অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिसिसिपी नदी

मिसिसिपी नदी

मिसिसिपी नदी

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक प्रमुख नदी. ‘फादर ऑफ वॉटर्स’ (जलजनक) या नावानेही तिला अनेकदा संबोधले जाते. ३,७८० किमी. लांबीची ही नदी पश्चिमेस रॉकी व पूर्वेस ॲपालॅचिअन या पर्वतांदरम्यानची प्रमुख नदीप्रणाली आहे. मिसूरी या तिच्या मुख्य उपनदीच्या उगमापासून मिसिसिपीच्या मुखापर्यंत एकूण लांबी ६,०२० किमी. असून मिसिसिपी-मिसूरी या संयुक्त प्रणालीचा लांबीच्या दृष्टीने जगात तिसरा क्रमांक लागतो.

मिसिसिपी ही उत्तर-दक्षिणवाहिनी नदी मिनेसोटा राज्याच्या उत्तर भागातील आइटॅस्का सरोवरातून, सस. पासून सु. ४४६ मी. उंचीवर उगम पावते व मिनेसोटा, आयोवा-विस्कॉन्सिन, इलिनॉय-मिसुरी, टेनेसी, आर्‌कॅन्सॉ, मिसिसिपी, लुइझिॲना इ. राज्यांतून वाहत जाऊन दक्षिणेस मेक्सिकोच्या आखाताला जाऊन मिळते. मिसिसिपी-मिसूरी नदीप्रणालीमुळे कॅनडा व अ. सं. सं. देशांतील  सु. ३२,२१,००० चौ. किमी. क्षेत्राचे (अ. सं. सं. च्या २/५ क्षेत्राइतके) जलवाहन होते. सुरुवातीला मिसिसिपी नदी काही अंतर पूर्व दिशेने वाहत जाते व मिनेसोटा राज्यातील मसाबी व कयूना या भागांतून पुढे गेल्यावर ती दक्षिणवाहिनी बनते. आइटॅस्का सरोवर ते मिनीॲपोलिसपर्यंतच्या सु. ८२३ किमी. लांबीच्या प्रवाहमार्गात अनेक धबधबे आहेत. मिनीॲपोलिस शहराच्या पूर्वेस मंडोटा येथे तिला उजवीकडून मिनेसोटा नदी येऊन मिळते. मिनीॲपोलिस शहराजवळील सेंट अँथनी धबधब्यामुळे या नदीच्या प्रवाहात एकदम बदल झालेला दिसून येतो. या भागात नदी तीव्र उतारावरून सु. ३७५ मी. वाहत जाऊन मूळ पातळीच्या सु. १९ मी. खाली येते. त्यामुळे या भागात अनेक बंधारे, विद्युत् प्रकल्प उभारून तिच्या पाण्याचा व वेगाचा योग्य उपयोग करून घेण्यात आला आहे. त्यामुळे मिनीॲपोलिस शहरात अनेक उद्योगधंदे विकसित झाले आहेत. येथून पुढे ही नदी काही अंतर ओबडधोबड टेकड्यांच्या व जंगलांच्या प्रदेशांतून वाहत जाते. या भागात तिला डावीकडून ब्लॅक व विस्कॉन्सिन नद्या येऊन मिळतात. पुढे सेंट लूइस शहरापर्यंत या नदीला डावीकडून इलिनॉय व उजवीकडून डेमॉइन या नद्या मिळतात. सेंट लूइस शहराच्या उत्तरेस २७ किमी. वर हिची सर्वांत महत्त्वाची उपनदी मिसूरी ही उजवीकडून येऊन मिळते. यानंतरच्या मुखापर्यंतच्या भागात मिसिसिपीला उजवीकडून अनुक्रमे व्हाइट, आर्‌कॅन्सॉ, विचिटॉ, रेड इ., तर डावीकडून ओहायओ, यॅझू इ. महत्त्वाच्या नद्या येऊन मिळतात. मिसूरीच्या संगमानंतर तिचे पात्र सु. १,०७० मी. रूंद झाले असून कैरो शहराजवळ ओहायओ नदी मिळाल्यानंतर ते जवळजवळ १,३७० मी. रुंद झाले आहे. खालच्या टप्प्यात ही नदी सु. ४० ते २०१ किमी. रूंदीच्या गाळाच्या सुपीक मैदानी प्रदेशातून वाहत जाऊन जिरार्डू भूशिराजवळ ती लांबट आकाराच्या त्रिभुज प्रदेशातून वाहते. मैदानी प्रदेशात या नदीने अनेक ठिकाणी धनुष्कोटी सरोवरे बनविली असून पुरामुळे आलेल्या गाळाचे बांध आणि तट निर्माण झाले आहेत. नदीच्या तळभागावर गाळ साचल्याने पात्र बाजूच्या प्रदेशापेक्षा उंचावले गेले आहे. आर्‌कॅन्सॉ व रेड नद्यांच्या संगमानंतर या नदीने पक्षीपद त्रिभुज प्रदेश बनविलेला दिसून येतो व या भागात तिला अनेक फाटे फुटतात. त्यांपैकी ॲचॅफालाइया व बेझाऊ हे प्रमुख आहेत. नदीचा मुख्य प्रवाह पुढे आग्नेयीस काही अंतर जातो व अनेक मुखांनी मेक्सिकोच्या आखातास मिळतो. हिचा अगदी अलीकडचा त्रिभुज प्रदेश बनण्यास १५०० मध्ये सुरुवात झाली असावी, असे तज्ञांचे मत आहे.

मिसिसिपी नदी जलवाहतुकीच्या दृष्टीने पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. ही नदी इलिनॉय जलमार्गाने ‘सेंट लॉरेन्स सी वे’ शी जोडलेली असल्याने तिच्यातून सागरगामी बोटींपर्यंत मालवाहतूक सहज शक्य होते. नदीच्या अगदी वरच्या नदीखोऱ्यात पाऊस जास्त झाल्यास अथवा वरच्या टप्प्यातील बर्फ वितळल्यास नदीला प्रचंड पूर येऊन बाजूचे नैसर्गिक बांध फुटून पाणी सखल प्रदेशात पसरते व अतोनात नुकसान होते. १९२७ साली आलेल्या पुरामुळे नदीपात्र काही ठिकाणी सु. १२९ किमी. रूंद झाले व त्यामुळे ७३ लक्ष हे. क्षेत्र पाण्याखाली गेले होते. तेव्हापासून सरकारने या नदीच्या वरच्या भागात दोन्ही काठांवर सु. २,५८० किमी. लांबीचे बांध घातले असून पाणी योग्य दिशेने वळविले आहे. १९७३ साली आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी १३·२ मी. वाढून ७७ दिवस कायम राहिली होती. त्यामुळे ५०,००० माणसे वाहून गेली होती.

संपूर्ण मिसिसिपी नदीखोऱ्यात पाणीपुरवठ्याच्या वेगवेगळ्या योजना आखण्यात आल्या असून तेथे बहुतेक सर्व महत्त्वाची पिके घेतली जातात. नदीच्या खालच्या टप्प्यात प्रामुख्याने कापूस, भात ही पीके, तर त्रिभुज प्रदेशात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय नदीपात्रात मासेमारीही मोठ्या प्रमाणावर चालते. त्रिभुज प्रदेशात खनिज तेल, गंधक व नैसर्गिक वायू मिळतो. अलीकडच्या काळातही अवजड वस्तू व पदार्थांच्या; तसेच उत्तर भागातील जंगलप्रदेशांतून लाकडाच्या ओंडक्यांच्या वाहतुकीसाठी या नदीच्या मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जातो. मुबलक शक्तिसाधनांमुळे नदीखोऱ्यात औद्योगिक विकासही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. नदीकिनाऱ्यावरील मिनीॲपोलिस, सेंट लूइस, मेंफिस, बॅटनरूझ, न्यू ऑर्लीअन्स इ. शहरांना औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. क्लिंटन (मिसिसिपी राज्य) येथे या नदीखोऱ्याची सु. ८९ हे. क्षेत्रात प्रतिकृती (मॉडेल) तयार करण्यात आली असून, तिचा नदीखोऱ्याच्या अभियांत्रिकीसाठी उपयोग होतो. तसेच आइटॅस्का सरोवर एक थंड हवेचे ठिकाण म्हणून व मिनेसोटा राज्य उद्यानांसाठी प्रसिद्ध झाले आहे.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate