অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केनेथ डेव्हिड कौंडा

केनेथ डेव्हिड कौंडा

केनेथ डेव्हिड कौंडा: झँबियाचे पहिले अध्यक्ष व आफ्रिकी देशांच्या स्वातंत्र्याचे एक कट्टे पुरस्कर्ते. ‘आफ्रिकी गांधी’ असाही त्यांचा निर्देश केला जातो. जन्म ऱ्होडेशियातील लुब्वे मिशन येथे. वडील न्यासालँडमध्ये शिक्षक व पुढे काही दिवस मंत्री; आई आफ्रिकेतील पहिल्या शिक्षिकांपैकी एक. १९०४ मध्ये ऱ्होडेशियात कौंडा कुटुंब स्थायिक झाले. लुब्वे मिशन येथेच केनेथ कौंडा यांचे शिक्षण झाले व तेथेच ते १९४३ मध्ये प्रथम शिक्षक आणि १९४४ – ४७ च्या दरम्यान मुख्याध्यापक झाले. त्यानंतर ते खाणी असलेल्या भागात रहावयास गेले. तेथे त्यांनी कृषिसहकार संस्था स्थापन केली व खाण कामगार कल्याण अधिकारी वसतिगृहाचे अधीक्षक म्हणून काम केले. ऱ्होडेशिया व न्यासालँड, तसेच येथील राष्ट्रवादी चळवळींचे नेतृत्व काही गोऱ्‍या लोकांकडे होते; म्हणून कौंडांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस स्थापन करण्यात पुढाकार घेतला आणि ते तिचे मुख्य सचिव झाले (१९५८ – ५८).

प्रथमपासून म. गांधींच्या अहिंसात्मक चळवळीचा मार्ग त्यांनी अवलंबिला. १९५७ मध्ये त्यांनी भारताला भेट दिली. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या हॅरी एन्कुम्बुला या अध्यक्षाशी मतभेद झाल्यामुळे तीतून बाहेर पडून ते झँबिया आफ्रिकन नॅशनल युनियन या पक्षाचे १९५८ – ५९ मध्ये अध्यक्ष झाले. झँबियातील अशांत वातावरणामुळे या पक्षावर बंदी घालण्यात आली व कौंडांना नऊ महिने कैदेची शिक्षा झाली. शिक्षा संपताच ते नव्या युनायटेड नॅशनल इंडिपेंडन्स पक्षाचे अध्यक्ष झाले (१९६०). १९६२ मध्ये या पक्षातर्फे उत्तर ऱ्होडेशियाच्या संसदेवर निवडून आले. त्यांनी एन्कुम्बुला यांच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाशी समझोता करून संयुक्त मंत्रिमंडळ बनविले व स्वतःकडे समाजकल्याण आणि स्थानिक स्वराज्य ही खाती घेतली. १९६३ मध्ये आफ्रिकन संघाच्या समाप्तीनंतर ते उत्तर ऱ्होडेशियाचे पंतप्रधान झाले व १९६४ मध्ये झँबिया स्वतंत्र झाल्यानंतर ते त्याचे पहिले अध्यक्ष झाले.

अध्यक्ष झाल्यावर प्रथम त्यांनी तांब्याचा व्यवहार करणाऱ्या सर्व कंपन्यांबरोबर स्वामित्वशुल्कासंबंधी काही करार केले आणि लुम्पा या धार्मिक पंथाने चालविलेल्या चळवळीस प्रतिबंध घातला. तांब्याची निर्यात सुलभ व्हावी, म्हणून त्यांनी ऱ्होडेशियामधून रेल्वेवाहतुकीसाठी मदत मागितली व ती मिळविली. गांधीवादी धोरणास अनुसरून त्यांनी दोन महत्त्वाच्या संहिता १९७३ मध्ये जाहीर केल्या. पहिलीने तत्कालीन पुढाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण घातले, तर दुसरीने खासगी संपत्तीवर निर्बंध लादले. यामुळे सरकारची आर्थिक स्थिती काहीशी सुधारली. झँबियातील सार्वत्रिक निवडणुकीनंतर डिसेंबर १९७३ मध्ये त्यांनी मंत्रिमंडळात लष्करातील दोन उच्च अधिकारी व उच्च पोलिस अधिकारी यांना स्थान दिले. यानंतर त्यांनी झँबियातील सर्व खाणी सरकारी नियंत्रणाखाली आणल्याचे जाहीर केले व सर्व देशात एकपक्ष पद्धतीचे शासन जारी केले. ब्लॅक गव्हर्न्मेंट (१९६१), झँबिया शॅल बी फ्री (१९६२) व ह्यूमॅनिझम इन झँबिया अँड इट्स इंप्लिमेंटेशन (१९६७) ही पुस्तके लिहिली. कौंडांच्या मानवतावादी व समाजवादी कार्याचा यथोचित गौरव भारताने त्यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे जवाहरलाल नेहरू पारितोषिक देऊन केला (जानेवारी १९७५). त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी ‘आफ्रिकी स्वातंत्र्य व एकात्मता यांचा खंदा पुरस्कर्ता’ या शब्दांत त्यांचा गौरव केला.

 

संदर्भ : Hall, R. S. The High Price of Principles : Kaunda and the White South, New York, 1970.

लेखक - सु. र. देशपांडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate