অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संघर्षाची मशाल : विहितगाव

संघर्षाची मशाल : विहितगाव

संघर्षाची मशाल : विहितगाव

एखाद्या गावाच्या रक्तातच संघर्ष, विद्रोह दडलेला असतो. जेथे संघर्षाच्या मशालींसाठी नेहमी उमेदीचा निखारा मिळतो अन् जगण्याच्या विद्रोहाला पेटवणारे शब्द गवसतात. महार सैन्यांच्या पराक्रमांची आठवण करू देणारे गाव, काळाराम सत्याग्रहाची रणशिंगे फुकणारे गाव, बाबुराव बागुलांचे तडफदार कवितांचे गाव अशी बिरूदे घेऊन मिरविणारे गाव म्हणजे विहितगाव. विहितगावाने गावपण कालांतराने त्यागले असले तरी गावचा इतिहास मात्र अजूनही ठसठशीत आहे. मात्र या आठवणींच्या पाऊलखुणांना जतन करण्याची गरज आहे. कारण जातीव्यवस्थेच्या बुरूजाला सुरूंग लावण्याच्या मोठ्या कामाची सुरुवात या गावापासून झाली आहे.

नाशिकरोड शहराचे उपनगर झालेले विहितगाव अगदी नव्या नवरीप्रमाणे नवनवीन इमारतींनी सजू लागले आहे. त्यामुळे विहितगावचे गावपण हरवले, असे म्हणायला हरकत नाही. पण देवळाली सोडले अन् वालदेवीवरचा पूल ओलांडला की, उजव्या हाताला नदी किनारी वसलेले पूर्वीचे छोटेसे विहितगाव अजूनही पहायला मिळते. गावातील ज्येष्ठमंडळी सांगतात की, वालदेवीला इतभर तरी पाणी असते म्हणून या गावाला विहितगाव म्हटले गेले असावे. मुगलकाळात विहितगावास ईदगावही म्हटले गेले. गाव म्हटले की, बाराबलुतेदारी आली; पण विहितगावाला बाराबलुतेदारी पद्धत पूर्वीपासून नव्हती. हे गाव नेहमीच शिवकाळापूर्वीपासून राजांच्या सरदारांचे मुलकी गाव राहिले आहे. तसेच शिवकाळात, पेशवाईत व नंतर इंग्रजांच्या सत्तेतही विहितगावात महारांना जहागिरी दिलेले हे गाव महार सैन्यांच्या इतिहासावरही नजर ठाकायला महत्त्वपूर्ण ठरते.

शिवरायांच्या लष्करात, गड-किल्ल्यांवर, आरमारात महारांना महत्त्वाचे स्थान होते. काही किल्ल्यांवरील किल्लेदार म्हणूनही महार होते. काही महार हे महाराजांच्या अंगरक्षक पथकात देखील होते. शिवरायांच्या नंतर संभाजी राजे सत्तेवर आले तेव्हाही हीच व्यवस्था होती. लष्करात महार सैनिकांची हुलस्वार म्हणून एक तुकडी असायची. त्यामध्ये महार, मांग, चांभार इ. जातीचे लोक असत. ही बिनीची तुकडी लढाईत व प्रवासात नेहमी आघाडीवर राहून रस्ता मोकळा करीत असे. शत्रूला हूल देण्यात महार सैन्य माहीर होते. या हुलस्वारांमध्ये म्हाल नाक व सिव नाक, सिद नाक यांचा उल्लेख इतिहासांच्या पानात आढळतो. यातील सिद नाक महारास वार्षिक ४०० रुपये रोख व १०० रुपयाचे कापड; तर त्याच्या हाताखालील १२ स्वारांस दरमहा १५ ते २० रुपये पगार होता. सिद नाक हा मोठा महापराक्रमी होता म्हणून शाहू राजांनी त्याला मिरज जवळचे कळंबी गाव इनाम दिले होते. या सिद नाकाच्या नातवाचे नाव देखील सिद नाकच होते.

ज्याने खर्ड्याच्या लढाईत सहभाग घेऊन पराक्रम गाजवला होता. पुढच्या काळात वसईच्या लढाईत तुक नाक, सीता, फकिरा आदी महारांनी अतुलनीय पराक्रम दाखवला होता. महार शूरवीर योध्यांनी इतिहासात आपले नाव किर्तीमान केले आहे. पेशव्यांनी महारांना सैन्यांतून बाहेर केल्याने बिनीचे व धारेवरचे लढवय्ये महार इंग्रजांना मिळाले व त्यांनी १८१८ च्या भिमा कोरेगावच्या लढाईत पेशव्यांना नामोहरम केले. यावेळी गंगनाक महार व त्याच्या दोन भावांना व कोठुळा मराठा सरदार या दोघांना विहितगाव जहागिरी वतन मिळाले. तेव्हा सय्यद नावाचा मुगल सरदार विहितगावचा कारभार पाहत होता. मात्र, गंगनाक महार व कोठुळा यांना विहितगाव मिळाल्याने सय्यदने विहितगाव सोडले. त्यानंतर येथील जमीन महार, कोठुळा (आताचे कोठुळे) व बालाजी संस्थानात वाटण्यात आली. त्यानंतर विहितगावात स्थानिक सरदारांचे अनेक वाडे उभे राहिले. यावेळी विहितगावातील दाणी हे सरदार होते अन् त्यांच्याकडे त्यांचा स्वतंत्र फौजफाटा होता, अशी माहितीही ग्रामस्थ देतात. यावरून तेव्हाच्या ऐतिहासिक विहितगावचे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. नंतरच्या काळात न्याय प्रतिष्ठा सांभाळणारे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले.

इंग्रज राजवटीतील काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. जातीव्यवस्थेच्या बुरुजाला सुरुंग लावण्याचे काम या घटनेने केले होते. विहितगावातील चावडीत नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, अमृतरावजी रणखांबे, तुळशीराम संभाजी काळे, शिवराममारू, पांडूरंग ज‌िबाजी सबनीस, गणपत सज्जन कानडे, सावळेराम दाणी, संभाजी रोकडे, भवानराव बागूल इत्यादी कार्यकर्त्यांशी केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहितगाव येथे २९ डिसेंबर १९२९ रोजी चावडीत झालेल्या बैठकीत मंदिर प्रवेशाची घोषणा झाली. हा क्षण विहितगावसाठी अविस्मरणीय ठरला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रहींना उद्देशून म्हणाले,‘मंदिर प्रवेशाने आपले सर्वच प्रश्न सुटतील असे मुळीच मानता येणार नाही.

आपले प्रश्न हे राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. हिंदूंनी आपल्याला माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवले आहे. ते आपल्याला अधिकार देण्यास तयार आहेत का नाही, हाच प्रश्न या मंदिर प्रवेश सत्याग्रहातून निर्माण होणार आहे. हा सत्याग्रह हिंदूंच्या ह्रदय मंदिरात बदल करण्यासाठी आहे. रामाच्या मंदिरात प्रवेश मिळाल्याने आपले प्रश्न सुटणार नाहीत. पण आम्ही हिंदू मनाची ही एक कसोटीच घेत आहोत.’ त्यानंतर विहितगावातील अनेकांनी आपली जमीन विकून काळाराम मंदिर सत्याग्रहासाठी निधी उभारला. २ मार्च १९३० हा सत्याग्रहाचा पहिला दिवस होता अन् विहितगावातून शेकडो लोक या सत्याग्रहात सहभागी झाले होते, अशी आठवणही ग्रामस्थ सांगतात.

पाच वर्षे विहितगावातील अनेक कुटुंबांनी सत्याग्रहात सहभागी झालेल्यांना रसद पुरविण्याचे काम केले. विहितगावात प्रवेश करताना आजही ती चावडी पहायला मिळते. या चावडीत गेल्यावर अजूनही संघर्षाच्या घोषणा कानात घुमतात. ‘संघर्षाशिवाय हक्क मिळणार नाही’ हे जहाल सत्य अजूनही ही चावडी आपल्याला सांगते आहे, असा भास आजही येथे अनुभवायला मिळतो. मात्र या ऐतिहासिक क्षणाचा इतिहास या चावडीत कोठेही वाचायला मिळत नाही. संघर्षाचा इतिहास व छायाचित्र येथे लावल्यास ही चावडी ऐतिहासिक वास्तू बनू शकते. तरच विहितगावच्या संघर्षाची गाथा प्रत्येकाला अनुभवायला मिळेल.

२ मार्च १९३० ला काळाराम मंदिर सत्याग्रह पेटला होता अन् त्याच दलित चळवळीला आवाज देण्यासाठी १७ जुलै १९३० मध्ये विहितगावात बाबुराव बागूल यांचा जन्म झाला. दलित साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी, विद्रोही दलित कथांचे उद्गाते, वास्तववादी कादंबरीकार अन् वास्तवतेचे भेदक चित्रण करणारे लेखक बाबुराव बागूलांचे गाव म्हणूनही विहितगाव ओळखले जाते. बेरोजगारी, आर्थिक-सामाजिक विषमता यांविरुद्ध त्या कालखंडात त्यांनी रचलेल्या कवितांमधून विद्रोही विचारांचा प्रभाव जाणवतो. ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथेने तर वास्तवालाही शहारे आणले. ‘मरण स्वस्त होत आहे,अघोरी, कोंडी, पावशा, सरदार, भूमिहीन, मूकनायक, अपूर्वा’ अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा विद्रोही प्रवाह त्यांनी आणला. बागुलांच्या लेखनामुळे प्रभावित होऊन लिहित्या झालेल्या दलित वर्गातील लेखकांच्या लिखाणातून मराठी साहित्यात दलित साहित्याची नवी लाट आली, याचे श्रेयही विहितगावालाच जाते. २६ मार्च २००८ ला बाबुराव बागूल यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावाने स्मारक उभारण्याची घोषणाही झाली; मात्र आजतागत त्यांच्या नावाचे स्मारक उभे राहू शकलेले नाही.

विहितगाव गावातील विठ्ठल मंदिरामुळे प्रतिपंढरपूर म्हणूनही ओळखले जाते. येथील विठ्ठलाची मूर्ती मन प्रसन्न करते. याच म‌ंदिरात अष्टभुजा देवीची लाकडी मूर्ती आहे. ही आवर्जून पहावी अशी आहे. वि‌ठ्ठल मंदिरातील ह.भ.प. आईसाहेब समाधी नेमकी कोणाची याबाबत फारशी माहिती मिळत नाही; मात्र ती १७५० दरम्यानची असल्याचे ग्रामस्थ सांगतात. तसेच गावात इतरही मंदिरे आहेत. यात अण्णा गणपती हे पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. वालदेवी नदीच्या काठी नवग्रहांना समर्पित श्री अण्णा गणपती नवग्रह सिध्दपिठ उभारण्यात आले आहे. उत्तर भारतात आणि नाशिकमध्ये हे एकमेव असे नवग्रहांचे मंदिर असल्याचे म्हटले जाते. या मंदिराचे केंद्राकर्षण म्हणजे भगवान गणेशाची भव्य मूर्ती होय. विहितगावचा इतिहास अनेक घटनांनी शहारलेला आहे. त्याचे संकलन होणे व त्याचे स्मृतीरूपी स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. भूतकाळाला विसरून इतिहास घडविता येत नाही, हे विहितगावने वेळीच ओळखण्याची गरज आहे.

लेखक : रमेश पडवळ


 

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate