অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पणजी

पणजी

पणजी

भारतातील गोवा, दमण, दीव या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी. गोव्यातील सर्वांत मोठे शहर आणि अरबी समुद्र किनाऱ्यावरील नैसर्गिक बंदर. लोकसंख्या ३४,८३७ (१९७१) उपनगरांसह ५९,२५८ (१९७२). हे मुंबईच्या दक्षिणेस सु. ३६० किमी. मांडवी नदीमुखाच्या दक्षिण तीरावर वसले आहे.

पणजी येथील मंत्रालय

अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत ताळगावची ही एक वाडी होती व सागरगामी जहाजे येथे गोडे पाणी घेण्यासाठी थाबंत.

या बंदरातील उतरणीच्या भागास ‘पाण’ म्हणतात व त्यावरून ‘पाणजी’-पणजी है नाव पडले असावे. १५°२९’ उत्तर या अक्षांशावर व सागरकिनाऱ्यालगत हे शहर असल्याने येथील हवामान उष्ण व दमट सागरी प्रकारचे आहे. जून ते सप्टेंबर या कालावघीत नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांपासून सु. ३०० सेंमी. पाऊस पडतो. इतर महिने बहुतांशी कोरडे असतात.

विजापूरच्या मुसलमानी सुलतानाकडून १५१० मध्ये पोर्तुगीजांनी गोवा (गोमंतक) जिंकल्यानंतर त्यांनी जुने गोवे या ठिकाणी राजधानी स्थापन केली. परंतु प्लेगच्या साथीने तेथे थैमान घातल्यामुळे १८४३ मध्ये राजधानी पणजी-नवा गोवा-येथे आणण्यात आली. आल्तिनो टेकडीपासून मांडवीच्या किनाऱ्यापर्यंत चंद्रकोरीच्या आकाराचे हे नगर वसविण्यात आले. आल्तिनो या टेकडीवर उच्च आणि श्रीमंत लोकांची वस्ती आहे. यांशिवाय रायबंदर, मेर्सी, चिंबल हे पणजीचे इतर उपनगरी विभाग आहेत.

मांडवीच्या काठाने ‘अ‍ॅव्हेन्यू द ब्राझील’ या राजमार्गावर तसेच सरकारी व खाजगी आधुनिक इमारती तसेच आबे फारियासारखे अनेक सुंदर पुतळे व उद्याने आहेत. मीरामार चौपाटी, मांडवीची खाडी व दोनापावला या भिन्न प्रकारच्या सागरी किनाऱ्यांनी पणजीच्या सौंदर्यात भर घातली आहे. साडेचारशे वर्षाच्या पोर्तुगीज राजवटीमुळे या शहराच्या रचनेवर पाश्चात्त्य संस्कृतीची छाप पडलेली असून व्यवहाराची भाषा कोकणी आहे.

आदिलखाँ महाल इमारतीतील सचिवालय, ‘अवर लेडी ऑफ इमॅक्यूलेट कन्सेप्शन’ हे भव्य ख्रिस्ती प्रार्थनामंदिर, ‘सेंट्रल लायब्ररी’ व ‘इंप्रेसा नासियोनाल’ ही दुर्मिळ, पुस्तकांची दोन ग्रंथालये येथे असून ‘राष्ट्रीय महासागरविज्ञान संस्था’ आणि कला, वाणिज्य, शास्त्र व वैद्यकीय महाविद्यालये इ. शैक्षणिक संस्था आहेत. पणजी परदेशी प्रवाशांचे आवडते केंद्र झाल्याने तेथे अत्याधुनिक व आलिशान उपाहारगृहे आहेत.

मांडवीवरील पुलाने हे शहर राष्ट्रीय हमरस्त्यावर आले आहे. येथून मडगाव रेल्वेस्थानक ३३ किमी. आणि दाभोळी विमानतळ २८ किमी. वर असून बंदरातून लोह खनिज, मँगॅनीज, मासे, नारळ, काजू इ. निर्यात होतात. ऐतिहासिक व आधुनिक गोष्टींचा सुरेख संगम झालेली इतकी नयनमनोहर राजधानी क्वचितच आढळेल.


आठल्ये, द. वा.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate