অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोल्हापुरचे ऐतिहासिक चौक

कोल्हापुरचे ऐतिहासिक चौक

कोल्हापूर शहरात अनेक चौक आहेत. पण त्यापैकी काही चौक ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे असून आजही कोल्हापुरच्या दैनंदिन जीवनात ते आपले स्थान टिकवून आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर आहे तो बिंदू चौक. पूर्वी कोल्हापूर शहराचे संरक्षण करण्यासाठी शहराभोवती रूंद असा दगडी कोट होता. कोटाच्या भिंतीला समान अंतरावर 45 बुरूज व बाहेरच्या बाजूस खोल खंदक होता. बुरूजास ठिकठिकाणी प्रवेशद्वारे होती. यापैकी रविवार पेइ बुरूजाच्या प्रवेशद्वाराजवळचा चौक मिरची बाजार म्हणून प्रसिद्ध होता.

या चौकात ब्रिटिशांविरूद्धच्या स्वातंर्त्यासाठीच्या लढय़ामध्ये भारत छोडो चळवळ जोरात असताना 15 ऑगस्ट, 1942 मध्ये एका सभेचे आयोजन झाले होते. ब्रिटिशांनी 1942 मध्ये एका सभेचे आयोजन झाले होते. ब्रिटिशांनी ही सभा उधळून लावण्यासाठी करवलेल्या लाठीहल्ल्यात सभेसाठी आलेला बिंदू नारायण कुलकर्णी हा युवक हुतात्मा झाला. त्याच्या स्मरणार्थ मिरची बाजार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या चौकाचे बिंदू चौक असे नामकरण उत्स्फूर्तपणे झाले.

ऐतिहासिक शिवाजी चौक

बिंदू चौकाप्रमाणेच शिवाजी चौकही कोल्हापूरकरांच्या जीवनात महत्वाचे स्थान टिकवून आहे. बिंदू चौकानजीकच शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या चौकाजवळ कोल्हापूरचा सुप्रसिध्द चप्पल बाजार आहे. जवळच महानगरपालिका, भवानी मंडप, महालक्ष्मी मंदिर ही महत्वाची स्थळे हाकेच्या अंतरावर आहेत. कोल्हापुरातील कोणत्याही मोर्चास, मिरवणुकीस या चौकातून गेल्याशिवाय परिपूर्णता येत नाही. या चौकातील 21 फुटी मूर्तीचा गणेशोत्सव प्रसिध्द आहे.

या चौकातील पूर्णाकृती ब्रांझचा छत्रपती शिवरायांचा पुतळा ऐतिहासिक महत्वाचा आहे. पूर्वी या पुतळ्य़ाच्या जागी मुंबई प्रांताचे गव्हर्नर सर लेस्ली विल्सन यांचा पुतळा होता. पण भालजी पेंढारकरांसारख्या प्रखर देशाभिमानी शिवभक्तामुळे त्याचे येथून उच्चटन झाले आहे. शहरातील बहुतेक महत्वाची मार्केट्स शिवाजी चौकातून चालत जाण्याच्या अंतरावर आहेत. सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेला हजरत सयद मुबारक घुडणपीर दर्गा या चौकातच आहे.

दसरा चौक

विजयादशमीचा म्हणजेच दसर्‍याचा सोहळा देशभर निरनिराळ्य़ा पद्धतीने साजरा केला जातो. म्हैसूरचा राजेशाही थाटाचा दसरा प्रसिद्ध असून लाखो पर्यटकांचे ते आकर्षण आहे. म्हैसूरप्रमाणेच कोल्हापुरच्या दरबारी थाटाचा दसरा प्रसिद्ध आहे. संस्थानकाळी शहरातील याच चौकात शाही थाटात दसर्‍याचे सोने लुटण्याचा कार्यक्रम संपन्न होत असे. आजही ही परंपरा अव्याहतपणे सुरूच आहे.

कालमानानुसार संस्थांनी थाटाचे वैभव कमी होत चालले आहे. पण कोल्हापुरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गेल्या काही वर्षापासून सुरू झालेल्या दसरा महोत्सवामुळे ही वैभवी परंपरा सुरू राहिली आहे. सोने लुटण्याचा पारंपरिक सोहळा ज्या चौकात संपन्न होतो तो चौक 'दसरा चौक' म्हणून प्रसिद्ध झाला आहे.

या चौकात छत्रपती शाहूंचा अत्यंत सुंदर व भव्य असा पूर्णाकृती पुतळा चौकाचे सौंदर्य वाढवत खडा आहे. चौकातच असलेली राजर्षी शाहू स्मारक भवनाची सुंदर वास्तू कोल्हापुरातील महत्त्वाच्या सांस्कृतिक उपक्रमासाठी एक प्रसिद्ध जागा आहे. विजयादशमीस या परिसरात सोने लुटण्यासाठी अलोट गर्दी होते. स्वत: कोल्हापुरचे छत्रपती पूर्वीप्रमाणेच आजही युवराज व अन्य दरबारी मानकर्‍यांसमवेत आपल्या शाही लवाजम्यासह येथे येतात.

लेखन: ज्ञानदीप

माहिती स्रोत: myKolhapur.net

अंतिम सुधारित : 8/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate