অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नद्या

आशिया खंडातील एक प्रमुख प्रजासत्ताक आणि जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र. लोकसंख्येच्या बाबतीत चीन खालोखाल भारताचा जगात दुसरा क्रमांक, तर क्षेत्रफळाच्या बाबतीत रशिया, ब्राझील, कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया व चीनखालोखाल सातवा क्रमांक लागतो. ‘भारतीय उपखंड’ म्हणून आशियातील ज्या प्रदेशाचा निर्देश करण्यात येतो, त्यातील सर्वांत अधिक क्षेत्र भारताने व्यापलेला आहे. भारताचे स्थान पूर्व गोलार्धात मध्यवर्ती असून आशिया खंडाच्या दक्षिणेस हा देश येतो. बंगालच्या उपसागरातील अंदमान व निकोबार द्वीपसमूह तसेच अरबी समुद्रातील लक्षद्वीप, मिनिकॉय व अमिनदीवी बेटे हा भारताचाच भाग आहे. गुजरात राज्याच्या अतिपश्चिमेकडील टोकापासून (६८७' पू.) पूर्वेस अरूणाचल प्रदेशाच्या अतिपूर्वेकडील टोकापर्यंत (९७ २५' पू.) हा देश विस्तारला असून हे अंतर सु. २,९३३ किमी. भरते. तसेच दक्षिणेस कन्याकुमारीपासून (८0 ४' उ.) उत्तरेस जम्मू-काश्मीर राज्याच्या उत्तर टोकापर्यंत (३७ ६' उ.) देशाचा दक्षिणोत्तर विस्तार असून हे अंतर सु. ३,२१४ किमी. आहे. देशाचे क्षेत्रफळ ३२,८७,७८२ चौ. किमी. असून ते जगाच्या क्षेत्रफळाच्या २.४% आहे. १९८१ च्या जनगणनेनुसार देशाची लोकसंख्या ६८,३८,१०,०५१ आहे. नवी दिल्ली (लोकसंख्या ६१,९६,४१४-१९८१) हे भारताच्या राजधानीचे ठिकाण आहे. भारताची भूसीमा १५,२०० किमी. असून सागरी सीमा सु. ६,१०० किमी. आहे. भारताच्या वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान; उत्तरेस चीन, नेपाळ आणि भूतान; पूर्वेस ब्रम्हदेश व बांगला देश आणि दक्षिणेस श्रीलंका हे देश असून पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर व दक्षिणेस हिंदी महासागर आहे. देशाच्या नावावरून ओळखला जाणारा जगातील हा एकमेव महासागर होय. कर्कवृत्त (२३ १/२ उ.) देशाच्या मध्यातून जाते. ८२ १/२ पूर्व. हे रेखावृत्त भारताच्या जवळजवळ मध्यातून जात असून या रेखावृत्तावरील मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथील स्थानिक वेळेवर भारताची प्रमाणवेळ आधारलेली आहे. प्रस्तुत नोंदीत भारतासंबंधीची माहिती पुढील प्रमुख विषयानुक्रमाने दिलेली आहे व या प्रमुख विषयांखाली आवश्यक तेथे महत्त्वाचे उपविषय तसेच उप-उप विषय दिलेले आहेत.

प्रमुख विषय

(१) देशनाम, राजकीय विभाग, राष्ट्रध्वज इत्यादी. (२) भूवैज्ञानिक इतिहास, (३) भूवर्णन, (४) मृदा, (५) नैसर्गिक साधनसंपत्ती, (६) जलवायुमान, (७) वनश्री, (८) प्राणिजात, (९) इतिहास, (१०) राजकीय स्थिती, (११) विधी व न्यायव्यवस्था, (१२) संरक्षणव्यवस्था, (१३) आर्थिक स्थिती, (१४) लोक व समाजजीवन, (१५) धर्म, (१६) शिक्षण, (१७) विज्ञान व तंत्रविद्या, (१८) भाषा, (१९) साहित्य, (२०) वृत्तपत्रसृष्टी, (२१) ग्रंथालये, (२२) कला, (२३) हस्तव्सवसाय, (२४) संग्रहालये व कालावधी, (२५) रंगभूमी, (२६) चित्रपट, (२७) खेळ व मनोरंजन, (२८) महत्त्वाची स्थळे.

वरील प्रमुख विषय व त्यांतील उपविषय यांच्या विवेचनात अनेक ठिकाणी बाणांकाने करून, तसेच चौकटी कंसातील पूरक संदर्भ देऊन भारतासंबंधी विश्वकोशाच्या एकूण सतरा खंडात स्वतंत्र नोंदीच्या रूपाने आलेले विषय दाखविले आहेत. त्यांवरून जिज्ञासू वाचकाला भारतासंबंधी अधिक माहिती मिळू शकेल. उदा., भारताच्या प्रदीर्घ इतिहासातील बहुतेक सर्व महत्त्वाचे कालखंड, राजकीय सत्ता, घराणी यांवर स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत. उदा., मौर्य काल; गुप्त काल; इंग्रजी अंमल, भारतातील; मराठा अंमल; शीख सत्ता, भारतातील; इत्यादी.

पृथ्वीतलावरील भारतीय उपखंड : एक नमुनाकृती

भारतातील सर्व घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश, भारतीय संविधान, भारतीय तत्त्वज्ञान, भारतीय कला, भारतीय वास्तुकला, प्रमुख भारतीय भाषा व त्याचे साहित्य इत्यादींवर स्वतंत्र नोंदी दिलेल्या आहेत. भारतातील पिके, उद्योगधंदे, शक्तिसाधने, रंगभूमी, चित्रपट, देशी-विदेशी खेळ इ. विषयांवरील नोंदीतून त्या त्या विषयाशी संबंधित अशी भारताची माहिती दिलेली आहे. उदा., चित्रपट या नोंदीत भारतातील विविधभाषी चित्रपटसृष्टीबद्दलची माहिती आली आहे. प्राचीन व अर्वाचीन काळातील विविध क्षेत्रांतील थोर आणि कर्तृत्वान अशा भारतीय व्यक्तींवरही स्वतंत्र नोंदी आहेत. वाचकाने विश्वकोशात भारतासंबंधीच्या इतरत्र आलेल्या नोंदी पाहिल्यास त्यातून भारतासंबंधीची अधिक माहिती मिळू शकेल.

देशनाम- राजकीय विभाग -राष्ट्रध्वज इत्यादी

देशनाम

भारतवर्ष (वर्ष म्हणजे र्यपुराणप्रथेनुसार 'खंडा'चा विभाग) हे देशाचे प्राचीन नाव. त्याशिवाय अजनाभवर्ष, हैमवतवर्ष (वायुपुराण), कार्मुकुसंस्थान, कूर्मसंस्थान (मार्कंडेयपुराण) अशीही पौराणिक नावे आढळतात. ऋग्वेदात वर्णिलेल्या भरत नावाच्या मानववंशाचे वसतिस्थान व राज्य म्हणून किंवा भरत नावाचा ऋषभदेवाचा पुत्र अथवा दुष्यंत-शकुंतला यांच पुत्र या देशाचा सम्राट होता म्हणून याचे नाव भारत असे पडले असावे. नाभिपुत्र ऋषभाने आपला ज्येष्ठ पुत्र भरत याला राज्याभिषेक करून त्याला हैमवत नावाचे दक्षिणवर्ष राज्यकारभारासाठी दिले. हेच हैमवतवर्ष भरताच्या नावावरून भारत या नावाने ओळखले जाऊ लागले. वायुपुराणातील या उक्तीला भागवत आणि मार्कडेय ह्या पुराणातही पुष्टी दिलेली आहे. महाभारतात मात्र दुष्यंत-शकुंतलापुत्र भरत याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव पडल्याचे म्हटले आहे. भारतामुळे येथील लोकांची कीर्ती झाली; त्यामुळे त्याच्या कुलाला भारतकुल व नंतर देशातले सर्व लोक याला भारत म्हणू लागले. डॉ. वासुदेवशरण अग्रवाल यांनी भारत या नावाविषयी दोन व्युत्पत्ती दिल्या आहेत : पहिल्या व्युत्पत्तीनुसार ऋग्वेदकाळात आर्याची भारत नावाची एक पराक्रमी शाखा होती. त्या शाखेने बिपाशा (सांप्रतची बिआस) व शतद्रु (सतलज) नद्या पार करून ज्या प्रदेशात आगमन केले व वसती केली, त्या प्रदेशाला ‘भरत जनपद’ असे म्हटले जाऊ लागले. या जनपदातल्या प्रजेला भारतीय प्रजा भारतीय म्हणून ओळखले जाई. या भरतजनांच्या आधारावर देशाच्या एका विशिष्ट भूभागाला भारत म्हटले जाऊ लागले. पुढे या भरतजनांनी ज्या प्रदेशावर आपली विस्तारली, त्या सर्व व्याप्त प्रदेशातलाही भारत हे नाव पडून पुढे संपूर्ण देशाचेच ते नाव रूढ झाले असावे. दुसऱ्या व्युत्पत्तीनुसार ऋग्वेदात यज्ञाग्नीला भारत असे म्हटले आहे. भारतजनांनी या भूमीवर प्रथम यज्ञाग्नी प्रज्वलित केला म्हणून या देशाला भारत हे नाव प्राप्त झाले असावे. शतपथ ब्राह्मणातमहाभारतातही अग्नीला भरत असे म्हटलेले आहे.

तिबेटमध्ये त्सांगपो नावाने ओळखली जाणारी ब्रह्मपुत्रा नदी मान सरोवराच्या आग्नेयीस सु. १०० किमी. वर एका हिमनदीतून उगम पावते. सु. १,२५० किमी. लांबीच्या प्रवासानंतर ती दक्षिणेकडे वळते व आसाममध्ये प्रवेश करते. तेथे तिने विस्तृत खोरे तयार केले आहे. दिबांग, लोहित, सुबनसिरी, कामेंग, तिस्ता, बडी दिहांग, दिसांग, कोपिली, धनसिरी इ. ब्रह्मपुत्रेच्या प्रमुख उपनद्या आहेत.

भारतीय द्वीपकल्पावरील प्रमुख नद्या

नर्मदा नदी अमरकंटक पठारावर उगम पावून एका खचदरीतून पश्चिमेकडे वाहत जाते व खंबायतच्या आखातास मिळते. तापी नदी सातपुडा पर्वतात उगम पावते व खचदरीतून पश्चिमेकडे वाहत जाऊन अरबी समुद्रास मिळते. दामोदर नदी छोटा नागपूरच्या पठारात उगम पावते व पूर्वेकडे वाहत जाऊन हुगळी नदीस मिळते. महानदी दंडकारण्याच्या उत्तर भागात उगम पावून प्रथम उत्तरेकडे वाहत जाते व नंतर पूर्वेकडे वळून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी नदी महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतात त्र्यंबकेश्वरजवळ उगम पावते व नंतर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते. मांजरा, प्राणहिता,इंद्रावती इ. नद्या तिला येऊन मिळतात. कृष्णा नदी महाबळेश्वर पठारावर उगम पावून प्रथम आग्नेयीकडे वाहत जाते. नंतर ती कर्नूलच्या पुढे ईशान्येस व पूर्वेस वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. भीमा, कोयना, पंचगंगा,तुंगभद्रा इ. तिच्या प्रमुख उपनद्या होत. कावेरी नदी कूर्ग जिल्ह्याच्या पश्चिम भागात उगम पावते व आग्नेयीकडे वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते.

महानदी, ब्राह्मणी, वैतरणा, गोदावरी, कृष्णा, कावेरी, पेन्नार, पालार, वैगई या बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या द्वीपकल्पावरील प्रमुख नद्या आहेत. यांची पात्रे रुंद असून मुखाशी त्रिभुज प्रदेश आहेत. विंध्य व सातपुडा पर्वतांत उगम पावणाऱ्या चंबळ, बेटवा, दामोदर, शोण, केन इ. नद्या असून त्या ईशान्येस गंगा नदीकडे वाहत जातात. अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्यांमध्ये साबरमती, मही, नर्मदा, तापी, शरावती या नद्या प्रमुख आहेत. बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या व अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या असेही भारतातील नद्यांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करता येते.

भारतातील नद्यांमधून दरवर्षी १६,८३,००० द. ल. घ. मी. एवढे पाणी वाहत असते. नद्यांच्या पुरामुळे काही वेळा विघातक कार्य घडत असले, तरी त्या आपल्या खोऱ्यात पर्वतपदीय मैदाने, गाळाची सुपीक मैदाने, पूरमैदाने,त्रिभुज प्रदेश इ. भूविशेषांची निर्मिती करून विधायक कार्यही करतात.

प्रसिद्ध गिरसप्पा धबधबा, कर्नाटक राज्य.

पश्चिम घाट हा भारतीय द्वीपकल्पावरील पूर्व व पश्चिमवाहिनी अशा अनेक नद्यांचा जलविभाजक आहे. येथून उगम पावणाऱ्या लहानमोठ्या नद्यांवर अनेक धबधबे व प्रपातमाला आढळून येतात. शरावती नदीवरील गिरसप्पा धबधबा (भारतातील सर्वांत उंच धबधबा), कावेरी नदीवरील शिवसमुद्रम व होगेनकल धबधबे, पैकारा नदीवरील पैकारा धबधबा, घटप्रभा नदीवरील गोकाक धबधबा इ. हे भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण भागातील प्रसिद्ध धबधबे आहेत. तसेच उत्तर भागात नर्मदा, शोण, चंबळ, बेटवा या नद्यांवरही धबधबे व प्रपातमाला आहेत. त्यांपैकी नर्मदा नदीवरील धुवांधार व कपिलधारा, चंबळीवरील चुलिया व तोन्सवरील बेहार हे धबधबे प्रसिद्ध आहेत. कावेरी, कृष्णा व चंबळ या नद्यांवर तर अनेक प्रपातमाला आढळतात.

मुद्र व बेटे

भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर व दक्षिणेस हिंदी महासागर आहे. अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराची निर्मिती क्रिटेशस कालखंडाच्या उत्तरार्धात किंवा तृतीयक कालखंडाच्या पूर्वार्धात झालेली असावी. खोलीनुसार या सागरी विभागाचे चार भाग पाडले जातात. भारताची अनेक बेटे या दोन सागरभागांतच आहेत. बंगालच्या उपसागरातील बेटे अरबी समुद्रातील बेटांपेक्षा विस्ताराने मोठी व अधिक वसती असलेली आहेत. निर्मितीच्या बाबतीतही यांत भिन्नता आढळते. बंगालच्या उपसागरातील बेटे म्हणजे सागरांतर्गत पर्वतश्रेण्यांचे माथ्याचे भाग असून अरबी समुद्रातील बेटांची निर्मिती प्रवाळांपासून झालेली आहे.

लक्षद्वीप, अमिनदीवी व मिनिकॉय ही अरबी समुद्रातील प्रमुख भारतीय बेटे असून ती सु. ८° ते १२° उ. अंक्षांशांदरम्यान आहेत. यांतील मिनिकॉय हे सर्वांत दक्षिणेकडील बेट असून त्याच्या उत्तरेस असलेल्या लक्षद्वीप बेटांमध्ये पाच, तर अमिनदीवी बेटांमध्ये सहा प्रमुख बेटांचा समावेश होतो. बंगालच्या उपसागरात ६° ४५' ते १३° ४५' उ. अक्षांश व ९२° १५' ते ९४° १३' पू. रेखांश यांदरम्यान अंदमान व निकोबार ही भारताची बेटे आहेत. या बेटांच्या किनाऱ्यांवर प्रवाळभित्ती तयार झालेल्या आढळतात. यांतील बॅरन हे ज्वालामुखी बेट आहे. या बेटांच्या पूर्वेकडील सागरी भागास अंदमान समुद्र असे म्हणतात. गुजरातच्या किनाऱ्यावर कच्छ व खंबायत ही आखाते असून भारत-श्रीलंका यांदरम्यान मानारचे आखात व पाल्कची सामुद्रधुनी आहे.

वरील सागरी बेटांशिवाय भारताच्या किनाऱ्यालगतही अनेक बेटे आढळतात. त्यांपैकी गुजरातच्या किनाऱ्यावरील खंबायतच्या आखातातील नोरा, बैदा, कारूंभार व पीरोतान; काठेवाड द्वीपकल्पाच्या द. किनाऱ्यावरील दीव बेट, खंबायतच्या आखातातील परिम बेट; महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील साष्टी, करंजा; कर्नाटकच्या किनाऱ्यावरील अंजदीव, पिजन, सेंट मेरी आणि केरळच्या किनाऱ्यावरील विपीन ही अरबी समुद्रकिनाऱ्यावरील, तर तमिळनाडूच्या किनाऱ्यावरील वानतीवू, पांबन;आंध्रच्या किनाऱ्यावरील श्रीहरिकोटा, पुलिकत; ओरिसाच्या किनाऱ्यावरील व्हिलर, शॉर्टस व प. बंगालच्या किनाऱ्यावरील सागर, बुलचेरी, बांगदूनी, मूर इ. बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरील प्रमुख बेटे आहेत.

हिमनद्या

भारत हा उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे येथील हिमालयाच्या अधिक उंचीच्या प्रदेशातच हिमनद्या आढळतात. खिंडी व दऱ्यांपेक्षा पर्वतशिखरांच्या भागातच अधिक हिमवृष्टी होत असून येथील हिमरेषाही वेगवेगळ्या भागांत वेगवेगळी आढळते. पश्चिम हिमालयातील हिमरेषा ४,५०० ते ६,००० मी. यांदरम्यान, तर पूर्व हिमालयात ती ४,००० ते ५,८०० मी. च्या दरम्यान आढळते. सिक्कीममध्ये हिमवृष्टीचे प्रमाण अधिक असते. जगातील मोठ्या हिमनद्यांपैकी बऱ्याच हिमालयात आढळतात. सिआचेन (७० किमी.); हिस्पार (६२ किमी.), बल्तोरो (६० किमी.) व बिआफो (६० किमी.) या हिमालयाच्या काराकोरम पर्वत विभागातील प्रमुख हिमनद्या असून त्यांनी सु. १३,००० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे. या हिमनद्यांपासून सिंधूच्या उजव्या तीरावरील नद्यांना पाणीपुरवठा होतो. कुमाऊँ हिमालयातही अनेक हिमनद्या असून त्यांतील गंगोत्री ही सर्वांत मोठी (लांबी ३० किमी.) हिमनदी आहे. नेपाळ सिक्कीममधून कांचनजंधा हिमाल ही हिमनदी वाहते. याशिवाय झेमू, यालुंग,तालुंग, जानो व कांचनजंघा हिमाल ही हिमनदी वाहते. यांशिवाय झेमू, यालुंग, तालुंग जानो व कांचनजंघा या इतर उल्लेखनीय हिमनद्या आहेत. या सर्व हिमनद्यांच्या वेगामध्ये फरक आढळतो. बल्तोरो हिमनदी दिवसाला २ मीटर व खुंबू हिमनदी दिवसाला १३ सेंमी. एवढी पुढे सरकते; तर बऱ्याचशा हिमनद्या मागेमागे सरकत असलेल्या आढळतात. हिमालयाचा बर्फाच्छादित भाग व या हिमनद्यांमुळे भारतातील नद्यांना केवळ पाणीपुरवठा होतो असे नव्हे, तर त्याचा मैदानी प्रदेशातील मॉन्सूनच्या पर्जन्यावर व पर्वतीय भागातील हिमवृष्टीवरही परिणाम होतो. हिमालयातील हिमनद्या व बर्फाच्छादित प्रदेश म्हणजे भारतीय लोकांना निसर्गाकडून लाभलेली देणगीच आहे.

 

स्त्रोत -- मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate