অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय हवाईमार्ग निगम

भारतीय हवाईमार्ग निगम

भारतीय हवाईमार्ग निगम : देशांतर्गत हवाई वाहतूक करणारा सरकारी क्षेत्रातील निगम. १५ जून १९५३ मध्ये एका कायद्यान्वये या निगमची स्थापना झाली. देशांतर्गत हवाई वाहतूक करणाऱ्या आठ कंपन्यांचा व्यवहार ताब्यात घेऊन या निगमाने १ ऑगस्ट १९५३ पासून कारभाराला सुरुवात केली. कार्यक्षमतेने, किफायतशीरपणे प्रवासी व माल यांची हवाई वाहतूक करणे हे उदिष्ट ठेवून निगमाने आपला व्यवहार व्यापारी तत्त्वांवर चालवावा, अशी कायद्यात तरतूद आहे. देशांतर्गत वाहतुकीशिवाय बांगला देश, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका, पाकिस्तान व मॅलॅगॅसी प्रजासत्ताक या शेजारी देशांबारोबरील हवाई वाहतूकही शासनाने या निगमाकडेच सोपविली आहे. निगमाचे प्रधान कार्यालय नवी दिल्ली येथे असून नवी दिल्ली, मुंबई व कलकत्ता या तीन केंद्रांवरून निगमाच्या हवाई वाहतूक सेवा चालू असतात.

निगमाचे संचालक मंडळ अध्यक्षासहित नऊजणांचे असून नऊ कार्यकारी प्रमुख असतात, ते पुढीलप्रमाणे: (१) महाव्यवस्थापक, (२) उपमहाव्यवस्थापक, (३) वित्तनियंत्रक, (४) संचालक-अभियांत्रिकी, (५) संचालक-नियोजन, (६) संचालक-प्रवर्तन, (७) संचालक-वाणिज्य, (८) भांडार व खरेदी नियंत्रक, (९) सचिव. मार्च १९८० अखेरीस निगमात २६६ कोटी रू. एवढी गुंतवणूक होती, तर निगमाची निव्वळ मत्ता ११५ कोटी रू. होती. १९७६-७७ पर्यंतच्या तीन वर्षात निव्वळ नफा १ कोटीवरून २० कोटी रूपयांपर्यंत वाढला पण नंतर तो कमीकमी होत गेला. निगमाची १९७९ मधील कार्यवाही पुढीलप्रमाणे होती : उतारू वाहतूक ५३.८७ लक्ष; उतारू-किमी. वाहतूक ४२५.२० कोटी; मालवाहतूक ४६,५९३ टन; माल-किमी. वाहतूक ४४३ लक्ष; कर्मचारी संख्या १६,७८७; विमानांची संख्या ४२; एकूण महसूल-तास १,०९,९३४; अनुसूचित हवाई मार्गाचे जाळे ५०,८४२ किमी. निगमाकडे १९८०-८१ मध्ये ८ एअर बस, २१ बोईंग-७३७, १४ एच्. एस्. ७४८ आणि ८ फॉकर फ्रेंडशिप जातींची मिळून ५१ विमानांचा ताफा होता.

११७ मार्गावर निगमाची वाहतूक चालू होती. या वर्षी प्रवासी वाहतूकीपासून २४४ कोटी रू. माल वापतुकीमुळे २१ कोटी रू., तर टपालाचे १० कोटी रू. असे निगमाचे महसुली उत्पन्न होते. ११७ पैकी ९१ मार्गावरील वाहतूक किफायतशीर नव्हती; तोट्यातील मार्गामुळे निगमाला १९८०-८१ मध्ये ३५ कोटी रू. तूट आली. शासकीय धोरणानुसार सार्वजनिक सेवा म्हणून काही मार्ग तोट्यात चालणे अपरिहार्य असले, तरी असा तोटा भरून निघावा म्हणून केंद्र शासनाने ' नागरी हवाई विकास निधी ' १९६४ मध्ये सुरू करून निगमाला अर्थसाहाय्य दिले. १९७४ मध्ये या निधीतून शासनाने निगमाला अंतिम अनुदान दिले. निगमाला एकंदर नफा होत असल्यामुळे अशा अर्थसाहाय्याची गरज नाही, असे शासनाचे मत पडले. तेव्हापासून निगमाचे भांडवल भाग व कर्ज या दोन प्रकारांत मिळून ५२.७८ कोटी रू. राहिले. यामुळे निगमाचे न्यून-भांडवलीकरण झाल्याचे मानले जाते. दुदैवाने एप्रिल १९७० मध्ये मद्रास येथे निगमाचे एक बोईंग ७३७ विमान व ऑगस्ट १९७९ मध्ये पुणे येथे एच्. एस्. ७४८ हे विमान अशी दोन विमाने अपघातात नष्ट झाली. निगमाचे यामुळे मोठेच नुकसान झाले; पहिल्या अपघातात प्राणहानी झाली नाही, तथापि दुसऱ्या अपघातात विमानातील सर्व प्रवासी व निगमाचा कर्मचारीवर्ग यांना आपले प्राण गमवावे लागले.

खनिज तेलाच्या किंमतींत १९७४ पासून होत गेलेल्या अफाट वाढीमुळे निगमाच्या विमानांचा वापर इष्टतमतेपेक्षा बराच कमी होत गेला. परिणामी १९ नोव्हेंबर १९७९ पासून निगमाची प्रवासी वाहतूक व मालवाहतूक यांच्या दरांत ३०% वाढ करण्यात आली. खनिज तेलात झालेली वाढ, मार्गनिर्देशन दरांत व विमान उतरविण्याच्या शुल्कामध्ये झालेली वाढ, कर्मताऱ्यांच्या वेतनांतील व सर्वसामान्य किंमतीच्या पातळीत झालेली वाढ, या सर्व वाढींना तोंड देण्यासाठी वरील भाडेवाढ अपरिहार्य होती. १९८१ अखेरीस संपलेल्या पाच वर्षांत खर्चांचे महसुलाशी असलेले प्रमाण ८४% वरून ९२% पर्यंत वाढले. सामान्य भारतीय नागरिकाला आकर्षित करतील असे भाड्याचे दर ठेवणे निगमाला परवडण्याजोगे नाही. विमान यात्रिकांपैकी ६०% धंदाव्यवसायांतील, १०% शासकीय अथवा सार्वजनिक क्षेत्रातील, तर २०% परदेशी पर्यटक असतात असे आढळते. निगमाद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणार्थ मोठ्या प्रमाणावर रक्कम खर्च करण्यात येते. १ जुलै १९७७ पासून अंशदायी आरोग्य लाभ योजना कार्यान्वित झाली. कर्मचाऱ्यांच्या अनेक हुषार मुलांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात आल्या.

कोचीनजवळील मुन्नार येथे निगमाने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता एक नवीन विश्रामधाम (हॉलिडे होम) बांधले. निगमाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही मर्यादित प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. निगमाने आतापर्यंत टांझानिया, सूदान व नेपाळ या देशांतील प्रशिक्षार्थ्याना आपल्या अभियांत्रिकी विभागात प्रशिक्षण दिले. निगमाच्या स्वतःच्या अभियांत्रिकी शाळेत अभियंते व तंत्रज्ञ यांना नियमित प्रशिक्षण दिले जाते; याशिवाय 'बोईंग एअरक्राफ्ट कंपनी' तसेच 'एअरबस इंडस्ट्रीज' या विदेशी विमान कंपन्यांमध्ये निगम आपले तंत्रज्ञ व अभियंते यांना उच्च प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवीत असतो. हैदराबाद येथील 'केंद्रिय प्रशिक्षण संस्थे' मध्ये विमानोड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात येते. वक्तशीरपणात जगातील इतर देशांच्या हवाई वाहतूक कंपन्यांशी तुलना करता भारतीय हवाईमार्ग निगमाचा १९८० मध्ये चौथा क्रमांक होता; पण विमानतळांवरील सोई/सुविधा बव्हंशी असमाधानकारकच आहेत. नागरी हवाई खाते आणि निगमाचा कारभार यांत समन्वय व सुसूत्रता आणली, तर निगमाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकेल.

 

लेखक - व. श्री. पटवर्धन / वि. रा. गद्रे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate