অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नंदाताईंची सुधारित शेती

दोडकी येथील नंदाताईंचे पती सुभाषराव यांनी ग्रामविकासाचा व्यासंग जपला आहे. लोकसहभागातून नदी खोलीकरण, वनराई बंधारे, गावतलावातील गाळ उपसणे, अशी अनेक कामे गावामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. सुभाषराव नानवटे हे ग्रामविकासाच्या कामात असल्याने नंदाताईंकडे आपसूकच कुटुंबाच्या शेतीची सूत्रे आली.

नंदाताईंच्या कुटुंबाची सात एकर शेती. खरिपात सोयाबीन, तूर; तर रब्बीत गहू, हरभरा लागवड असते. पाण्यासाठी शेतात विहीर आहे, परंतु रब्बी हंगामापर्यंत कसेबसे विहिरीचे पाणी पुरते. त्यामुळे कमी पाण्यात सुधारित तंत्राचा वापर करून पीक उत्पादनवाढीकडे त्यांचा प्रयत्न असतो. गेल्या वर्षी त्यांनी पहिल्यांदाच रुंद वरंबा व सरी टोकण यंत्राने गादीवाफा तयार करून त्यावर हरभरा लागवड केली. तंत्रज्ञान बदलामुळे त्यांना एकरी पाच क्‍विंटलच्या तुलनेत सात क्‍विंटलचे उत्पादन मिळाले. त्यांच्याकडे तीन म्हशी, दोन बैल आहेत. त्यामुळे शेतीला पुरेसे शेणखत मिळते. स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचा कृषिदूत गावात आहे, पीक व्यवस्थापनामध्ये त्याचे मार्गदर्शन त्या घेतात.

...असे आहे पीक नियोजन 

1) दरवर्षी सात एकर क्षेत्रावर सोयाबीनच्या जेएस-335 या जातीची लागवड असते. जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला जातो. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया, एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रणावर त्यांचा भर असतो. सोयाबीनचे एकरी सहा क्‍विंटल उत्पादन त्यांना मिळते. प्रति क्‍विंटल 3200 रुपये या दराने सोयाबीन विक्री केली. सोयाबीनच्या एकरी व्यवस्थापनावर सात हजार रुपये खर्च झाला. खर्च वजा जाता 12 हजार 200 रुपयांचा निव्वळ नफा या पिकातून मिळाला.
2) एक एकरात सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक त्यांनी घेतले होते. गतवर्षी त्यांना आंतरपिकातून तीन क्‍विंटल तुरीचे उत्पादन मिळाले. दरवाढीच्या अपेक्षेने त्यांनी अद्याप तुरीची विक्री केली नाही.
3) वाशीम येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या डब्ल्यू.एस.एम. 1472 या कमी पाण्यात येणाऱ्या गहू जातीची त्यांनी या वर्षी एक एकर क्षेत्रावर लागवड केली होती. "आत्मा'अंतर्गत प्रकल्पातून त्यांना अनुदानावर 40 किलो गहू बियाणे, 50 किलो डीएपी आणि 50 किलो युरिया खत मिळाले होते. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने सुधारित तंत्राचा अवलंब करीत त्यांना एकरी आठ क्‍विंटल उत्पादन मिळाले.

रुंद वरंबा व सरी तंत्राने हरभरा लागवड

1) कृषी विभागाने गावात सभा घेऊन हरभरा उत्पादनवाढीसाठी रुंद वरंबा व सरी पद्धतीने (बीबीएफ) पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत नंदाताईंनी या वर्षी पहिल्यांदाच हरभरा लागवड रुंद वरंबा व सरी पद्धतीने केली. या तंत्राने रुंद वरंबा 1.2 मीटर अंतराचा राहतो, त्यावर यंत्राद्वारे हरभऱ्याच्या चार ओळी बसतात. दोन ओळींतील अंतर 30 ते 45 सें.मी. ठेवता येते. पेरणी यंत्राने एका एकरातील पेरणी एक तासात होते. प्रति तास 600 रुपये या दराने भाडेतत्त्वावर पेरणी यंत्र त्यांनी कोंडाळा झामरे (जि. वाशीम) येथील राजीव इंगोले यांच्याकडून आणले होते.
3) नंदाताई दरवर्षी जाकी 9218 या जातीची लागवड करतात. या जातीचा हरभरा टपोरा असतो, मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. जिरायती तसेच ओलिताखालील जमिनीतही या जातीचे चांगले उत्पादन मिळते. घरचेच बियाणे वापरावर त्यांचा भर असतो. लागवडीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम आणि 25 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केली. त्यामुळे बियाण्यांची उगवण चांगली झाली. रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा वापर, तसेच शेणखताचा पुरेपूर वापर केल्याने जमिनीची सुपीकता टिकली आहे. जमिनीत ओलावा टिकून राहतो.
4) पारंपरिक लागवड पद्धतीत एकरी 30 किलो बियाणे लागते. तर बीबीएफ पद्धतीसाठी एकरी केवळ वीस किलो बियाणे लागले. बीबीएफ लागवड पद्धतीत ज्या ठिकाणी हरभरा बियाणे उगवले नव्हते तेथे त्यांनी दादर ज्वारी टोकली. जेव्हा ज्वारीचे दाणे खाण्यासाठी पक्षी येत तेव्हा हरभरा पिकावरील किडीही हे पक्षी खात होते. त्यामुळे आपोआप कीडनियंत्रणास मदत झाली. कीडनियंत्रणासाठी निंबोळी अर्काची फवारणी केली. तसेच शेतात कामगंध सापळे लावले होते. गरजेनुसार रासायनिक कीडनाशकांची फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने केली. पिकाला संरक्षित पाणी देण्यासाठी तुषार सिंचनाचा अवलंब केला. पिकाच्या योग्य व्यवस्थापनामुळे हरभऱ्याची चांगली वाढ झाली.
5) या तंत्रज्ञानाचे फायदे म्हणजे अवकाळी पावसाच्या काळात सरींमधून अतिरिक्‍त पाणी निघून जाते. लागवड अंतर अधिक असल्याने रोपांना खेळती हवा मिळते. गादीवाफ्यामुळे मातीमध्ये ओलावाही टिकून राहतो. हरभरा घाट्याची संख्या व आकारदेखील पारंपरिक लागवडीच्या तुलनेत चांगला मिळाला.
6) तंत्रज्ञान बदलामुळे एकरी सात क्‍विंटलचे उत्पादन मिळाले. वाशीम बाजार समितीत हरभरा विक्री केली. प्रति क्‍विंटल 2550 रुपये दर मिळाला. प्रति एकरी सहा हजार रुपयांचा खर्च झाला. हा खर्च वजा जाता निव्वळ नफा 11 हजार 850 रुपये नफा झाला.
7) शेतीमाल विक्रीची जबाबदारी नंदाताईंचे पती सुभाषराव सांभाळतात.

पॅलेटनिर्मिती उद्योगातून प्रगती

स्वयं शिक्षण प्रयोग या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून नंदाताईंनी गावामध्ये पॅलेट (कोळसा कांड्या) तयार करण्याचा लघू उद्योग उभारला. हा उद्योग सध्या सखी बचत गटाच्या मार्फत चालविला जातो. नंदाताई या गटाच्या अध्यक्षा आहेत.
या उद्योगाबाबत माहिती देताना नंदाताई म्हणाल्या, की पॅलेटनिर्मितीसाठी यंत्रसामग्रीचा खर्च साडेतीन लाख रुपये आहे. स्वयंसेवी संस्थेने यंत्रसामग्री पुरविली आहे. पॅलेट विक्रीतून यंत्र खरेदीची परतफेड करीत आहोत. या पॅलेटचा वापर सुधारित शेगड्यांना इंधन म्हणून होतो. पारंपरिक चुलीतून निघणाऱ्या धुरापासून महिलांना डोळ्यांचे आजार होतात. ते होऊ नयेत यासाठी सुधारित चुलींचा वापर या परिसरात संस्थेच्या माध्यमातून वाढला आहे. या चुलींना इंधन म्हणून पॅलेटचा वापर केला जातो. प्रति दिन 50 बॅग (प्रति दहा किलो बॅग) उत्पादन होते. या उद्योगासाठी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या जिल्हा समन्वयक तबस्सूम मोमीन, क्षेत्रीय समन्वयक माधव गोरकटे यांचे मार्गदर्शन मिळते.
1) पॅलेट तयार करण्यासाठी लागणारा लाकडाचा भुसा हा वाशीम येथील आरा मशिनवरून तीन रुपये किलो दराने, तर उसाच्या मळीची भुकटी ही उस्मानाबादवरून मागविली जाते. ही भुकटी बारा रुपये किलो दराने वाहतूक खर्चासह मिळते.
2) पॅलेट साठवणुकीसाठी असलेली ब्रॅंडनेमची बॅग त्यावरील छपाईसह सहा रुपये 15 पैशांना मिळते. मजुरी व वीज असा खर्च अपेक्षित धरता साडेसहा रुपये प्रति दहा किलो पॅलेट उत्पादनाचा खर्च आहे.
3) पॅलेटची दहा किलो बॅगची विक्री 110 रुपयांना होते. स्वयं शिक्षण प्रयोगाकडून होणारी पॅलेटची खरेदी आठ रुपये किलो दराने होते. संस्थेने उद्योग चालविण्यासाठी कोणतेच भांडवल घेतले नाही, त्यामुळे त्यांना सवलतीच्या दरात पुरवठा होतो. खासगी ग्राहकांसाठी हा दर 11 रुपये असा आहे.
4) स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेने पॅलेट (कोळसा कांड्या) या इंधनाचा वापर करून चालणाऱ्या शेगड्यांचा पुरवठा वाशीम जिल्ह्यातील गावांमध्ये केला आहे. त्याकरिता लागणारे पॅलेट या नंदाताईंकडून खरेदी केल्या जातात. त्यामुळे ग्राहक शोधण्याचाही त्रास त्यांना होत नाही. प्रति महिना 600 (प्रति दहा किलो) बॅगची विक्री होते.
नियोजनातून साधली प्रगती
1) जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेणखताचा वापर
2) तीन म्हशी, दोन बैलांचे संगोपन, त्यामुळे शेतीला पुरेशा शेणखताची उपलब्धता
3) पिकाला पाणी देण्यासाठी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब
4) कीडनियंत्रणासाठी एकरी पाच कामगंध सापळ्याचा वापर
5) पीक व्यवस्थापनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांचा सल्ला
7) अतिरिक्‍त उत्पन्नासाठी पॅलेटनिर्मिती उद्योगाची सुरवात.
8) रिचार्जपीटच्या माध्यमातून भूगर्भातील पाणीपातळी वाढविण्याचा प्रयत्न.

संपर्क  : नंदाताई सुभाष नानवटे - 9325875999

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate