অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भुरके सोंडे

पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकांवर भुरके सोंडे (मायलोसेरस सोंडे, मायलोसेरस मॅकूलॅसस्‌ डेसब्र) या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. सर्वसाधारणपणे हा प्रादुर्भाव पीक फुलावर येईपर्यंत दिसतो.

  • ही कीड बहुभक्षी आहे. ती कापूस, भेंडी, अंबाडी, मका, सोयाबीन, चवळी, ऊस, तूर, रागी, बाजरी, आंबा, बोर, स्ट्रॉबेरी, डाळिंब, सफरचंद, पीयर, पीच, तीळ या सारख्या पिकावर आढळते.
  • ही दुय्यम कीड असून, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून खरीप पिकांवर दिसत आहे. या किडीची व्याप्ती व तिचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात या किडीमुळे पिकाचे आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
  • सध्या शेतकरी या किडीला पांढरी माशी समजून विशेषतः कपाशीवर कीटकनाशकांच्या नाहक फवारण्या करतात म्हणून या किडीची ओळख करून घेणे आवश्‍यक आहे.

किडीची ओळख

या किडीचे एकूण जीवनचक्र 42 ते 54 दिवसांचे असते.

प्रौढ

लहान, अंडाकृती, पांढुरके राखाडी रंगाचे असून, पाठीवर चार काळ्या रंगाचे ठिपके असतात. राखाडी रंगामुळे यांना इंग्रजीत "ऍश विव्हील' असे म्हणतात.

अंडी

मादी लंबगोलाकार, फिक्कट पिवळ्या रंगाची जमिनीमध्ये जवळपास 8 सें.मी. खोलीवर 350 ते 360 अंडी घालते. हवामानानुसार 3 ते 11 दिवसांनंतर त्यातून अळ्या बाहेर पडतात.

अळी

अळ्यांना पाय नसतात. अळी मासाळ व फिक्कट पिवळी असून, 8 मि.मि. लांब असते.

कोष

अळीची पूर्ण वाढ झाल्यावर जमिनीत खोल मातीच्या कोषामध्ये कोषावस्थेत जाते. 5 ते 7 दिवसांच्या कोषावस्थेनंतर प्रौढ बाहेर येतात.

नुकसानीचा प्रकार

सोंडे पिकांची पाने कडेने कुरतडून खातात. पानाला नागमोडी नक्षीदार आकार दिसून येतो. प्रौढ कपाशीच्या पात्या, फुले व कोवळ्या बोंड्यांचेसुद्धा नुकसान करतात. अळ्या जमिनीमध्ये राहून खाद्य वनस्पतीची मुळे खातात, त्यामुळे झाडे वाळतात. एक अळी साधारणपणे कपाशीच्या 10 रोपट्यांचे नुकसान करू शकते. संवेदनशील कपाशी जातीमध्ये साधारण 40 टक्के झाडांचे नुकसान होऊ शकते. मात्र आपल्या भागात अळ्यांचा प्रादुर्भाव सध्यातरी दिसलेला नाही.

नियंत्रणाच्या उपाययोजना


या किडीमुळे झालेले नुकसान पीक वाढीच्या अवस्थेत भरून निघू शकते, त्यामुळे या किडींमुळे पिकांचे लक्षणीय नुकसान दिसत असल्यावरच कीटकनाशकाचा वापर करावा.
  • प्रौढ गोळा करून नष्ट करावेत.
  • नियमित प्रादुर्भाव क्षेत्रात कपाशी पेरणीपूर्वी कार्बोफ्यूरॉन (3 टक्के दाणेदार) 33.30 किलो प्रति हेक्‍टर जमिनीमध्ये मिसळून द्यावे.
  • नियमित प्रादुर्भाव क्षेत्रात कपाशी पिकाच्या रोपावस्थेत कीटकनाशकांचे द्रावण ड्रेचिंग करावे.
  • अधिक प्रादुर्भाव असल्यास कापूस पिकावर खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी. (प्रमाण ः प्रति 10 लिटर पाणी)
  • डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) 19.8 मि.ली.
  • किंवा मोनोक्रोटोफॉस (36 टक्के प्रवाही) 25 मि.ली.

 

डॉ. ए. व्ही. कोल्हे, डॉ. डी. बी. उंदिरवाडे

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate