অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय जहाज वाहतूक निगम

भारतीय जहाज वाहतूक निगम

भारतीय जहाज वाहतूक निगम : आंतरराष्ट्रीय जलवाहतूक करणारा सरकारी क्षेत्रातील निगम. २ ऑक्टोबर १९६१ रोजी पौर्वात्य नौकानयन महामंडळ व पाश्चिमात्य नौकानयन महामंडळ यांच्या एकत्रीकरणातून या निगमाची स्थापना करण्यात आली. निगमाचे प्राधिकृत भांडवल ३५ कोटी रु., तर भरणा झालेले व अभिदत्त भांडवल २७.९५ कोटी रु. आहे. निगमाचे संपूर्ण भांडवल भारताचे राष्ट्रपती व त्यांच्या नामनिर्देशित व्यक्ती यांच्या नावे केलेले आहे. निगम मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, समुद्रपार व किनारी तेलवाहू जहाज वाहतूक, कोरड्या मालाची वाहतूक, अवजड माल वाहतूक इ. सेवा उपलब्ध करतो. स्थापनेच्या वेळी निगमाजवळ १९ जहाजे आणि स्थूल नोंदणीकृत टनभार व वस्तुभार अनुक्रमे १.३८ लक्ष टन व १.९२ लक्ष टन एवढा होता. १ ऑक्टोबर १९८० रोजी १४४ जहाजे, स्थूल नोंदणीकृत टनभार व वस्तुभार अनुक्रमे २९.०४ लक्ष टन व ४८.४८ लक्ष टन एवढा होता. भारतीय व परदेशी जहाजकारखान्यांमधून १५ जहाजांची नोंदणी (स्थूल नोंदणीकृत टनभार व वस्तुभार अनुक्रमे २.३३ लक्ष टन व ३.४० लक्ष टन) करण्यात आली आहे. वरील १४४ व १५ नोंदविलेल्या जहाजांकरिता निगमाने केलेली गुंतवणूक अनुक्रमे सु. ९७५ कोटी रु. व सु. १६० कोटी रु. आहे. १९८१ च्या अखेरीस निगमाजवळील जहाजांची संख्या १४८ झाली असून स्थूल नोंदणीकृत टनभार ३०.२४ लक्ष टन एवढा झाला. एकूण भारतीय जहाजांच्या टनभारापैकी निम्म्याहून अधिक (५१%) टनभार निगमाच्या जहाजांचा आहे.

निगमाचे प्रचालन उत्पन्न व परदेशी हुंडणावळीचे उत्पन्न (बचत) पुढील आकड्यांवरून स्पष्ट होईल (आकडे कोटी रुपयांत) : १९६१ - ६२ : ७.८९, १.१८; १९६९ - ७० : ५२.८९, २६.३०; १९७९ - ८० : ४०६.२३, २००.०, १९८० - ८१ मध्ये निगमाला ५०१.६८ कोटी रुपयांचे वाहतूक उत्पन्न मिळाले. स्थापनेपासून निगमाला नफा मिळत असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक आर्थिक मंदी, जहाजउद्योगामध्ये आलेली मंदी व चलनवाढीचे दडपण या अडचणींवरही मात करून निगमाने आपली प्रगती चालू ठेवली आहे. आपल्या उत्पन्नातील बराचसा भाग पुनर्गुंतवणुकीसाठी वापरणे, हे निगमाच्या विकासाचे महत्वाचे वैशिष्ट्य मानावे लागेल. ही गोष्ट पुढील आकडेवारीवरून स्पष्ट होईल (आकडे कोटी रुपयांत) : १९६१ - ६२ : जहाज विकास निधी समिती (एसडीएफसी) व बँका यांच्याकडून घेतलेली कर्जे ५.७१, भागभांडवल २३.४५, जहाजकारखान्यांकडून घेतलेली कर्जे, स्वतः निगमाने मिळविलेले उत्पन्न ६.८५, एकूण ३६.०१; १९६९ - ७० : ३८.६७, २३.४५, १९.५५, ५३.५२, १३५.१९; १९७९ - ८० : ६१३.८९, २७.९५, ९०.८६, ३३६.०३, १,०६८.७३. निगमाने प्रमाणित पेट्यांत (कंटेनर्स) बंदिस्त केलेला माल वाहून नेण्यासाठी खास कोठड्यांची (सेल्युलर) पेटी-जहाजे आपल्या वाहतुकीत वापरण्यास प्रारंभ केला.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून ऑस्ट्रेलियाकडे आपली पहिली पेटी-जहाज वाहतूक सेवा निगमाने सप्टेंबर १९७८ पासून सुरू केली. यानंतर दोन वर्षांतच देशाच्या पूर्व किनाऱ्यावरूनही अशा प्रकारची वाहतूकसेवा ऑस्ट्रेलिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पूर्व कॅनडा व पॅसिफिक महासागरी बंदरे यांकडे सुरू करण्यात आली. पॅसिफिक किनाऱ्यावरील बंदरे, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा यांना पेटी-जहाज वाहतूक सेवा ऑक्टेबर १९७९ मध्ये सुरू करून व त्याकरिता खासकरून उभारलेल्या हल्डिया (प. बंगाल) बंदरातील थांब्याचा प्रथम उपयोग भारतीय जहाज वाहतूक निगमानेच करून घेतला. भारत-ग्रेट ब्रिटन-यूरोप, भारताचा प. किनारा-मॉरिशस-पूर्व आफ्रिका, भारत-प. आफ्रिका-भारत-काळा समुद्र, भारत-भूमध्ये समुद्र या मार्गावरही अशाच प्रकारची पेटी-जहाज वाहतूक सेवा सुरू करण्याचा निगमाचा विचार आहे.

 

लेखक -  वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate