অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रँक हाइनमन नाइट

फ्रँक हाइनमन नाइट

फ्रँक हाइनमन नाइट : शिकागोमधील नवसनातनवादी अर्थसंप्रदायाचा अध्वर्यू अर्थशास्त्रज्ञ. इलिनॉयमधील मॅक्लीन काउंटीत जन्मला. मिलिगन महाविद्यालयातून १९११ मध्ये बी.ए. व टेनेसी विद्यापीठातून १९१३ मध्ये बी.ए. आणि एम्.ए. झाला. १९१६ मध्ये त्याने कॉर्नेल विद्यापीठाची पीएच्.डी. संपादन केली. धर्मशास्त्र, जर्मन वाङ्‌मय, रसायनशास्त्र, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र इ. विषयांचा त्याने अभ्यास केला. कॉर्नेल, शिकागो व आयोवा विद्यापीठांत अध्यापन केल्यानंतर १९२८ मध्ये तो शिकागो विद्यापीठात परतला व अखेर तेथील मॉर्टन हल हे मानाचे प्राध्यापकपद त्याने भूषविले. इतरांप्रमाणे शासकीय नोकरी, वृत्तपत्रव्यवसाय किंवा क्रियाशील संघटनांमध्ये काम न पतकरता नाइट शेवटपर्यंत तार्किक बुद्धिवादीच राहिला.

१९५० मध्ये तो अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचा अध्यक्ष झाला व १९५७ मध्ये त्याला असोसिएशनचे फ्रॅन्सिस वॉकर पदक मिळाले. रिस्क, अन्‌सर्टन्टी अँड प्रॉफिट (१९२१) या पहिल्या ग्रंथानेच तो अमेरिकेतील अर्थशास्त्रज्ञांमध्ये नावारूपास आला. या प्रबंधात त्याने खंड व नफा यांच्यामधील भेद स्पष्ट केला. त्यासाठी जरी पूर्ण स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेचे विशदीकरण त्याने केले असले, तरी पूर्ण स्पर्धा ही केवळ एक संकल्पना असून प्रत्यक्ष परिस्थिती निराळी असते, याची त्याला जाणीव होती. याच संदर्भात धोका व अनिश्चितता यांच्यातील फरक त्याने स्पष्ट केला व अनिश्चितता हीच नफ्याच्या मुळाशी असते, असे प्रतिपादिले. इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन (१९३३) या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या पुस्तकात त्याने अर्थशास्त्रातील संदिग्ध संकल्पनांचे विवरण केले असून अर्थव्यवस्था म्हणजे एक समाकलित सामाजिक संघटना असते, यावर भर दिला आहे.

नाइटने आणखीही काही ग्रंथ लिहिले असले, तरी त्याची ख्याती विशेषतः निबंधकार आणि ग्रंथपरीक्षक म्हणून आहे. त्याचे बरेचसे लेखन प्रस्थापित श्रद्धांवरील टीकात्मक निबंधांच्या स्वरूपात आढळते. द एथिक्स ऑफ कॉम्पिटिशन (१९२१–३५) व फ्रीडम अँड रिफॉर्म (१९२९–४६) हे त्याच्या विद्यार्थ्यांनी संकलित केलेले त्याचे निबंधसंग्रह प्रसिद्ध आहेत. इंटेलिजन्स अँड डेमॉक्रॅटिक अ‍ॅक्शन (१९६०) या ग्रंथात नाइटने सत्याचा शोध हे स्वतंत्र समाजाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे, असे प्रतिपादिले. मानवी प्रगतीसाठी मानवाने सामाजिक समस्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे, केवळ सामाजिक संस्थांमध्ये फेरफार करून समस्या सुटत नाहीत, असे त्याचे मत होते.

 

लेखक - ए. रा. धोंगडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate