অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सांगली जिल्हा

महाराष्ट्र पश्चिम भागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८,६५६ चौ. किमी. महाराष्ट्र  एकूण भूक्षेत्राच्या २·८०% क्षेत्र या जिल्ह्याने व्यापले आहे. लोकसंख्या २८,२०,५७५ (२०११). अक्षवृत्तीय विस्तार  १६° ४५' उ. ते १७° २२' उ अक्षांश.रेखावृत्तीय विस्तार ७३° ४२' पू. ते ७५° ४०' रेखांश. पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी. व दक्षिण-उत्तर रुंदी ९६ किमी.पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सांगली जिल्ह्याचे स्थान असून त्याच्या उत्तरेस सातारा व सोलापूर जिल्हे, पूर्वेस कर्नाटक  राज्यातील विजापूर जिल्हा, दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यातील विजापूर व बेळगाव जिल्हे तर पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा आहे. अगदी पश्चिमेकडील १२·८७ किमी. लांबीची सह्याद्रीची नैसर्गिक सरहद्द जिल्ह्याला लाभली आहे. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव असे एकूण दहा तालुके आहेत. सांगली (लोकसंख्या  २,५५,२७०–२०११) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

सांगली या नावाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. पहिल्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर सहा गल्ल्या होत्या. त्यावरून त्यास सांगली हे नाव पडले असावे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार या ठिकाणी जे गाव होते त्याला कानडी भाषेत सांगलकी म्हटले जाई. मराठीमध्ये त्याचे सांगली झाले असावे. अन्य एका आख्यायिकेनुसार वारणा व कृष्णा या नद्यांचा संगम सांगली येथे होतो. संगम या शब्दाचा अपभ्रंश होऊन सांगली हे नाव पडले असावे.

भूवर्णन

जिल्ह्याच्या प्राकृतिक रचनेत बरीच विविधता आढळते. भूरचनेनुसार सांगली जिल्ह्याचे (१) पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेश, (2) कृष्णा खोऱ्यातील सुपीक व सखल मैदानी प्रदेश आणि (3) पूर्वेकडील प्रदेश असे प्रमुख तीन प्राकृतिक विभाग पडतात. सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग डोंगराळ आहे. यात शिराळा तालुक्याचा बराचसा भाग आणि वाळवा तालुक्याचा काही भाग येतो. जिल्ह्याच्या पश्चिम सरहद्दीवर सह्याद्रीची मुख्य श्रेणी असून त्याची उंची सु.१,४६३ मी. आहे. याच भागात प्रचितगड किल्ला व त्याच्या दक्षिणेस ‘दक्षिण तिवरा घाट’ आहे. या घाटातून कोकणात जाण्यासाठी पाऊलवाट आहे. सह्याद्रीपासून आग्नेय दिशेत पसरलेल्या भैरवगड-कांदूर डोंगररांगा आहेत. या डोंगररांगांपासून आग्नेयीस, पूर्वेस व ईशान्येस अनेक कटक गेलेले आढळतात. सह्याद्रीपासूनच्या या संपूर्ण डोंगराळ प्रदेशाला आष्टा डोंगरमाला असे ही संबोधले जाते. या डोंगरमालांच्या आग्नेय भागात मल्लिकार्जुन डोंगर व संतोषगिरी आहेत. या प्राकृतिक विभागाचा उतार आग्नेयीकडे आहे. पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशाच्या पूर्वेस कृष्णा, वारणा व येरळा या नद्यांच्या खोऱ्यांचा सखल व सुपीक मैदानी प्रदेश आहे. या प्रदेशात वाळवा, मिरज, पलूस या तालुक्यांचे काही भाग येतात. या भागांतून वाहणारी कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. येथे तिचा प्रवाह सामान्यपणे वायव्य-आग्नेय असा आहे. शिराळा व वाळवा तालुक्यांच्या दक्षिण सरहद्दीवरून पूर्वेस वाहत येणारी वारणा तसेच उत्तरेकडून वाहत येणारी येरळा नदी या विभागात कृष्णेला मिळतात. या नद्यांमुळे हा प्रदेश बराच सुपीक बनला आहे.

पूर्वेकडील पठारी प्रदेश कृष्णा खोऱ्याच्या उत्तरेस, ईशान्येस व पूर्वेस आहे. कृष्णा काठच्या प्रदेशापेक्षा हा भाग अधिक उंचीचा व सपाट आहे. या पठारी प्रदेशात कवठे महांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज या तालुक्यांचा काही भाग येतो. या पठारी प्रदेशात काही डोंगर आहेत; परंतु ते फारसे उंच नाहीत. मिरज तालुक्याच्या आग्नेय भागातील दंडोबाचा डोंगर, वाळवा व पलूस तालुक्यांच्या उत्तरेकडील मच्छिंद्रगड-कमळभैरव डोंगर, कडेगाव तालुक्यातील वर्धनगड डोंगररांगा, तासगाव तालुक्याच्या उत्तरेकडील होनाई डोंगर, आटपाडी तालुक्यातील शुक्राचार्याचा डोंगर, कवठे महांकाळ तालुक्यातील आडवा डोंगर या येथील प्रमुख डोंगररांगा आहेत. या पठारी प्रदेशातील डोंगररांगा कृष्णा व भीमानदीखोऱ्यांच्या दरम्यानचा जलविभाजक ठरल्या आहेत. सांगली जिल्ह्याच्या अगदी पूर्वेकडील प्रदेश सपाट माळरानाचा आहे. या प्रदेशात जत व आटपाडी तालुके आणि कवठे महांकाळ तालुक्याचा पूर्व भाग येतो.

सांगली जिल्ह्यात जांभी, पिवळसर, तांबूस, तपकिरी, करडी व काळी अशा विविध प्रकारच्या मृदा आढळतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषतः शिराळा तालुक्यातील जास्त पावसाच्या प्रदेशात जांभी, पिवळसर-तांबूस, तपकिरी मृदा; कृष्णा, येरळा व वारणा नद्यांच्या खोऱ्यांत काळी कसदार मृदा; वाळवा, मिरज व तासगाव तालुक्यांच्या काही भागांत करड्या रंगाची तर पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशात हलक्या पोताची व क्षारयुक्त मृदा आढळते. शिराळा तालुक्यात बॉक्साइटचे साठे असून अनेक ठिकाणी चुनखडक आढळतो.

नद्या

कृष्णा, वारणा, येरळा, माण, अग्रणी व बोर या सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. त्यांपैकी कृष्णा, वारणा व येरळा नद्या निश्चितपणे पाऊस पडणाऱ्या या प्रदेशातून वाहतात. कृष्णा ही सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी नदी असून जिल्ह्यातील तिचा प्रवाहमार्ग १३०किमी. आहे. ती वाळवा, पलूस व मिरज तालुक्यांतून प्रथम पश्चिम-पूर्व व त्यानंतर वायव्य-आग्नेय दिशेस वाहते. कृष्णा नदीचे खोरे हा जिल्ह्यातील सुपीक भाग आहे. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वारणा, येरळा व अग्रणी या प्रमुख उपनद्यांबरोबरच कासेगाव व पेठ या नद्या आणि कटोरा ओढा, वाळू ओढा व खरा ओढा हे प्रमुख प्रवाह कृष्णेला मिळतात. वारणा नदी सांगली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर असलेल्या सह्याद्री पर्वतश्रेणीतील प्रचितगडजवळ उगम पावते. तिची लांबी १७३ किमी. आहे. उगमानंतर ती शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातून काहीशी दक्षिणेकडे वाहत आल्यानंतर जिल्ह्याच्या दक्षिण सरहद्दीवरून (कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांची सरहद्द) प्रथम आग्नेयीकडे व त्यानंतर पूर्वेकडे वाहत जाते. सांगली शहराजवळच हरिपूर येथे ती कृष्णेला मिळते. मोरणा ही वारणेची उपनदी शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात धामवडे टेकडीजवळ उगम पावते. सह्याद्रीच्या दक्षिण व आग्नेय दिशेने पसरलेल्या डोंगररांगांच्या दरम्यानच्या प्रदेशातून दक्षिण व आग्नेय दिशेत वाहत आल्यानंतर शिराळा तालुक्यातील मांगले येथे वारणा नदीला मिळते. काडवी, कानसा, शाली, अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या आहेत.

सातारा जिल्ह्यातून वाहत येणारी येरळा ही सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख नदी आहे. पश्चिमेकडील वर्धनगड-मच्छिंद्रगड आणि पूर्वेकडील महिमानगड-पन्हाळा डोंगररांगांमधून प्रथम दक्षिणेस, त्यानंतर आग्नेयीस व शेवटी दक्षिणेस वाहत जाऊन सांगली शहरापासून काही अंतरावर असलेल्या ब्रह्मनाळजवळ ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु.८५ किमी. आहे. येरळा नदीला पश्चिमेकडून नानी नदी व सोनहिरा ओढा, तर पूर्वेकडून कापूर नाला येऊन मिळतो. अग्रणी नदी खानापूर पठारावर बलवडीच्या जवळपास उगम पावते. उगमानंतर सु.३२ किमी. अंतर दक्षिणेस वाहत आल्यानंतर वज्रचौंदे येथून ती आग्नेयवाहिनी बनते. जिल्ह्याच्या बाहेर ती कृष्णेला मिळते. जिल्ह्यातील तिच्या प्रवाहमार्गाची लांबी सु.८५ किमी. आहे.

माण (माणगंगा) नदी सांगली जिल्ह्याच्या ईशान्य भागातील आटपाडी तालुक्यातून आग्नेय दिशेस वाहते. जिल्ह्यातील तिचा प्रवाह फक्त ३५ किमी. इतका कमी असला तरी तिच्या उपनद्या मात्र खानापूर, आटपाडी, जत, कवठे महांकाळ तालुक्यांचे जलवहन करतात. कोरडा नदी जतच्या जवळपास उगम पावते. उत्तरेस वाहत जाऊन ती जिल्ह्याच्या बाहेर माण नदीला मिळते. माण नदी पुढे भीमा नदीला मिळते. जतच्या ईशान्येस सु. ४ किमी. अंतरावर बोर नदी उगम पावते. या नदीने जत तालुक्याच्या पूर्व भागाचे जलवहन केले आहे. ईशान्येस व उत्तरेस वाहत जाऊन जिल्ह्याच्या बाहेर ती भीमा नदीला मिळते. जिल्ह्यातील तिची लांबी सु. ६४ किमी. आहे.

हवामान

हवामानाच्या दृष्टीने सांगली जिल्ह्याचे पश्चिमेकडील जास्त पावसाचा प्रदेश, कृष्णा खोऱ्याचा मध्यम पावसाचा प्रदेश आणि पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश असे तीन विभाग पडतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात वार्षिक सरासरी पर्जन्यमान सु.४०० सेंमी. असून पूर्वेकडे आटपाडी व जत तालुक्यात ते सु.५० सेंमी. इतके कमी आहे. एकूण वार्षिक पर्जन्यापैकी ६८% पर्जन्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मिळतो. सुखटणकर समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, मिरज, कवठे महांकाळ व तासगाव या तालुक्यांचा केंद्र शासनाने निश्चित केलेल्या अवर्षणप्रवणक्षेत्रात समावेश करण्यात आला असून १९७४-७५ पासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण – क्षेत्रविकास कार्यक्रम राबविले जात आहेत.

जिल्ह्यातील वनक्षेत्र फारच कमी म्हणजे जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या अवघे ६% इतके आहे. एकूण वनक्षेत्राच्या सु. एक चतुर्थांश वनक्षेत्र एकट्या शिराळा तालुक्यात आहे. पश्चिमेकडील जास्त पावसाच्या सह्याद्री पर्वत व लगतच्या डोंगराळ प्रदेशात सदाहरित वने, सह्याद्रीच्या पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशात मिश्र आर्द्र पानझडी वने, तर जिल्ह्याच्या पूर्वेकडील कमी पावसाच्या प्रदेशात शुष्क पानझडी वृक्ष, झुडुपे व गवत आढळते. सदाहरित जंगलांत जांभूळ, पिसा, भोसा, अंजन, हिरडा, तांबट इ. प्रकारचे वृक्ष आढळतात.

वाळवा, खानापूर व तासगाव तालुक्यांच्या सरहद्दीवर ‘सागरेश्वर’ अभयारण्य विकसित करण्यात आले आहे. हे अभयारण्य हरणांसाठी राखीव आहे. शिराळा तालुक्यातील ‘चांदोली’  अभयारण्य प्रसिद्घ आहे. हे अभयारण्य जिल्ह्याच्या सीमा ओलांडून कोल्हापूर, सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांत पसरले आहे. त्याचा विस्तार सु. ३०० चौ. किमी. क्षेत्रात आहे. या अभयारण्यास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला आहे. गवा, अस्वल, बिबट्या, हरिण इ. प्राणी तसेच पक्ष्यांच्या अनेक जाती,  अनेक दुर्मिळ वनस्पती या अभयारण्यात आढळतात. जिल्ह्यातील दंडोबाच्या डोंगरावर वनोद्याने आहेत.

इतिहास

प्राचीन इतिहास असलेल्या ह्या प्रदेशाने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल, मराठे आणि पटवर्धन संस्थानिक इत्यादींच्या राजवटी अनुभवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी १६६९ साली आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७७२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. त्यावेळी सांगलीच्या जवळ असलेले हरिपूर हे सांगलीपेक्षाही मोठे गाव होते. त्यावेळी हरिपूरची लोकसंख्या २,००० तर सांगलीची लोकसंख्या फक्त १,००० होती. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर पटवर्धन कुटुंबात अंतःकलह निर्माण झाल्याने मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात मिरज सांगलीपासून अलग झाले. तत्पूर्वी सांगलीचा समावेश मिरज जहागिरीमध्ये होत असे. सविनय कायदेभंगाच्या चळवळीमधील शिराळा तालुक्यातील बिळाशीच्या सत्याग्रहाची नोंद भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात झाली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात संस्थानांचे विलिनीकरण करतेवेळी सांगली, मिरज व जत ही संस्थाने सातारा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याने तो जिल्हा आकारमानाने मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या गैरसोयीचा बनला होता. त्यामुळे १९४९ मध्ये तत्कालीन सातारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन उत्तर सातारा व दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण करण्यात आले. १९६० मध्ये काही फेरफार करून तत्कालीन दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांप्रतच्या सांगली जिल्ह्यात करण्यात आले. १९६५ मध्ये मिरज व खानापूर तालुक्यांचे विभाजन करून कवठे महांकाळ व आटपाडी असे आणखी दोन तालुके नव्याने निर्माण करण्यात आले. तालुका पुनर्रचनेनुसार १९९९ मध्ये पलूस, तर २००२ मध्ये कडेगाव या तालुक्यांची नव्याने निर्मिती करण्यात आली.

चिंतामणराव पटवर्धन, दादासाहेब वेलणकर, क्रांतिसिंह नाना पाटील, वि.स. खांडेकर, विजय हजारे, विष्णुदास भावे, वसंतदादा पाटील इ. सांगली जिल्ह्यातील थोर व्यक्ती होत ज्या विठोजीराव चव्हाणांनी औरंगजेबाच्या छावणीवर अचानक हल्ला करून औरंगजेबाच्या तंबूचे सोन्याचे कळस कापून आणून औरंगजेबाच्या उरात धडकी भरविली, ते विठोजीराव चव्हाण याच जिल्ह्यातील डिग्रजचे. पेशवाईच्या काळात या भागावर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. त्यांपैकी चिंतामणराव पटवर्धन यांनी या भागाचा चांगला विकास घडवून आणला. त्यांनी छोटी धरणे, बंधारे व ताली बांधून जलसिंचनाखालील क्षेत्र वाढविले. दुग्धोत्पादनासाठी विविध योजना आखल्या. ग्रामीण विकासासाठी ग्रामोद्योग योजना सुरू केली. श्री गजानन मिल सुरू करण्यासाठी दादासाहेब वेलणकर यांना प्रोत्साहन दिले, तर सांगली येथे साखर कारखाना सुरू करण्यास शिरगावकर बंधूंना मदत केली. शैक्षणिक संस्थांच्या विकासातही त्यांचे मोठे योगदान आहे. प्रसिद्घ देशभक्त, झुंझार नेते आणि प्रतिसरकारचे निर्माते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील येडे मचिंद्र या खेड्यात झाला. प्रसिद्घ क्रिकेटपटू विजय हजारे हे सांगलीचेच. सुप्रसिद्घ मंगेशकर कुटुंबियांचे काही वर्षे वास्तव्य सांगली येथे होते.महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व मुख्यमंत्री व स्वातंत्र्य सेनानी वसंतदादा पाटील यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील पदमाळे हे होय.

आर्थिकस्थिती

सांगली जिल्ह्यात रब्बी,ज्वारी बाजरी, गहू,तांदूळ ही अन्नधान्य पिके घेतली जातात. रब्बी ज्वारीला येथे ‘शाळू’ म्हणून ओळखले जाते. ‘मालदांडी’ ही शाळूची जात येथे विशेष प्रचलित आहे. जत, आटपाडी व कवठे महांकाळ हे तालुके रब्बी ज्वारीसाठी प्रसिद्घ आहेत. कृष्णाकाठच्या सखल व सुपीक प्रदेशात गहू पिकविला जातो. तांदळाचे सर्वाधिक उत्पादन शिराळा तालुक्यात घेतले जाते. हळद, ऊस, द्राक्षे ही जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके आहेत. हळदीच्या उत्पादनासाठी हा जिल्हा पूर्वीपासूनच प्रसिद्घ आहे. सांगलीची  हळद व हळदबाजार हे देशात प्रसिद्घ आहे. ऊसाच्या उत्पादनात वाळवा, तासगाव, मिरज हे तालुके अग्रेसर आहेत. अलीकडच्या काळात हा जिल्हा द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्घीस आला असून प्रामुख्याने तासगाव जिल्हा त्यासाठी प्रसिद्घ आहे. कृष्णाकाठच्या प्रदेशात विशेषतः मिरज, तासगाव, वाळवा तालुक्यांच्या काही भागांत तंबाखूचे उत्पादन घेतले जाते. शिराळा तालुक्यातील मोरणा खोरे आणि वाळवा व मिरज तालुक्यांत पानमळे आहेत. त्याशिवाय भुईमूग, हरभरा, सोयाबीन, डाळिंब, वेगवेगळी कडधान्ये इत्यादींची उत्पादने जिल्ह्यात घेतली जातात.

सन २००९-१० मध्ये जिल्ह्यात काही प्रमुख पिकांचे उत्पादन पुढीलप्रमाणे झाले (आकडे शेकडा मे.टनांत) : तांदूळ– ३८७, गहू–४५३, ज्वारी – १,२७०, बाजरी – २०६, मका– ६४२, नाचणी– १, हरभरा– १८१, तूर– १७, भुईमूग– १५१.जिल्ह्यात ऊसाचे उत्पादन ५०,३५१ डेस्ड केन झाले असून सरकीविरहित कापूस उत्पादन ९ गासड्या व अंबाडी उत्पादन २ गासड्या झाले (१ गासडी = १७० किलो). जिल्ह्यात पिकाखालील एकूण क्षेत्र ७,५९,००० हे. असून त्यापैकी २१% क्षेत्र दुबार पिकाखाली आहे. लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी २०% क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे.

सन २००७ च्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात १३,९०,००० पशुधन होते. त्यांपैकी २,८१,००० गाई व बैल, ५,१९,००० म्हशी व रेडे, ५,८२,००० शेळ्या व मेंढ्या होत्या. तसेच ३४,७३,००० कोंबड्या व बदके होती. पशुवैद्यकीय सुविधांतर्गत पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय मिरज येथे कार्यरत आहे. त्या शिवाय जिल्ह्यात १४६ पशुवैद्यकीय दवाखाने, २६ पशुवैद्यकीय प्रथमोपचार केंद्रे, एक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना, एक जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, ३ विभागीय कृत्रिम रेतन केंद्रे व १५० कृत्रिम रेतन केंद्रे होती. जत येथे पशुपैदास केंद्र व रांजणी येथे शेळी पैदास केंद्र कार्यरत आहे. सन २००९-१० मध्ये ८६२ दुग्ध सहकारी संस्थाच्या सहकार्याने प्रतिदिन ५·११ लाख लिटर याप्रमाणे सु.१८·६५ कोटी लिटर दूध संकलित करण्यात आले. जिल्ह्यातील तलावांमध्ये किंवा जलाशयांमध्ये मासेमारी केली जाते. जिल्ह्यामध्ये पाच मत्स्यबीज पैदास केंद्रे आहेत.

सांगली जिल्ह्यामध्ये वारणा पाटबंधारे प्रकल्प, आरफळ स्टोअरेज, कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्प, टेंभू उपसा सिंचन योजना व कृष्णा कालवा हे पाच मोठे प्रकल्प आहेत. वारणा नदीवर शिराळा तालुक्यात चांदोली येथे; अग्रणी नदीवर तासगाव–कवठे महांकाळ तालुक्यांच्या सीमेवर वज्रचौंदे येथे; येरळा नदीवर बलवडी येथे धरणे आहेत. सन २००९–१० वर्षाअखेर जिल्ह्यातील एकूण ८४,७२५ हे. क्षेत्र मोठ्या प्रकल्पाच्या लाभक्षेत्राखाली येते. येरळवाडी, सिद्घेवाडी, मोरणा, दोड्डनाला, बसाप्पावाडी, संख, म्हसवड तलाव हे सात मध्यम प्रकल्प कार्यान्वित असून या प्रकल्पांचे सांगली जिल्ह्यातील लाभक्षेत्र सु.१५,०७५ हे. आहे. जिल्ह्यातील ८४ लघुपाटबंधारे प्रकल्पाखालील लाभक्षेत्र सु. ३६,८३७ हे. आहे. आटपाडी (तालुका आटपाडी), रेठरे (वाळवा), कुची आणि लांडगेवाडी (कवठे महांकाळ), अंजनी (तासगाव), खंडे राजुरी (मिरज) व कोसाटी (जत) येथे तलाव आहेत. सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या खोडशी धरणाचा व माण नदीवर बांधण्यात आलेल्या राजेवाडी तलावाचा लाभही सांगली जिल्ह्यास होतो. जिल्ह्यातील एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सु. २५% क्षेत्र ओलिताखाली आहे. त्यापैकी ७२ % क्षेत्र विहिरीखाली व २८% क्षेत्र पृष्ठभागीय ओलिताखाली आहे.

प्रसिद्घ उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी आपल्या किर्लोस्कर उद्योगसमूहाचा पहिला कारखाना सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे उभारला. या उद्योगात कृषी अवजारांची निर्मिती केली जाते. जिल्ह्यात ८ औद्योगिक वसाहती असून त्यांमध्ये छोटे-मोठे उद्योग कार्यरत आहेत. जिल्ह्यात मार्च २०१० अखेर नोंदणी झालेले ८२० कारखाने असून त्यांपैकी ७५० कारखाने चालू आहेत. जिल्ह्यात १७ सहकारी साखर कारखाने असून त्यांतील एकूण साखर उत्पादन ५८०८ हजार मे.टन होते (२०१०).

जिल्ह्यात विटा, माहुली व नेलकरंजी येथे हिऱ्यांना पैलू पाडण्याचे उद्योग आहेत. बागणी हे गाव अडकित्ते तयार करण्याच्या परंपरागत उद्योगासाठी प्रसिद्घ आहे. तासगाव येथे द्राक्षांपासून मनुके तयार करण्याचा उद्योग नव्याने विकसित होत आहे. माधवनगर व मिरज येथे कापडगिरण्या, तर सांगली येथे सूतगिरणी आहे. जत, आटपाडी व कवठे महांकाळ तालुक्यांत मेंढपाळ व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्यामुळे मेंढ्यांच्या लोकरीपासून घोंगड्या विणण्याचा व्यवसाय मोठा आहे. सन २००८-९ अखेर जिल्ह्यात एकूण ५,९२६ सहकारी संस्था असून त्यांपैकी ७५४ कृषि-पतसंस्था, १,४१९ बिगर कृषि-पतसंस्था, ५५ पणन संस्था, २,१९० उत्पादक संस्था व १,५०८ सामाजिक सेवा संस्था कार्यरत होत्या.

जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी ९,९२५ किमी. असून त्यात राष्ट्रीय महामार्ग ३० किमी.,राज्य महामार्ग ९३१ किमी., जिल्हा रस्ते ५,२०७ व ग्रामीण रस्ते ३,७५७ किमी.लांबीचे होते (२००७).पुणे- महामार्ग  हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४जिल्ह्यातून जातो. कासेगाव, नेर्ले, पेठ, कामेरी ही जिल्ह्यातील प्रमुख गावे या महामार्गावर आहेत. सांगली या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणापासून सर्व दिशांना रस्ते गेलेले आहेत. सांगली – पेठ (आष्टा व इस्लामपूरमार्गे), सांगली – कोल्हापूर (आष्टामार्गे), सांगली – कोल्हापूर (जयसिंगपूर,हातकणंगलेमार्गे), सांगली – विटा (कवलापूर, तासगाव, विसापूरमार्गे), सांगली – विजापूर (मिरज, बेडगमार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख रस्ते आहेत. मिरज– पुणे, मिरज– कुर्डुवाडी, मिरज– कोल्हापूर व मिरज– बेळगाव हे जिल्ह्यातून जाणारे लोहमार्ग आहेत. मिरज हे जिल्ह्यातील प्रमुख प्रस्थानक आहे.

जिल्ह्यात ७३ वर्गीकृत बँकांच्या १९५ शाखा, सहकारी बँकांच्या ४८१ शाखा व आयुर्विमा महामंडळाच्या ७ शाखा कार्यरत आहेत. रास्त भावाची दुकाने १,३१५ व शासकीय गोदामे २९ आहेत. जिल्ह्यात पोस्टाची सुविधा असलेल्या गावांची संख्या ३८९ इतकी असून ४१७ पोस्ट कार्यालये व ९२ तार कार्यालये आहेत (२००९–१०).

लोक व समाजजीवन

सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात लोकवस्ती विरळ आहे. तेथील गावे लहान लहान असून लोकांची घरे साधी आहेत. कृष्णाकाठच्या सुपीक प्रदेशात लोकवस्ती अधिक असून गावे मोठमोठी आहेत. जिल्ह्याच्या पूर्वेकडील माळरानाच्या कमी पावसाच्या प्रदेशात लोकवस्ती विरळ आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची एकूण लोकसंख्या २८,२०,५७५ असून त्यात १४,३५,९७२ पुरूष व १३,८४,६०३ स्त्रिया होत्या. जिल्ह्यातील स्त्री-पुरूष प्रमाण दर एक हजार पुरूषांमागे ९६४ स्त्रिया असे होते. एकूण लोकसंख्येपैकी सर्वांत जास्त लोकसंख्या मिरज तालुक्यात (२९%) असून सर्वांत कमी (5%) आटपाडी तालुक्यात होती. जिल्ह्यात अनुसूचित जातींचे  ३,१३,४७४ (१२%) व अनुसूचित जमातींचे १७,८५५ (०·६९%) लोक होते. तसेच ग्रामीण व नागरी लोकसंख्या अनुक्रमे ७५% व २५% होती. विटा, आष्टा, तासगाव, इस्लामपूर येथे नगरपालिका आहेत. सांगली, मिरज व कुपवाड मिळून एक महानगरपालिका करण्यात आली आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ३२९ आहे.साक्षरतेचे प्रमाण ८२·६२% असून त्यांपैकी पुरूष साक्षरता ९०·४०% तर स्त्री साक्षरता ७४·६६% आहे.सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण मिरज तालुक्यात (८१·९१%), तर सर्वांत कमी साक्षरता (६३·१५%) जत तालुक्यात आहे.  २००१–२०११ या दशकातील लोकसंख्या वाढीचा दर ९·१८% होता.

सन २००९–१० च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १९ रूग्णालये,७ दवाखाने, ४प्रसूतिगृहे, ५९ प्राथमिक आरोग्यकेंद्रे, ३२० प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे होती. या वैद्यकीय संस्थांमध्ये १,३६९ खाटांची सोय आहे. ७९ कुटुंबकल्याण केंद्रे असून त्यांपैकी ७३ केंद्रे ग्रामीण भागात तर ६ केंद्रे नागरी भागात होती.

सन २००९–१०  मध्ये जिल्ह्यातील १,९१० प्राथमिक शाळांमध्ये २,५१,१७४ विद्यार्थी व ८,६१७ शिक्षक; ४६१ माध्यमिक शाळांत २,१०,६९५ विद्यार्थी व ४,७७७ शिक्षक; १३० उच्च माध्यमिक शाळांत ३४,०५३ विद्यार्थी आणि ३,१८५ शिक्षक होते. वरील शैक्षणिक संस्थांव्यतिरिक्त जिल्ह्यात ४ अभियांत्रिकी महाविद्यालये, २ तंत्रनिकेतने, २ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये, २ वैद्यकीय महाविद्यालये, १ विधी महाविद्यालय, ११ डी. एड्. महाविद्यालये आहेत.

सांगली जिल्ह्याने अनेक मातब्बर कलावंतांची देणगी महाराष्ट्राला दिली आहे. त्यामुळे या जिल्ह्याला ‘कलावंतांचा जिल्हा’ किंवा ‘नाट्यपंढरी’ असे संबोधले जाते. प्रसिद्घ नाटककार गोविंद बल्लाळ देवल,विष्णुदास भावे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे मूळ सांगलीचेच. गायक अब्दुल करीमखाँ मिरजचे, तर विष्णू दिगंबर पलुस्कर हे पलूसचे. बालगंधर्व म्हणून प्रसिद्घीस आलेले नारायणराव राजहंस हे या जिल्ह्यातील नागठाण्याचे, तर नटवर्य गणपतराव बोडस हे बोरगावचे. प्रसिद्घ मराठी साहित्यिक वि. स. खांडेकर हे सांगलीचेच.

महत्त्वाची स्थळे

सांगली, मिरज, शिराळा, देवराष्ट्रे, तासगाव, किर्लोस्करवाडी, औदुंबर, नरसिंगपूर ही जिल्ह्यातील महत्त्वाची स्थळे आहेत. जिल्ह्याचे मुख्य ठिकाण सांगली हे कृष्णा नदीच्या काठावर वसले आहे. सांगलीची हळद, गूळ, शेंगा यांची बाजारपेठ, गणेशदुर्ग, गणेश मंदिर इ. उल्लेखनीय आहेत. मिरज हे महत्त्वाचे रेल्वे प्रस्थानक असून येथील भुईकोट किल्ला व मीरासाहेबांचा दर्गा प्रसिद्घ आहे. तंतुवाद्य निर्मितीच्या परंपरागत उद्योगासाठी हे प्रसिद्घ आहे. मिरजचे हवामान शुद्घ, कोरडे व आरोग्यदायी मानले जाते. अनेक दवाखाने व रूग्णालये येथे आढळतात. बत्तीस शिराळा हे शिराळा तालुक्याचे मुख्य ठिकाण असून नागपंचमीला येथे भरणाऱ्या यात्रेमुळे हे विशेष प्रसिद्घीस आले आहे. दरवर्षी नागपंचमीत येथे जिवंत नागांची मिरवणूक काढली जाते व ते अंगाखांद्यांवर खेळविले जातात. हल्ली त्यावर बंदी घालण्यात आली आहे.कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे हे गाव स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्घीस आले. याच्या आसमंतात पसरलेले सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्घ आहे. तासगाव येथील गणेश मंदिराचे गोपुर प्रेक्षणीय आहे. औदुंबर हे दत्तस्थान पूर्वीपासून विशेष प्रसिद्घ आहेत.कृष्णा-वारणा नद्यांच्या संगमावर वसलेल्या हरिपूर येथे संगमेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. बागणी येथील भुईकोट किल्ला उल्लेखनीय आहे, येथे पीरचा दर्गा असून मोठा उरूस भरतो. कवठेएकंद येथील श्री सिद्घराम मंदिर प्रेक्षणीय आहे. दसऱ्याच्या दिवशी येथे फार मोठ्या प्रमाणावर शोभेचे दारूकाम होते.

याशिवाय मिरज व कवठे महांकाळ तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या दंडोबा डोंगरावरील शिवमंदिर, ब्रह्मनाळ येथील कृष्णा-येरळा नद्यांच्या संगमाजवळील महादेव मंदिर, वाळवा तालुक्यातील बहे येथील रामलिंग मंदिर, किल्ले मच्छिंद्रगड येथील नाथ संप्रदायातील मच्छिंद्रनाथांची समाधी, खानापूर तालुक्यातील रेणावी येथील रेवणसिद्घ समाधी, भिवघाटनजीक असलेली शुकाचार्यांची समाधी इ. धार्मिक स्थळे उल्लेखनीय आहेत. वारणा नदीवरील चांदोलीधरण आणि सभोवतालचे चांदोली अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे. (चित्रपत्रे).

चौधरी, वसंत

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 3/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate