অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मत्स्यशेती करताना...

पाणथळ, तसेच पडीक जमिनीतदेखील मत्स्यशेतीस खूप वाव आहे. मत्स्य व कोळंबीसंवर्धनाचे योग्य नियोजन केल्यास चांगला नफा मिळू शकतो. मत्स्यशेती करण्यासाठी जागेची निवड, पाणी व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन आणि बाजारपेठेचा अभ्यास आणि प्रशिक्षण महत्त्वाचे आहे.

मत्स्य तलावासाठी पाणी धरून ठेवण्याची चांगली क्षमता असणारी जमीन योग्य असते. या जमिनीत चिकण माती आणि गाळ यांचे प्रमाण ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असावे. मत्स्य तलाव खोदताना ज्या ठिकाणी खोलगट जमीन आहे, अशी जमीन निवडल्यास तलाव खोदण्यास खर्च कमी येतो, तसेच क्षारपड जमिनीतही मत्स्य तलाव करता येतो. मत्स्यशेती सुरू करण्याकरिता प्रथमतः तलाव करणे आवश्‍यक आहे. तलावाचा आकार हा आयताकृती असावा. तलावाची लांबी रुंदीच्या दीड ते दोन पट असावी. तळे भरण्यासाठी गुरुत्वाकर्षणाने पाणी घेता यावे किंवा तलावात पाणी भरण्याची सोय असावी. नदी, विहीर, धरण, नाला किंवा कालवा यांतून विद्युत पंप/इंजिन बसवून पाणी तळ्यात घेता यावे, अशी सोय असावी. पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपवर बारीक आसाची जाळी बसवावी किंवा गाळप कक्ष तयार करावा. पाणी घेण्याची व सोडण्याची व्यवस्था असावी. तलावामध्ये फक्त कोळंबीसंवर्धन करावयाचे असल्यास तळ्यातील तळातून पाणी काढून टाकता येईल, अशी व्यवस्था असावी. तलावामध्ये पाण्याची खोली सहा फूट असावी, अशा प्रमाणात किमान दहा महिने तरी पाणी उपलब्ध असावे. पाण्याचा आम्ल-विम्ल निर्देशांक ७.००पेक्षा कमी व ८.५पेक्षा अधिक नसावा. विद्राव्य प्राणवायू चार भाग प्रति दशलक्षपेक्षा (चार पीपीएम) अधिक असावा. पाणी स्वच्छ व प्रदूषणयुक्त हवे. तळ्यामध्ये जलवनस्पती, तसेच इतर झाडोरा असू नये.

तळ्यात पाणी घेतल्यावर बीजसंवर्धन सुरू करण्यापूर्वी पाण्याचा आम्ल-विम्ल निर्देशांक १५ ते २० दिवस अगोदर व्यवस्थित करून घ्यावा. २० गुंठे तलावाकरिता ४० ते १०० किलो या प्रमाणात चुन्याची मात्रा द्यावी. पाण्यात माशांचे नैसर्गिकरीत्या अन्न तयार होण्यासाठी तळ्याच्या आकारानुसार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ओले शेण, युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा. त्यामुळे नैसर्गिकरीत्या अन्न तयार होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. तळ्यात शेवाळ वाढू लागल्यास युरियाचा वापर थांबवावा.

पूरक खाद्यवापर ः

मासे, तसेच कोळंबीच्या वाढीसाठी केवळ तळ्याची नैसर्गिक आणि खत वापरामुळे वाढविलेली उत्पादकता यावरच अवलंबून न राहता, नैसर्गिक खाद्याच्या जोडीला पूरक खाद्य देणे. अधिकतम मत्स्योत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने आवश्‍यक असते. शेंगदाणे, तीळ, मोहरी इत्यादीची पेंड (ढेप) आणि कणी (पॉलिश) कोंडा किंवा गव्हाचा कोंडा यांचे समभाग मिश्रण पूरक खाद्य म्हणून वापरावे. संचलित मत्स्यबीज, कोळंबी बीजाचे प्रमाण व वाढ विचारात घेऊन दैनंदिन पूरक खाद्याची मात्रा ठरविण्यात यावी. कोळंबीच्या वाढीसाठी खास तयार केलेले व बाजारात उपलब्ध असलेले पॅलेटेड खाद्य वापरावे. पूरक खाद्य दररोज ठराविक ठिकाणी, ठराविक वेळी द्यावे. पेंड व कोंडा यांचे समभाग मिश्रण पाणी घालून भिजवावे आणि त्यांचे घट्ट गोळे करून तळ्यात टाकावेत किंवा उथळ पाण्यात बांबूच्या टोपल्यात ठराविक ठिकाणी असे गोळे ठेवावेत. मत्स्यसंवर्धनाकरिता रोहू, कटला व मृगळ या मत्स्य प्रजाती उपलब्ध आहेत. या मत्स्य प्रजाती पाण्यातील वेगवेगळ्या थरांतील खाद्य खात असल्याने अन्नासाठी त्यांच्यात स्पर्धा होत नाही. पाण्याच्या वरच्या थरात कटला, मधल्या थरात रोहू व तळालगत कोळंबीचे संवर्धन करता येते.

वैशिष्ट्यपूर्ण जंबो कोळंबी

गोड्या पाण्यातील जंबो कोळंबी इतर सर्व जातींच्या कोळंबीच्या तुलनेत जलद वाढते. वर्षभरात या जातीचा नर सर्वसाधारणपणे ७०-१०० ग्रॅमपर्यंत, तर मादी ३५ ते ७० ग्रॅमपर्यंत वाढते. विविध कारणांमुळे सध्या जगभर जंबो कोळंबी ही संवर्धनाकरिता सर्वांत लोकप्रिय जात आहे.

- ही कोळंबी सर्वभक्षी आहे. पाण्यातील कीटक, कृमी, वनस्पती, बी-बियाणे, छोटे कवचधारी प्राणी, मासे, मासळीचे विसर्जित पदार्थ इत्यादींचा या कोळंबीच्या अन्नात समावेश होतो.
- शिजल्यावर ही कोळंबी मोहक दिसते, तसेच अत्यंत चविष्ट आहे.
- या कोळंबीची वाढ झपाट्याने होते.
- कटला, रोहू, गवत्या इत्यादी प्लवंगभक्षी माशांबरोबर हिचे संवर्धन करता येते. हे पाण्याच्या वरच्या थरात राहतात, तर कोळंबी तळाशी वास्तव्य करते.
- कृत्रिम खाद्याबरोबरच कोळंबीला कणी, कोंडा, पेंड, मासे, खाटीक खान्यातले टाकाऊ मांस, धान्यकण इत्यादी पूरक खाद्य देता येते.
- ही कोळंबी गोड्या पाण्यात ते पाच पीपीटी पर्यंतच्या मचूळ पाण्यात वाढते. तसेच १८ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान तापमान असले तरीही जगते.
- काही नगात (विशेषतः नर) वाढीचा वेग दुप्पट असतो व अशी कोळंबी सहा ते सात महिन्यांत १०० - १२५ ग्रॅम वजनाची होते.
- रोगाला सहजासहजी बळी पडत नाही. या गुणांमुळे जंबो कोळंबी ही मत्स्यशेतीकरिता एक आदर्श कोळंबी आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः


ः ०२३५२ - २३२२४१
मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, जि. रत्नागिरी
ः ०२२ - २७४५२७७५
खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड
ः ०२३५२ - २३२९९५
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी

 

स्त्रोत : अग्रोवन, ३१ मे २०११

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate