অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

से झां बातीस्त

से झां बातीस्त

से झां बातीस्त : (५ जानेवारी १७६७ - १५ नोव्हेंबर १८३२). सुप्रसिद्ध फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ व सनातनवादी अर्थशास्त्र संप्रदायाचा एक प्रणेता. त्याचा जन्म लीआँ (फ्रान्स) येथे एका सुसंस्कृत व्यापारी कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर होरेस नावाच्या आपल्या भावासह त्याच्या वडिलांनी ( झां-एत्येन ) त्याला इंग्लंडला पाठविले. प्रथम तो क्रॉयडॉनच्या एका व्यापाऱ्याकडे कारकून म्हणून काम करू लागला. नंतर लंडन येथे दुसऱ्या व्यापाऱ्याकडे काम करू लागला. त्या व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर से पॅरिसला परतला. काही काळ विमा कंपनीत काम केल्यानंतर तो पत्रकारितेकडे वळला. त्याने सुरुवातीस वृत्तपत्र स्वातंत्र्यावर एक पुस्तिका प्रसिद्ध केली (१७८९), नंतर त्याने कुरियर दे प्रॉव्हेन्स या वृत्तपत्रात काही महिने काम केले. फ्रेंच राज्यक्रांतीनंतरच्या लष्करी उठावात त्याने भागही घेतला होता (१७९२). तो एत्येन क्लाव्ह्येअर या तत्कालीन अर्थमंत्र्याचा सचिव बनला (१७९३). त्याने डीलोची या वकीलाच्या कन्येशी विवाह केला (१७९३). क्लाव्ह्येअरच्या आत्महत्येनंतर त्याचे सचिवपद गेले, तेव्हा तो ल दीकेद फिलॉसॉफिक, लितेरेअर, एत पॉलितिक या नियतकालिकातील संपादक मंडळात रुजू झाला (१७९४-१८००). तिथेच त्याला पदोन्नती मिळून तो प्रमुख संपादक झाला. या नियतकालिकातून त्याने ⇨अ‍ॅडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाच्या उपपत्तीचे विश्लेषण व महत्त्व प्रतिपादन केले. त्याचा वृत्तपत्रकार म्हणून लौकिक झाला. याच सुमारास (१७९९) पहिला नेपोलियन याच्या नेतृत्त्वाखाली प्रशासक मंडळ स्थापन झाले.

त्यातील ट्रिब्युनेटच्या सदस्यांत त्याची वर्णी लागली; तथापि नेपोलियन विरुद्धच्या वक्तव्यामुळे त्याचे सदस्यत्व रद्द झाले आणि त्यास नियतकालिकही सोडावे लागले. त्यानंतर उत्तर फ्रान्समध्ये अरास शहराजवळील ऑशी या गावी त्याने एक कापूस गिरणी उभारली. तीत सु. पाचशे-मुख्यतः स्त्री-कामगार त्याने नेमले. या व्यवसायात त्याला प्रचंड पैसा मिळाला. १८१३ मध्ये त्याने हा उद्योग विकला आणि तो पुन्हा पॅरिसला परतला. उर्वरित जीवन त्याने लेखन-वाचन यांत व्यतीत करण्याचे ठरविले. दरम्यान फ्रेंच शासनाने त्याला ग्रेट ब्रिटनच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला पाठविले. त्यासंबंधी त्याने एक पुस्तक प्रसिद्ध केले. पहिल्या नेपोलियनच्या पराभवानंतर (१८१५) ये याची कॉन्झर्व्हेटरी ऑफ आर्ट्स अँड क्राफ्ट्स या संस्थेमधील औद्योगिक अर्थशास्त्रविषयक अध्यासनावर नियुक्ती झाली (१८१७-३०). अखेरची दोन वर्षे त्याने कॉलेज द फ्रान्स (पॅरिस) यात राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापन केले (१८३०-३२). त्याच्या पत्नीचे तत्पूर्वी १८३० मध्ये निधन झाले. त्या दुःखद घटनेनंतर त्याची प्रकृती ढासळली. त्यातच मस्तिष्काघाताने पॅरिस येथे त्याचे निधन झाले. से याच्यावर अ‍ॅडम स्मिथ या अर्थशास्त्रज्ञाच्या लेखनाचा फार मोठा प्रभाव होता. त्याच्या अर्थशास्त्रविषयक सिद्धांताचे विश्लेषण त्याने आपल्या काही ग्रंथांतून तसेच स्फुटलेखांद्वारे केले. एवढेच नव्हे, तर स्मिथच्या लेखनातील दुर्बोधता आणि विसंगती त्याने निदर्शनास आणून त्याची अर्थशास्त्रातील सनातनी सांप्रदायिकता पुढे चालविली.

तिचा प्रसारप्रचार केला. त्याची स्फुटलेखांव्यतिरिक्त ग्रंथसंपदा विपुल आहे. त्याने मुख्यत्वे फ्रेंच भाषेत लेखन केले. त्याच्या ग्रंथांपैकी ए ट्रीटिझ ऑन पोलिटिकल इकॉनॉमी; ऑर, द प्रॉडक्शन, डिस्ट्रिब्यूशन अँड कन्झम्प्‌शन ऑफ वेल्थ (१८०३, इं. भा.) हा अत्यंत क्रांतिकारक व प्रमाणभूत ग्रंथ होय. त्याच्या अनेक सुधारित आवृत्त्या निघाल्या. याशिवाय त्याचे कॅटिकिझम ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी (१८१५, इं. भा.), लेटर्स टू टॉमस रॉबर्ट मॅल्थस ऑन पोलिटिकल इकॉनॉमी अँड स्टॅग्नेशन ऑफ कॉमर्स (१८२१, इं.भा.), डेफिनिशन्स इन पोलिटिकल इकॉनॉमी (१८२७, इं. भा.), ए कंप्लिट कोर्स इन प्रॅक्टीकल पोलिटिकल इकॉनॉमी (१८२९, सहा खंड, इं. भा.) वगैरे ग्रंथ मान्यवर झालेले असून त्याच्या अर्थशास्त्रविषयक मीमांसेचे दर्शक होत. तद्वतच एकोणिसाव्या शतकातील नव-सनातनवादी संप्रदायाच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासास ते साहाय्यभूत ठरतात. से याचा ‘लॉ ऑफ मार्केट्स’ (विपणन नियम) हा विशेष प्रसिद्ध असून पुरवठाच स्वतःच्या मागणीची निर्मिती करतो, या गृहीत तत्त्वावर तो आधारित आहे. त्याच्या मते, आर्थिक मंदी ही मागणीमधील सर्वसाधारण कमतरतेमुळे होत नाही; तर ती अत्युत्पादनामुळेही बाजारपेठेत उद्‌भवते आणि काही ठिकाणी ती कमी (अपुऱ्या) उत्पादनामुळे होते. हा असमतोल सहज समायोजन करून मिटू शकतो; कारण उत्पादनकर्ते (कारखाने) यांना आपले उत्पादन ग्राहकांच्या चोखंदळपणाशी (पसंतीशी) जुळवून घेऊन करावे लागते. थोडक्यात, से याच्या विपणन नियमाचा स्पष्ट ध्वन्यर्थ असा आहे की, भांडवलशाही ही स्वनियमन करणारी पद्धती असून आर्थिक व्यवहारात शासनाने मध्यस्थी करण्याची गरज नाही. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील १९३० च्या दशकातील आर्थिक मंदीच्या लाटेपर्यंत से याचा विपणन नियम सनातनी अर्थकारणाचा मध्यवर्ती केंद्रबिंदू होता. से याच्या अनेक ग्रंथांचे इंग्रजी व अन्य यूरोपीय भाषांत अनुवाद झाले असून त्याच्या आवृत्त्याही निघाल्या. त्याच्या अर्थशास्त्रज्ञ असणाऱ्या होरेस या मुलाने व लिआँ या नातवाने त्याच्या विपणन नियमाचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.

 

 

लेखक - वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate