অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सेंट हेलीना

सेंट हेलीना

दक्षिण अटलांटिक महासागरातील ब्रिटिशांकित बेट. क्षेत्रफळ १२२ चौ.किमी. लोकसंख्या ७,७२८ (२०१२ अंदाज). हे आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्यापासून १,९५० किमी.वर १५° ५५' द. अक्षांश व ५° ४२' प. रेखांश यांदरम्यान आहे. अ‍ॅसेन्शन (१९२२ पासून ), ट्रिस्टन द कुना (१९३८ पासून ) ही बेटे सेंट हेलीना वसाहतीत समाविष्ट आहेत. जेम्सटाउन ही याची राजधानी आहे.

लोकसंख्या १,००० (२००९ अंदाज)

भूवर्णन

सेंट हेलीना या बेटाची निर्मिती ज्वालामुखी क्रियेतून झालेली आहे. सांप्रत बेटावरील ज्वालामुखी निद्रिस्त आहेत. सेंट हेलीनाची नैर्ॠत्य-ईशान्य कमाल लांबी १६·९ किमी. व कमाल रुंदी १० किमी. आहे.

बेटाच्या पूर्व, उत्तर व पश्चिम भागांत ४९० ते ७०० मी. उंचीचे सुळके निर्माण झालेले आहेत. सँडी बेटाच्या उत्तरेस अर्धवर्तुळाकार पर्वत आहेत. या भागात मौंट अ‍ॅक्टॅएऑन (उंची ८१८ मी.) आहे. येथे डायना हे ८२३ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर आहे. या पर्वताच्या दक्षिणेस सागरकिनाऱ्याजवळ खोल दऱ्या आहेत.

बेटाच्या वायव्य भागात जेम्स बे जवळ ·४ किमी. दरी आहे. हा भाग वसाहतयोग्य आहे. या भागातच जेम्सटाउन हे शहर आहे. अ‍ॅसेन्शनचे क्षेत्रफळ ८८ चौ.किमी. व ट्रिस्टन द कुना याचे क्षेत्रफळ ९८ चौ. किमी. आहे. ही बेटे ज्वालामुखीपासून बनलेली आहेत.

सेंट हेलीना आग्नेय अटलांटिक व्यापारी वाऱ्यांच्या टप्प्यात येत असल्याने याचे हवामान आरोग्यवर्धक व आल्हाददायक असते. येथील उन्हाळ्यात सरासरी तापमान २१° से. ते २९° से. व हिवाळ्यात १८° से. ते २३° से. यांदरम्यान असते. समुद्रसपाटीवर वार्षिक सरासरी पर्जन्यमान २० सेंमी. तर बेटाच्या मध्यभागात ७६ सेंमी.पर्यंत असते. बेटाच्या खडकाळ, ओसाड अशा किनारी भागात निवडुंगासारख्या, काटेरी वनस्पती आढळतात. बेटाच्या मध्य भागात गॉर्स, हिवर, वाळुंज, स्कॉच पाइन, ओक, सिडार यूकॅलिप्टस, बांबू इ. वृक्ष आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था

पोर्तुगीजांकडे नोकरीस आलेल्या जॉन न्यू कॅसल या स्पॅनिश नाविकाने ( मार्गनिर्देशकाने ) रोमन सम्राट कॉन्स्टॅटिनची आई सेंट हेलीनाच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजऱ्या होणाऱ्या उत्सवादिवशी, १५ मे १५०२ रोजी या बेटाचा शोध लावला.

१५८८ पर्यंत या बेटाची माहिती फक्त पोर्तुगीजांना होती.

१५८८ मध्ये कॅप्टन थॉमस कॅव्हेंडिश या ब्रिटिश नाविकाने या बेटास भेट दिली. तद्नंतर बेटावर जलवाहतूक सुरू झाली. या बेटावर डचांची वसाहत १६४५-५१ पर्यंत होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात हे १६५९ मध्ये आले. तद्नंतर काही काळ येथे डचांचा अंमल होता.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा मालकी हक्क १६७३ ते १८३४ पर्यंत यावर होता. तद्नंतर ही ब्रिटिश वसाहत झाली. १६७३ मध्ये येथील मूळ रहिवाशांनी गुलामांची आयात केली. पुढे १८२६—३२ पर्यंत सर्व गुलामांची मुक्तता करण्यात आली. येथील लाँगवुड येथे नेपोलियन बोनापार्टला १८१५ ते त्याच्या मृत्युपर्यंत (१८२१) कैदेत ठेवण्यात आले होते.

जलवाहतुकीचे महत्त्वाचे बेट म्हणून १९७० पर्यंत याची भरभराट झाली. मात्र सुएझ कालवा १९६९ मध्ये वाहतुकीस खुला झाला व पर्यायाने जलवाहतूक मार्ग बदलल्याने याचे महत्त्व कमी झाले. ब्रिटिश राजसत्तेने १९६६ मध्ये सेंट हेलीनास काही प्रमाणात स्वायत्तता दिली होती.

येथील कार्यकारी व वैधानिक अधिकार हे ब्रिटिश राजसत्तेकडे आहेत. सेंट हेलीना येथे १९८८ चे संविधान प्रत्यक्षात १ जानेवारी १९८९ पासून अमलात आले असून या संविधानाप्रमाणे येथील राज्यकारभार चालतो. येथील राज्यकारभार कार्यकारी परिषद व विधानपरिषदेद्वारे गव्हर्नर पाहतो. कार्यकारी परिषदेत गव्हर्नर हा प्रमुख असतो. त्याशिवाय या परिषदेत मुख्य सचिव, अर्थ सचिव व अ‍ॅटर्नी जनरल हे पदसिद्ध सदस्य व विधान परिषदेतील निवडून आलेल्या पाच सदस्यांचा समावेश असतो.

विधान परिषदेचा अध्यक्ष गव्हर्नर असतो. विधान परिषदेत सभापती, तीन पदसिद्ध सदस्य (मुख्य सचिव, अर्थ सचिव व अ‍ॅटर्नी जनरल), लोकांनी निवडून दिलेले १२ सदस्य यांचा समावेश असतो. ब्रिटिश सर्वसाधारण कायद्याप्रमाणे येथील न्यायव्यवस्थेचे कामकाज चालते.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate