অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मॉरिटेनिया

मॉरिटेनिया

मॉरिटेनिया इस्लामी प्रजासत्ताक. पश्चिम आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक देश. क्षेत्रफळ १०,३०,७०० चौ.किमी. लोकसंख्या १८,३४,५०० (१९८४ अंदाज).

दक्षिणोत्तर लांबी सु. १,५०० किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी १,०९४ किमी. अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १४° ४२ ते २७ उत्तर आणि ४° ३० ते १७° पश्चिम यांदरम्यान असून मॉरिटेनियाच्या ईशान्येस अल्जीरिया, पूर्वेस आणि दक्षिणेस माली, नैर्ऋत्येस सेनेगल, वायव्येस व उत्तरेस मोरोक्को (सहारा प्रांत) हे देश आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे.

देशाच्या सरहद्दीची एकूण लांबी ५,७४० किमी. आहे. न्याकशॉट (लोकसंख्या ३,५०,०००–१९८२ अंदाज) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन

देशाच्या उत्तर भागातून कर्कवृत्त जात असून देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी तीन चतुर्थांश क्षेत्र कर्कवृत्ताच्या दक्षिणेस आहे. भौगोलिकि दृष्ट्या मॉरिटेनियाचा भूप्रदेश हा सहारा प्रदेशाचाच पश्चिमेकडील भाग असून तो मैदाने व पठारांनी व्यापलेला आहे. भूरचनेनुसार देशाचे तीन विभाग पाडता येतात. दक्षिण भागात सेनेगल नदीखोऱ्याचा अरुंद प्रदेश असून याच्या उत्तरेकडे पठारी व मैदानी प्रदेश आहेत.

दीखोऱ्याच्या उत्तर भागातील आद्रार, मध्य भागातील टागांट, धार टीशीट, धार वालाटा व दक्षिण भागातील आसाब व आफ्फोल्ले हे प्रमुख पठारी प्रदेश असून यांच्या उत्तरेस वालुकामय मैदानी प्रदेश आहेत. किनाऱ्यावरील मैदानी प्रदेशांची सस. पासूनची उंची ४५ मी. पेक्षा कमी असून अंतर्गत भागातील मैदानी प्रदेशांची उंची १८३ ते २२८ मी. पर्यंत आढळते. अंतर्गत व मैदानी प्रदेशांत तुटलेले कडे व द्वीपगिरी आढळतात.

वायव्य भागातील केडिएट इजिल हे देशातील सर्वोच्च शिखर (९१५ मी.) आहे. देशात सर्वत्र वाळूच्या टेकड्या विखुरलेल्या असून त्यांनी देशाचे जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. दक्षिणेकडील केवळ सेनेगल नदीखोऱ्यातच सुपीक मृदा आढळते. वालुकामय प्रदेशात लिथोसॉल गणातील मृदेचे प्रमाण अधिक आहे. पूर्वीच्या सरोवरांच्या जागी बनलेल्या मृदेत क्षारांचे प्रमाण अधिक आहे.

२५·४ सेंमी. समवृष्टिरेषेच्या दक्षिण भागात वाळूमिश्रित तपकिरी मृदा, अगदी दक्षिण भागात उष्ण कटिबंधीय लोहयुक्त मृदा, तर सेनेगल नदीच्या खोऱ्यात गाळाची मृदा आढळते.

मॉरिटेनिया-सेनेगल देशांदरम्यान म्हणजेच देशाच्या दक्षिण सरहद्दीवरून पश्चिमेस वाहत जाणारी सेनेगल हीच येथील एकमेव महत्त्वाची नदी असून दक्षिण भागात तिच्या अनेक छोट्याछोट्या उपनद्या आहेत.

त्याही बहुधा कोरड्याच असतात. अंतर्गत पठारी प्रदेशांवरून अनेक कोरड्या नद्यांची पात्रे दिसून येतात. त्यांतून क्वचितच पाणी वाहताना दिसते. उत्तर व पूर्व भागांतील अतिशय कोरड्या भागांत नद्यांची पात्रेही पहावयास मिळत नाहीत.

हवामान

देशाचा दक्षिणेकडील काही भाग वगळता सर्वत्र हवामान उष्ण व कोरडे आहे. देशाचे हवामान सामान्यपणे वाळवंटी स्वरूपाचे असले, तरी त्यात हवामानाचे तीन विभाग पाडता येतात. दक्षिण मॉरिटेनियाचे हवामान साहेलियन प्रकारचे असून तेथे जुलै ते ऑक्टोबर पावसाळा असतो.

मात्र वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७० सेंमी. पेक्षा कमीच असते. अगदी दक्षिण भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६६ सेंमी., तर न्वाकशॉट येथे ते १४ सेंमी. आहे. सेनेगल नदीखोऱ्यातील तापमान २४° से. ते ३५° से. असते. किनारी प्रदेश वालुकामय असला, तरी महासागरी व्यापारी वाऱ्यांमुळे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात ३० किमी. पर्यंत तापमान बेताचे राखले जाते.

उत्तर मॉरिटेनियाचे हवामान सहारा प्रकारचे असून यात देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या दोन तृतीयांश क्षेत्र मोडते. वर्षातील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ या भागातील दिवसाचे तापमान ३८° से. पेक्षा अधिक असते. रात्रीचे तापमान मात्र त्यामानाने बरेच कमी असते. या भागात हिवाळ्यातील तापमान ०° ते ३८° से., तर उन्हाळ्यातील तापमान १६° ते ५४° से. असते. आटार येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १० सेंमी. आहे.

उन्हाळ्यात नैर्ऋत्येकडून वाहत येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांपासून देशाच्या दक्षिणेकडील अर्ध्या भागात वृष्टी होत असते. दक्षिणेकडून उत्तरेकडे वार्षिक पर्जन्यमान व पर्जन्याचा ळाक कमीकमी होत जातो.

ध्रुवीय प्रदेशातील हवामान विक्षोभामुळे देशात काही ठिकाणी हिवाळ्यात पर्जन्यवृष्टी होते. एकमेकांविरुद्ध दिशेने वाहत येणाऱ्या आर्द्र नैर्ऋत्य आणि हरमॅटन वाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या वादळी स्वरूपाच्या हवामानामुळे किंवा चंडवातामुळे कधीकधी पर्जन्यवृष्टी होते.

वनस्पती व प्राणी

दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढत जाणाऱ्या रुक्षतेच्या प्रमाणानुसार वनस्पती प्रकारांमध्येही फरक पडत जातो. उत्तरेकडील सहारा वाळवंटी प्रदेशात काटेरी वनस्पती आढळतात. तेथील मरूद्यानांत मात्र तुलनेने वनस्पतींचे प्रमाण अधिक असून त्यात प्रामुख्याने खजुराची झाडे अधिक आढळतात.

दक्षिण भागात सॅव्हाना प्रकारच्या वनस्पती व गवत आढळते. यात गोरखचिंचेबरोबरच ताड आणि काटेरी वनस्पतीही असतात, तर अगदी दक्षिण भागात सेनेगल नदी खोऱ्यात वाळुंज, बोर व बाभळीसारख्या वनस्पती आढळतात.

देशाच्या दक्षिण भागातील सॅव्हाना प्रकारच्या प्रदेशात सिंह, बिबळ्या, हत्ती, कोल्हा, चित्ता, तरस, मगर, सुसर, ऊद मांजर, माकड, पाणघोडा, तर उत्तर भागात हरिण, रानमेंढ्या इ. प्राणी तसेच शहामृगासारखे मोठे पक्षी व बदके दिसून येतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate