অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोर्ट हारकोर्ट

पोर्ट हारकोर्ट

पोर्ट हारकोर्ट : विहंगम दृश्य

 

पोर्ट हारकोर्ट

 

 

 

 

नायजेरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर, प्रमुख औद्योगिक शहर, तसेच रिव्हर्स राज्याचे व पोर्ट हारकोर्ट प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,४२,००० (१९७५ अंदाज). हे बॉनी या नायजर नदीच्या त्रिभुज प्रदेशातील पूर्वेकडील शाखेवर, अंटलांटिक महासागर किनाऱ्यापासून आत सु. ६६ किमी. अंतरावर वसले आहे.

हवामान उष्ण व दमट. वार्षिक सरासरी पर्जन्य २३७ सेंमी आहे. याच्या आसमंतात कच्छ वनश्री व वर्षारण्ये आहेत. पूर्वीच्या ओबोमोटूनामक उजाड गावाच्या जागेवर १९१२ मध्ये उडी कोळसा क्षेत्रांचे बहिर्द्वार म्हणून ब्रिटिशांनी याची स्थापना केली; तथापि १९१६ मध्ये एनूगू कोळसा खाणींशी जोडणाऱ्या लोहमार्गामुळे त्याचा विकास झाला. तत्कालीन ब्रिटीश वसाहतीचा सचिव लूइस हारकोर्ट याच्या स्मृतिप्रीत्यर्थ याला पोर्ट हारकोर्ट हे नाव मिळाले.

उत्तरेस सहा किमी.वरील ट्रान्स-आमाडी या १,००० हे. क्षेत्राच्या औद्योगिक वसाहतीत टायर, ॲल्युमिनियम उत्पादने,कागद, काचेच्या बाटल्या बनविणे इ. उद्योग; तर शहरात सिमेंट, सिगारेटी, धातूच्या खिडक्या व दारे, रंग, प्लॅस्टिके,कापड, लाकडी वस्तू, बोटी बांधणे, तेलशुद्धीकरण इ. उद्योगधंदे चालतात.

आसमंतातील ताड तेल, खोबरे, कोळसा,कोको, कथिल, कोलंबाइट, खनिज तेल, इमारती लाकूड, वाटाणे इ. उत्पादनांची येथून निर्यात केली जाते. हे बंदर ताड तेल व खनिज तेल साठविण्याच्या सोयींनी युक्त आहे. नळांद्वारे आसमंतातील तेल व नैसर्गिक वायू शहरात आणलेला आहे.

रस्त्यांनी व लोहमार्गांनी महत्त्वाच्या ठिकाणांशी हे शहर जोडले असून, ईशान्येस ११ किमी.वर विमानतळ आहे. ‘सर्कल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या मध्यभागातील जूबिली मेमोरियल पार्क, खेळांचे प्रेक्षागार व गोल्फ मैदान असेच रुग्णालये, दूरचित्रवाणी केंद्र, तांत्रिक व व्यापारी संस्था, रोमन कॅथलिक, बॅप्टिस्ट, अँग्लिकन व मेथडिस्ट मिशन आणि त्यांची विद्यालये इ. सुविधा येथे आहेत.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate