण्यापूर्वी संपूर्ण ज्ञान आवश्‍यक.
  • मांसापेक्षा अंडी उत्पादन महागडे.
  • मागणी व ऋतूप्रमाणे दरात चढ-उतार.
  • चांगले व्यवस्थापन नफा वाढविते.
  • घरगुती पद्धतीने कोंबड्यांचे व्यवस्थापन अधिक फायदेशीर.

संपर्क - धनंजय राऊत, 9011483398, 9011485982. 
अभयखेडा, ता. मानोरा जि. वाशीम

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate