অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लोकसाहित्य

लोकसाहित्य

लोकमानसाचे विविध वाङ्‌मयीन, सांस्कृतिक, कलात्मक आविष्कार या संज्ञेने सूचित होतात. ‘फोकलोअर’ या अर्थी मराठीत लोकसाहित्य वा लोकविद्या या संज्ञा रूढार्थाने वापरल्या जातात व त्यांचा आशय कित्येकदा परस्परव्याप्त असल्याचे दिसून येते.

पश्चिमेकडे ‘फोकलोअर’ची संकल्पना सर्वप्रथम समाजशास्त्र व मानवशास्त्र यांच्या अभ्यासातून निर्माण झाली. स्वाभाविकच फोकलोअरचा अभ्यास हा लोकसंस्कृतीचा अभ्यास म्हणून सांस्कृतिक मानवशास्त्र (कल्चरल अँथ्रपॉलॉजी) याच नावाने प्रारंभीच्या काळात झालेला आहे. फोकलोअरमध्ये लोकसंस्कृतीच्या जडणघ़डणीतील शाब्द साधने (वाच्यार्थाने वाङ्‌मय-लिटरेचर) व शब्देतर साधने (रूढी, चालीरीती, पारंपरिक कला, कारागिरी, क्रीडा, ज्योतिष, वैद्यक इ.) या सर्वांचाच समावेश झालेला आहे. तरीरी मानवशास्त्रज्ञांत याविषयी एकमत नाही. काहींच्या मते फोकलोअर म्हणजे संस्कृतीमधील केवळ पारंपरिक शाब्द साधनेच होत.

असे असले तरी, एकूणच समग्र संस्कृतीची जडणघडण होण्याच्या मुळाशी संस्कृतीमधील शाब्द साधने व शब्देतर साधने या सर्वांचाच मूलभूत व सर्वगामी सहभाग असल्याचे भान एकोणिसाव्या शतकातील अभ्यासकांना आले व या सर्व बाबींचा समावेश असलेली फोकलोअर ही स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून मान्यता पावली आहे. फोकलोअरमध्ये अभिप्रेत असलेली शाब्द साधने (लोकपरेपरेतील वाङ्‌मय) व शाब्देतर साधने(कृतिसंबद्ध व भावसंबद्ध साधने) हे सर्व साहित्य(साधने या अर्थाने) लोक-संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याने मराठीतील व एकूणच आधुनिक भारतीय अभ्यासकांनी साधनवाचक अर्थानेच ‘लोकसाहित्य’ हा शब्द वापरावयाला प्रारंभ केला व तो आता रुळला आहे. याच अर्थाने एक स्वतंत्र अभ्यासशाखा म्हणून प्रस्तुत लोकसाहित्य विचारात घेतले आहे.

या व्यापक अर्थाने लोकसाहित्य या संकल्पनेत अभिप्रेत असलेले सर्व घटक पुढे एका वृक्षाकृतीमध्ये दाखविले आहेत.इ. स. सोळाव्या-सतराव्या शतकापर्यंत जगाच्या पश्चिम भागात मध्ययुगाची समाप्ती होऊन यंत्रप्रधान आधुनिक युगाला प्रारंभ झाला. भारतात ही परिस्थिती एकोणिसाव्या शतकात आली. मुद्रणयंत्राच्या शोधामुळे लिखित साहित्याची निर्मिती आणि प्रसार यांची लाट आली आणि त्याचवेळी मुद्रणपूर्व मौखिक परंपरेतील साहित्य व संस्कृती यांचे संग्रहण व अध्ययन करण्याची गरज अभ्यासकांना वाटू लागली. या साहित्यासाठी ‘फोकलोअर’ ही इंग्रजी संज्ञा सर्वप्रथम विल्यम जोन्स टॉमस या इंग्लिश पुरातत्वज्ञाने १८४६ मध्ये वापरली आणि जगभर ती रुळली.

आज मराठीत लोकसाहित्य हा शब्द इंग्रजी फोकलोअर शब्दाचा पर्यायशब्द म्हणून रुळला असला, तरी त्यातील ‘साहित्य’ हा शब्द मराठीत आधीच वाङ्‌मय (लिटरेचर) या अर्थाने रूढ असल्याने जे शब्दबद्ध (शाब्द) असे कथा, गीतादी साहित्य म्हणजेच लोकसाहित्य असे समजले जाते. फार तर म्हणी,उखाणे, लोकोक्ती, कोडी या शाब्द साहित्याचाही त्यात समावेश केला जातो.

त्याचप्रमाणे लोकसाहित्य या शब्दातील ‘लोक’ या पूर्वपदाचा अर्थही अनेकदा ग्रामीण, अनक्षर, जुन्या परंपरेतले असा केला जातो, तोही योग्य नव्हे. लोकसाहित्य म्हणजे आदिम लोकांचे साहित्यही नव्हे. ‘लोकशाही’ या शब्दातील ‘लोक’ या पदाच्या जवळचा आशय लोकसाहित्यामधील ‘लोक’ पदात अंतर्भूत आहे. म्हणजे हे ‘लोक’ केवळ जुने वा केवळ नवे, केवळ ग्रामीण वा केवळ नागर, केवळ साक्षर वा केवळ अनक्षर नाहीत. सांस्कृतिक दृष्ट्या विशिष्ट मानसिक जडणघडण असलेल्या मानवसमूहाला ‘लोक’ म्हटले आहे. ‘लोक’ हा शब्द नेहमीच समूहवाचक असतो.

भारतात ‘लोक’ हा शब्द प्राचीन काळापासून विविध अर्थानी वापरला जातो. स्वर्ग, मृत्यू, पाताळ इ. त्रिभुवनांसाठी ‘लोक’हे उत्तरपद म्हणून वापरले जाते. उदा., स्वर्गलोक वगैरे. आपल्याखेरीज अन्य समूहांसाठी ‘लोक’शब्द वापरला जातो. हिंदी भाषेत जन, जनपद, ग्राम्य असे शब्द लोक(फोक) या अर्थाने रुळवण्याचा प्रयत्न झाला. डॉ. श्याम परमार यांनी ‘लोक’ शब्दाची नेमकी व्याप्ती विशद केली आहे. ते म्हणतात; “लोक’ साधारण जनसमाज है, जिसमें भू-भागपर फैले हुए समस्त प्रकारके मानव सम्मिलित है। यह शब्द वर्गभेदरहित, व्यापक, एवं प्राचीन परम्पराओंकी श्रेष्ठ राशिसहित अर्वाचीन सभ्यता, संस्कृती के कल्याणमय विवेचन का द्योतक है। ”– प्राचीन काळी संस्कृतात वैदिकेतरांसाठी ‘लोक’ संज्ञा रूढ होती. परंतु नंतर वैदिक-वैदिकेतरांतील अंतर मिटत गेले आणि त्यातील ‘लोक’ शब्दाचा अर्थही व्यवहारातून गेला. इंग्रजीमध्ये ‘फोक’ हा शब्द ‘नागरी’ (सिव्हिलाइज्ड) या शब्दाच्या विरुद्ध छटेने आणि काहीसा हेटाळणीपूर्वक वापरला जातो. मात्र ‘फोकलोअर’ मधील ‘फोक’ मध्ये ही छटा नाही. मराठी ‘लोक’पदाच्या अर्थामध्ये तर ही छटा नाहीच.

पाश्चिमात्य अभ्यासकांनी फोकलोअर या शब्दाची व्याप्ती नेमकेपणाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिकाना, ब्रिटानिका, कोलंबिया यांसारख्या विविध पाश्चात्य ज्ञानकोशांतून; एन्सायक्लोपीडिया ऑफ सोशल सायन्सेससारख्या विषयकोशांतून तसेच डिक्शनरी ऑफ फोकलोअर, मायथॉलॉजी, अँड लेजंड्स ह्या बृहत् व्याख्या-कोशातून फोकलोअरच्या  आशयाची व्याप्ती व स्वरूप स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार लोकसाहित्यात (फोकलोअर) लोकजीवनामध्ये समूहप्रतिभेच्या आणि समूहमानसाच्या अबोध प्रेरणेतून अनायासे, आपोआप निर्माण झालेले व अनायासे परंपरेने टिकत आलेले सर्व घटक समाविष्ट होतात. त्यात कथा, गीते, म्हणी, उखाणे, कोडी, कूटे, लोकप्रचलित मंत्र इ. सर्व शाब्द (शब्दबद्ध) साहित्याबरोबरच लोकप्रचलित धर्मविधी, श्रद्धा, देवदेवता, रूढी, चालीरीती, धारणा, व्रतवैकल्ये, उपासना, सर्व कला, कारागिरी, क्रीडा, वैद्यक, अन्नवस्त्रादी नित्योपयोगी वस्तू व त्यांच्या उपयोगाच्या रीती या सर्व शब्देतर साहित्याचा समावेश होतो.

थोडक्यात म्हणजे सांस्कृतिक दृष्ट्या एकाच प्रकारची मानसिक जडणघडण  असलेल्या समूहाची जीवनप्रणाली लोकसाहित्यात आविष्कृत होत असते. यामागे समूहाच्या अबोध मनाची (कलेक्टिव्ह अन्‌कॉन्शस) प्रेरणा असते. त्यामुळे समूहजीवनातील सर्व साहित्य आपोआप सहज घडत असते. म्हणूनच लोकसाहित्याची निर्मिती ही आपोआप झालेली समूहाची निर्मिती असते. प्रत्यक्षात जरी एखादे गीत वा कथा व्यक्तिनिर्मित असली, तरी त्यामागची प्रेरणा समूहाची असते. त्यावर विशिष्ट व्यक्तीची नाममुद्रा नसते. व्यक्तीची मालकी नसते, तर समूहाची मालकी असते. समूहप्रेरणेने निर्माण झालेले साहित्य समूहस्वीकृत असेल तर समूहमन ते जतन करते. हे जतन परंपरेने होते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते आपोआप जाते. देशकालपरिस्थित्यनुसार त्यात बदलही होतो. पण तोही समूहप्रेरित व समूहस्वीकृत असतो. या अर्थाने लोकसाहित्य सदैव प्रवाही असते. ते जुने असूनही समूहमनात सदैव ताजे असते. समूहाच्या इच्छेनुसार व गरजेनुसार त्यात सतत घट-भर दोन्ही होत असते.

लोकसाहित्य व नागर साहित्य किंवा अभिजात साहित्य यांच्या संबंधांबद्दलही विविध मते आहेत. सर्व साहित्याचे मूळ लोकसाहित्यात आहे; तर लोकसाहित्य हे अभिजात साहित्याचे भ्रष्ट अनुकरण असते, असे दुसरे एक टोकाचे मत आहे. प्रत्यक्षात लोकसाहित्य व अभिजात साहित्य यांत सतत देवाणघेवाण व अभिसरण चालू असते. लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा परस्परपोषक राहिल्या, तरच दोन्हींचा निरामय विकास संभवतो.

लोकसाहित्य ही फोकलोअरसाठी पर्यायी मराठी संज्ञा प्रथम सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ व लोकसाहित्यविशारद दुर्गाबाई भागवत यांनी वापरली व पुढे ती रुळली. मराठीतील लोकसाहित्याचे आद्य चिकित्सक अभ्यासक वि. का. राजवाडे यांनी १९२५ मध्ये प्रथम ‘लोककथा’ व ‘लोकगीत’ हे शब्द वापरले. पुढे त्या पारिभाषिक संज्ञा म्हणून मान्यता पावल्या. फोकलोअर या इंग्रजी शब्दाला पर्याय म्हणून दत्तो वामन पोतदार यांनी ‘लोकविद्या’ ही संज्ञा सुचविली होती; परंतु ती रूढ होऊ शकली नाही.

भारतीय लोकसाहित्याचे गाढ व्यासंगी अभ्यासक डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी ‘लोकवार्ता’ ही संज्ञा हिंदीतून लेखन करताना सुचविली आणि ती हिंदीत रुळली आहे. ‘लोकसाहित्य’ ही संज्ञाही हिंदीत रुळली आहे. ‘ग्रामसाहित्य,’‘लोकयान’ या संज्ञा मात्र हिंदीत रूढ होऊ शकल्या नाहीत.पं. कृष्णदेव उपाध्याय यांनी फोकलोअरला सार्थ पर्याय म्हणून ‘लोकसंस्कृती’ ही  संज्ञा आग्रहाने सुचविली आहे. परंतु मराठीतील लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांच्या मते ‘लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती नव्हे.’ त्यांच्या मते दोन्हींचे घटक समान असले तरी एक नव्हेत. लोकसाहित्य हे लोक-संस्कृतीच्या अभ्यासाचे साधन होऊ शकते.

मराठीत ज्यांनी अत्यंत सखोल आणि व्यापक भूमिकेतून लोकसाहित्याभ्यास केला, ते डॉ. रा. चिं. ढेरे मात्र पं. कृष्णदेव उपाध्याय यांच्याप्रमाणेच लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृती असे मानणारे आहेत. त्यांच्या सर्व संशोधनातून त्यांच्या या भूमिकेचा प्रत्यय येतो. ‘लोकसंस्कृतीचे शब्दरूप लोकवाङ्‌मयात (फोक लिटरेचर) असते; तर लोकसंस्कृतीचे कृतिरूप हे लोकाचार, लोकरूढी, लोकभ्रम इत्यादींत असते.  लोकसंस्कृती हे लोकसाहित्याचे व्यक्त रूप असते.’ असा डॉ. ढेरे यांच्या प्रतिपादनाचा आशय होय.

डॉ. ढेरे, पं. कृष्णदेव उपाध्याय, डॉ. वासुदेवशरण अग्रवाल आणि पाश्चिमात्य अभ्यासक या सर्वांच्या मते संस्कृतीतील कथागीतादी सर्व शाब्द वाङ्‌मय व सर्व शब्देतर साहित्य या सर्वांचा सामग्र्याने केलेला अभ्यास म्हणजे लोकसाहित्याचा अभ्यास होय. स्वाभाविकच या अभ्यासाचा व्याप फार मोठा आहे. विशिष्ट समाजाच्या लोकसाहित्याचा (लोकसंस्कृतीचा) अभ्यास करण्यासाठी त्या समूहाचा इतिहास, त्यांच्या भूप्रदेशाचा भूगोल, समाजशास्त्र, मानवशास्त्र, पुरातत्वशास्त्र, भाषाशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, दैवतकथाशास्त्र आणि आज अर्थशास्त्र या सर्व शास्त्रांच्या अभ्यासाचे सहकार्य घेतल्याखेरीज या अभ्यासाला पूर्णता येणार नाही. म्हणूनच ही एक बहुस्पर्शी अथवा समन्वित अभ्यासपद्धती (मल्टिडिसिप्लिनरी स्टडी ॲप्रोच) आहे. एक स्वतंत्र अभ्यासशास्त्र म्हणून समन्वित पद्धतीने लोकसाहित्याभ्यास होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. लोकसाहित्याच्या अभ्यासासाठी आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण बाब म्हणजे क्षेत्रीय  कार्य (फिल्ड वर्क) ही आहे. क्षेत्रीय कार्याखेरीज लोकसाहित्याचे समग्र आकलन होणे दुरापास्त असते.

अमेरिका, जर्मनी, रशिया या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत असलेल्या राष्ट्रांतील विद्यापीठांमधून लोकसाहित्याभ्यासाच्या स्वतंत्र शाखा आहेत. या विषयावर मोठ्या प्रमाणात ग्रंथनिर्मिती होत आहे. आकाशात झेप घेतानाही माणसाची मातीची ओढ संपत नसावी, म्हणूनच मानवमात्राचे आद्य समूहमन त्याला पुन्हा पुन्हा आपल्या मुळाकडे खेचत असावे.

भारतातही अनेक विद्यापीठांतून लोकसाहित्याभ्यासाच्या स्वतंत्र शाखा सुरू झाल्या आहेत. अनेक मानव्यविद्याशाखांतील अभ्यासक एकत्रितपणे संशोधन करीत आहेत. म्हैसूर विद्यापीठात मानसगंगोत्रीयेथे लोकसाहित्य-संग्रहालय उभे राहिले आहे. राजस्थानातही लोकसाहित्य-संग्रहालय आहे. लोककलांच्या अभ्यासासाठी आणि जतन-संवर्धनासाठी भारताचे सांस्कृतिक खाते सतत प्रयत्नशील आहे.केरळमधील काही अभ्यासक फोकलोअर या नावाची एक लघुपत्रिका उत्स्फूर्तपणे प्रकाशित करतात. जागतिक पातळीवरील अभ्यासकांमध्ये संपर्क साधता यावा म्हणून दरवर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चासत्रांचे आयोजन विविध राष्ट्रे करीत आहेत. दरवर्षी ‘फोकलोअर काँग्रेस’ नावाची एक परिषदही आयोजित केली जाते.लोकसाहित्याभ्यास हा केवळ भूतकाळातील संस्कृतिघटकांचा अभ्यास नसून मानवी संस्कृतीच्या आरंभापासून माणसाने अबोधपणे जतन केलेल्या जिवंत सांस्कृतिक जीवनाचा तो शोध आहे. म्हणूनच मानवाचा वर्तमान हा भूतकाळाने घडविलेला असतो आणि त्याचे भविष्य हे भूत-वर्तमानाच्या आधाराने उभे राहिलेले असते, याची समृद्ध जाण लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासातून येऊ शकते.

वरील वृक्षाकृतीनुसार लोककथा, लोकगीते, म्हणी व उखाणे वगैरे शाब्द लोकसाहित्याचा विचार अनेकदा होतो. परंतु भारतभरच्या असंख्य जातिजमातींची त्यांच्या त्यांच्या बोलींमधून जातिपुराणे आहेत. अभिजात संस्कृत पुराणकथांची संवादी अशी लोकभाषेतील पुराणे आहेत. अनेकदा प्रचलित व सुप्रतिष्ठित पुराणातील संकल्पनांना व कथांना छेद देणाऱ्या कथा विविध जातिजमातींच्या पुराणांतून दिसतात. जातपंचायतीचे न्यायनिवाडे करणारे नियम त्या त्या जातिजमातीत परंपरेने चालत आलेले असतात. त्यांच्या मौखिक परंपरा असतात. एकापरीने ते त्या त्या समाजाचे, समाजशासनाचे नियम असलेल्या ‘स्मृति’ असतात. क्वचित त्यांची लिखित बाडे असतात.

लोकसंस्कृतीच्याच नव्हे, तर एकूणच भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांचे या सर्व साधनांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. येथील संस्कृतीची  गुंतागुंत उलगडण्यासाठी ही अत्यंत महत्वाची साधने आहेत. औद्योगिकीकरणाच्या व शहरीकरणाच्या प्रक्रियेत ही साधनेही लुप्त होत चालली आहेत. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपल्या गावगाड्याबाहेर या पुस्तकाच्या शेवटी  मांग जमातीमधील ‘बसवपुराण’ नावाच्या एका जातिपुराणाची संहिता छापलेली आहे. त्यातून भारतीय समाजाच्या भौतिक विकासातील कोडी सोडवण्यासही मदत होईल. अशी अनेक अलक्षित पुराणे सर्वदूर आहेत.

इष्ट ते साध्य करण्याचे व त्याचबरोबर अनिष्ट-निवारणाचे, रोगराई दूर करण्याचे अनेक मंत्र लोकभाषेत देवऋषी, भगत यांच्या परंपरेत आहेत. सर्वसामान्यांच्या रूढीतही असे लोकमंत्र आजही प्रचलित आहेत. ते समाजातील उच्चस्तरीय समजल्या जाणाऱ्या पांढरपेशा समाजातही आहेत. बालकाची दृष्ट काढतांना बायका जे पुटपुटतात तो एक लोकमंत्रच आहे. झोपताना उच्चारला जाणारा ‘अस्तिक-स्मरण’ हा लोकमंत्रच आहे. मंगळागौर पुजताना नववधू पुटपुटते, तो लोकपरंपरेने आलेला मंत्रच आहे. इच्छित प्राप्तीसाठी उत्कटपणे ताललयबद्ध शब्दसंहतीचे पुन्हा पुन्हा निष्ठेने उच्चारण करणे हे मंत्रलक्षण वरील सर्व उदाहरणांत आढळते. यावरूनही लोकसाहित्य म्हणजे केवळ ग्रामीण, खेडवळ व जुन्या लोकांचे साहित्य नव्हे, हे लक्षात येईल.

प्रत्येक प्रगत संस्कृतीची मुळे लोकसंस्कृतीत असतात आणि लोकपरंपरेचे अनेक अवशेष प्रगत अवस्थेतही विद्यमान असतात, याचे भान लोकसाहित्याच्या चिकित्सक अभ्यासातून येते.लोकसाहित्याच्या शब्देतर परंपरेतीलही लोकरूढी, चालीरीती, व्रताचार, विधिविधाने, तोडगे यांचा विचार केला जातो. त्या परंपरेची अनेक रूपे आधुनिक जीवनसरणीतही आढळतात.

लोककलांपैकी प्रयोगात्म लोककलांचा विचार अनेकदा होतो. मात्र हस्तकलांचा पद्धतशीर अभ्यास जितका व्हायला हवा तितका भारतीय अभ्यासकांनी अद्याप केलेला नाही. अलीकडे त्याचे भान येऊ लागले आहे. सर्व लोककलांचा उगम यातुधर्मातील श्रद्धेशी निगडित असल्याने सर्व भारतीय पारंपरिक कला धर्मश्रद्धेशी आजही बांधलेल्या आहेत.मात्र लोकक्रीडी, लोकवैद्यक व लोकज्योतिष यांचा भारतीय संदर्भातील अभ्यास व संशोधन अजूनही अलक्षित व उपेक्षित आहे.

संदर्भ : 1. Danieis, C. L.; Stevans, C. M. Ed. Encyclopedia of Superstitions, Folklore, and the Occult Sciences of the World, London, 1971.

2. Dorson, Richard, Ed. Folklore : Selected Essays, Bloomington, 1972.

3. Leach, Maria, Ed. Dictionary of Folklore, Mythology qnd  Legend, New York, 1949.

4. Reaver, J. Russell; Boswell, George W. The Fundamentals of  Folk Literature, London, 1962.

5. Thompson, Stith, Motif-Index of Folk- Literature Bloomington,  1955-58.

६. अग्रवाल, वासुदेवशरण, प्राचीन भारतीय लोकधर्म, अहमदाबाद, १९६४.

७. गोडसे, द. ग. लोकघाटी, मुंबई, १९७९.

८. जोशी, लक्ष्मणशास्त्री, संपा. राजवाडे लेखसंग्रह, दिल्ली, १९५८.

९. ठाकुर, रवींद्रनाथ, अनु. व संपा. भागवत, दुर्गा, लोकसाहित्य, मुंबई, १९६७.

१०. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीची क्षितिजे, पुणे, १९७१.

११. ढेरे, रा. चि. लोकसंस्कृतीचे उपासक, पुणे, १९६४.

१२. ढेरे, रा. चि. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा, पुणे १९९०.

१३. ढेरे, रा. चि. संतसाहित्य आणि लोकसाहित्य : काही अनुबंध, पुणे, १९७८.

१४. दाते, शं. ग. लोककथा, भाग १ व २, पुणे १९२९.

१५. परांजपे, तारा, आंध्र-महाराष्ट्र : सांस्कृतिक अनुबंध, औरंगाबाद, १९९१.

१६. बाबर, सरोजिनी, संपा. लोकसाहित्य : भाषा आणि संस्कृति, पुणे, १९६३.

१७. भवाळकर, तारा, लोकनागर रंगभूमी, पुणे १९८९.

१८. भवाळकर, तारा, लोकसंचित, पुणे १९९०.

१९. भवाळकर, तारा, लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, पुणे, १९८६.

२०. भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रुपरेखा, पुणे, १९७७.

२१. मराठे, रा. वि. संपा. गावगाडा शब्दकोश, मुंबई, १९९०.

२२. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे अंत:प्रवाह, पुणे, १९७५.

२३. मांडे, प्रभाकर, लोकसाहित्याचे स्वरुप, औरंगाबाद, १९८९.

२४. मोरजे, गंगाधर, लोकसाहित्य : एक स्वतंत्र अभ्यासक्षेत्र, पुणे, १९८५.

२५. व्यवहारे, शरद, लोकसाहित्य : उद्‌गम आणि विकास, नागपूर, १९८७.

लेखिका: तारा भवाळकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/15/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate