অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-दहा)

महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा पर्यटन दौरा आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

सांगली



चांदोली अभयारण्य


चांदोली राष्ट्रीय उद्यान.. सुमारे 317 चौ.कि.मी. क्षेत्रात आणि चार जिह्यांत पसरलेलं नितांतसुंदर आणि रमणीय ठिकाण. वारणा नदीवरील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हे उद्यान वसले आहे. पट्टेवाल, आणि बिबळे वाघ, अस्वल, गवे, रानडुक्कर, सांबर, सायाळ, भेकर, रानकुत्री इ.प्राणी, कोकीळ, मैना, सातभाई, खंड्या, सुतार यासारखे पक्षी तर अजगर, नाग, यासारखे सरपटणारे प्राणी येथे मोठ्या प्रमाणात आढळतात.

कसे पोहोचाल? 

हे अभयारण्य सांगली, कोल्हापूर रेल्वेस्टेशनपासून 80 किमी. तर पुणे बेंगलोर महामार्गावर कराड 45 किमी व इस्लामपूरपासून 55 कि.मी अंतरावर आहे.

श्रीगणपती मंदिर



सांगली शहरातील गणपती मंदिर हे सांगलीचे इतिहासदत्त आकर्षण आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै.आप्पासाहेब पटवर्धन यांनी हे मंदिर 1843 साली बांधले. कृष्णा नदीच्या काठी हे देऊळ बांधलेले असून पुरापासून ते सुरक्षित राहावे म्हणून या मंदिराची कल्पकतेने उभारणी करण्यात आली आहे. 

सर्व मंदिराचा आकार तीस/चाळीस फूट खोल चुनेगच्चीने भरण्यात आला आहे. कितीही पाणी वाढले तरी ते देवालयात येणार नाही अशी रचना करण्यात आली आहे.

कसे पोहोचाल?
सांगली रेल्वे स्टेशनपासून सुमारे अडीच कि.मी. अंतरावर हे श्रीगणपती मंदिर आहे.

सिंधुदुर्ग

सावंतवाडी



सावंतवाडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दक्षिणेचे शेवटचे शहर. सावंतवाडीच्या पूर्वीच्या सुंदरवाडी या नावातून गावाचे सौंदर्य स्पष्ट होते. चारी बाजूला रम्य वनश्रीचे डोंगर आणि मध्यभागी मोतीतलाव अशी सुंदर रचना सावंतवाडीला लाभली आहे. नरेंद्र डोंगर नावाचा छोटेखानी पर्वत सावंतवाडीची आणि तिच्या सौदर्यांचीच पाठराखण करत उभा आहे. या ठिकाणी सदैव थंडगार असलेले वनउद्यान आहे. चितार आळीतील कारागिरांनी तीनशे वर्षांपासून आजपर्यंत आपली हस्तकारागिरी जोपासली आहे. इथली हस्तकला जगप्रसिद्ध आहे. सावंतवाडीची लाकडी खेळणी प्रसिद्ध आहेत.
कसे पोहोचाल?

कोकण रेल्वेने सावंतवाडीपर्यंत जाता येते. सावंतवाडी शहरात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेस व रिक्षाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

सिंधुदुर्ग किल्ला


ज्या जलदुर्गावरून या जिल्ह्याला सिंधुदुर्ग हे नाव देण्यात आले तो सिंधुदुर्ग हे जिल्ह्यातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ ठरले आहे. हजारो लोक या जलदुर्गाच्या दर्शनासाठी येतात व प्रचंड आकाराच्या खडकांच्या साहाय्याने समुद्रात उभारण्यात आलेल्या या जलदुर्ग निर्मितीबद्दलच्या शिवाजी महाराजांच्या कल्पकतेने भारावून जातात. इतिहासातील नोंदीप्रमाणे 1664 साली शिवाजी महाराजांनी मालवण समुद्रातील कुरटे नावाने प्रसिद्ध असलेले बेट निवडून त्या बेटावर 44 एकर क्षेत्रावर या भव्य किल्ल्याची उभारणी केली. दगड आणि प्रचंड खडकांनी वेढलेल्या या बेटावर हा किल्ला बांधण्यासाठी 500 पाथरवट, 200 लोहार, 3 हजार मजूर आणि शेकडो कुशल कारागीर सतत तीन वर्षे काम करत असल्याची नोंद या किल्ल्यातील शिलालेखावर आढळते. 

कसे पोहोचाल?

सिंधुदुर्ग किल्ला कोकण रेल्वेवरील सिंधुदुर्गनगरी रेल्वेस्टेशनपासून 30 कि.मी व कुडाळपासून 35 कि.मी अंतरावर आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी एसटी बसेस व रिक्षाची सुविधा उपलब्ध आहे. 

आंबोली



आंबोली ही सावंतवाडी संस्थानिकांची उन्हाळ्यातील राजधानी व निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. सभोवताली दाट जंगले, डोंगर, दऱ्याखोऱ्या आहेत. नयनरम्य देखावा व दऱ्यातील सृष्टीसौंदर्य पाहण्यासाठी महादेवगड, कावळेसाद, शिरगावकर, परीक्षित, नट, सावित्री, सनसेट, पूर्वेचा वस असे असंख्य पॉईट. हिरण्येकेशी नदीचा उगम येथूनच होतो. या ठिकाणचा नांगरतास धबधबा, वनविभागाचे वनउद्यान आणि आंबोलीचा धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे खास आकर्षण आहे. आंबोलीपासून जवळच चौकूळ हे निसर्गरम्य गाव लागते. आंबोली-चौकूळच्या जंगलात गवे, हरीण, भेकर, बिबट्या, ससे, रानमांजरे हे वन्यप्राणी याशिवाय असंख्य प्रकारच्या वनौषधी आहेत. 

कसे पोहोचाल?

कोकण रेल्वेवरील सावंतवाडी रेल्वेस्टेशनपासून 25 कि.मी.अंतरावर आहे. आंबोली घाटापर्यंत एसटी बसेसची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

 

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate