অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुधारित तंत्रातून दुग्घव्यवसाय

जोडधंद्याची जोड दिल्यास शेती फायदेशीर ठरते. शिवाय जोडधंद्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावते. सोनार कामाचा पारंपरिक व्यवसाय सुरू ठेवीत पुसद (जि. यवतमाळ) येथील उमेश पंधे यांनी भोजला येथे पंधे डेअरी फार्म सुरू केला. गाई-म्हशींची सुयोग्य देखभाल व गोठा व्यवस्थापन ते करतात. दर दिवशी 150 लिटर दुधाच्या संकलनातून नफाही समाधानकारक मिळत आहे. 
उमेश व गणेश पंधे बंधूंकडे वडिलोपार्जित सहा एकर ओलिताची शेती आहे. पारंपरिक शेती करीत असतानाच या बंधूनी नोव्हेंबर 2011 मध्ये म्हैस विकत घेतली. त्यापासून बारा लिटर दूध दररोज मिळायचे. निम्मे दूध घरी ठेवून उर्वरित दुधाची ते घरूनच विक्री करीत. दुधाचा दर्जा चांगला ठेवल्याने मागणी वाढू लागली. त्याप्रमाणे व्यवसाय वाढविण्याचा निर्णय पंधे बंधूंनी घेतला. परभणी बाजारातून सहा जाफराबादी व चार मुऱ्हा म्हशी, तर नगर जिल्ह्यातील लोणी येथून 11 होलस्टिन फ्रिजीयन व एक फुले- त्रिवेणी अशा गाई विकत घेतल्या. आज त्यांच्याकडे 11 म्हशी व 12 गाई आहेत.
-जाफराबादी म्हशीच्या दुधाला फॅट चांगला मिळतो, तर फुले त्रिवेणीपासून भरपूर दूध मिळते. 
-मुऱ्हा म्हशी स्वभावाने काहीशा चंचल असल्या तरी भरपूर दूध देतात. मात्र जाफराबादीच्या तुलनेत दूध पातळ असते.

...असे आहे गोठा व्यवस्थापन

  • जनावरांना बाराही महिने हिरवा चारा पुरविण्याचे नियोजन
  • वर्षभर पुरेल एवढा कोरडा चारा विकत घेऊन साठवला जातो.
  • कडबा कुट्टीद्वारे जनावरांना दिला जातो.
  • वर्षभर चाऱ्यासाठी एक एकरात मका व यशवंत फुले गवताची लागवड
  • तोंडखुरी व पायखुरी या रोगांसाठी नियमित लसीकरण, कासदाह रोग होऊ नये यासाठी काळजी.
  • गोठ्यातील शेण ट्रॉलीद्वारे उचलले जाते.
  • गोठा रोज धुऊन स्वच्छ केला जातो.
  • दर आठवड्याला जनावरांची तपासणी
जनावरांच्या निगेसाठी एक जोडपे ठेवले आहे. 
जनावरांच्या आरोग्याची देखभाल करण्यासाठी पशुचिकित्सक 
पिण्याच्या पाण्यासाठी गोठ्यातच पाइपलाइनद्वारे व्यवस्था
गाई व म्हशींच्या देखभालीसाठी 50 x 35 फुटाचे लोखंडी अँगलचे शेड. वरती कापडी आच्छादन व खाली सिमेंटचा बेड. दोन्ही बाजूला सिमेंटच्या पक्‍क्‍या गव्हाणी. गोठ्यात 'टेल टू टेल' पद्धतीने जनावरे बांधली जातात. एका बाजूने गाई तर दुसऱ्या बाजूने म्हशी बांधतात. गाईंसाठी मुक्त संचार गोठा पद्धत सुरू केली आहे.

दुधाची काढणी यंत्राद्वारे होते

गोठा धुण्यासाठी पंधे यांनी स्वतःची पद्धत विकसित केली आहे. गव्हाणीला लागून जमिनीपासून दीड फूट उंच आडवे पीव्हीसी पाइप लावले आहेत. त्यांना विशिष्ट अंतरावर छिद्रे पाडली आहेत. पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील मोटारीला हा पाइप जोडला असून गोठा स्वच्छ करण्याच्या वेळी विशिष्ट दाबाने पाइपमधून पाणी येते. त्यामुळे दोन जनावरांच्या मधल्या जागेतून शेण निघून मधल्या नालीतून गोठ्याबाहेर संकलित होते. अशाप्रकारे कमी श्रमात गोठा स्वच्छ केला जातो. पशुचिकित्सक डॉ. सी. पी. भगवतकर व डॉ. काईट यांचे मार्गदर्शन मिळते. वडील दीपक पंधे व भाऊ गणेश यांचे मार्गदर्शन व मदत उमेश यांना होते.

दूध उत्पादन व विक्री

गाईंचे 100 लिटर व म्हशींचे 50 लिटर मिळून दररोज सुमारे 150 लिटर दूध मिळते. गाईच्या दुधाला प्रति लिटर 25 रु. तर म्हशीच्या दुधाला 40 रु. दर मिळतो. 100 लिटर दूध खासगी डेअरीला, तर 50 लिटर दुधाची घरूनच किरकोळ विक्री होते. दररोजच्या दूध विक्रीतून 4500 रुपये मिळतात. दररोजचा खर्च 2500 रु. वजा जाता 2000 रु निव्वळ नफा उरतो.

उप-उत्पादन

जनावरांपासून मिळणारे अर्धे शेणखत शेताला उपयोगी पडते. दोन एकरात पंधे यांना यंदा वीस क्‍विंटल कापूस झाला. एक एकर सेंद्रिय पपईपासून 50 हजारांचे उत्पन्न मिळाले. उर्वरित शेणखताची विक्री होते. आतापर्यंत एक लाख रुपयांच्या शेणखताची विक्री केली आहे. शेणखताचा दर्जा चांगला असल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून त्याला मागणी आहे. रेडे आणि गोऱ्ह्यांची विक्री न करण्याचा पंधे यांचा संकल्प असून नजीकच्या माहूर येथील रेणुका देवस्थानाच्या गोरक्षण संस्थानास ते दान केले जातात. आतापर्यंत सात रेडे व दोन गोऱ्हे दान केले आहेत.

पंधे बंधूंकडून शिकण्यासारखे काही

  • पाणी, जागा व चारा यांचे योग्य नियोजन करूनच दुग्ध व्यवसाय करावा
  • दूरदृष्टी ठेवूनच चाऱ्याचे नियोजन आवश्‍यक.
  • मजूर नसल्यास स्वतः काम करण्याची तयारी ठेवावी.
  • घरपोच दुधाची विक्री व्यवस्था उभारल्यास नफा वाढतो.
  • नव्या गाई विकत आणल्यावर बदललेल्या वातावरणाचा परिणाम म्हणून प्रारंभी पुरेसे उत्पादन मिळत नाही.
  • म्हशींच्या तुलनेत गाईंची जास्त काळजी घ्यावी लागते.
  • स्थानिक बाजारात घरगुती ग्राहक म्हशीच्या दुधाला प्राधान्य देतात.
  • घरगुती ग्राहक दुधाला जास्त भाव देतात.
  • मुक्त गोठा पद्धती म्हशींपेक्षा गाईसाठी उपयुक्त.
  • शेतीविषयक साहित्य, पुस्तके वाचण्याची आवड. त्यातूनच दुग्ध व्यवसायाविषयी माहिती मिळविली.
  • जास्त परिश्रम घेऊन दुधाच्या विक्रीसाठी दारोदार हिंडावे लागते. तरीही हा व्यवसाय वाढविणार आहे. जनावरांची संख्या वाढवून शहरात दुग्ध विक्री केंद्र तसेच दुग्ध प्रक्रिया उद्योग उभा करण्याचा मानस असल्याचे पंधे म्हणाले.

संपर्क - उमेश पंधे, 9822592553 
पंधे डेअरी फार्म, भोजला, ता. पुसद, जि. यवतमाळ - 9822592553 
गिरिधर ठेंगे, (8575394868)

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate