অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंगळ

सूर्यकुलातील नवग्रहांपैकी मंगळ हा एक ग्रह असून सूर्यापासून आरंभ केल्यास सध्या ज्ञात असलेल्या ग्रहांत मंगळाचा चौथा क्रमांक लागतो. पृथ्वीसापेक्ष तो पहिला बहिर्ग्रह (पृथ्वीच्या सूर्याभोवतील परिभ्रमण कक्षेच्या बाहेर ज्याची परिभ्रमण कक्षा आहे असा ग्रह) आहे. ज्येष्ठा (अँटारेझ) व राहिणी (आल्डेबरन) हे तारे वगळता मंगळासारखा दुसरा तांबडा तेजस्वी गोल आकाशात दिसत नाही. दूरदर्शकातून (दुर्बिणीतून) पाहिल्यास मंगळ फिकट पिवळट तांबूस किंवा नारिंगी रंगाचा दिसतो आणि त्याच्या बिंवावर काळपट किंवा करड्या रंगाचे डाग, नारिंगी किंवा भगव्या छटेची क्षेत्रेध्रुवावर पांढरी आवरणे आणि कधीकधी रेषात्मक काळसर खाणाखुणा दिसतात.

मंगळास ग्रीक लोकांनी आरीझ किंवा एरीझ युद्ध देव, तर ज्येष्ठा ताऱ्यास अँटारेझ (मंगळाचा प्रतिस्पर्धा) अशी सार्थ नावे दिली होती. प्राचीन भारतीयांनी मंगळास कुज, अंगारक, भौम, लोहित इ. नावे देऊन फलज्योतिषात त्याला क्रौर्य, पराक्रम, उद्योग, उत्पात, अग्निप्रलय, साथीचे रोग, दंगेधोपे, वादळे, युद्ध इत्यादींचे कारकत्व दिले. हा रक्तवर्ण, दक्षिण दिशेचा स्वामी तमोगुणी मानलेला असून मेष व वृश्चिक या राशींचा स्वामी आहे. मकर राशी हे त्याचे उच्च स्थान असून कर्क राशी हे नीच स्थान आहे. कुंडलीत मंगळाची दृष्टी ४,७ व ८ स्थानांवर असून मंगळामुळे त्या स्थानांच्या फलांत न्यूनत्व येते अशी समजूत आहे.

गॅलिलीओ यांनी १६१० मध्ये मंगळ परिपूर्ण गोलाकार, नसल्याचे प्रथम निदर्शनास आणले. १६५९ मध्ये क्रिस्तीआन हायगेन्झ यांनी मंगळाचे चित्र रेखाटून त्या चित्रात सर्टिस मेजर या नावाने ओळखण्यात येणारा पसरलेला मोठा काळा डाग बरोबर दाखविला होता. जे.डी. कासीनी यांनी १६६६ मध्ये मंगळाच्या दोनही ध्रुवांजवळील पांढरी आवरणे (ध्रुव-टोप) प्रथम पाहिली. हायगेन्झ यांनी १६५९ मध्ये मंगळ स्वतःच्या अक्षाभोवती परिभ्रमण करतो याची नोंद केली.

विल्यम हर्शेल (१७३८-१८२२) यांनी मंगळावर वातावरणाचे अतिशय पातळ आवरण असल्याचे निदर्शनास आणले. त्याचप्रमाणे त्यांनी मंगळाचा अक्ष कक्षीय पातळीला काटकोनात नसून कललेला आहे असे १७८४ मध्ये दाखवून मंगळावर होणाऱ्या ऋतुमानातील बदलांसंबंधी विवरण केले.

१६६६ मध्ये कासीनी यांनी अक्षीय आवर्तकाल मोजून तो २४ तास ४० मिनिटे असल्याचे दाखविले व त्यामध्ये फक्त तीन मिनिटांची चूक असल्याचे दिसते. अमेरिकन ज्योतिर्विद एशफ हॉल यांनी १८७७ मध्ये मंगळाच्या दोन उपग्रहांचा शोध लावला. इटालियन ज्योतिर्विद जी. व्ही. स्क्यापरेल्ली यांनी १८८१ मध्ये मंगळाचा नकाशा तयार करून त्यात मंगळ बिंबावरील पांढऱ्या डागावर कोळ्याच्या जाळ्यासारखे रेषात्मक जाळे (याचा त्यांनी ‘कॅनाली’- कालवे – असा उल्लेख केलेला होता) प्रथमच दाखविले. छायाचित्रण तंत्राच्या साह्यय्याने या नकाशात नंतर खूप सुधारणा होऊन शेकडो नवीन गोष्टींची भर पडली आहे. या नकाशातील कॅनालीच्या समूहामुळे जीवसृष्टीचे अस्तित्व आढळण्याची शक्यता असलेला पृथ्वीसारखा दुसरा ग्रह म्हणूनही मंगळाला महत्त्व प्राप्त झालेले आहे.

पृथ्वीच्या कक्षेसापेक्ष मंगळाच्या कक्षेची वैशिष्ट्ये

फोबस व डायमॉस या नावांनी ओळखण्यात येणाऱ्या दोन उपग्रहांसह मंगळ सूर्याभोवती विवृत्ताकृती (दीर्घवर्तुळाकार) कक्षेत भ्रमण करीत असतो. सूर्यापासून मंगळाचे सरासरी अंतर सु. २२.८ कोटी किमी. म्हणजे सूर्य व पृथ्वी यांमधील सरासरी अंतराच्या सु. १.५२ पट आहे.कक्षेतील उपसूर्य बिंदूत (सूर्यापासून सर्वांत जवळ असलेल्या बिंदूत) असताना मंगळ सूर्यापासून सु. २०.७ कोटी किमी. अंतरावर आणि अपसूर्य बिंदूत (सूर्यापासून सर्वांत दूर असलेल्या बिंदूत) असताना २४.९ कोटी किमी. इतका दूर असतो.

पृथ्वीवरून मंगळाचे निरीक्षण करण्याच्या दृष्टीने पृथ्वीच्या कक्षेसापेक्ष मंगळ-कक्षेची काही वैशिष्ट्ये माहीत असणे उपयुक्त ठरते. या दोन्ही कक्षा समकेंद्री (एकच केंद्र असलेल्या) नसून त्यांची सध्या अशी स्थिती आहे की, पृथ्वी-कक्षेचा अपसूर्य बिंदू सूर्याच्या ज्या बाजूस (दिशेत) आहे, त्याच दिशेच्या आसपास (सु. ५५° पूर्वेकडे) मंगळ-कक्षेचा उपसूर्य बिंदू येतो. यामुळे या परिसरात दोन्ही कक्षांमधील अंतर कमी कमी होत जाते. ४ जुलैच्या सुमारास पृथ्वी बिंदूपाशी असते आणि २८ ऑगस्टच्या सुमारास मंगळाच्या कक्षेच्या उपसूर्य बिंदूच्या जास्तीत जास्त जवळून जाते.

नक्षत्रसापेक्ष सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मंगळास ६८६ दि. २३.५ तास (पृथ्वीवरील) लागतात. (मंगळाचे ६६९ दिवस). मंगळाचे सांवासिक वर्ष ७७९.९४ माध्य (सरासरी) सौर दिवसांचे आहे म्हणजे सूर्य व पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेवर एकदा मंगळ आला की पुन्हा तशी स्थिती येण्यास ७८० दिवस जावे लागतात. या कलावधीत सूर्याभोवती पृथ्वीच्या दोनपेक्षा अधिक प्रदक्षिणा म्हणजे सु. २ १०/७३ प्रदक्षिणा होतात. यामुळे मंगळावरील एका वर्षातील बरेच दिवस मंगळ पृथ्वीपासून दूर अंतरावर आणि सूर्याच्या आजूबाजूच्या दिशातच दिसत असतो आणि मंगळाच्या निरीक्षणासाठी सोयीचे (योग्य) दिवस थोडेच मिळतात.

वेधानुकल प्रतियुत्या

पृथ्वीच्या एका बाजूस सूर्य व बरोबर विरूद्ध बाजूस मंगळ असेल त्या वेळी प्रतियुती (षड्भांतर) झाली असेम्हणतात. एकदा प्रतियुती झाल्यावर पुढची प्रतियुती (वर सांगितल्याप्रमाणे) सु. २ वर्षे ७ आठवड्यांनी होते. मंगळाचा सूर्य सांवासिक काल व आवर्तकाल (प्रदक्षिणा काल) समपरिमाणात नसल्यामुळे एका प्रतियुतीच्या वेळी कक्षेच्या ज्या बिंदूपाशी मंगळ असतो, त्याच बिंदूपाशी तो पुढच्या प्रतियुतीच्या वेळी नाही; तर त्या बिंदूच्या पुढे कक्षेचा सु. १/७ भाग जातो.

२ वर्षे ७ आठवड्यांनी होणाऱ्या पुढच्या प्रतियुतीच्या वेळी मंगळ माध्यमानाने आपल्या कक्षेवर सु. ५०° पूर्वेकडे सरकलेला असतो व याप्रमाणे प्रत्येक प्रतियुतीच्या वेळी त्याचे स्थानांतर होत होत सु. १५ वर्षांनी होणाऱ्या प्रतियुतीच्या वेळी कक्षेच्य ज्या बिंदूवर अगदी आरंभी मंगळ असेल, त्या बिंदूच्या जवळपास येतो.

कक्षांतर्गत गती वर्षभर एकच राहत नसल्यामुळे हा कलावधी सु. १५ ते १७ वर्षांचा आहे. यामुळे प्रत्येक प्रतियुतीच्या वेळी पृथ्वी व मंगळ यांमधील अंतरात बदल पडत जातो. मंगळ उपसूर्य बिंदूच्या आसपास असताना होणाऱ्या प्रतियुतीच्या वेळी हे अंतर किमान (५.६ कोटी किमी.) असते व अपसूर्य बिंदूच्या जवळपास असताना होणाऱ्या प्रतियुतीच्या वेळी ते कमाल (सु. १० कोटी किमी.) असते.

प्रतियुत्यांचे काल मंगळाचे निरीक्षण करण्यास व वेध घेण्यास अत्यंत उपयुक्त असतात. या वेळी पृथ्वी व मंगळ यांमधील अंतर किमान होत असल्यामुळे व मध्यरात्री मंगळ डोक्यावर (मध्यमंडलावर) दिसणार असल्यामुळे मंगळाचे दृश्य बिंब मोठ्या अकारमानाचे, पूर्ण प्रकाशित व तेजस्वी दिसते आणि त्यावरील आविष्कार अधिक स्पष्ट आणि मोठे दिसू शकतात. दृश्य बिंबाचा कमाल व्यास २५ सेकंद व तेजस्वितेची प्रत-३ असते. प्रतियुती पूर्वी व नंतर १ ते २ महिन्यांचा काल साधारणमानाने मंगळाच्या निरीक्षणास अनुकूल असतो.

पृथ्वी आपल्या कक्षेच्या अपसूर्य बिंदूच्या आसपास व मंगळ त्याच्या कक्षेवरील उपसूर्य बिंदूच्या आसपास असताना होणाऱ्या प्रतियुतीच्या वेळी मंगळ पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो. यामुळे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यांमध्ये होणाऱ्या मंगळाच्या प्रतियुत्या निरीक्षणाच्या दृष्टीने उत्तम ठरतात. या कालावधीत घडणाऱ्या प्रतियुत्या या अत्यंत अनुकूल प्रतियुत्या होत. अशा प्रतियुत्यांच्या वेळी तेजस्वीपणाच्या दृष्टीने सूर्य, चंद्र व शुक्र या मालिकेत मंगळाचा चौथा क्रमांक लागून गुरू किंवा व्याध यांनाही तो मागे टाकतो. या वेळी प्रज्वलित कोळसा किंवा धोक्याच्या लाल दिव्याप्रमाणे चमकणारा मंगळ पाहिल्यावर पुरातन काळी मंगळाला युद्ध देवतेचे स्थान का मिळाले ते समजू शकते.

मंगळ उपसूर्य बिंदूच्या आसपास असताना होणाऱ्या लागोपाठच्या प्रतियुत्यांच्या मधील कालात सु. ६ प्रतियुत्या होतात. यांतील तीन प्रतियुत्यांच्या वेळी मंगळ व पृथ्वी यांमधील अंतर वाढतच असते आणि मंगळ अपसूर्य बिंदूच्या आसपास असताना होणाऱ्या प्रतियुतीच्या वेळी ते सर्वांत अधिक असते. या प्रतियुत्या वेध घेण्याच्या दृष्टीने प्रतिकूल प्रतियुत्या ठरतात. या वेळी दृश्य बिंबाचा व्यास फक्त १४ सेकंद असतो.

प्रत्येक वेधानुकूल प्रतियुतीच्या वेळी मंगळ नेमका उपसूर्य बिंदूपाशी असेलच असे नाही; पण या दोन घटनांमध्ये जास्तीत जास्त ± ८ दिवसांचा फरक पडतो व या कालावधीत मंगळाच्या तेजस्वितेत लक्षात येण्यासारखा फरक पडत नाही. प्रतियुतीपूर्वी काही दिवस मंगळाची गती वक्री होऊ लागते म्हणजे नक्षत्र सापेक्ष मंगळ पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकताना दिसतो व प्रतियुतीनंतर काही दिवसांनी मंगळ पुन्हा मार्गी होतो.

प्रत्येक प्रतियुतीच्या वेळी मंगळावरील ऋतुमान भिन्न भिन्न असल्यामुळे मंगळावर दिसणारे आविष्कार भिन्न असू शकतात. मंगळ हा पृथ्वीजवळचा बहिर्ग्रहअसल्यामुळे चंद्र-शुक्रासारख्या त्याच्या सर्व कला दिसत नाहीत. पौर्णिमेलगतच्या दोन-तीन कलाच फक्त दूरदर्शकातून पाहिल्यास दिसतात. या वेळी मंगळ बिंबाचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग ८४ टक्क्यांहून कधी कमी असत नाही.

मंगळाचा अक्ष अवकाशात अशा तऱ्हेने कललेला आहे की, उपसूर्य बिंदूच्या आसपास घडणाऱ्या प्रतियुतींच्या वेळी मंगळाचा दक्षिण गोलार्ध पृथ्वीकडे कललेला असतो. या वेळी दक्षिण गोलार्धावर उन्हाळा असून ग्रह अधिक स्पष्ट दिसत असल्यामुळे दक्षिण गोलार्धावरील आविष्कारांची निरीक्षणे अधिक प्रमाणात झालेली आहेत.

मंगळाच्या कक्षेची पातळी क्रांतिवृत्ताच्या (पृथ्वी-कक्षेच्या) पातळीशी १°. ८५ कोन करते आणि सध्याच्या स्थितीत मंगळ उपसूर्य बिंदूच्या आसपास असताना क्रांतिवृत्ताच्या दक्षिणेला गेलेला असतो. त्यामुळे वेधानुकूल प्रतियुत्यांच्या वेळी उत्तर गोलार्धातील निरीक्षकांच्या दृष्टीने मंगळाचे आकाशातील स्थान तितकेसे सोयीचे ठरत नाही. दक्षिण गोलार्धातील वेधशाळा निरीक्षणासाठी अधिक उपयुक्त ठरतात. अपसूर्य बिंदूपाशी मंगळ असताना होणाऱ्या प्रतियुत्या उत्तर गोलार्धातील निरीक्षकांस अधिक सोयीच्या असतात.

मंगळाच्या अत्यंत वेधानुकूल प्रतियुत्या

दिनांक

कालावधी(वर्ष)

पृथ्वीपासून मंगळाचे अंतर (कोटी किमी.)

५ सप्टेंबर १८७७

१५

५.६०

२६ ऑगस्ट १८९२

१७.१

५.५५

१८ सप्टेंबर १९०९

१४.९

५.८३

२२ ऑगस्ट १९२४

१४.९

५.५५

२३ जलै १९३९

१४.९

५.८३

११ सप्टेंबर १९५६

१७.२

५.६७

६ ऑगस्ट १९७१

१४.९

१.६५

२८ सप्टेंबर १९८८

१७.२

५.८४

पृथ्वीच्या एकाच अंगास सूर्य व मंगळ येऊन सूर्याच्या दिशेतच मंगळ असतो, तेव्हा त्यास युती असे म्हणतात. युतीच्या वेळी मंगळ पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर गेलेला असून दोहोंमधील अंतर सु. ४० कोटी किमी. असते.

या स्थितीत मंगळच्या दृश्य बिंबाचा व्यास ३.६ सेकंदांच्या आसपास असून तेजस्वितेची प्रत+२ होते. युतीच्या आसपास असताना सूर्याच्या तेजामुळे मंगळ दिसू शकत नाही. या वेळी त्याचा ’अस्त’ झाला असे म्हणतात.

 

लेखक: वि. वि. मोडक /  य. रा. नेने  /  अ. ठाकूर.

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate