অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शाश्‍वत जमीन आरोग्यातून सदाहरित क्रांती

शाश्‍वत जमीन आरोग्यातून सदाहरित क्रांती

शाश्‍वत जमीन आरोग्यातून सदाहरित क्रांती

 

“रासायनिक खताला सेंद्रिय खतांची जोड दिल्यास येणार्‍या उत्पादनाची गुणवत्ता चांगली असते. त्यामागचे कारण ते सेंद्रिय वा असेंद्रिय हे नसून, एकात्मिक वापरातून होणारे सर्व अन्नद्रव्यांचे संतुलित पोषण हे कारण आहे. सेंद्रिय खतांमधून नत्र, स्फुरद व पालाश या व्यतिरिक्त अनेेक दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळतात आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारून सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. त्यामुळे उत्पादनाची प्रत सुधारते. ते सेंद्रिय म्हणून वेगळे समजणे चुकीचे ठरेल...”

पीक पध्दती, हवामान आणि शेतीचे व्यवस्थापन यानुसार जमिनीची सुपीकता बदलत असते. पीक उत्पादनासाठी जमिनीचा सतत वापर होत राहिल्यास जमिनीची सुपीकता खालावते. कारण पिकांना लागणार्‍या अन्नद्रव्यांसाठी जमिनीतील अन्नद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. परिणामी पिकांच्या पोषणासाठी जमिनीत आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांची कमतरता वरचेवर वाढत जाते. जमिनीतील अन्नद्रव्यांबाबत आज अशीच स्थिती निर्माण झाली आहे. खतांसारख्या कृषी निविष्ठांचा (Inputs) अकार्यक्षम वापर होताना दिसत आहे. एकूणच जमिनीचे आरोग्य खालावल्यामुळे शेतीतील किफायतशीरपणा कमी झालेला दिसून येतो.

पीक पोषण संकल्पना

पिकांना संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा होण्यासाठी जमिनीतील अन्नद्रव्यांची शाश्‍वतता कशी राखता येईल, याचा सर्वप्रथम विचार करायला पाहिजे. पीक पोषणासाठी लागणार्‍या अन्नद्रव्यांची गरज कुठल्याही एकाच संसाधनातून पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी अन्नद्रव्यांचे विविध स्रोत वापरावे लागतील. केवळ सेंद्रिय खतांचा किंवा रासायनिक खतांचा वापर करणे पुरेसे नाही. कारण सेंद्रिय खतांमध्ये असणारे अन्नद्रव्यांचे कमी प्रमाण, सेंद्रिय पदार्थांची टंचाई आणि अन्नधान्य उत्पादकतेचे आव्हान इत्यादी दृष्टिकोनातून केवळ सेंद्रिय खतांचा वापर करणे योग्य ठरणार नाही. त्याचप्रमाणे निव्वळ रासायनिक खतांचा वापर केला, तर जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होईल आणि ते जमिनीच्या आरोग्यास घातक ठरेल.

शाश्‍वत पीक उत्पादकता आणि शेतीसाठी प्रथम जमिनीची शाश्‍वतता कशी वाढविता येईल, याचा विचार होणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्याचे वर्ष जमिनीच्या आरोग्याचे शाश्‍वत व्यवस्थापन याविषयी जगभरात जागरूकता निर्माण होण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष’ म्हणून साजरे केले जात आहे. त्यामध्ये जमिनीच्या आरोग्याचा प्रचार-प्रसार होण्यासाठी ‘सदृढ जीवनासाठी सदृढ जमिनी’ ही असे घोषवाक्यही जाहीर करण्यात आले आहे.

जमिनीचे आरोग्य शाश्‍वत ठेवण्यासाठी प्रथम ‘जमिनीचे पोषण’ ही संकल्पना लक्षात घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय खतांचा वापर आपण फक्त अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यासाठी करत नसतो, तर जमिनीच्या गुणधर्मात सुधारणा होण्यासाठी करत असतो. मात्र, अलीकडील काळात शेतीमध्ये सेंद्रीय खतांचा वापर अतिशय कमी प्रमाणात केला जाऊ लागला आहे. त्याचबरोबर अयोग्य पद्धतीने आणि असंतुलित स्वरूपात रसायनांचा वापर होऊ लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतीतील उत्पादन घटत गेले आणि यातून सेंद्रिय शेती चांगली की रासायनिक शेती चांगली अशी तुलना सुरू झाली.

पिके त्यांच्या पोषणासाठी जमिनीतील विविध अन्नद्रव्ये शोषूण घेत असतात. त्यापैकी नत्र हे एक महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे. जमिनीत मुख्यतः सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा दोन स्वरूपात नत्र आढळते.  जमिनीमध्ये सेंद्रिय स्वरूपातील नत्राचे प्रमाण मोठे असते, मात्र सेंद्रिय स्वरूपातील नत्राचे असेंद्रिय नायट्रेटमध्ये रूपांतर झाल्याशिवाय पिके ते नत्र शोषून घेऊ शकत नाहीत. म्हणून जमिनीत कुठल्याही स्वरूपात कृषी निविष्ठा (Inputs) वापरल्या, तरी त्यातील अन्नद्रव्ये विशिष्ट स्वरूपात रूपांतरित झाल्यानंतरच ती पिकांकडून शोषली जातात.

कोरडवाहू क्षेत्रात सेंद्रिय शेतीसमोरील मर्यादा

सद्यःस्थितीत शेतीतील समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि सर्व समस्या सेंद्रिय शेतीतून सुटतील, असा अंदाज केला जात आहे. मात्र, पिकांचे संतुलित पोषण करून वाढत्या अन्नधान्याची गरज भागविणे आणि सोबतच जमिनीची सुपीकता शाश्‍वत ठेवणे हे मोठे आव्हान आहे. आपल्याकडील मुख्यत: उष्ण कटिबंधीय प्रदेशातील कोरडवाहू शेतीमध्ये उत्पादकता वाढविणे ही बाब तर सर्वाधिक आव्हानात्मक आहे. कारण आपल्याकडे सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेत बर्‍याच मर्यादा येताना दिसतात. इतरत्र काही ठिकाणी निरनिराळ्या हवामानाच्या प्रदेशात विशेषत: शीत कटिबंधीय प्रदेशात सेंद्रिय शेतीसाठी लागणार्‍या निविष्ठांची सहज उपलब्धता असते. किंबहूना तेथील हवामान, मोठमोठी चराऊ कुरणे, पाण्याचे मुबलक स्रोत इत्यादींमुळे तेथील परिस्थिती सेंद्रिय शेती पध्दतीसाठी पोषक असल्याचे दिसून येते.

कोरडवाहू क्षेत्रामध्ये शेणखत, कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक घटकांचा (गुरे-ढोरे, चारा, पाणी इत्यादींचा) अभाव आणि प्रतिकूल परिस्थिती (उष्ण हवामान) असल्यामुळे तेथील शेतकरी शेतीत सेंद्रिय खते सहजतेने वापरू शकत नाहीत. त्यामुळे कोरडवाहू भागातील शेतकर्‍यांना सेंद्रिय शेती करताना मर्यादा येतात, हे लक्षात घेण्याची गरज आहे. मुळात या भागातील शेती तोट्यात येण्याचे कारण शिफारशींएवढीही अन्नद्रव्ये बरेच शेतकरी वापरू शकत नाहीत, हे आहे. खूपच ओढाताण करून महागडी रासायनिक खते वापरली, तरीही या भागातील शेतीतून अपेक्षित उत्पादन  मिळत नाही. त्याचे कारण म्हणजे जमीन मुळातच आजारी आणि क्षीण झालेली आहेे. त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होत नाही. खतांचा प्रतिसाद दिवसेंदिवस खालावत चालला आहे. चार दशकांपूर्वी प्रतिकिलो खतांपासून 15 किलो धान्य इतके उत्पादन मिळत होते, आता ते उत्पादन 3 किलोवर आले आहे. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढत आहे, मात्र त्यातुलनेत किफायतशीरपणा कमी कमी होत चालला आहे. शास्त्र आणि तंत्रज्ञानाच्या आधारे सतत सेंद्रिय खतांच्या नियमित वापराची शिफारस करण्यात आली; पंरतु काही परिस्थितीजन्य समस्यांमुळे हे होऊ शकले नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

ज्या शेतीमध्ये फक्त 5 ते 10 टन प्रती हेक्टरी शेणखत वापरले जात नाही, तेथे संपूर्ण शेती सेंद्रिय पध्दतीने कशी करणार आणि त्यातून वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्याचे आव्हान कसे पेलणार, हा एक मोठा प्रश्‍न आहे. सेंद्रिय शेतीसाठी शास्त्रीय आधारावर काही विशिष्ट पिके आणि अनुकूल क्षेत्राची निवड करून संसाधनांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने आणि विशेष उद्दिष्टे ठेवूनच आखणी करणे गरजेचे आहे.

एकट्या रासायनिक खतांची शिफारस नाहीच

अन्नधान्याची सुरक्षितता जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच पोषणमूल्यांची सुरक्षितता गरजेची आहे. सेंद्रिय अन्नधान्य असे काही वेगळे नसून, ते फक्त रासायनिक निविष्ठा वापरून उत्पादित केलेल्या अन्नधान्यापेक्षा सुरक्षित आहे, असे समजून त्याला या दृष्टीने मान्यता मिळत आहे. मुळात आपल्याकडील शेतकरी महागाईमुळे आपल्या शेतीत प्रमाणाबाहेर किंवा शिफारशींपेक्षा जास्त खतांचा वापर करूच शकत नाहीत. त्यामुळे शेतीला प्रदूषणाचा धोका अशा खतापासून नाही, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. रासायनिक खतांचा अयोग्य प्रमाणात वापर घातक होऊ शकत असल्यामुळे फक्त एकट्या रासायनिक खतांच्या वापराची शिफारस कधीच केली गेलेली नाही. तो काही क्षेत्रात काही परिस्थितीमुळे क्वचितच झाला असेल, मात्र त्याचे निष्कर्ष इतर क्षेत्रासाठी लागू पडतीलच, असे नाही.

रासायनिक खताला सेंद्रिय खतांची जोड

रासायनिक खताला सेंद्रिय खतांची जोड दिल्यास येणार्‍या उत्पादनाची गुणवत्ता चांगली असते. त्यामागचे कारण ते सेंद्रिय वा असेंद्रिय हे नसून, एकात्मिक वापरातून होणारे सर्व अन्नद्रव्यांचे संतुलित पोषण हे कारण आहे. सेंद्रिय खतांमधून नत्र, स्फुरद व पालाश या व्यतिरिक्त अनेेक दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकास मिळतात आणि जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारून सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. त्यामुळे उत्पादनाची प्रत सुधारते. ते सेंद्रिय म्हणून वेगळे समजणे चुकीचे ठरेल. ज्या जमिनीत जस्त, लोहसारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे, तेथील धान्ये, फळे इत्यादींमध्ये या पोषणमूल्यांची कमतरता दिसून येत असते. अशा सर्व प्रश्‍नांचे उत्तर फक्त सेंद्रिय शेतीमध्ये आहे, असे नाही. एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचे निष्कर्ष याबाबतीत फार महत्त्वाचे असून, त्यामुळे शाश्‍वत पीक उत्पादकता गाठता येते आणि जमिनीची सुपीकताही टिकवली जाते, तसेच प्रदूषणाचा धोकासुध्दा टाळता येतो.

सेंद्रिय शेतीला शास्त्रीय आधार निर्माण करण्याची गरज

सद्यःस्थितीतील शेतीच्या निरनिराळ्या समस्यांचा व्यवस्थित अभ्यास केल्यास त्या समस्यांना कारणीभूत असलेल्या परिस्थितीची जाणीव होऊ शकते. काही दुर्लक्षित व्यवस्थापन संसाधनांचा अयोग्य वापर, पुरेशा अर्थसाहाय्याचा अभाव, अनियमित हवामान आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या माहितीचा अभाव इत्यादी बाबी शेतीतील विविध समस्यांच्या मुळाशी असल्याचे दिसून येते. या पार्श्‍वभूमीवर सध्यापेक्षा काहीतरी वेगळे करावे, अशी मानसिकता होऊ शकते; परंतु सेंद्रीय शेतीला दीर्घ मुदतीय शाश्‍वत उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून शास्त्रीय आधार निर्माण करण्याची व तो विचारात घेण्याची गरज आहे.

देशातील शेतीविषयीचे धोरण ठरविताना हरित क्रांतीचे प्रणेते व नोबेल पारितोषिक विजेते कृषी शास्त्रज्ञ डॉ. नॉरमन बोरलॉग यांचे सेंद्रिय शेती, शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयीचे विचार लक्षात घेणे गरजेचे आहे. शेतीमधील समस्यांवर मात करण्यासाठी आणि अन्नधान्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्या मतानुसार, सेंद्रिय शेतीतून कमी उत्पादन मिळत असते. त्यामुळे आवश्यक तेवढ्या उत्पादनासाठी जास्त जमिनीची आवश्यकता भासेल, जंगल क्षेत्र कमी होईल आणि सर्व उपलब्ध सेंद्रिय संसाधनांचा वापर करूनही अन्नधान्याची गरज पूर्ण करणे शक्य होणार नाही. सेंद्रिय अन्नधान्य हे वेगळे नसते, असाही युक्तिवाद त्यांनी शास्त्रीय आधारावर केलेला आहे.

‘सेंद्रिय शेती’ ही संकल्पना म्हणून चांगली आहे. लहान शेतकर्‍यांच्या दृष्टीने ती लाभदायक ठरू शकते. मात्र, व्यावसायिक शेतीमध्ये प्रती हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादकतेस महत्त्व असते. मर्यादित जमिनीतून वाढत्या गरजा भागविणे हे आपल्या देशासमोरील मोठे आव्हान आहे. जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती चांगली आहेच; परंतु सेंद्रिय शेती फार सोपी, स्वस्त आणि कमी कष्टाची आहे, असे मुळीच नाही. त्याचबरोबर या शेतीमुळे शेतीतील सर्वच प्रश्‍न सुटतील असेही नाही. त्यामुळे सेंद्रिय शेतीची विस्तृत संकल्पना समजून घ्यावयास हवी आणि त्यानुसार व्यवस्थापनाची आपली तयारी आणि शक्यता पडताळून पाहणे गरजेचे आहे.

शेतीतील समस्या फक्त सेंद्रिय शेतीने सुटणार का?

‘पीक फेरपालट’ ही सेंद्रिय शेतीच्या संकल्पनेतील एक महत्त्वाची बाब आहे. मात्र तिचा वापर पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही आणि सतत एकच एक पीक घेतले जाते. सेंद्रिय शेतीतील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सेंद्रिय खताची निर्मिती करणे. मात्र आज पीक फेरपालटाप्रमाणेच सेंद्रिय खतनिर्मितीदेखील खूप कमी प्रमाणात होते, ती मोठ्या प्रमाणात का होत नाही, त्यामागची कारणे कोणती असावीत, हे पाहण्याची गरज आहे. एकूणच सेंद्रीय शेती खर्‍या अर्थाने त्वरीत अवलंबण्यासाठी मोठी तयारी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे शेतीतील समस्या फक्त सेंद्रिय शेतीने सुटणार का, याचाही विचार करावा लागणार आहे.

शेती उत्पादनाला योग्य बाजारभाव न मिळाल्यास मग ती कोणत्याही प्रकारची शेती असो, त्यात तोटाच सहन करावा लागेल. सेंद्रिय शेतीमध्ये खर्च  फार कमी होईल, असे मुळीच नाही. त्यामुळे शेतीच्या किफायतशीरपणासाठी उत्पादन खर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळवून देण्यास जास्त महत्त्व द्यावे लागेल. या सर्व बाबींच्या विवेचनावरून असे दिसून येते की, उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करून एकमेकांना पूरक अशा सर्व उपलब्ध संसाधनंाचा वापर शेतीत करूनच शेती व जमिनीचे आरोग्य शाश्‍वत ठेवता येईल.

आज देश अन्नधान्य उत्पादनात स्वावलंबी झाला आहे, तसेच अन्नसुरक्षा धोरणही तयार केले आहे. हे आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करून झालेल्या पहिल्या हरित क्रांतीतून साध्य झाले आहे, हे विसरून चालणार नाही. यापुढील काळात सदाहरित क्रांतीसाठी बदलत्या परिस्थितीतील आणखी वाढलेल्या आव्हानंाच्या दृष्टिकोनातून सविस्तर नियोजन करूनच स्थानिक संसाधनंाचे संवर्धन करीत शाश्‍वत शेतीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागेल. सदाहरित क्रांतीमध्ये जमीन आणि पाणी या संसाधनांना व त्यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे लागेल.

डॉ. विलास खर्च

सहयोगी अधिष्ठाता,

कृषी महाविद्यालय, नागपूर

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला)

संपर्क : 9657 7257 87

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate