অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हेरकथा

हेरकथा

कथा या साहित्यप्रकारातील लोकप्रिय, रंजनप्रधान कथाप्रकार. या प्रकारात गुन्ह्याचा (मुख्यतः खुन्याचा) शोध, तपास आणि रहस्याचा क्रमाक्रमाने होत जाणारा उलगडा, अशा स्वरूपाचे कथासूत्र उत्कंठावर्धक, रंजक पद्धतीने मांडले जाते. कथा ही सामान्यतः आशयाची, पात्रांची, सामाजिक परिसराची, वास्तवाची आणि निवेदनशैलीची एक एकात्म संघटना असते. हेरकथा या प्रकारात मात्र विषयापेक्षा, पात्रांपेक्षा वा सामाजिक वास्तवापेक्षा विस्मयकारक, छुप्या, भुरळ घालणाऱ्या निवेदनशैलीद्वारा कथानकाला आणि कथानकातील रहस्याला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार या कथाप्रकारास हेरकथा (डिटेक्टिव्ह स्टोरी) तसेच रहस्यकथा, विस्मयकारक कथा, अद्भुतरम्य कथा असेही म्हटले जाते. कथेच्या अभिव्यक्तितंत्राची मर्यादा या साहित्यप्रकारात आढळत नाही. एकाच वेळी ह्या प्रकाराच्या कथा ह्या लघुकथा, कथा, दीर्घकथा वा कादंबरी यांपैकी कोणत्याही एका साहित्यप्रकारातून अभिव्यक्त होत असतात. मानवी संबंधांतील गूढता व विकृती, सामाजिक, आर्थिक, राजकीय गुन्हेगारी असे विषय घेऊन त्यांचा कौशल्याने, उत्कंठावर्धक शैलीने उलगडा करणे, कथानकात वरवर असंबद्ध भासणाऱ्या उप-कथानकांचा वापर करून वाचकांस भुरळ घालणे आणि सत्यान्वेषी भूमिकेतून सत्याचा उलगडा करणे अशा पद्धतीचे निवेदनतंत्र हेरकथेत प्राधान्याने वापरले जाते. हेरकथा आकर्षक, रोमहर्षक, वाचनीय व रंजक करण्यासाठी लेखक मानसशास्त्रीय विश्लेषणाधिष्ठित स्वभावरेखनाचा, व्यक्तिचित्रणाचा, बुद्धिचातुर्याचा आणि क्लृप्त्यांचा विशेषत्वाने वापर करतात. प्रसिद्ध ब्रिटिश-अमेरिकन दिग्दर्शक अ‍ॅल्फ्रेड हिचकॉक रहस्यप्रधान चित्रपटांच्या पटकथा लिहित असे.

सुप्रसिद्ध अमेरिकन कथाकार एडगर अ‍ॅलन पो (१८०९–४९) हा हेरकथा या प्रकाराचा आद्य प्रणेता मानला जातो. त्याने लिहिलेली ‘द मर्डर्स इन द ज्यू मॉर्ग’ (१८४१) ही पहिली हेरकथा मानली जाते. त्याच्या ‘द फॉल ऑफ द हाउस ऑफ अशर’, ‘हाँटेड पॅलेस’, ‘द मास्क ऑफ द रेड डेथ’, ‘द ब्लॅक कॅट’ इ. कथांनी भयकथेचा आणि गुप्त-हेरकथेचा प्रणेता म्हणून त्याची प्रतिमा प्रस्थापित केली. हेरकथा हा प्रकार हळूहळू विस्तारत जाऊन त्याची जागा हेर-कादंबऱ्यांनी घेतली आणि गुप्तहेर-कादंबऱ्या मोठ्या प्रमाणात लिहिल्या जाऊ लागल्या. १९३० चे दशक हा गुप्तहेर-कादंबऱ्यांचा सुवर्णकाळ होता. या काळात अशा रंजक हेर-कादंबऱ्या विपुल संख्येने लिहिल्या गेल्या आणि त्यांना मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग लाभून त्या अफाट लोकप्रियही झाल्या. उदा., डॅशिएल हॅमेटच्या गुप्तहेर-कादंबऱ्या या काळात खूप लोकप्रिय ठरल्या. हेरकथा क्षेत्रात अफाट लोकप्रियता लाभलेले लेखक म्हणजे आयरिश कथा--कादंबरीकार ⇨ आर्थर कानन डॉइल (१८५९–१९३०) हा होय. त्याने निर्माण केलेली शेरलॉक होम्स ही गुप्त पोलिसाची व्यक्तिरेखा जगभर विलक्षण लोकप्रिय ठरली. ‘शेरलॉक होम्स’ ही काल्पनिक गुप्तहेर--व्यक्तिरेखा पहिल्यांदा डॉइलच्या ‘अ स्टडी इन स्कार्लेट’ (१८८७) ह्या हेरकथेत अवतरली. याशिवाय  गिलबर्ट कीथ चेस्टर्टन (१८७४–१९३६) याने अनेक उत्कृष्ट हेरकथा लिहून अमाप लोकप्रियता मिळवली. द इनोसन्स ऑफ फादर ब्राउन (१९११), द विज्डम ऑफ फादर ब्राउन (१९११) इ. त्याचे हेरकथासंग्रह प्रसिद्ध आहेत. यांशिवाय यूरोपीय साहित्यात अ‍ॅगाथा ख्रिस्ती, जे. जे. कॉनिंग्टन, डॉरोथी सेअर्स, रेमंड चँडलर,  झॉर्झ सीम्नाँ इ. अनेक लेखक-लेखिकांनी हेरकथा निर्मितीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.

भारतीय साहित्याच्या परिप्रेक्ष्यात हेरकथालेखनात बंगाली लेखक अग्रेसर असून व्योमेश बॅनर्जी यांनी उच्च दर्जाच्या हेरकथा लिहिल्या आहेत. मराठी साहित्यात हेरकथांची सुरुवात ह. ना. आपटे यांच्या ‘चाणाक्षपणाचा कळस’ या दीर्घकथेपासून झाली. ही दीर्घकथा १८९०–९२ साली क्रमशः मासिक मनोरंजना तून प्रसिद्ध झाली.  बाबूराव अर्नाळकर हे मराठीतले अत्यंत लोकप्रिय हेरकथा लेखक होत. तसेच चंद्रकांत काकोडकर, सुहास शिरवळकर, बाबा कदम, गुरुनाथ नाईक यांसारख्या लोकप्रिय लेखकांनी मराठीतील हेरकथांचा प्रांत समृद्ध केला आहे. गुप्तहेर, शेरलॉक, धनंजय, रहस्यमाला यांसारख्या अनेक मासिकांतून मराठीत सातत्याने हेरकथा प्रसिद्ध होत आल्या आहेत. समीक्षकांनी हेरकथांची गणना ही अल्पजीवी रंजक साहित्यात केलेली असली, तरी सर्वसामान्य वाचकांमध्ये अशा कथांचे आकर्षण व लोकप्रियता जबरदस्त असल्याचे दिसून येते, त्यामुळे हा कथाप्रकार टिकून आहे.

लेखक: सदांशिव दिवाकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/4/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate