Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia

मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / हापूस आंब्याचे उत्पादन वाढले
शेअर करा
Views
  • स्थिती: परीक्षण प्रक्रिया चालू

हापूस आंब्याचे उत्पादन वाढले

सुधारित तंत्रज्ञानामुळे बागायतदारांकडील आंबा पिकाच्या हेक्‍टरी उत्पादकतेत व फळाच्या गुणवत्तेत दीड ते दुपटीने वाढ झाली.

सन 2012-13 मध्ये दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले यांच्यामार्फत एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प राबवण्यात आला. वेंगुर्ले तालुक्‍यातील अणसूर (जि. सिंधुदुर्ग) येथे या प्रकल्पाची समूह प्रात्यक्षिके राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत घेण्यात आली. यात राबवलेल्या सुधारित तंत्रज्ञानामुळे बागायतदारांकडील आंबा पिकाच्या हेक्‍टरी उत्पादकतेत व फळाच्या गुणवत्तेत दीड ते दुपटीने वाढ झाली.

सुधारित तंत्रज्ञानाद्वारा उत्पादनवाढीचा हेतू

कोकणची बहुतांश कृषी अर्थव्यवस्था हापूस आंब्याच्या उत्पादनावर अवलंबून आहे. कोकणात आंबा पिकाखाली सुमारे एक लाख 80 हजार हेक्‍टर क्षेत्र असून, यापैकी बहुतांशी क्षेत्र हापूस जातीखाली आहे. अणसूर गावातील शेतकरी वर्षानुवर्षे आंबा उत्पादन घेत असले तरीही त्यांचे उत्पादन हेक्‍टरी दोन टनांपर्यंत सीमित होते. याचे मुख्य कारण म्हणजे या भागात आंब्यावर फुलकिडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव व्हायचा. किडीच्या नियंत्रणाकरिता बागायतदार सातत्याने एकाच कीटकनाशकाची फवारणी करायचे. यामुळे फुलकिडींत प्रतिकार क्षमता वाढून त्यांचे नियंत्रण अवघड झाले होते.

बरेच बागायतदार शास्त्रीय पद्धतीने पिकाचे व्यवस्थापन करीत नव्हते. खतांचा वापर संतुलित नव्हता. मोहोर व्यवस्थापन योग्य प्रकारे नसल्याने अपेक्षित उत्पादनापर्यंत पोचणे त्यांना शक्‍य होत नव्हते. उत्पादनवाढीचे आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवणे हा मुख्य हेतू होता.

प्रकल्पात नेमक्‍या कोणत्या बाबी राबवल्या?

1) प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना प्रादेशिक फळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ आणि विभागातील विस्तार कार्यकर्ते यांच्या एकत्र बैठका घेऊन सुधारित तंत्राची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यात आली. या संदर्भातील प्रकाशनांचे वेळोवेळी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. तंत्रज्ञान वापरात ज्या क्षणी अडचणी येत होत्या अशा वेळी शेतकऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून शास्त्रज्ञांबरोबर संपर्क साधून मार्गदर्शन घेतले. विद्यापीठामार्फत होणारे मेळावे, चर्चासत्रे, कृषी प्रदर्शने आदी कार्यक्रमांत या शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यात आला. 
2) अणसूर गावात 30 शेतकऱ्यांकडील 50 हेक्‍टर क्षेत्रावर (प्रत्येकाकडे सुमारे एक ते दीड हेक्‍टर) प्रात्यक्षिके शेतकऱ्यांच्या शेतावर आयोजित केली. त्याद्वारा खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, आंब्याच्या नियमित उत्पादनाकरिता पॅक्‍लोब्युट्राझॉल संजीवकाचा वापर आदींबाबत तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात आले. 
3) कीड व रोग नियंत्रणाबाबत सखोल मार्गदर्शन झाले. 
4) आवश्‍यक खते, कीडनाशके, आणि संजीवक शेतकऱ्यांना पुरविण्यात आले.

प्रकल्पातून काय घडले?

1) आपल्याच बागेत प्रात्यक्षिके आयोजित केल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला. 
2) सुधारित तंत्रज्ञानाचा वापर ते करू लागले. 
3) पूर्वी हेक्‍टरी दीड ते दोन टन असलेले हापूस आंब्याचे उत्पादन साडेचार ते पाच टनांपर्यंत पोचण्यास मदत झाली. 
4) आंब्याची "क्वालिटी' सुधारली. 
5) यंदाच्या वर्षीही (2013) शेतकरी हे तंत्रज्ञान वापरू लागले आहेत.

आधुनिक तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती मिळाली

माझी एक हेक्‍टरवर आंबा लागवड आहे. त्यात प्रामुख्याने हापूस, तर काही रत्ना, केशरची झाडे आहेत. दर वर्षी तुडतुडे आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव होतो. माझ्या परीने, तसेच अन्य शेतकऱ्यांच्या सल्ल्याने कीडनाशक फवारणी करीत असे, पण म्हणावा तसा उपयोग होत नव्हता. किडींच्या प्रादुर्भावामुळे आंब्याची प्रत ढासळत होती. असंख्य फवारण्या करूनही नुकसान सोसावे लागत होते. प्रकल्पात सहभागी झाल्यानंतर विद्यापीठाच्या शिफारशीनुसार आणि वेळापत्रकानुसार कीडनाशकांची फवारणी केली. अन्य गावांच्या तुलनेत माझ्या बागेत किडींचा प्रादुर्भाव फारच कमी आढळला. पॅक्‍लोब्युट्राझोलचा वापर केल्यामुळे आंबा पीक लवकर तर आलेच, परंतु उत्पादनात वाढ होऊन ते पाच टनांपर्यंत पोचले. पीक व्यवस्थापन पद्धतीतील आमच्या उणिवा लक्षात आल्या. यापुढे सुधारित तंत्राचा वापर करणार आहे.

- रमाकांत जनार्दन गावडे - 9421176204 
अणसूर, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.

दोन हेक्‍टरवर 10 वर्षांपूर्वी हापूस आंब्यांची लागवड केली आहे. बागेत दर वर्षी तुडतुडे आणि फुलकिडींचा प्रादुर्भाव होत होता. असंख्य फवारण्या करूनही नुकसान होतच होते. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत सहभागी झालो. त्यामध्ये शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन झाले. विद्यापीठाच्या शिफारशी आणि वेळापत्रकानुसार कीडनाशकांची फवारणी केली. सुधारित तंत्रज्ञानाचे महत्त्व पटले.

- विजया कृष्णा सरमळकर - 9423301098 
अणसूर

माझ्याकडे एकूण पाच हेक्‍टर क्षेत्रावर आंब्याची लागवड आहे. सुरवातीला बागेतून चांगले उत्पादन निघायचे, पण त्यानंतर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येऊ लागला. त्यामुळे उत्पादनात हळूहळू घट होऊ लागली. प्रकल्पात सहभागी झालो. त्याअंतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांत सहभागी झालो. नवीन तंत्रज्ञान अवगत केले. यापुढे माझ्या बागेत विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्धार केला आहे.

- केशव देऊलकर - 7507830468 
अणसूर

विद्यापीठाने पुरवलेल्या तंत्रज्ञानातील काही बाबी

1) सुधारित पीक संरक्षण वेळापत्रक - यात पीकवाढीच्या अवस्थेनुसार पहिल्या ते सहाव्या फवारणीपर्यंत कीडनाशकांच्या शिफारशी.

खत व्यवस्थापन

हापूस आंब्याला सेंद्रिय खताबरोबर प्रति झाड (दहा वर्षांच्या पुढील) नत्र (1.500 किग्रॅ), स्फुरद (0.500 कि. ग्रॅ.) व पालाश सेंद्रिय खतांबरोबर नत्र (1 कि. ग्रॅ.) सल्फेट ऑफ पोटॅशमधून जूनमध्ये द्यावे. खते कलमाच्या विस्ताराच्या थोडीशी आत सुमारे 45 ते 60 सें. मी. रुंद आणि 15 सें. मी. खोल वर्तुळाकार चर खणून द्यावीत. त्या चरांमध्ये प्रथम पालापाचोळा, शेणखत टाकून त्यावर रासायनिक खते टाकून मातीने चर बुजवून घ्यावा. खते देण्याआधी तण काढून घ्यावे.

हापूस आंब्याला दर वर्षी फळधारणेसाठी पॅक्‍लोब्युट्राझोल संजीवकाचा वापर 

हे संजीवक वर्षातून एकदा 15 जुलै ते 31 ऑगस्टदरम्यान पूर्ण वाढलेल्या झाडाला (10 वर्षांवरील) द्यावे. कारण वर्षाआड फळे धरण्याचा गुणधर्म 10 वर्षांनंतर प्रकर्षाने दिसून येतो. हे संजीवक झाडाच्या आकारमानानुसार द्यावे. प्रत्येक झाडाचा पूर्व-पश्‍चिम व दक्षिण-उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढून प्रति मीटर व्यासास 0.75 ग्रॅम क्रियाशील घटक पॅक्‍लोब्युट्राझोल द्यावे. झाडाच्या बुंध्याभोवती झाडाच्या विस्ताराच्या निम्म्या अंतरावर कुदळीने 10 ते 12 सें. मी. खोल असे सम अंतरावर 25 ते 30 खड्डे काढून त्यात या संजीवकाचे तयार द्रावण समप्रमाणात ओतावे. त्यानंतर खड्डे मातीने बुजवून टाकावे. हे द्रावण मोठ्या पावसात देऊ नये. वापर करण्यापूर्वी व त्यानंतर झाडाभवती असलेले सर्व तण काढून टाकावे. 

संपर्क - 
2) डॉ. बी. एन. सावंत - 9422436117 
शास्त्रज्ञ, विस्तार शिक्षण 
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, 
वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

3.0
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Back to top