Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 14:15:0.366670 GMT+0530
मुख्य / शेती / कृषी यशोगाथा / शाश्वत शेती / सेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी
शेअर करा

T3 2019/10/18 14:15:0.372771 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 14:15:0.405400 GMT+0530

सेंद्रिय हळद, आल्यातून समृद्धी

माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी तुकाराम नारायण दहे यांनी सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देत हळद व आले पिकातून आपली प्रगती साधली आहे.

माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी तुकाराम नारायण दहे यांनी सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देत हळद व आले पिकातून आपली प्रगती साधली आहे. जिद्द, मेहनत आणि प्रयोगशीलता या जोरावर अत्यल्प भूधारक असलेले दहे यांच्या कुटुंबाकडे आज 12 एकर शेती झाली आहे.
माळसोन्ना येथील तुकाराम नारायण दहे यांचे मूळ गाव मानवत. तेथे त्यांची एक एकर शेती होती. त्यांनी ती विकून आपल्या आजोळी, माळसोन्ना येथे एक एकर शेती घेतली. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1999 पासून दहे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला; परंतु केवळ एक एकरवर शेती परवडणारी नव्हती. त्यामुळे कर्ज घेऊन संकरित गाय विकत घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. गावात दूध डेअरी सुरू केली. सात वर्षे ती चालवली खरी, मात्र पुढे काही कारणामुळे बंद करावी लागली. दरम्यानच्या काळात दहे कुटुंबीयांनी साडेचार एकर शेती खरेदी केली. अर्थात ती जिरायती होती. त्यामुळे मूग, सोयाबीन, कापूस, बाजरी, ज्वारी अशी पिके त्यात घ्यावी लागत होती. त्यातून वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पन्नातून कर्जाची परतफेड करणे अशक्‍य होत असे.

शेतीशाळेमुळे कलाटणी

दैठणा कृषी मंडळाचे तत्कालीन कृषी अधिकारी पी. डी. देशमुख यांनी माळसोन्ना येथे शेतीशाळा सुरू केली होती. दर आठवड्याला दहे नियमितपणे शेतीशाळेत जाऊ लागले. यामुळे त्यांना सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापन कसे करावे, याची माहिती मिळू लागली. बियाणे गुणवत्ता, लागवड पद्धत, पाणी, खते, कीडनाशके, पिकांवरील मित्रकीटक, शत्रुकिडी यांचे चांगले ज्ञान त्यांना होऊ लागले. जिरायती क्षेत्रात संरक्षित पाण्याची सोय करायची होती, तरच त्यातून उत्पन्नवाढ मिळणार होती. दागिने मोडून सिंचनासाठी शेतात 200 फूट बोअर घेतले. त्याला चांगले पाणी लागले. हळद हे पीक घेण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी 2006 मध्ये बेणे तयार करण्याच्या दृष्टीने हळद लागवड केली. पुढील वर्षी सरी- वरंबा पद्धतीने लागवड केली.

गादी वाफ्यावर हळद लागवड

सन 2008 मध्ये गादी वाफा पद्धतीने हळद लागवड केली. या भागात अशा प्रकारचा प्रयोग नवीन होता. लागवडीपूर्वी माती परीक्षण व सामू तपासून घेतला. प्रत्येकी पाच फूट अंतरावर दोन फूट रुंदीचे गादी वाफे (बेड) तयार केले. प्रत्येक गादी वाफ्यावर दोन ओळी, दोन ओळींतील अंतर एक फूट आणि दोन रोपांतील अंतर सहा इंच याप्रमाणे दोन एकर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी सेलम जातीचे एकरी दहा क्विंटल बेणे लागले.

पीक व्यवस्थापनातील काही गोष्टी-

 • गेल्या सात वर्षांपासून दहे हळदीची शेती बेणे निर्मितीसाठीच करतात.
 • सेंद्रिय पद्धतीचा वापर सुमारे 80 ते 90 टक्के होतो. अगदीच वेळ पडली तर रसायनांचा वापर होतो.
 • शेतात गांडूळ खताची चार युनिट आहेत. त्याचे खत वापरले जाते.
 • याशिवाय बायोडायनॅमिक खतही वापरतात.
 • दशपर्णी अर्क, जीवामृत, निंबोळी अर्क, व्हर्मीवॉश यांचाही वापर होतो.
 • ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाबरोबर बिव्हेरिया बॅसियानासारख्या जैविक कीडनाशकांचाही उपयोग केला जातो.
 • ठिबक सिंचनाद्वारा पाणी दिले जात

उत्पादन व मालाचा दर्जा

 • ओल्या हळदीचे एकरी 200 क्विंटल, तर वाळवलेल्या हळदीचे 40 क्विंटल उत्पादन सरासरी मिळते.
 • उत्पादन खर्च एकरी 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत होतो.
 • मार्केटमध्ये हळदीचा क्विंटलला जो दर सुरू असतो त्याच्या एक चतुर्थांश दराने बेणे विक्री होते.
 • सेंद्रिय पद्धतीवर जोर असल्याने बेण्याची क्‍वालिटी चांगली असून, भेसळ जराही नसल्याचे दहे म्हणतात.
त्यामुळे आपले बेणे आगाऊ मागणीने विकले जाते. परिसरातील गावांबरोबरच आंध्र प्रदेशातील शेतकरीही त्यांच्याकडून बेणे नेतात.

पुरस्काराने सन्मान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (परभणी) विस्तार कार्यक्रमांतर्गंत माळसोन्नासह अन्य काही गावे दत्तक घेतली आहेत. या गावांमध्ये विविध पिकांबाबत मार्गदर्शन होते. विद्यापीठातील विस्तार शिक्षण विभागातील प्राध्यापक डॉ. प्रवीण कापसे, कृषी अधिकारी पी. डी. देशमुख यांनी सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. त्यामुळे सेंद्रिय शेतीचा अवलंब करत दहे यांनीही परिसरातील गावात सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यात सहभाग नोंदवला. 
दहे यांना शेतीतील योगदानाबाबत 2011-12 या वर्षी राज्य शासनातर्फे वसंतराव नाईक "कृषिभूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशात बेणे विक्री

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात भेटीसाठी आलेल्या आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना दहे यांच्या हळद उत्पादनाची माहिती मिळाली. त्यांनी दहे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून सुमारे दोनशे क्विंटल हळद बेण्याची खरेदीही केली. पंढरपूर, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही त्यांच्याकडून बेणे विकत नेले आहे.

तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन

माळसोन्ना येथील शेतकरी पारंपरिक पिके घेत असत. यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे गावातील काही लोक उपजीविकेसाठी शहरात स्थलांतर करीत. परंतु दहे यांनी गावात कृषी विज्ञान मंडळाच्या माध्यमातून तरुण शेतकऱ्यांना एकत्र केले. त्यांच्यात शेतीची आवड निर्माण केली. पूर्वी गावातील कुणीही हळद लागवड करत नव्हते. मात्र दहे यांच्या प्रोत्साहनामुळे गावात हळदीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

आले लागवडीतूनही आर्थिक हातभार

काही वर्षांपासून दहे आले लागवडही करतात. एकरी सरासरी 180 ते 200 क्विंटल उत्पादन (ओले) मिळते. 
बेणे व मार्केटसाठीही विक्री होते. या वर्षी आले पिकात शेवगा घेतला आहे. त्यापासून बोनस उत्पन्न मिळणार आहे.

पत्र्याच्या घरातून बंगल्यात

तुकाराम दहे यांच्या कुटुंबाकडे पूर्वी एकर शेती होती. पत्र्याचे घर होते. आई नीलाबाई, बंधू आबासाहेब यांच्यासह सर्व कुटुंबीयांच्या मेहनतीमुळे आज त्यांच्याकडे 12 एकर शेती झाली आहे. 
तीन बोअरच्या माध्यमातून ही शेती सिंचनाखाली येते. दहे कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती आता चांगली झाली असून, गावातील मुख्य रस्त्यावर त्यांनी बंगला बांधला आहे. मुले चांगले शिक्षण घेत आहेत.

संपूर्ण कुटुंब राबते शेतात

घरातील सर्व सदस्य शेतात राबतात. दहे यांचे मोठे बंधू आबासाहेब यांचे शिक्षण एम.ए.पर्यंत झाले आहे, परंतु नोकरीपेक्षा शेतीलाच त्यांनी जवळ केले आहे. आई नीलाबाई यांचे वय 70 वर्षे असूनही शेतीतील कष्ट करणे त्यांनी थांबवलेले नाही. त्या दर वर्षी पंढरपूरची वारी अजूनही पायी करतात, हे विशेष. नीलाबाई यांनी सुमारे 12 वर्षे मजूर म्हणून काम केले. मिळणाऱ्या उत्पन्नातून मुलांना वाढवले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. शिक्षणाचे महत्त्व समाजावून सांगितले. नोकरी मिळाली नाही तरी शेतीतून चांगले उत्पन्न घेता येते, हा विश्‍वास त्यांनी मुलांमध्ये जागृत केला. 
तुकाराम दहे - 9822548325

माणिक रासवे

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

2.94029850746
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 14:15:1.655306 GMT+0530

T24 2019/10/18 14:15:1.662834 GMT+0530
Back to top

T12019/10/18 14:15:0.122908 GMT+0530

T612019/10/18 14:15:0.191710 GMT+0530

T622019/10/18 14:15:0.354736 GMT+0530

T632019/10/18 14:15:0.355818 GMT+0530