অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जेम्स जोसेफ हेकमन

जेम्स जोसेफ हेकमन

हेकमन, जेम्स जोसेफ : (१९ एप्रिल १९४४). प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सह-मानकरी. सूक्ष्म अर्थमिती क्षेत्रात त्याने विकसित केलेल्या पद्धती व उपपत्ती यांबद्दल त्याला डॅन्येल मॅक्फॅडन याच्याबरोबर विभागून अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले (२०००). हेकमनचा जन्म शिकागो (इलिनॉय प्रांत) येथे बेर्निस आयरीन मेड्ली व जॉन जेकब हेकमन या दांपत्यापोटी झाला. लेकवुड (कोलोरॅडो) येथील हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेऊन पुढे त्याने कोलोरॅडो विद्यापीठातून गणित विषयात बी.ए. (१९६५); प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम्.ए. (१९६८) व पीएच्.डी. (१९७१) या पदव्या प्राप्त केल्या.

शिकागो विद्यापीठात रुजू होण्यापूर्वी काही काळ कोलंबिया विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक पदावर तो अध्यापन करीत होता. त्या दरम्यान नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च (एन्बीइआर्) या संस्थेत त्याने काही महिने काम केले. तिथे त्याची बॉब विलिस याच्याशी मैत्री जमली. त्याच्याकडून अर्थशास्त्रातील विषमांगताचे (हेटरोजिनिटी) महत्त्व हेकमनला कळले. नंतर तो शिकागो विद्यापीठात प्राध्यापक झाला (१९७३). तिथे तो २००० पर्यंत अध्यापन करीत होता (फक्त मधली १९८८ व १९९० ही दोन वर्षे येल विद्या-पीठात त्याने अध्यापन केले) . तो इव्हिंग बी. हॅरिस स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये इकॉनॉमिक रिसर्च सेंटर व सेंटर फॉर सोशल प्रोग्रॅम इव्हॅल्यूएशन या संस्थांचा संचालक झाला. त्याने २००४ ते २००८ दरम्यान युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे सूक्ष्म अर्थशास्त्र विषयाचा मानद प्राध्यापक म्हणून अध्यापन केले; मात्र त्यानंतर तो पुन्हा शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाला. याशिवाय युनिव्हर्सिटी कॉलेज, डब्लिनमध्ये तो अभ्यागत प्राध्यापक म्हणून शिकवीत आहे. जेम्स जोसेफ हेकमनजेम्स जोसेफ हेकमन हेकमन आपल्या सुप्रसिद्ध ‘हेकमन करेक्शन’ प्रणालीच्या योगदानाबद्दल प्रसिद्ध आहे.

आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा अभ्यास व निदान करण्यासाठी सदर प्रणाली वापरली जाते. नमुना (सँपल) पहाणी करताना अभ्यासकाच्या पूर्वग्रहामुळे नमुना निवड प्रातिनिधिक नसल्यास सांख्यिकीय विश्लेषण चुकीचे निष्कर्ष दाखविते व त्यामुळे आर्थिक धोरणे चुकीची ठरण्याची शक्यता असते. हेकमनने यासाठी दोन पातळ्यांवरील ‘हेकमन करेक्शन’ ही सांख्यिकीय पद्धत विकसित केली. त्यामुळे नमुना निवड जरी अयोग्य झाली, तरी तीमध्ये दुरुस्ती करणे शक्य होते. त्याचे संशोधनकार्य व्यापक स्वरूपाचे असून देशाच्या आर्थिक धोरणांचे मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक शासकीय आधार त्याने विकसित केला. त्यामुळे शिक्षण, व्यवसाय-प्रशिक्षण, कामगार समस्या, आर्थिक विश्लेषण, भेदाभेद करणारे कायदे व मानवी हक्क यांसंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेणाऱ्यांना वेगळी दृष्टी मिळाली. आफ्रिकन-अमेरिकन लोकांचा आर्थिक विकास व्हावा, यासाठी केलेल्या नागरी हक्क कायद्यावर हेकमनचा प्रभाव होता. मुलां-मधील बाल्यावस्थेतील असमानता, मानवी विकास व कौशल्यनिर्मितीचक्र हे त्याचे अलीकडील संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. हेकमनच्या अग्रेसर सूक्ष्म साधनसामग्री विश्लेषणात्मक योगदानाने आधुनिक सूक्ष्म अर्थमितीचा पाया घातला आहे. त्याच्या उपयोजित संशोधनात दर्शविलेले प्रास्थिक अनुभवजन्य ज्ञान महत्त्वाचे सामाजिकव व्यक्तिगत प्रश्न सोडविण्यास साहाय्यभूत ठरले आहे. त्याच्या सूक्ष्म अर्थमिती संशोधनाच्या विकसित पद्धती व उपपत्ती सामाजिक समस्यांच्या सोडवणुकीतील प्रमाणभूत साधने होत. हे त्याचे मूलगामी संशोधन होय.

नोबेलव्यतिरिक्त हेकमनला पुढील अनेक मानसन्मान लाभले : जॉन बेट्स क्लार्क मेडल (१९८३), युलिसेस मेडल, युनिव्हर्सिटी कॉलेज, डब्लिन (२००६), जर्नल ऑफ इकॉनॉमेट्रिक्स डेनिस ऐग्नर अवॉर्ड (२००५ व २००७), थिओडोर डब्ल्यू. शुल्झ अवॉर्ड (२००७), गोल्ड मेडल ऑफ द प्रेसिडेंट ऑफ द इटालियन रिपब्लिक (२००८), फ्रीश मेडल (२०१४) इत्यादी. हेकमनने अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या २००८ च्या निवडणूक प्रचारात धोरण विश्लेषक म्हणून काम केले. नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस व अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी यांचा तो सन्माननीय सदस्य आहे.

हेकमनने विपुल ग्रंथलेखन केले असून २७० पेक्षा अधिक शोध-निबंध लिहिले आहेत. त्याच्या ग्रंथांपैकी : लॉ अँड इम्प्लॉय्मेन्ट : लेसन्स फ्रॉम लॅटिन अमेरिकन अँड द कॅरेबियन (२००४), इनइक्वालिटी इन अमेरिका (२००४), हँडबुक ऑफ इकॉनॉमेट्रिक्स (२००८), द इम्पॅक्ट ऑफ ९/११ ऑन बिझनेस अँड इकॉनॉमिक्स : द बिझनेस ऑफ टेरर (२००९), ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह ऑन द रूल ऑफ लॉ (२०१०), द परफॉर्मन्स ऑफ परफॉर्मन्स स्टँडर्ड्स (२०११), गिव्हिंग किड्स अ फेअर चान्स (२०१३) इ. मान्यवर व महत्त्वाचे होत. यांशिवाय जर्नल ऑफ लेबर इकॉनॉमिक्स आणि जर्नल ऑफ अप्लाइड इकॉनॉमेट्रिक्स या नियतकालिकांचा सहसंपादक म्हणून तो कार्यरत आहे. हेकमनचा विवाह लीन पेट्लर या सुविद्य युवतीशी झाला (१९७९). ती समाजशास्त्र या विषयात पदवीधर असून त्यांना जोनाथन व अस्मा ही दोन अपत्ये आहेत.

 

लेखक - जयवंत चौधरी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate