অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नायजर

पश्चिम आफ्रिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे प्रजासत्ताक राष्ट्र. क्षेत्रफळ ११, ८६,४०८ चौ. किमी.; लोकसंख्या ४८,५२,००० (१९७५). विस्तार १२° उ. ते २३° ३० उ. व ०° ३० पू. ते १५° ३० पू. यांदरम्यान दक्षिणोत्तर १,२०० किमी. व पूर्व – पश्चिम १,५०० किमी.; प्रामुख्याने मरुभूमी व निमओसाड असलेला हा देश भूवेष्टित आहे.

न्यामे राजधानी देशाच्या नैऋत्य कोपऱ्यात आहे. नायजरच्या उत्तरेस अल्जीरिया व लिबिया, पूर्वेस चॅड, दक्षिणेस बेनिन प्रजासत्ताक (दाहोमी) व नायजेरिया. पश्चिमेस अपर व्होल्टा व माली हे देश आहेत. उत्तर व पूर्व या दिशांना वाळवंटी व चॅड सरोवरीय सरहद्द बहुतांशी सर्वेक्षण न झालेली आहे. या देशाचे नायजर हे नाव भ्रामक वाटते, कारण आफ्रिकेतील या नावाची मोठी नदी या देशाच्या नैरऋत्य भागातून सु. ६०० किमी. वाहते.

भूवर्णन

नायजरमधील उत्तरेकडील व पूर्वेकडील सु. २/३ भाग सहारा मरुभूमीत मोडत असला तरी तो पूर्णपणे सपाट नाही. तो भाग १८० ते ४६० मी. उंचीचे एक विस्तृत पठार असून त्यात आयरचे मध्यवर्ती पठार १,००० मी. हून अधिक उंचीचे आहे. ते अल्जीरियातील अहॅग्‍गर पर्वतश्रेणीचे एक अंग आहे.

आग्‍नेयीकडे चॅड टेकड्यांचा विभाग आहे. हा दक्षिणोत्तर उंच भाग म्हणजे चॅड सरोवर व नायजर नदी यांमधील जलविभाजक होय. याच गंडस्थळावर उत्तरेकडे ग्रेबोन हे २,००० मी. उंचीचे शिखर आहे. ईशान्य आणि पूर्व भाग प्रामुख्याने वाळूच्या टेकड्यांनी व्यापलेला आहे.

नैऋत्येकडील नायजर नदी, आग्‍नेयकडील चॅड सरोवराला मिळणारी कोमाडुगू योबे नदी, चॅड सरोवराचा परिसर व नायजेरियाच्या सरहद्दीजवळील भाग वगळला, तर या देशात सर्वत्र पाण्याची कमतरता आहे. अस्साकराई, दालोल बोसो व रिमा या इतर नद्या कोरड्या किंवा खंडित प्रवाहांच्या असून नायजरला मिळतात.

कर्कवृत्ताच्या दक्षिणेस असलेला हा देश एक उष्ण व ओसाड प्रदेश आहे. सर्वत्र दैनिक तपमानकक्षा जास्त आहे. न्यामे येथे सरासरी तपमान ३३° ते ३८° से. पर्यंत असते. या नैऋत्य भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५५ सेंमी. आहे व ते उत्तर व पूर्व भागांकडे कमीकमी होत जाते. देशाच्या मध्यभागी आगादेस या शहरी ते १८ सेंमी. आहे आणि तेथून ईशान्य व उत्तर भागांत ते याहूनही कमी आहे. या भागांत बिलमा नावाचा पूर्ण वालुकामय प्रदेश आहे.

जानेवारी – फेब्रुवारीमध्ये ईशान्य व्यापारी वारे हे कोरडे वारे वाहतात व त्यांची हरमॅटन या उष्ण, धूळयुक्त वाऱ्यांशी गाठ पडते. एप्रिल – मेमध्ये अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठी चक्री वादळे होतात. जून ते ऑक्टोबर हा तुलनेने थंड व पावसाळी ऋतू समजायचा. विशेषतः ऑगस्टमध्ये सर्वत्र पाऊस पडतो.

ऑक्टोबर ते पुढील जूनपर्यंत जवळजवळ कोरडा ऋतूच असतो. एकूण पर्जन्याची अनिश्चितताच आढळून येते. नायजर नदीला मात्र भरपूर पाणी असते. चॅड हे सरोवर उथळ असून त्याचा १/८ म्हणजे सु. २,८०० चौ. किमी. भाग नायजरमध्ये समाविष्ट आहे. हा भाग आंतरिक जलोत्सारणाचा आहे. उत्तरेकडील व पूर्वेकडील बहुतांश भाग विलुप्त दऱ्यांचा आहे.

दक्षिणेकडील भागात पाण्याचा पुरवठा चांगला असून लालसर जांभा प्रकारची गाळाची जमीन आढळते. उत्तरेकडे वाळुमिश्रित नापीक जमीन, तर या दोन्हींच्या मध्यभागी असलेल्या ‘साहेल’ या भागात साधारण उथळ, पांढरी जमीन आढळते. दक्षिणेकडील जमीन पिकांस उपयुक्त आहे व साहेल भागात काटेरी झुडुपे व गवताळ राने वाढतात.

उत्तरेकडील व पूर्वेकडील ओसाड भागांत जलसंचयी वनस्पती वाढतात आणि मरूद्यानांच्या आसपास खजूर, ताड इ. वृक्ष दिसून येतात. चॅड भागात दलदलीमुळे बोरू, लव्हाळे यांसारख्या वनस्पती आढळतात.

ओसाड प्रदेशांत वनस्पती व प्राणी यांची वाढ फारच कमी आहे. साहेल विभागात शहामृग व हरणांचे कळप मोठे आहेत. मानवी आक्रमणामुळे दक्षिणेकडील वन्यप्राण्यांची संख्या कमी होत असली तरी हत्ती, जिराफ, काळवीट, सिंह आणि नायजर व इतर नद्यांकाठी पाणघोडे व मगरी आढळतात. यांत भर म्हणून अनेक जातींचे पक्षी, माकडे, सर्प पहावयास मिळतात. हा भाग शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. सिंह, हत्ती, मूप्लॉन, ऑरिक्स व ॲडॅक्स हे बड्या शिकारीचे प्राणी आहेत.

इतिहास

नायजरच्या आसपासचा प्रदेश ईजिप्तच्या लोकांना फार प्राचीन काळापासून ज्ञात होता. तथापि गेल्या एक हजार वर्षांचा इतिहास म्हणजे अरब, बर्बर, सोंघाई, हौसा, फुलानी आणि तुराग यांच्या लढायांचा रक्तरंजित इतिहास होय. त्यांतील प्रमुख बाब म्हणजे सेमेटिक व हेमेटिक लोकांची उत्तर व ईशान्येकडून येथील काळ्या लोकांवर होणारी आक्रमणे ही होय. दहाव्या शतकाच्या सुमारास चॅड सरोवराजवळचा भाग जिंकून बर्बर लोकांनी हौसा राज्य स्थापन केले.

या भागात शिरणारे श्वेतवर्णीय लोक प्रथम मीठ, सुवर्ण व गुलाम यांचा व्यापार करीत. ते नंतर वसाहतवादी बनत. अकराव्या व बाराव्या शतकांत अरबांनी धार्मिक युद्धे करून बर्बरांना दक्षिणेकडे पळवून लावले व सक्तीने धर्मपरिवर्तन करून इस्लाम धर्मीयांची संख्या वाढविली. अरबांची ही साम्राज्यतृष्णा ओळखून प. आफ्रिकेतील धर्मांतरित जमातींनी एकत्र होऊन अरबांना मागे रेटले. १५१५ मध्ये पहिल्या अस्किया मुहंमदाने सोंघाई जमातीचे साम्राज्य स्थापन केले. ते सतराव्या शतकापर्यंत अस्तित्वात होते. त्यानंतर हौसा राज्ये डोकी वर काढू लागली.

तुराग व फुलानी या जमातींत लढे उत्पन्न झाले. १८०४ व १८१० मध्ये उथमान दन फोडिओ या धार्मिक प्रवृत्तीच्या फुलानी मुस्लिमाने हौसा राज्याविरुद्ध धार्मिक युद्ध पुकारले आणि चॅड सरोवराच्या पश्चिमेकडील बोरनू साम्राज्यात प्रवेश केला.

अठराव्या शतकात या भागात पहिला यूरोपीय प्रवासी मंगो पार्क आला व त्यापाठोपाठ शतकाच्या शेवटापर्यंत यूरोपीय व्यापाऱ्यांचे आगमन सुरू झाले. १८५० साली ब्रिटिशांनी पाठविलेले जर्मन शास्त्रज्ञ हिन्‍रिक बार्ट यांनी या भागात भ्रमण करून सूदानवर बरेच मौलिक लेखन केले.

१८८२ साली ब्रिटिशांनी पाठविलेले मेजर डिक्सन डेन्हॅम व ले. चेप्परटन या अधिकाऱ्यांनी या क्षेत्रात फिरून या प्रदेशाचे पहिले वर्णन उपलब्ध करून दिले. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी या भागात ब्रिटिश व फ्रेंच सैनिकांना, तुरागांचा प्रखर प्रतिकार मोडण्यात यश मिळाले आणि १९०१ ते २२ या कालखंडात फ्रेंचांनी दुर्गांची साखळी निर्माण करून स्थानिक प्रतिकाराचा बीमोड केला. पहिल्या महायुद्धकाळात जर्मन प्रेरणेने व मदतीने तुरागांनी सशस्त्र क्रांती केली, परंतु ती ब्रिटिशांच्या मदतीने पार मोडून काढण्यात फ्रेंचांना यश आले. १९२२ साली नायजर हा फ्रेंच वसाहतीचा एक भाग बनला.

द्वितीय महायुद्धाचा या वसाहतीवर विशेष परिणाम झाला नाही. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीला गती आली. १९४६ साली नायजरसाठी एक प्रादेशिक विधिमंडळ स्थापन करण्यात आले व लोकांना फ्रेंच नागरिकत्व बहाल करण्यात आले. या मंडळाच्या मतदानानुसार डिसेंबर १९५८ मध्ये नायजर हे पाचवे फ्रेंच गणतंत्र झाले.

३ ऑगस्ट १९६० रोजी नायजर हा देश पूर्णपणे स्वतंत्र झाला व २० सप्टेंबर १९६० रोजी तो संयुक्त राष्ट्रांचा सभासदही झाला. चीनच्या प्रेरणेने प्रस्थापित सरकार उलथून पाडण्याचा एक प्रयत्‍न मे १९६४ मध्ये झाला. पण तो विफल होऊन कटवाल्यांना देहांताची शिक्षा देण्यात आली. या देशाचे फ्रान्सशी आर्थिक व संरक्षणात्मक घनिष्ठ संबंध आहेत.

राजकीय स्थिती

स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास १९५६ मध्ये सुरक्षितता व आर्थिक प्रगती यांसाठी नायजरने आपले शेजारी दाहोमी, अपर व्होल्टा व आयव्हरी कोस्ट यांच्याशी एक मैत्री – संघ स्थापन केला. हा नायजेरियातील मोठ्या बाजारपेठेविरुद्ध निर्माण करण्यात आलेला प्रतिबाजार होय. याचा परिणाम म्हणजे या मित्रसंघात सारखेच संविधान व चलन अस्तित्वात आहे. चलन सीएफ्‌ए फ्रँक या नावाने ओळखले जाते.

८ नोव्हेंबर १९६० रोजी सम्मत करण्यात आलेल्या घटनेनुसार येथे गणतांत्रिक अध्यक्षीय पद्धतीचे शासन निर्माण झाले. घटनेनुसार अध्यक्ष राज्याचा प्रमुख व कार्यकारिणीचा मुख्य असतो. मंत्रिमंडळ अध्यक्षाला जबाबदार असून त्याला मंत्रिमंडळ नियुक्त अगर विसर्जित करण्याचा अधिकार आहे. सेनादलाचा तो प्रमुख असून सर्व मुलकी व सैनिकी अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार त्याला असतो. ६० सभासदांच्या राष्ट्रीय सभेची निवडणूक अध्यक्षांच्या निवडणुकीबरोबरच दर पाच वर्षांनी होते.

नायजरची राज्यकारभारासाठी आगादेस, झिंडर, डिफा, ताउआ, न्यामे, माराडी आणि डोसो या सात प्रांतांत विभागणी केली असून, प्रत्येक प्रांताचे उपप्रांत असे एकूण ३३ विभाग आहेत. प्रत्येक प्रांताला विधिमंडळ असून ते केंद्रसरकारला जबाबदार असते. गावाचे प्रशासन परंपरागत नेतृत्वाने चालते.

देशात विविध पक्षांना कायद्याने बंदी नाही, तथापि १९७४ पर्यंत प्रत्यक्षात आफ्रिकन लोकशाही प्रागतिक नायजर पार्टी या एकाच पक्षाच्या हातात सत्ता होती. पक्षप्रमुख हमानी डिओरी याने या देशाला स्थिर सरकार दिले होते, परंतु १५ एप्रिल १९७४ रोजी सेनी कौंत्शे या सैनिकी अधिकाऱ्याने सत्ता काबीज करून घटना स्थगित केली, विधिमंडळ बरखास्त केले व राजकीय पक्षांवर बंदी घातली.

ऑगस्ट १९६१ मध्ये फ्रेंच सैन्याचे हस्तांतरण होऊन नायजरचे स्वतंत्र सेनादल उभारण्यात आले. यात स्वयंचलित वाहने असलेल्या ४ वाहिन्या, २,१०० सैनिकांचे भूदल व अधिकारी आणि वायुसैनिक मिळून १०० जणांचे एक छोटेसे वायुदल समाविष्ट आहे. या देशाला नौदल नाही. १९६२ मध्ये परंपरागत न्यायालये विसर्जित करण्यात आली व नवीन न्यायसंस्थेची उभारणी झाली. यात देशाचे सर्वोच्च न्यायालय असून अंतिम अपीले तेथपर्यंत नेता येतात.

आर्थिक स्थिती

सहाराच्या दक्षिण सीमेवरील हा एक ओसाड व निमओसाड प्रदेश असल्यामुळे देशाचा विकास उत्तरेकडील पशुपालक व दक्षिणेकडील शेतकरी या दोघांच्या समन्वयावर अवलंबून आहे. देशात फक्त ९·६ टक्के जमीन शेतीखाली व कायम लागवडीखाली आहे व ती नायजर नदीचा परिसर, माराडी – झिंडर पट्टा व चॅड सरोवरानजिकचा प्रदेश यांतच आहे. ८६ टक्के लोक शेती व पशुपालन यांवर अवलंबून असून दरडोई उत्पन्न ७०० रु. च्या आसपास आहे.

भुईमूग व कापूस ही मुख्य नगदी पिके असून तृणधान्ये व भात ही दुय्यम अन्नपिके आहेत. एकट्या भुईमुगाचे उत्पादन १९७२ साली २,५८,००० मे. टन होते. कसावा, तूर, कांदा, खजूर, जोंधळा, रताळी, सुरण, तंबाखू ही इतर पिके होत. शेतीच्या वाढीला प्रमुख अडचण पाण्याचा अभाव ही आहे. योग्य जलसिंचन उपलब्ध झाल्यास १/४ क्षेत्र शेतीखाली येऊ शकेल. दुसरी अडचण वहातुकीच्या सोयींची आहे.

शेतीपेक्षा अधिक महत्त्वाचा व्यवसाय पशुपालनाचा असून, देशाच्या ६० टक्के भागांत हा व्यवसाय चालतो. त्यात २·५ लक्ष तुराग व ३ लक्ष फुलानी या भटक्या जमातींचे लोक गुंतलेले आहेत व ते ८० टक्के पशुधन सांभाळतात. १९७३ मध्ये देशात ३० लक्ष गुरे, ७० लक्ष मेंढ्या व बकरी; ३,७२,००० गाढवे, २ लक्ष घोडे, ३·५ लक्ष उंट होते. १९७० मध्ये ६७·५ लक्ष कोंबड्या होत्या. पशूंच्या व्यापारापैकी ८० टक्के व्यापार नायजेरियाशी होतो व कातड्यांची निर्यात प्रामुख्याने फ्रान्सला होते. नायजर नदीत व चॅड सरोवराभोवती थोडी मासेमारी चालते. पशूंपासून उत्पादन (१९६९) मांस १३,००० मे. टन; गुरांची कातडी ९३५ मे. टन; मेंढ्यांची कातडी ३०४ मे. टन व बकऱ्यांची कातडी १,५४० मे. टन असे होते.

खनिज संपत्तीत खनिज मीठ व लोखंड यांचे अल्पप्रमाणात उत्पन्न मिळते. दगडी कोळसा व खनिज तेल यांचा अभाव आहे. नुकतेच आगादेसच्या उत्तरेस सु. ३०० किमी. अंतरावर अर्लिट या ठिकाणी युरेनियमचे मोठे साठे आढळून आले आहेत आणि फ्रान्स व नायजर यांची एक संयुक्त कंपनीही स्थापन झाली असून १९७० पासून तिने खनिज युरेनियमच्या उत्पादनास सुरुवातही केली आहे.

हे एकमेव खनिज या देशाच्या विकासातील मोठा वाटा उचलू शकेल. १९७३ मध्ये युरेनियमचे ९४९ मे. टन उत्पादन झाले. मांगा आणि आगादेस येथे मीठ व नेट्रॉन आणि आयर येथे थोडेसे कथिल सापडते. एकूण क्षेत्रफळाच्या १२·३ टक्के इतके लहान जंगलक्षेत्र असल्यामुळे जळणाची नेहमीच टंचाई असते.

आयात खनिज तेलावर १२,६०० किवॉ. वीजनिर्मिती होते. इंधन म्हणून सर्वत्र लाकूड वापरले जाते परंतु त्याचीही टंचाई असल्यामुळे भुईमुगाच्या फोलपटांचाही इंधन म्हणून वापर करतात. सौरशक्तीचाही वापर करण्याचे प्रयोग चालू आहेत. देशात कारखानदारी अगदीच लहान प्रमाणावर असून ती न्यामे शहराच्या आसपास आहे. अन्न, रसायने, तेल गाळणे, वस्त्रोद्योग, फर्निचर, वाहने जोडणे, बीर, साबण, प्लॅस्टिक यांसारखे लहान कारखाने आहेत व ते बहुतांशी फ्रेंच भांडवलावर चालतात. यांतून काम करणाऱ्यांची संख्या १५,००० असून त्यांची एकमेव संघटना आहे. हिच्यातर्फे कामगारांना मजुरीचे दर ठरविण्याचा व संप करण्याचा अधिकार आहे. मलबाझा येथे १९६६ मध्ये सिमेंटचा मोठा कारखाना निघाला आहे. नायजरमध्ये खाजगी भांडवलाचा अभाव असून सामूहिक पद्धतीचे फायदेही उपलब्ध नाहीत. त्यामुळे नवीन कारखानदारीच्या भवितव्यास मर्यादा पडते.

देशातील व्यापार चांगल्या दळणवळणाच्या सोयींअभावी मर्यादित आहे. सरकारने शहरात किरकोळ भांडारे उघडून देशातील उत्पादित वस्तूंच्या किंमती नियंत्रित ठेवल्या आहेत. या वस्तूंची ठोक व किरकोळ विक्री स्वयंमालकीची आहे. व्यापारी वर्ग शेतकऱ्यांना भांडवल पुरवितो. अंतर्गत भागांत अद्याप वस्तुविनिमय चालतो. देशाच्या दक्षिणेकडील सरहद्दीवर नियंत्रण कमी असल्याने व नायजेरिया आणि नायजर या दोन्ही शेजारी राष्ट्रांत हौसा व फुलानी या जमाती रहात असल्यामुळे सरहद्दीपलीकडून मोठ्या प्रमाणावर चोरटा व्यापार चालतो. दुसरे कारण नायजरमधील फ्रँक व नायजेरियातील स्टर्लिंग या चलनांत फरक असल्यामुळे नायजेरियात वस्तू स्वस्त आहेत व बाजारक्षेत्र मोठे आहे.

प्रमुख निर्यात वस्तूंत मेंढ्या, बकऱ्या व मगरी यांची कातडी, मांस, लोणी व अल्प प्रमाणात मीठ व मासे हे आहेत. खनिज युरेनियमची निर्यात सुरू झाली आहे. आयात वस्तूंत प्रामुख्याने यंत्रे, कापड व जीवनावश्यक वस्तू आहेत. प्रमुख निर्यात वस्तू पुढीलप्रमाणे : भुईमूग ५९·५%, गुरेढोरे १२·३%, कापूस ४·८%, शेंगदाणा तेल ४%, कातडी ७·३% व इतर १२·१% अशी असून देशानुसार निर्यात : फ्रान्स ६२·७%, नायजेरिया १६·१%, आयव्हरी कोस्ट ३·३%, दाहोमी ३·१%, घाना २·४%, अपर व्होल्टा २% आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने १·३% अशी आहे.

प्रमुख आयात वस्तू : यंत्रे १८·२%, कापड १७·९%, रसायने ५·२%, विद्युत् उपकरणे ४·९%, साखर ३·४%, लोह – पोलाद २·४%, रबरी धावा वगैरे १·७%, मद्ये २%, पेट्रोलियम वस्तू ४·१% अशा असून देशानुसार आयात : फ्रान्स ४८·७%, पश्चिम जर्मनी ६·४%, जपान ५·२%, अमेरिकेची संयुक्त संस्थाने ५·१%, आयव्हरी कोस्ट ४·५%, नेदर्लंड्‌स ४·३%, सेनेगल ४·१%, चीन २·८%, अशी आहे. १९७२ सालची एकूण आयात १,६५० कोटी सीएफ्‌ए फ्रँक होती, तर निर्यात १,३७१ कोटी सीएफ्‌ए फ्रँकची होती. यातील तूट भरून काढण्यासाठी फ्रान्सवर विसंबून रहावे लागते. ही तूट कमी करण्यासाठी नायजरने आयव्हरी कोस्ट, दाहोमी, अपर व्होल्टा व टोगो या चार राष्ट्रांबरोबर प्रादेशिक सहकार तत्त्वावर मैत्रीसंघ स्थापन केला आहे आणि यूरोपीय सामुदायिक बाजारपेठेशीही संबंध प्रस्थापित केला आहे.

देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी ८४% उत्पन्न शेती व पशुपालनापासून मिळते. १९६८ – ६९ च्या अंदाजपत्रकात एकूण जमा १,०६३ कोटी सीएफ्‌ए फ्रँक व खर्चापोटी १,१२७ कोटी सीएफ्‌ए फ्रँक होते. १९७२ – ७३ चा अर्थसंकल्प १,३०९·८ कोटी सीएफ्‌ए फ्रँकचा संतुलित होता.

दळणवळण

नायजर हा देश भूवेष्टित असल्यामुळे या देशाला परदेशी व्यापारासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते. पूर्वी नायजेरियातील कानो शहरामार्गे व्यापार होत असे. पण आता मैत्रीसंघातील दाहोमी देशातील कोटोनाऊ बंदरामार्गे व्यापार चालतो. न्यामे, गाया, तेथून पुढे दाहोमीमध्ये परकाऊ, कोटोनाऊ येथपर्यंत १,०६० किमी. लांबीचा हा रस्ता म्हणजे पक्का रस्ता, कच्चा रस्ता व रेल्वेमार्ग असा खंडित मार्ग आहे.

दाहोमी देशातील परकाऊपासून कोटानाऊपर्यंत ४३५ किमी. रेल्वेमार्ग आहे. यामुळे वाहतूकखर्च खूप वाढ करणारा ठरला आहे. या देशाला नायजर नदीमधून दक्षिणेकडे समुद्रापर्यंत मार्ग उपलब्ध झाल्यास या देशाचा अधिक फायदा आहे. देशात नायजर नदी ३०० किमी. वाहतूकयोग्य असून न्यामे ते गायापर्यंत ऑक्टोबर ते मार्च अशी वाहतूक चालते.

नदीच्या वरच्या व खालच्या भागांत धावत्या (रॅपिड्‌स) असल्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. तरी पण नायजेरियातील काइंजी येथील धरण पूर्ण झाल्यावर नायजरला समुद्रापर्यंत थेट वाहतूक मिळू शकेल. देशातील अंतर्गत भागात मरुभूमीतून अनेक किमी. लांबीच्या वाटा आहेत. देशात कच्च्या व पक्क्या रस्त्यांची एकूण लांबी ६,९८५ (१९७१) किमी. आहे. सहारा पार करणाऱ्या महत्त्वाच्या दोन मोटार रस्त्यांची न्यामे व झिंडर ही दोन शेवटची शहरे आहेत.

एक उत्तर – दक्षिण रस्ता अल्जीरियातील अहॅग्‍गरमध्ये सुरू होऊन आयरमार्गे झिंडरला मिळतो व तेथून पुढे नायजेरियातील कानो या शहरास जातो आणि एक फाटा चॅडमधील फॉर्लामीकडे जातो. दुसरा पूर्व – पश्चिम रस्ता झिंडर, माराडी, डोसोवरून न्यामेला जातो. देशात १९७० मध्ये प्रवासी मोटारी ८,३३६; मालमोटारी व बसगाड्या २,४१९ होत्या. नियमित वाहतुकीचे विमानतळ ६ आहेत. मुख्य पक्का हमरस्ता न्यामेपासून चॅड सरोवरापर्यंत दक्षिणेकडून आहे. न्यामे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून देशातील इतर शहरे विमानमार्गाने जोडली आहेत. या देशामध्ये रेल्वे नाही. सध्या देशामध्ये ३५ टपाल कचेऱ्या, ३,३०० दूरध्वनी व १ नभोवाणी केंद्र व १,००,००० रेडिओ आहेत. नायजर नभोवाणीवरून फ्रेंच, हौसा आणि जेरमा या भाषांतून प्रक्षेपण केले जाते. दूरचित्रवाणीचा वापर प्रामुख्याने शिक्षणासाठीच केला जातो.

लोक व समाजजीवन

नायजर हा देश हवामान, नैसर्गिक वनस्पती यांप्रमाणेच श्वेतवर्णीय व कृष्णवर्णीय वंशांच्या सीमेवरील प्रदेशात मोडतो. शेकडा ७५ कृष्णवर्णीय लोक नायजर नदीच्या परिसरात राहत असून श्वेतवर्णीय, तुराग व फुलानी मरुभूमीत पशुपालनात गुंतलेले आणि भटके लोक आहेत. तुराग हा उंच, सुटसुटीत बांध्याचा लालसर पिवळ्या वर्णाचा, काळ्या डोळ्यांचा; लांब, काळे व कुरळे केस असलेला, रेखीव चेहऱ्याचा आहे.

फुलानी हलक्या वर्णाचा, अरुंद नाकाचा व दक्षिण यूरोपीयांसारखा चेहरा असलेला आहे. तुराग हे पूर्णपणे भटके लोक असून प्रामुख्याने शेळ्या- मेंढ्यांचे कळप पाळतात; तंबूतून वस्ती करतात व मांस आणि खजूर यांवर उपजीविका करतात. फुलानी जमातीचे लोक फिरते पशुपालक असून बहुधा गुरेढोरे पाळतात, दूधदुभत्यावर जास्त अवलंबून राहतात व तात्पुरत्या झोपड्यांतून वस्ती करतात.

कृष्णवर्णीयांमध्ये हौसा हे खऱ्या अर्थाने निग्रो बांधणीचे असून देशाच्या दक्षिण व आग्‍नेय भागांत आणि नायजेरियाच्या सरहद्दीवर बहुसंख्य आहेत. जेरमा व सोंघाई हे पश्चिम व नैऋत्य भागांत, तर कानुरी पूर्व भागात बहुसंख्येने आहेत. चॅड सरोवराच्या आसपास मांगा जमातीचे लोक आहेत. हे सर्व कृष्णवर्णीय लोक स्थायी स्वरूपाचा शेतीचा व्यवसाय करतात. १९७४ साली एकूण लोकसंख्येपैकी हौसा ५४·३%; जेरमा – सोंघाई ३३·६%; फुलानी १०·६%; मांगा ९·१% व तुराग २·९% आणि बाकीचे इतर अशी विभागणी होती. देशात प्रामुख्याने इस्लाम धर्माचे ८५%; परंपरागत धर्म पाळणारे १४·५% व ख्रिस्ती धर्माचे ०·५% लोक आहेत.

आफ्रिकेतील विरळ लोकवस्ती असलेल्या राष्ट्रांत नायजरची गणना होते. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. ला ३·६ आहे. अधिकांश म्हणजे ९२% लोकसंख्या ग्रामीण असून ८% नागरी आहे. एकूण ४ मोठी शहरे असून ८,००० खेडी आहेत. ५,००० खेड्यांमध्ये प्रत्येकी २०० हून कमी लोकसंख्या आहे. लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण किंचित अधिक म्हणजे ५०·२% आहे. १९६० मध्ये लोकसंख्येपैकी २९·४% लोक आर्थिक दृष्ट्या कार्यरत होते. त्यांपैकी ९६·९% लोक शेती. जंगल, शिकार व मासेमारीत; ०·१% निर्मिती व बांधकामात; ०·२% वाहतूक, साठा दळणवळणात; ०·८% व्यापारात; ०·९% सेवांमध्ये; १% इतर व्यवसायांत होते.

बहुसंख्य लोकांचा धर्म इस्लाम असला, तरी भिन्न वंश, समाज व व्यवसाय यांमुळे लोकांमध्ये समान अशा गोष्टी कमीच आढळतात. शिवाय जेरमा – सोंघाईचा ओढा शेजारच्या माली देशातील त्याच जातीच्या टोळीवाल्यांकडे, हौसांचा ओढा नायजेरियातील हौसांकडे तर तुरागांचा ओढा अल्जीरियातील तुरागांकडे असल्यामुळे नायजरमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना कमी तीव्र आहे. सण, उत्सव व चालीरीती इस्लाम धर्माला आधारभूत आहेत. पण सणांपेक्षा लग्‍नकार्यात भरपूर धन खर्च करणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुराग समाज हा मातृसत्ताक पद्धती मानणारा असून, स्त्रियांना पुरूषांपेक्षा अधिक महत्त्व देणारा आहे.

आरोग्य

या देशात जननाचे प्रमाण दर हजारी ५२ असून मृत्यूचे प्रमाण २३ आहे. सर्वसाधारणपणे हिवताप, महारोग, क्षय, खुपऱ्या व त्सेत्से माशीच्या दंशाने होणारा निद्रारोग ही मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. १९६७ मध्ये डॉक्टर ६६, रूग्णशय्या २,५५३ तर १९७३ मध्ये १०० डॉक्टर, २ रूग्णालये, ३६ विभागीय वैद्यकीय केंद्रे, १५६ दवाखाने तसेच अनेक फिरती चिकित्सालये होती.

भाषा व साहित्य

अनेक जाती व त्यांच्या अनेक भाषा अस्तित्वात असूनही फ्रेंच भाषा ही शासनाची अधिकृत भाषा आणि शिक्षणाचे माध्यमही आहे. काही शाळांतून दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकविले जाते. प्रत्यक्ष व्यवहार व व्यापाराची भाषा हौसा ही असून ८५% लोकांना ती समजते. त्याखालोखाल जेरमा – सोंघाई ही भाषा प्रचारात आहे. या दोन्ही भाषा जाणणाऱ्यांस देशात कोठेही भाषेची अडचण जाणवत नाही. स्थानपरत्वे येथील अरबी भाषा इतर देशांतील अरबी भाषेपेक्षा वेगळी आहे. तिने आपले आगळे साहित्य, लोकगीते व वाङ्‌मयभांडार निर्माण केले आहे.

अरबी व तुराग भाषा सोडल्यास इतर बहुसंख्य भाषा चॅडिक भाषावर्गात मोडतात. मुस्लिमांनी चालविलेली थोडी नियतकालिके वगळल्यास उरलेली फ्रेंच भाषेत आहेत. राजधानी न्यामेतून एक फ्रेंच दैनिक प्रसिद्ध होते. त्याच्या २,००० प्रती निघतात. नगरपालिका असलेल्या शहरांत सरकारी ग्रंथालये व वाचनालये आहेत. त्यामे शहरात एका संस्थेतर्फे ग्रंथालय व राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय चालवण्यात येत असून दोन्ही एकाच जागेत आहे. दरसाल येथे डिसेंबरमध्ये युवक मेळावा भरतो.

शिक्षण

या देशातील शिक्षणाची अवस्था अगदीच प्राथमिक स्वरूपाची असून साक्षरतेचे प्रमाण फक्त ५·८% आहे. एकूण ६७३ प्राथमिक, २३ माध्यमिक आणि एक तांत्रिक शाळा असून अध्यापकप्रशिक्षणाची ४ विद्यालये आहेत, पण एकही महाविद्यालय नाही. १९६९-७० मध्ये विद्यार्थ्यांची व शिक्षकांची संख्या पुढीलप्रमाणे होती : प्राथमिक – ८४,२४८; १९६५, माध्यमिक – ५,५८७; २५३, तांत्रिक – १३७; २१ व अध्यापन प्रशिक्षण – ५४८; ४४. १९७२ मध्ये प्राथमिक शाळांत ९४,५१९; माध्यमिक शाळांत ७,७९६ व तांत्रिक शाळेत १७९ विद्यार्थी होते. येथे दूरचित्रवाणीचा उपयोग फक्त शिक्षणासाठी केला जातो हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. देशाच्या नैऋत्य भागात नायजर नदीच्या आकारावरून नाव पडलेले डब्‍ल्यू (W) नॅशनल पार्क या नावाचे परदेशी प्रवाशांना आकर्षित करणारे उद्यान आहे. तरुणांमध्ये फुटबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग व सायकलिंग हे खेळ अधिक प्रिय आहेत.

प्रेक्षणीय स्थळे

न्यामे (लोकसंख्या १,५०,००० – १९७५ अंदाज) हे राजधानीचे व संमिश्र लोकवस्तीचे शहर असून सुशिक्षित आफ्रिकन आणि यूरोपीय यांच्या चालीरींतींचे मिश्रण येथे आढळते. झिंडर (४०,००० –१९७५) हे १९२६ पर्यंत राजधानी असलेले ऐतिहासिक व हौसा जमातीचे शहर आहे. याचे नायजेरियाशी जवळचे संबंध आहेत.

कलाकुसरीच्या कामाबद्दल हे शहर प्रसिद्ध आहे. माराडी (४२,००० – १९७५) हे नायजेरियाच्या सरहद्दीजवळील भुईमूग उत्पादन क्षेत्रातील प्रमुख शहर आहे. ताउआ (३०,००० – १९७५) येथील पशूंच्या व्यापाराची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.

देशात लोकसंख्येचा ताण अद्याप फारसा नाही. शेतीउत्पादनांची विविधता असल्यामुळे जागतिक बाजारपेठेतील किंमतीच्या चढ – उतारांचा अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होत नाही, तसेच राजकीय मतप्रणालींचा संघर्ष नाही. यामुळे व युरेनियमचे साठे सापडल्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास भरपूर वाव आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय व्यवहारांत या देशाची छाप चांगली पडण्याची शक्यता आहे. विश्रामगृहे वगैंरेंच्या व इतर सोयी करून पर्यटनव्यवसाय वाढविण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.

 

लेखक - म. अ. खांडवे / द. बा. आठल्ये

 

 


स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate