অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

म्हैसूर नरसिंहाचार श्रीनिवास

म्हैसूर नरसिंहाचार श्रीनिवास

१६ नोव्हेंबर १९१६ -  १९९९. प्रसिद्ध भारतीय समाजशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म सुशिक्षित कुटुंबात म्हैसूर ( कर्नाटक ) येथे झाला. वडिलांचे नाव नरसिंहाचार. त्यांनी जन्मगावी शालेय-माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे एम्.ए., एल्एल्.बी., पीएच्.डी., डी.फिल्. वगैरे उच्च पदव्या मिळविल्या. यांपैकी पीएच्.डी. आणि डी. फिल्. या पदव्या अनुकमे मुंबई व ऑक्सफर्ड ( इंग्लंड ) विदयापीठांतून मिळविल्या. सुरूवातीस त्यांनी ऑक्सफर्ड विदयापीठात ‘ भारतीय समाजशास्त्र’ ह्या विषयाचे अधिव्याख्याता म्हणून काम केले (१९४८५१). पुढे महाराजा सयाजीराव विदयापीठ, बडोदा (१९५१५९) आणि दिल्ली विदयापीठात (१९५९७२) त्यांनी अध्यापन केले.

यांबरोबरच त्यांनी देशविदेशांत अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. पुढे रॉयल अँथपलॉजिकल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटन अँड आयर्लंड या संस्थेचे मानद अधिछात्र म्हणून त्यांची निवड करण्यात आली. हा बहुमान मिळविणारे ते पहिले भारतीय होत. त्यांनी बर्कली, कॅलिफोर्निया येथे टागोर    अधिव्याख्याता आणि मँचेस्टर येथे सायमन अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले (१९६३). त्यानंतर स्टॅनफर्ड विदयापीठात ( कॅलिफोर्निया ) वर्तनशास्त्र विभागात ते कार्यरत होते. तसेच बंगलोर येथील सामाजिक व आर्थिक परिवर्तन संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी  सांभाळले. श्रीनिवास यांच्या पत्नीचे नाव रूक्मिणी असून त्यांना दोन मुली आहेत.

श्रीनिवास यांचे भारतीय समाजशास्त्रामधील संशोधन व क्षेत्राभ्यास  महत्त्वाचा आहे. त्यांनी दक्षिण भारतातील कुर्ग ज्ञातिव्यवस्थेतील परिवर्तनाचा चिकित्सक अभ्यास केला आणि तत्संबंधी शोधनिबंध प्रसिद्ध केले. तेथील तेरा कनिष्ठ जातींनी उच्च जातीचे, म्हणजे ब्राह्मण जातीचे अनुकरण करून आपला समाजव्यवस्थेतील दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला. त्याला ‘ बाह्मणीकरणाची प्रकिया ’ असे त्यांनी म्हटले आहे. तेथील कनिष्ठ जाती ब्राह्मणांचे आचार-विचार, प्रथा-परंपरा, रीतिरिवाज इत्यादींचे अनुकरण करतात व आपला सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न करतात. ब्राह्मण नसलेल्या ठिकाणी आर्थिक, राजकीय व संख्यात्मक दृष्टया बलिष्ठ असलेल्या स्थानीय जातीचे अनुकरण केले जाते. ही परिवर्तनाची प्रकिया केवळ कुर्ग समुदायापुरतीच मर्यादित नसून, जवळजवळ सर्वच प्रादेशिक समाजांतील कनिष्ठ जातींत त्यांना आढळून आल्यावर त्यांनी परिवर्तनाच्या या प्रकारास ‘ सांस्कृतिकीकरण ’ ही संज्ञा वापरली. तसेच त्यांनी पश्चिमीकरण व आधुनिकीकरण या संकल्पनांचीही उकल केली आहे. पश्चिमीकरण म्हणजे पाश्चिमात्यांच्या संस्कृतीचे भारतीयांनी केलेले अनुकरण होय.

बिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीत भारतीय समाजात तंत्रज्ञान, सामाजिक संस्था, विचार व मूल्ये अशा विविध पातळ्यांवर मोठया प्रमाणात परिवर्तन घडून आले. या परिवर्तनास ते ‘ पश्चिमीकरण ’ असे म्हणतात. पश्चिमीकरणापेक्षा आधुनिकीकरणाची प्रकिया अधिक व्यापक, प्रभावी व मूलभूत आहे. आधुनिकीकरण म्हणजे काही तर्कशुद्ध ( म्हणजे बुद्धीला पटणाऱ्या ) व मानवतावादी मूल्यांचे तसेच नियमनांचे आत्मसातीकरण होय. सामाजिक, राजकीय, आर्थिक वगैरे विविध पातळ्यांवर विकसित झालेल्या नवीन ज्ञानाचा, विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा व विचारांचा अवलंब करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य या प्रकियेने केले, असा विचार श्रीनिवास यांनी आपल्या लेखन-संशोधनाव्दारे मांडला आहे. श्रीनिवास यांचे न्याय, समता व दारिद्र्यनिर्मूलन यांविषयीचे विचार हे केवळ आदर्शात्मक नसून ते वास्तव परिस्थितीवर आधारलेले आहेत.

श्रीनिवास यांनी समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून बहुतेक सर्व लेखन केले आहे. त्यांची गंथसंपदा विपुल आहे. त्यांपैकी मॅरेज अँड फॅमिली इन म्हैसूर (१९४२), रिलिजन अँड सोसायटी अमंग द कुर्ग्ज ऑफ साउथ इंडिया (१९५२), कास्ट इन मॉडर्न इंडिया अँड अदर एसेज (१९६२), सोशल  चेंज इन मॉडर्न इंडिया (१९६६), द रिमेम्‌बर्ड व्हिलेज (१९७६), व्हिलेज, कास्ट, जेन्डर अँड मेथड (१९८८), इंडियन सोसायटी थ्रू पर्सनल रायटिंग्ज (१९९८)आणि द डॉमिनंट कास्ट अँड अदर एसेज; द कोहीझिव्ह रोल  ऑफ संस्कृटायझेशन अँड अदर एसेज; इंडियाज व्हिलेजिस इ. महत्त्वाचे व उल्लेखनीय गंथ होत.

श्रीनिवास यांना अनेक मानसन्मान लाभले. भारत सरकारने त्यांना ‘ पद्मभूषण ’ पुरस्कार देऊन सन्मानित केले (१९७६). यांबरोबरच रिव्हर स्मृती पदक (१९५५), एस्. सी. रॉय पदक (१९५८), नवरोजी स्मृती पारितोषिक (१९७१), हक्स्ली स्मृती पदक (१९७६), जी. एस्. घुर्ये  पुरस्कार (१९७८) इ. पुरस्कार व पारितोषिके त्यांना लाभली. तसेच त्यांना म्हैसूर, नीस, शिकागो, मणिपूर इ. विदयापीठांतर्फे मानद डॉक्टरेट     प्रदान करण्यात आली आहे.

लेखक: किरण केंद्रे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/11/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate