Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/20 00:44:44.042034 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / मुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान
शेअर करा

T3 2019/06/20 00:44:44.047508 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/20 00:44:44.077369 GMT+0530

मुंबईपेक्षा शेतीने दिले समाधान

मुंबईतील नोकरी सोडून गोविंद चाळके कोकणात शेती करण्यासाठी आले. आता ते तिथेच स्थिरावले आहेत.

काजू प्रक्रिया, आवळा व फळबागा वाढवल्या कृषी पर्यटन केंद्राच्या दिशेने वाटचाल

मुंबईतील नोकरी सोडून गोविंद चाळके कोकणात शेती करण्यासाठी आले. आता ते तिथेच स्थिरावले आहेत. विविध फळबागांच्या लागवडीतून त्यांनी माळरानावर हिरवाई फुलवली आहे. काजू प्रक्रियेची आवड लागून त्याला व अन्य फळांनाही बाजारपेठ मिळवण्यासाठी धडपड केली आहे, त्याला चांगले यश मिळत आहे. 
रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्‍यातील कर्ली गाव दाट झाडीने वेढले आहे. गावातील देवळाजवळच निवे धरण आहे. धरणात उन्हाळ्यातही पाणी पाहायला मिळते. भोवतालच्या गर्द झाडींनी परिसर आणखी सुंदर दिसतो. याच परिसराने बारा वर्षांपूर्वी चाळके परिवाराला भुरळ घातली आणि माळरानाच्या ठिकाणी सुंदर फळबाग उभी राहिली. 

देवरूखहून रत्नागिरीकडे जाताना साधारण सहा किलोमीटर अंतरावर कर्ली गावाकडे जाणारा रस्ता आहे. गाव देवळाला लागून चाळके यांच्या बागेकडे रस्ता जातो. बागेत प्रवेश करताच फणसाची झाडे स्वागताला उभी असतात. थोडे पुढे गेल्यावर काजूच्या कलमांमधून डोकावणारे निवे धरणाचे जलाशय दृष्टिपथास पडते. संपूर्ण परिसरात नजर फिरविल्यास विविध प्रकारची फळझाडे बहरलेली दिसतात आणि मधोमध दिसते ते कृषी पर्यटनाचा आनंद देण्यासाठी बांधलेले कोकणी पद्धतीचे कॉटेज...
चाळके परिवार तसा मोठा. सख्खे, चुलत अशी मिळून सुमारे 15 भावंडे. ती सर्वजण मुंबई येथे विमा कंपनी, रेल्वे किंवा अन्य विविध ठिकाणी नोकरीस आहेत. यातील गोविंद चाळके शेअर बाजारात एके ठिकाणी नोकरीस होते; मात्र काही कारणाने त्यांची नोकरी धोक्‍यात आली. मुंबईच्या धावपळीच्या जीवनालाही ते त्रासले होते. अशा धकाधकीच्या जीवनापेक्षा कोकणात शेती करावी, असा विचार त्यांच्या मनात आला.
पुढच्या पिढीला गावाची आवड राहावी आणि तेथेच एकत्रितपणे काही विकास करता यावा यासाठी फळबाग लागवड करण्याचे निश्‍चित केले. चाळके कुटुंबीयांनी त्यानुसार कर्ली येथे 61 वर्षांच्या लीजवरच 25 एकर जमीन घेतली, त्यातील लागवडीयोग्य जमीन 20 एकरांपर्यंत आहे. चाळके भावंडांनी शेअर मार्केटच्या तत्त्वावर या शेतात भागीदारी केली. या क्षेत्रावर पूर्वी सर्वत्र माळरान पसरले होते. रानटी झाडे दाटीवाटीने उभी असल्याने दिवसादेखील या भागात फारसे कोणी फिरकत नसे. 

बागेचा विकास

सन 2000 मध्ये राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या सहकार्याने चाळके बंधूंनी फळबागेची लागवड केली. त्याआधारे काजूची सुमारे 1700, चिकू, आवळा, दालचिनी प्रत्येकी 100 आणि फणसाची 50 झाडे लावण्यात आली. बनारसी आवळ्याचीही 60 ते 70 झाडे असून आंबा, नारळ देखील आहे. फळांची रोपे कोकणातून विविध ठिकाणाहून आणली. काजूसाठी मात्र शेतातच नर्सरी तयार केली. फळबागेला लागूनच धरणाच्या पाण्याची सुविधा असल्याने त्याचा चांगला फायदा घेता आला. कृषी विभागामार्फत शेततळ्यासाठीदेखील अनुदान देण्यात आले, शिवाय चर खोदण्यासाठी सहकार्य करण्यात आले. सर्व फळबागांमध्ये चाळके यांनी काजू हे पीक मुख्य ठेवले आहे. त्याच्या वेंगुर्ला 4, 6 आणि वेंगुर्ला 7 या जातींची लागवड येथे करण्यात आली आहे. 

प्रक्रियेवर भर

सुमारे 12 वर्षांपूर्वी पाया घातलेली ही बाग आता उत्पन्न देऊ लागली आहे. गोविंद म्हणाले, की पिकवलेला माल विकण्यापेक्षा तो प्रक्रिया करून विकला तर फायदा वाढतो हे समजले. त्यानुसार 2004 मध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात आला, त्यामुळे उत्पन्न वाढले आहे. गेल्या वर्षी एकूण झाडांतून सुमारे नऊ टन, तर या वर्षी सात टनांपर्यंत काजू बीचे उत्पादन मिळाले आहे. 

काजूच्या तीन प्रतवारी केल्या आहेत

1) अखंड - किलोला 550 रुपये. दोनशे ग्रॅम वजनाच्या पाकिटात पॅकिंग केले जाते.
2) पाकळी - किलोला 500 रु.- याचेही असेच पॅकिंग होते. 
3) तुकडा - किलोला 450 रुपये
प्रक्रिया केलेल्या काजूची गुणवत्ता चांगली असल्याने ग्राहकांकडून मागणी आहे. या उद्योगाचा विस्तार करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत जोगेश्‍वरी, दादर, बोरिवली, भायखळा येथे परिचित, नातेवाईक, छोटे व्यापारी यांना माल दिला जातो. ज्यांना एक किलोच्या किंवा त्याहून जास्त वजनात पॅकिंग हवे, त्यांना त्याप्रमाणे उपलब्ध केले जाते. मुंबईतील काही चाकरमानी गावी येतात, त्या वेळी परतताना ते आपल्या परिचितांसाठी आमचा काजू घेऊन जातात असे गोविंद म्हणाले. 

प्रक्रिया उद्योगात काय होते?

काजूगर बोंडातून बाहेर काढणे गरजेचे असते. या प्रक्रियेत बॉयलर व कटिंग या प्रक्रिया केल्या जातात. ओव्हनमध्ये तो ठरावीक तापमानाला ठेवला जातो. काजूगराची टरफले वेगळी करण्याचे काम स्थानिक बचत गटांना दिले आहे. एक किलो गर सोलण्यासाठी 10 रुपये दर त्यांना दिला जातो. दिवसभरात सुमारे 10 किलो काजू याप्रमाणे सोलून होतो. काजू बी फोडण्यापासून ते टरफल वेगळे करण्यापर्यंत विविध यंत्रे आता उपलब्ध झाल्याने त्यांच्या वापरावर भर देणार असल्याचे गोविंद म्हणाले.

फणस - फळबागेतील फणस वटपौर्णिमेला मुंबईला विकला जातो.

आवळा - आवळ्याला स्थानिक बाजारात मागणी असते. बहुतांश आवळा हा दिवाळीच्या हंगामातच विकला जातो.

संगमेश्‍वर परिसरात छोटे आवळा प्रक्रिया उद्योग आहेत. त्यांना हा आवळा प्रति किलो 20 ते 25 रुपये या दराने देतो. या हंगामात सुमारे तीनशे ते चारशे किलो आवळा विकला जात असल्याचे गोविंद म्हणाले. 

बागेतील चिकूचीदेखील गुणवत्ता चांगली आहे. स्थानिक परिसरात त्याची विक्री होते.
दालचिनीही मुंबईत सणाच्या निमित्ताने प्रति किलो तीनशे रुपये या दराने 20 ते 30 किलो प्रमाणात विकली जाते. आंब्याची सुमारे 200 झाडे असून त्यात हापूस, केसर व रत्ना या जाती आहेत. 

पर्यटन केंद्राच्या दिशेने

विविध फळबागा आणि भोवतालचे निसर्ग सौंदर्य यांचा उपयोग करून उत्पन्न वाढविण्यासाठी चाळके यांनी या ठिकाणी कृषी पर्यटन सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, त्यासाठी दोन कॉटेज उभारण्यात आले. सहलीसाठी येणाऱ्यांची सुविधा व्हावी म्हणून हॉलही बांधण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 50 ते 60 पर्यटकांनी येथील वातावरणाचा आनंद घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता कॉटेजची संख्या व अन्य सुविधा वाढविण्यावर भर आहे.
या सर्व प्रकल्पाकडे मिलिंद आणि गोविंद चाळके लक्ष पुरवतात. परिवार मुंबई येथे राहात असला तरी फळबाग क्षेत्राचा विकास करण्यासाठी गोविंद मात्र गावातच राहतात. कुटुंबातील अन्य सदस्य शक्‍य तेव्हा मदतीसाठी येतात.
फळबागेत वेगळेपण असावे म्हणून मधमाशी संगोपनाचा प्रकल्पही राबविण्यात येत आहे. मधुमक्षिका पालनासंदर्भात जिल्ह्यातील खादी व ग्रामोद्योग महामंडळाची मान्यता असलेले हे पहिले प्रशिक्षण केंद्र ठरले आहे. दोन बॅचेसचे प्रशिक्षणही या ठिकाणी झाले आहे.
आपल्या प्रयोगशीलतेतून नव्या मार्गाचा शोध घेत चाळके कुटुंबीयांनी आपल्या माळरानाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून फुललेले सौंदर्य अनेकांना भुरळ पाडते आहे; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे घाम गाळला की धरतीवर स्वर्ग कसा उभारला जातो याचा प्रत्यय या भावंडांनी इतरांना दिला आहे आणि समूह शेतीचे महत्त्वही स्पष्ट केले आहे. 
संपर्क - गोविंद चाळके -- 9422652435
मुंबईतील नोकरी म्हणजे केवळ अशाश्‍वतता होती. शेती मात्र शाश्‍वत आहे, असे मला वाटते. आता कोकणात शेती करायला लागल्यापासून मी अत्यंत समाधानी आहे. येथे कसलेही प्रदूषण नाही. वातावरणही स्वच्छ, निरोगी आहे. शेतीतून फायदा घ्यायचा असेल तर प्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे असे मला वाटते, त्यादृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे.

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

2.95833333333
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/20 00:44:44.903040 GMT+0530

T24 2019/06/20 00:44:44.909628 GMT+0530
Back to top

T12019/06/20 00:44:43.855285 GMT+0530

T612019/06/20 00:44:43.874182 GMT+0530

T622019/06/20 00:44:44.031288 GMT+0530

T632019/06/20 00:44:44.032220 GMT+0530