অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टेनेसी

टेनेसी

अमेरिकेच्या ‘पूर्व दक्षिणमध्य’ विभागातील एक राज्य. क्षेत्रफळ १,०९,४११ चौ. किमी.पैकी पाण्याखाली १,२४८ चौ. किमी. लोकसंख्या ४१,२६,००० (१९७३). विस्तार ३५° उ. ते ३६° ४१' उ. आणि ८१° ४०' प. ते ९०१८' प. यांदरम्यान. याच्या दक्षिणेस जॉर्जिया, ॲलाबॅमा व मिसिसिपी, मिसिसिपी नदीच्या पलीकडे पश्चिमेस आर्‌कॅन्सा व मिसूरी, उत्तरेस केंटकी व व्हर्जिनिया आणि पूर्वेस नॉर्थ कॅरोलायना ही राज्ये आहेत. नॅशव्हिल ही राजधानी आहे.

भूवर्णन

पश्चिम सीमेच्या मिसिसिपीकडून पूर्वसीमेच्या ॲपालॅचिअन पर्वतापर्यंत सु. ६९५ किमी. लांबीचा व १८० किमी. रुंदीचा हा राज्यप्रदेश चढत गेलेला आहे.

नैर्ऋत्येस मिसिसिपीच्या काठचा सर्वांत सखल भाग, त्यात मेंफिसच्या दक्षिणेस स. स. पासून फक्त ५८ मी. उंचीचा प्रदेश, वायव्येस राज्यातले एकमेव नैसर्गिक सरोवर रीलफुट; पश्चिमेचे सु. १६० किमी. रुंदीचे नदीकाठ मैदान, त्यात अनेक दलदली व डबकी. या सपाट भागाच्या पूर्वेस प्राचीन काळी वाऱ्‍याने वाहून आणलेल्या मातीची टेकाडे, त्यांच्या पूर्वेस सु. २४८ मी. उंचीचा टेकड्यांचा प्रदेश पूर्वेकडे उतरत गेलेला, त्याच्या मध्यभागी ९३ ते १२४ मी. खोलीचा एक विस्तीर्ण लंबगोलाकार उत्तम जमिनीचा खोलगट प्रदेश व त्याभोवतीचे ‘हायलँडरिम’ कडे; त्याच्या पूर्वेस चढत गेलेले ५५८ ते १,०८५ मी. उंचीचे कंबर्लंड पठार. त्याची पूर्वकड तुटून एकदम ४६५ मी. खाली ग्रेट व्हॅली खोऱ्‍यात उतरलेली; या खोऱ्‍यात अनेक समांतर डोंगररांगांच्या दरम्यान चिंचोळ्या दऱ्‍या; खोऱ्‍याच्या पूर्वेस ॲपालॅचिअन पर्वतश्रेणीचा भाग असलेले यूनाका पर्वत व त्यातील ‘ग्रेट स्मोकीज’ डोंगर; त्यात सर्वोच्च (२,०२४ मी.) 'क्लिंगमंझ’ डोम व इतर शिखरे; या भागात वनप्रदेश आणि खनिजयुक्त प्रदेश अशी एकूण रचना आहे.

मृदा

राज्यभर विविध शिलाजन्य प्रकारांच्या मृदा आहेत. पश्चिमेस नदीगाळ जमीन, तिच्या पूर्वेस वाऱ्‍याने आणलेल्या विमृदा, उत्तरेत करडी पिंगट व दक्षिणेस लाल, पिवळसर माती; मधल्या खोलगट प्रदेशात सुपीक, पिंगट, रेतीमिश्रित मृदा व कंबर्लंड पठारावर चुनामिश्रित माती आहे.

खनिजे

देशात पहिल्या क्रमांकाचे पायराइटचे उत्पादन, दुसऱ्‍या क्रमांकाचे फॉस्फेट्स आणि तिसऱ्‍या क्रमांकाचे जस्त असून उत्तम संगमरवर, कोळसा, तांबे व मँगॅनीज मिळतात.

नद्या

पश्चिम सीमेची मिसिसिपी, टेनेसी व कंबर्लंड या महत्त्वाच्या नद्या आहेत. टेनेसी नैर्ऋत्य व्हर्जिनियात उगम पावून राज्याच्या पूर्वेतील ‘ग्रेट व्हॅली’ खोऱ्‍यातून दक्षिणेच्या ॲलाबॅमा राज्यात जाऊन पश्चिमेला वळते व मग उत्तरवाहिनी होऊन राज्याच्या पश्चिम भागातून केंटकी राज्यात ओहायओला मिळते.

टीव्हीए [ टेनेसी व्हॅली ऑथॉरिटी] ने या नदीला अनेक ठिकाणी बंधारे घालून पूरनियंत्रण, जलमार्ग व प्रचंड प्रमाणावर विद्युत्‌निर्मिती व्यवस्था केलेली असून या प्रकल्पातल्या अनेक जलाशयांनी मिळून टेनेसीतला १,८२८ चौ.किमी. प्रदेश व्यापलेला आहे.

कंबर्लंड नदी केंटकीत उगम पावून टेनेसी राज्यात येऊन परत वळण घेऊन उत्तरेत केंटकीत ओहायओला मिळते. या नदीवरही अनेक धरणे बांधून पूरनियंत्रण व विद्युत्‌निर्मितीची सोय केलेली आहे. रम्य सृष्टिसौंदर्य व मासेमारीची सोय यांसाठी हे जलाशय प्रवाशांचे आकर्षण ठरले आहेत.

वामान

पश्चिमेच्या सखल भागाचे हवामान देशाच्या दक्षिण विभागासारखे–दीर्घ दमट उन्हाळे, अल्पकाळ सौम्य हिवाळे, क्कचित कडक थंडी असे असते; तर पूर्वेच्या डोंगराळ भागात हवामान देशाच्या ईशान्य भागासारखे–दीर्घ हिवाळे, खूप हिमपात, सौम्य उन्हाळे, बंदिस्त दऱ्‍याखोऱ्‍यांतील थंडी उंच प्रदेशापेक्षा कमी, असे असते.

पाऊस शेतीपुरता, डिसेंबर-जानेवारीत विशेष जोराचा असतो. किमान तापमान ४·४° से., कमाल तापमान २६·७° से. व सरासरी तपमान १५·६° से. असते. वार्षिक पर्जन्य १२५ सेंमी. व हिमपात २० सेंमी. असतो.

नस्पती

टेनेसीत विविध व विपुल वनस्पती प्रकार आढळतात. सु. ५२% प्रदेश वनाच्छादित आहे. २०० प्रकारच्या वृक्षांपैकी ५९ व्यापारदृष्ट्या उपयुक्त आहेत.

पाइन, एल्म, बीच, सिकॅमोर, बासवुड, पीकन, रानचेरी, काळा वॉलनट, हिकरी, हनी, ब्लॅक लोकस्ट, ट्यूलिप, पॉप्लर, मॅपल, पर्सिमॉन, विलो, विषारी आयव्ही व इतर अनेक प्रकारची झाडेझुडपे आहेत. गोल्डन सील, हेपाटिका, डिजिटॅलीस व गिन्सेंग इ. औषधी वनस्पती आहेत.

प्राणी

तीनशे प्रकारचे पक्षी, तीनशे प्रकारचे मासे, ८६ प्रकारचे सरपटणारे प्राणी, आठ प्रकारचे सरडे, चोवीस प्रकारची कासवे इ. विविध प्राणिसृष्टीत क्वेल, मोर्निंग डोव्ह, टर्की, ग्राउझ, पाणपक्षी, हरिण, अस्वल, रानडुक्कर, ससे, मासे यांची शिकार मिळते. रॅटल साप कॉपरहेड, कॉटन माउथ हे विषारी सापही आहेत.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate