অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धन

धन

(वेल्थ). आर्थिक उपयोगिता व आर्थिक महत्त्व आहे, असा अस्तित्वात असलेला भौतिक उपयुक्त वस्तूंचा साठा, ‘धन’ हा शब्द ‘वेल्थ’ ह्या इंग्रजी शब्दाचा पर्याय आहे. धनाच्या संकल्पनेशी निगडित असणाऱ्या इतरही संकल्पना रुढ आहेत. उदा., मत्ता (अ‍ॅसेट्‌स), मालकीच्या वस्तू (बिलाँगिंग्ज), चीजवस्तू (इफेक्ट्‌स), संपदा (इस्टेट), संपत्ती (प्रॉपर्टी) इत्यादी. तथापि अर्थशास्त्रामध्ये ‘धन’ या संकल्पनेचा विशिष्ट असा अर्थ मानलेला आहे. अर्थशास्त्रीय दृष्ट्या धन म्हणजे कोणत्याही क्षणी अस्तित्वात असलेल्या वस्तूंचा साठा, मात्र त्या वस्तू पुढील अटी पूर्ण करणाऱ्या असल्या पाहिजेत : (१) त्यांना उपयोगिता असली पाहिजे, म्हणजेच त्या मानवी गरजा पुरविण्यास समर्थ असल्या पाहिजेत, (२) त्यांचे पैशात मूल्य करता आले पाहिजे, (३) त्यांचा पुरवठा मर्यादित असला पाहिजे व (४) त्या बाह्य असल्या पाहिजेत, म्हणजेच त्यांची मालकी एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित करता आली पाहिजे. धनामध्ये सर्व प्रकारच्या उपयोग्य वस्तू, कच्चा माल, अर्धनिर्मित वस्तू, यंत्रसामग्री, जमीन, घरे, खाणी, कारखाने इत्यांदींचा सामावेश होतो. आपल्या मुळाबाळांच्या व कुटुंबाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या घरमालकिणीचे कार्य फार उपयोगी आहे, परंतु ते हस्तांतरित करता येण्यासारखे किंवा विनिमयक्षम नसल्यामुळे त्याची धनात गणना करता येत नाही.

सूर्यप्रकाश व शुद्ध हवा यांसारख्या वस्तू अत्यंत उपयोगी आहेत; परंतु त्याचा पुरवठा अमर्याद असल्याने त्यांचा धनात समावेश होत नाही. एखाद्या व्यक्तीच्या धनामध्ये केवळ मूर्त वस्तूच नव्हे, तर अमूर्त पण बाह्य वस्तूही समाविष्ट होऊ शकतात; कारण त्यांचा उपयोग करून तिला मूर्त वस्तू मिळविता येतात. अर्थात तिचे व्यक्तिगुण किंवा शक्ती यांचा जरी तिला आपल्या उदरनिर्वाहासाठी उपयोग होत असला, तरी त्या बाह्य नसून अंतर्गत असल्याने त्यांचा समावेश धनामध्ये होत नाही. त्याचप्रमाणे तिचे मित्रसंबंधही सामान्यतः धनामध्ये धरले जात नाहीत. मात्र ज्या मित्रसंबंधाना प्रत्यक्षात व्यावसायीक मूल्य आहे, त्याचा समावेश धनामध्ये करावा लागतो. उदा., उद्योग संस्थेचे किंवा दुकानाचे ख्यातिमूल्य. अ‍ॅडम स्मिथसारखे काही अर्थशास्त्रज्ञ व्यक्तीच्या धनात तिच्या औद्योगिक कार्यक्षमतेच्या मुळाशी असणाऱ्या सर्व शक्तींचा, गुणांचा व सवयींचा सामावेश करतात. यामुळे घोटाळा होऊ नये म्हणून धन या संज्ञेने फक्त बाह्य संपत्तीच दर्शविली जावी, असे अ‍ॅल्फ्रेड मार्शलचे मत आहे. धनाचे वर्गीकरण व्यक्तिगत धन, सामुदायिक धन व राष्ट्रीय धन असे करतात. व्यक्तिगत धन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मालकीतील सर्व वस्तूंचा संचय. उदा., तिचे घरदार, कपडे, जमीनजुमला, भांडी-कुंडी, पैसा सर्व प्रकारची बचत, (बँक ठेवी, बचतपत्रे, कंपनी शेअर, ऋणपत्रे इ.) आणि तिला इतरांकडून येणे असलेले कर्ज किंवा इतर हक्क. या एकूण धनातून तिने इतरांकडून घेतलेली कर्जे वजा करुन तिचे निव्वळ धन ठरविता येते.

सामुदायिक धन म्हणजे एखाद्या समुदायाची मालकी असलेली संपत्ती. उदा., कंपनीच्या मालकीचे कारखाने, यंत्रसामग्री, क्लबची इमारत व खेळाचे सामान, नगरपालिकेचे उद्यान इत्यादी. राष्ट्रीय संपत्तीमध्ये रस्ते, कालवे, सरकारी इमारती, जल व्यवस्था केंद्रे, विद्युत केद्रे, सरकारी उद्योगधंदे इत्यादींचा सामावेश करतात. राष्ट्रीय संपत्तीमध्ये राष्ट्राने परदेशांना दिलेले कर्जही धरावे लागते, परंतु त्या राष्ट्राने परदेशांतून काढलेले कर्ज वजा करावे लागते. राष्ट्रीय धनाची मोजदाद करताना वरील बाबींखेरीज राष्ट्रीतील सर्व व्यक्तींच्या धनाचाही समावेश करावा लागतो. मात्र पुनर्गणती टाळण्यासाठी व्यक्तींच्या आपसांतील देण्याघेण्यांचा विचार करावा लागतो, राष्ट्रीय धन मोजताना राष्ट्रातील बँकनोटा, ठेवी किंवा रोखे यांचा समावेश करता येत नाही. राष्ट्रीय धन आणि सामाजिक कल्याण यांचा निकटचा संबंध आहे. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रथमावस्थेत अ‍ॅडम स्मिथ, डेव्हीड रिकार्डो यांसारख्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी धन आणि त्याची वाढ यांवर विशेष भर दिला. धनसंचयाकडे ते आर्थिक विकासाच्या व उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून पाहत होते. म्हणून राष्ट्रीय धनाची वाढ म्हणजे सामाजिक कल्याणातील वाढ, असे समीकरण त्यांनी मांडले. त्यांच्या मते धनसंचय हे साध्य व साधनही आहे. म्हणूनच अर्थशास्त्राचा आद्य प्रणेता अ‍ॅडम स्मिथ ह्याने अर्थशास्त्र म्हणजे ‘अ‍ॅन इन्क्वायरी इन टू द नेचर अ‍ँड कॉझिस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स’ (राष्ट्रीय धनाचे स्वरूप व त्याच्या उत्पत्तीची कारणे ह्यांचे विवेचन करणारे शास्त्र) या शीर्षकाने आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांचा दृष्टिकोन संपूर्णतः वस्तुनिष्ठ असून त्यांनी व्यक्तीनिष्ठ कल्पनांकडे लक्ष दिले नाही; तसेच सामाजिक कल्याणाच्या दृष्टिने धनाच्या व्यक्तिव्यक्तींमधील विभाजनाकडेही लक्ष पुरविले नाही. अ‍ॅल्फ्रेड मार्शल, आर्थर पिगू यांसारख्या नव-सनातनवादी अर्थशास्त्राज्ञांच्या मते धन हे साध्य नसून साधन आहे.

धन आणि कल्याण यांचा जवळचा संबंध असला, तरी धनाची वाढ म्हणजे कल्याणाची वाढ, असे समीकरण मांडता येत नाही व धनाचा अभ्यास मानवी कल्याणाकडे लक्ष ठेवूनच केला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादले. हे मानवी कल्याण म्हणजे पैशाच्या फुटपट्टीने मोजता येणारे आर्थिक कल्याण होय, असे त्यांचे मत होते. धन हे समाजाच्या आर्थिक कल्याणाचे माप असले, तरी हे माप सर्वसाधारण स्वरूपाचे व अंदाजी माप आहे. मानवी कल्याणाच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या अनेक वस्तूंचा व सेवांचा धनामध्ये समावेश होत नाही, कारण त्या विनिमयक्षम नसतात. याउलट अफू, मद्य, विष यांसारख्या वस्तूंचा व्यक्तींच्या आरोग्यावर विघातक परिणाम होत असला, तरीही त्यांचा धनामध्ये समावेश होतो. म्हणून धनाच्या वाढीबरोबर कल्याणात वाढ होईलच, असे ठामपणे म्हणता येत नाही. सत्यसृष्टीत समाजामध्ये धनाची वाढ झाली, म्हणजे धनिक लोकच अधिक धनिक बनतात आणि बहुसंख्य जनता गरीबच राहून तिचे कल्याण साधले जात नाही, असे आढळून येते. म्हणूनच सामाजिक कल्याणाचा प्रश्न जितका धनाच्या वाढीचा आहे, तितकाच धनाच्या व उत्पन्नाच्या समप्रमाणात विभाजनाचा आहे, याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

 

लेखक -. गो. चिं. सुर्वे  / ए. रा. धोंगडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate