অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सातमाळा

सातमाळा

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागातील सह्याद्रीचा एक फाटा. दख्खनच्या पठारी प्रदेशाच्या पश्चिम कडेवर उत्तर-दक्षिण पसरलेल्या सह्याद्री (पश्चिम घाट) या पर्वतश्रेणीच्या मुख्य रांगेपासून पूर्वेस किंवा आग्नेयीस अनेक डोंगररांगा किंवा सह्याद्रीचे फाटे गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या सीमेअंतर्गत तापी-पूर्णेच्या दक्षिणेस सातमाळा-अजिंठा, हरिश्चंद्रगड-बालाघाट व महादेवाचे डोंगर या तीन प्रमुख डोंगररांगा आहेत [⟶ बालाघाट; महादेवाचे डोंगर]. उत्तरेकडील तापी व दक्षिणेकडील गोदावरी नदी यांदरम्यान सातमाळा-अजिंठा, उत्तरेस गोदावरी व दक्षिणेस भीमा नदी यांदरम्यान हरिश्चंद्रगड-बालाघाट, तर उत्तरेस भीमा व दक्षिणेस कृष्णा नदी यांदरम्यान महादेवाचे डोंगर आहेत. सह्याद्रीच्या मुख्य समूहात या सर्व श्रेण्यांचा प्रारंभ होत असून त्या पूर्व किंवा आग्नेय दिशेस पसरल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील या प्रमुख डोंगररांगांपैकी सर्वांत उत्तरेकडील, साधारणतः पश्चिम-पूर्व दिशेस पसरलेल्या तापी व गोदावरी यांदरम्यानच्या, डोंगररांगा ‘सातमाळा-अजिंठा’ या नावाने ओळखल्या जातात. सामान्यपणे या डोंगररांगांच्या पश्चिमेकडील भागास सातमाळा व पूर्वेकडील भागास अजिंठ्याचे डोंगर असे संबोधले जाते. सातमाळा डोंगररांगांना चांदवड, चांदोर किंवा इंध्याद्री म्हणूनही ओळखतात. या डोंगररांगांचा प्रारंभ नासिक जिल्ह्याच्या वायव्य भागामध्ये सह्याद्रीच्या मुख्य समूहात होतो. मुख्य सह्याद्रीपासून पूर्वेस ८० किमी. पर्यंत बेसॉल्ट खडकातील विलक्षण अशा कटक व सुळक्यांच्या स्वरूपात ही रांग पसरली आहे. मनमाडजवळील मंद उताराच्या खळग्यानंतर पुन्हा या डोंगररांगा मैदानी भागापासून १८२ मी. उंचीपर्यंत वाढत गेलेल्या आहेत. अजिंठ्याच्या पुढे काही किमी.वर या डोंगररांगा दक्षिणेस वळून पठारी प्रदेशात विलीन होतात. नांदेड जिल्ह्यातील यांच्या विस्तारित डोंगररांगांना निर्मळ आणि सातमाळा डोंगररांगा असे म्हणतात. यांचा विस्तार पुढे आंध्र प्रदेशात झालेला दिसतो.

नासिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यांत सातमाळा-अजिंठा डोंगररांगांचे फाटे पसरले आहेत. नासिक जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेल्या असून तेथे त्यांची सस.पासून सरासरी उंची १,१००–१,३५० मी. दरम्यान आढळते. धोडप व सप्तशृंगीसारखी काही शिखरे सस.पासून १,४००मी. पेक्षा उंच आहेत. अचल व जावाता हे किल्ले या रांगेत आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तर सरहद्दीवरून गेलेल्या या डोंगररांगांना अजिंठ्याचे डोंगर असे म्हणतात. अंजिठा, पाटणा, चांदोर येथील डोंगरकपाऱ्यांत कोरलेली बौद्घ लेणी ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या साधारण मध्यातून या डोंगररांगा गेलेल्या आहेत.

सातमाळा डोंगररांगामध्ये काही अरण्यांचे पट्टे आढळतात. काही भागांतील डोंगरांचे उतार उघडे असून काही भागांत विखुरलेल्या वनस्पती पहावयास मिळतात. डोंगररांगांच्या दरम्यान असलेल्या प्रवाहांच्या पात्रांत व काठावरील भागात दाट झाडी व झुडूपे आढळतात. प्रामुख्याने उष्णकटबंधीय शुष्क पानझडी प्रकारची वृक्षराजी या भागात आढळते. साग, ऐन, हिरडा, कुसुम, आवळा, पळस, खैर, शिसव, अंजन, शिरीष, शेवरी इ. वृक्षप्रकार येथील जंगलांत पहावयास मिळतात. अरण्यमय प्रदेशात वन्य पशु-पक्षी आढळतात. वाघ, कोल्हा, रानडुक्कर, ससा, भेकर, मुंगूस, काळवीट, सायाळ इ. प्राणी व मोर, रानकोंबडा, चंडोल, पोपट, कोकिळ, ससाणा, दयाळ इ. पक्षीही तेथे आढळतात.

सातमाळा डोंगररांगांपैकी उत्तरेकडील काही सोंडींच्या उताराच्या भागात तसेच मुख्य रांगेच्या पायथ्यापर्यंत लागवडीखालील क्षेत्र आहे. या डोंगररांगांमध्ये भिल्ल, गोंड, परधान, कोलाम या आदिवासी जमातींचे लोक राहतात. चाळीसगावजवळील रांजणगाव किंवा औलाम खिंड आणि अंजिठा खिंड या दोन खिंडींमधून प्रमुख मार्ग गेलेले आहेत. पश्चिमेकडील डोंगररांगांमध्ये निसर्गसुंदर गिरिस्थाने आढळतात.

विंध्य पर्वताच्या पश्चिमेस मध्य प्रदेश व गुजरात राज्यांच्या सरहद्दीदरम्यान असणाऱ्या डोंगररांगांनाही सातमाळा या नावाने ओळखले जाते.


चौधरी, वसंत

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate