অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेटकाफ, सर चार्ल्स

मेटकाफ, सर चार्ल्स

मेटकाफ, सर चार्ल्स

(३० जानेवारी १७८५–५ सप्टेंबर १८४६). हिंदुस्थानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हंगामी गव्हर्नर जनरल. त्याचा जन्म भारतात कलकत्ता येथे झाला. त्याचे वडील मेजर टॉमस मेटकाफ कंपनीच्या लष्करी सेवेत होते; पुढे ते कंपनीचे संचालक झाले. ईटन (इंग्लंड) येथे शिक्षण घेऊन मेटकाफ हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून रुजू झाला (१८०१). त्यानंतर त्याची लॉर्ड वेलस्लीचा स्वीय सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली (१८०३).

मिंटो गव्हर्नर जनरल झाल्यावर त्याने मेटकाफची एका स्वतंत्र आयोगावर नियुक्ती करून त्याला रणजितसिंगाकडे लाहोरला पाठविले (१८०८). त्याने त्याच्याशी अमृतसरचा तह केला (१८०९). यामुळे सतलजच्या पूर्वेकडील सर्व शीख संस्थाने इंग्रजांच्या संरक्षणाखाली आली. साहजिकच मुत्सद्दी म्हणून मेटकाफचा दर्जा वाढला. रेसिडेंट म्हणून त्याची ग्वाल्हेर (१८१०), दिल्ली (१८११–१९) आणि हैदराबाद (१८२०–२२) येथे नेमणूक करण्यात आली.

हैदराबाद येथे असताना त्याने कंपनीतील पैशाचे अपव्यवहार उघडकीस आणून निजामाला कर्जमुक्त केले. १८२५–२६ मध्ये भरतपूर येथे इंग्रजांविरुद्ध कारवाया करणाऱ्या दुर्जनसिंगविरुद्ध सैन्य पाठवून, मेटकाफने भरतपूर संस्थान ताब्यात घेतले. या प्रकरणावरील त्याचे भरतपूर मिनिट्स प्रसिद्ध आहेत. बेंटिंकच्या सामाजिक सुधारणांना – विशेषतः सतीची चाल बंद करण्यास – मेटकाफने पाठिंबा दिला. १८३४ मध्ये आग्रा येथे गव्हर्नर म्हणून काम केल्यानंतर त्याने बेंटिंकच्या अनुपस्थितीत एक वर्ष हंगामी गव्हर्नर जनरल म्हणून काम केले (१८३४–३५).

या काळात त्याने वर्तमानपत्रांवरील निर्बंध रद्द केले. त्यामुळे संचालक नाराज झाले. परिणामतः त्यांनी मेटकाफला कायम करण्याऐवजी वायव्य सरहद्द प्रातांचे लेफ्टनंट गव्हर्नर केले (१८३६–३८) आणि नंतर मद्रास इलाख्याचे गव्हर्नरपद दिले. त्यामुळे अपमानित होऊन त्याने राजीनामा दिला आणि इंग्लंड गाठले.

तेव्हा त्याला जमेका (१८३९–४२) आणि कॅनडा (१८४३–४५) यांचे गव्हर्नर करण्यात आले. त्याला सर हा किताबही लाभला. कॅनडाचा गव्हर्नर असतानाच त्याची प्रकृती खालावली व तो कर्करोगाने माल्शंगर (हँपशर) येथे मरण पावला. त्याच्या लोकप्रियतेचे प्रतीक म्हणून कलकत्त्यात मेटकाफ सभागृह बांधण्यात आले.


संदर्भ : सरदेसाई, गो. स. ब्रिटिश रियासत, उत्तरार्ध, मुंबई, १९३९.

देवधर, य. ना.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate