অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाँग बेट

लाँग बेट

लाँग बेट

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्याचे अटलांटिक महासागरातील एक बेट. हे संयुक्त संस्थानांतील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. न्यूयॉर्क राज्याच्या दक्षिणेकडील हे बेट हडसन नदीमुखाच्या पूर्वेस, लांबट आकारात पूर्व-पश्चिम दिशेने विस्तारले आहे. बेटाची पूर्व-पश्चिम लांबी १९३ किमी., रुंदी १९ ते ३७ किमी., क्षेत्रफळ ४,४६३ चौ.किमी. आणि लोकसंख्या ६७,२८,०७४ (१९८०) आहे. हिमानी निक्षेप क्रियेतून या बेटाची निर्मिती झालेली असून बेटाच्या दक्षिणेस व पूर्वेस अटलांटिक महासागर आहे. लाँग बेट उत्तरेस लाँग आयलंड साउंडमुळे कनेक्टिकट राज्यापासून, पश्चिमेस ईस्ट नदीमुळे मॅनहॅटनपासून, अप्पर न्यूयॉर्क उपसागरामुळे न्यू जर्सी राज्यापासून, तर जलाशयाच्या अरुंद पट्टीने स्टेटन बेटापासून अलग झालेले आहे. लाँग बेटाच्या पूर्व भागात त्रिशूलासारखी दोन भूशिरे असून त्यांमध्ये ग्रेट पीकॉनिक उपसागर आहे.

उत्तरेकडील भूशिर ओरिएंट पॉइंट व दक्षिणेकडील भूशिर माँटॉक पॉइंट या नावांनी ओळखले जाते. भूशिरांदरम्यानच्या उपसागरांत शेल्टर व गार्डनर बेटे आहेत. ओरिएंट पॉइंटपासून ईशान्येस एक द्विपमालिका पसरलेली असून प्लम व फिशर्झ ही तीमधील प्रमुख बेटे आहेत.

याची किंग्ज (लोकसंख्या २०,३०,९३६-१९८०), क्वीन्स (१८,९१,३२५), नॅसॉ (१३,२१,५७२) व सफाक (१२,८४,२३१) या चार परगण्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यांपैकी किंग्ज (ब्रुकलिन) आणि क्वीन्स परगणे हे न्यूयॉर्क शहराचेच भाग असून संपूर्ण लाँग बेट हे न्यूयॉर्क महानगरीय प्रदेशात समाविष्ट होते. सफाक परगण्याने लाँग बेटाचा पूर्वेकडील दोनतृतीयांश भाग व्यापलेला आहे. लाँग बेटाची समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंची (१२० मी.) नॅसॉ व सफाक परगण्यांत पसरलेल्या हिमोढ कटकामध्ये आढळते.

बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावर अरुंद वालुकाभिंत निर्माण झालेली असून तिच्यामागे ग्रे साउथ बे, मरिचीझ व शिककॉक हे उपसागर आहेत. हे उपसागर खाड्या आणि अधूनमधून असलेल्या खंडित भागांनी महासागराशी जोडले आहेत. त्यांशिवाय येथे लांब पुळणी, सलग असे वालुकाधन्व, उथळ खारकच्छे यांची निर्मिती झालेली दिसते. बेटाचा उत्तर किनारा दंतुर, अनेक उपसागर व लहानलहान कड्यांनी युक्त आहे. बेटावरील सरोवरे किंवा नद्या विशेष मोठ्या नाहीत. त्यामुळे पाणीपुरवठा मर्यादित आहे. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०७ सेंमी. आहे.

बेटावरील मृदा सामान्यतः वालुकामय असून तिच्यावर पीच पाइन व पांढरा ओक ह्या वृक्षांचे प्रमाण जास्त आढळते. कटक व लहान नदीखोऱ्यांतील सुपीक जमिनीवर पानझडी सदाहरित वृक्ष आढळतात. त्यांत तांबडा सीडार हॉली वृक्षही आहेत.

हेन्री हडसन हा इंग्लिश समन्वेषक १६०९ मध्ये लाँग बेटावर येऊन पोहोचला. येथील लहान खेड्यात अल्‌गाँक्वियन इंडियनांच्या वेगवेगळ्या सु. तेरा जमातींचे लोक रहात असल्याचे त्याला आढळले. डचांनी १६३६ च्या सुमारास बेटाच्या अगदी पश्चिम भागात व त्यानंतर लगेचच बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर कनेक्टिकट मॅचॅसूसेट्स उपसागर कॉलनीतील न्यू इंग्लंडवाल्यांनी वसाहती केल्या. १६५० मध्ये झालेल्या एका करारानुसार ऑइस्टर उपसागराच्या पश्चिमेकडील प्रदेश डचांकडे व पूर्वेकडील प्रदेश इंग्लंडकडे आला.

परंतु १६६४ मध्ये हे संपूर्ण बेट न्यूयॉर्कच्या ब्रिटीश प्रांताचा एक भाग बनले. न्यूयॉर्कशी पूल, रस्ते व लोहमार्गांनी जोडेपर्यंत येथील लोकसंख्या विरळ राहीली. १९४५ पासूनच येथील निवासी लोकांच्या संख्येत व उद्योगधंद्यांत वेगाने वाढ झाली. तसेच व्यापारी व संशोधनाच्या दृष्टीनेही याला महत्व आले. २७ ऑगस्ट १७७६ रोजी झालेल्या ‘लाँग आयलंड’ युद्धात ब्रिटीशांनी अमेरिकनांचा पराभव केला, परंतु वसाहती सैन्यदल त्यातून बरोबर निसटून गेले. यासाठी २९ ऑगस्ट रोजी रात्री दाट धुक्याचा फायदा जनरल जॉर्ज वॉशिंग्टनला झाला.

ठराव्या व एकोणिसाव्या शतकांत लाँग बेट हे समृद्ध कृषिक्षेत्र व मासेमारीसाठी महत्त्वांचे होते; परंतु अलीकडे शेतीच्या दृष्टीने त्याचे महत्त्व कमी झाले असले, तरी पूर्व भागात अजूनही शेती फायद्याची ठरते. विशेषतः सफाक हे राज्यातील महत्त्वाचा सुपीक व कृषिउत्पादक प्रदेश असून तो मंडई बागशेती (ट्रक फार्मिंग) व बटाटा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. ही उत्पादने न्यूयॉर्क शहराला पाठविली जातात. बेटावर मोठ्या प्रमाणात बदके पाळली जातात. हिमानी निक्षेप भागातून वाळूचे व बारीक खडीचे उत्पन्न मिळते. मुख्यतः निवासी क्षेत्र असलेल्या नॅसॉ परगण्यात आज उद्योगधंदेही बरेच आहेत. विमाने व इतर वाहतूक साधने, इलेक्ट्रॉनिकी साहित्य व प्लॅस्टिक उद्योग बेटावर आढळतात.

सांप्रत लाँग बेट म्हणजे लोकसंख्येची अतिशय गर्दी असलेला नागरी विभाग आहे. सर्वाधिक लोकसंख्या किंग्ज परगण्याची आहे. सफाक परगण्याची लोकसंख्या १९५० ते १९८० यांदरम्यान एकदशलक्षांपेक्षाही अधिक वाढली आहे. याच परगण्यातील ब्रुकहेवन येथील राष्ट्रीय प्रयोगशाळा हे अणुशक्ती संशोधन केंद्र आहे. न्यूयॉर्क, मॅनहॅटन व ब्राँक्स या बरोंशी लाँग बेट पूल, बोगद्यांद्वारा लोहमार्ग व रस्त्यांनी जोडले आहे.

पर्यटन व मनोरंजनाच्या दृष्टीने बेटाच्या दक्षिण व पूर्व  किनाऱ्यावर पुळणी, उद्याने व इतर अनेक आकर्षक प्रेक्षणीय स्थळे आहेत. फायर आयलंड नॅशनल सीशोअर, जोन्स बीच, हेक्शर, हिदर हिल्स हे भाग तसेच माँटॉक पॉइंट येथील राज्य उद्याने, पुळणी, गोल्फ खेळाची मैदाने, मासेमारीची क्षेत्रे, क्रीडा नौकाशर्यती, वस्तुसंग्रहालये, ऐतिहासिक स्थळे, जुन्या वास्तू इ. पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. बेटावर ला ग्वार्डिया हा अंतर्गत हवाई वहातुकीसाठी, तर जॉन एफ्. केनेडी हा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

 

चौधरी, वसंत

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate