অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठीची सहिष्णूता

मराठीची सहिष्णूता

मराठीची सहिष्णूता

महाराष्ट्रातील जवळपास सर्व बोलीभाषांचे संकलन- संपादन करणारा ग्रंथ नुकताच पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. डॉ.गणेश देवी आणि अरूण जाखडे यांनी केलेले श्रम निश्चितच अधिक मूल्यवान आणि ऐतिहासिक आहेत. तब्बल शंभरेक वर्षानंतर तेही जार्ज ग्रिअर्सन या इंग्रज अधिकाऱ्यानंतर पहिल्यांदा हा भाषेचा सर्व्हे होत आहे. या निमित्ताने डॉ.गणेश देवी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, मराठी ही सहिष्णू भाषा आहे. कारण तिने इंग्रजी स्वीकारताना स्वत:चे अस्तित्त्वही संपू दिले नाही. तसेच आपल्या अस्तित्वासोबत अनेक बोली जिवंतही ठेवल्या. हे अपवादात्मक चित्र आहे. बहुतेकवेळा इतर भाषांच्या बाबतीत असे होत नाही. तरीही आज भारतात हजारो बोलीभाषा मरणाच्या टप्प्यावर उभ्या आहेत; त्यांचे संकलन, संपादन होणे अत्यावश्यक आहे. डॉ.गणेश देवी त्यासाठी आदिवासी भागात केवळ काम करीत नाहीत तर भारतीय भाषांचे संकलनही करीत आहेत. 

खरं तर भाषेशिवाय आपले अस्तित्वच शक्य नसते. आपण जेही काही शोधतो, तत्त्वज्ञान मांडतो, संशोधन करतो ते भाषेद्वारेच असते तरीही आपण सामान्य नागरिक आणि अभ्यासकही भाषेकडे जितक्या गांभीर्याने पहायला हवे तितक्या गांभीर्याने पहात नाही. पटकथा लेखक Jaideep Sahni आपल्या मुलाखतीत म्हणतात, I like to get out of what I call the Language jail. As a Hindi film writer, I wish I could write in Tamail , oriya or Naga, but I can’t , So I try and dabble with different dialects to get out of the language jail. For ‘Company ’ (Cinema) I experimented with bambaiya hindi; in ‘Chak de! India’ we made lal sir speak in incorrect Hindi. Mujhe language ke slang me Maza aata. --- These days my agenda is to preserve words that are going out of circulation’. (express , 15-24 Aug. 2013) जयदीप साहनी ज्यांचा आता 'शुद्ध देशी रोमान्स' सिनेमा प्रदर्शित होतोय त्यांनाही भाषेबद्दल आत्यंतिक कळवळा आणि ओढ आहे. तमीळ, ओरियात लिहिण्याऐवजी जाणीवपूर्वक बोलीतून लिहिणारे, बम्बईया किंवा चुकीचं हिन्दी वापरणारी पात्रे जशीच्या-तशी भाषेसकट उतरवून बोलींच्या शब्दांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ते करू पाहताहेत.

भाषेचे भले-बुरे करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम सिनेमाही करीत असतो. पण आपण त्याकडे कायम दुर्लक्ष केले आहे. विशेषत: मराठीच्या संदर्भात दादा कोंडके, अशोक सराफ यांनी ज्या पद्धतीने भाषेला वाकवले, निळू फुल्यांनी ज्या पद्धतीने भाषिक जरबेचे राजकारण केले ते आपण नीटपणे पाहिले नाही. प्र.के.अत्र्यांसारख्यांना भाषाप्रभू म्हणतात आपण दादा कोंडकेंकडे का दुर्लक्ष केले कळत नाही. कदाचित त्यांनी भाषेला अधिकच वाकवून विनोदावर भर दिला म्हणूनही हे झाले असेल. पण विनोदामागेही एक अत्यंत छुपी अशी दुखरी वेदना असते आणि ती दडपण्यासाठी विनोदाचे शस्त्र वापरले जाते. दादा कोंडकेंचे 'एकटा जीव' हे आत्मचरित्र वाचले की त्याचा प्रत्यय आपणाला येतो. म्हणून पुन्हा एकदा आपण साहित्य- सिनेमाच्या भाषेकडे गांभीर्याने पहायला हरकत नाही. कारण कितीही नाकारले तरी सिनेमाचा एक मोठाच प्रभाव माणसांवर पडत असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर मराठी सिनेमाने गावाचे आणि पाटलाचे जे चित्र रेखाटले ते इतके एकांगी होतेय की विचारायची सोय नाही. पण बराच काळ तेच चित्र शहरी लोकांनी प्रमाण मानलेले दिसते. तेव्हा भाषेच्या संवधर्नाचे माध्यम म्हणूनही सिनेमाकडे पाहता येते. नुकताच साधनाने 'सिनेमा विशेषांक' ही प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये अनेकांनी आपली मते नोंदवून सिनेमाचा एकूण मानवी मनावर आणि जीवनावर किती खोलवर परिणाम होतो हे दर्शवले आहे. 

सांगण्याचे तात्पर्य असे की आज भारतातल्या हजारेक भाषा मृत्यूपंथाला लागलेल्या असताना आपण तिकडे डोळेझाक करणे आपणाला परवडणारे नाही. कारण भाषा किंवा बोली मरणे म्हणजे तो भाषिक समाज आणि त्याची भाषिक संस्कृती संपण्यासारखे असते. दुर्दैवाने आपण ते लक्षात घेत नाही. एखादी भाषा टिकवायची म्हणजे काय करायचे, हा तसा नेहमीचा प्रश्न. पण त्यासाठी आपण काही छोटे-छोटे प्रयोग करू शकतो. म्हणजे काय? तर समजा मुंबईत सामाजिक व बाहेरचे व्यवहार करण्यासाठी मला जर इंग्रजी- हिन्दी अपरिहार्य असेल तर काही हरकत नाही. पण कुटुंबात मी माझी मातृभाषा वापरायला हरकत नाही. पण घरातही आपण लहान मुलांना शुद्ध बोलण्यासाठी कायम दडपण आणीत असतो. भाषा कधी शुद्ध नसते. याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे आणि आपली भाषा जगवायला हवी. 

दुसरी गोष्ट आपण एक मराठी भाषक म्हणून सहजपणे करू शकतो. ती म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांना प्रमाण मराठी शब्दांचे आपल्या बोलीतले अर्थ सांगणे. इंग्रजी, हिन्दी शब्दांना प्रमाण मराठी आणि बोलीतले पर्यायी शब्द सांगणे. तसेच काळाच्या हद्दपार होण्याच्या मार्गावर असणाऱ्या आहेत. शब्दांचे संकलन करणे. शक्य झाल्यास त्या वस्तूची चित्रमय नोंद ठेवणे. त्यामुळे ती वस्तू संपली तरी भाषेमध्ये त्या शब्दांचा वापर करता येईल. 'हागंदारी' हा शब्द आपण आज सर्रासपणे प्रमाण मराठीत वापरतो. तेव्हा असं अनेक शब्दांबाबतीत होऊ शकतं. त्याचबरोबर आपण जी तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची प्रगती केली आहे त्या आधारे आपले वेगवेगळे उत्सव आणि सण-समारंभ यांचे रेकॉर्ड करून ठेऊ शकतो व त्याचे जतनही करू शकतो. तसेच इतरत्र बोलताना आपण आपल्याच भाषेचे अवमूल्यन करता कामा नये. तुम्ही म्हणाल आम्ही कुठे अवमूल्यन करतो! तर तुम्हाला सांगतो, जेव्हा आपण मराठी बोलता तेव्हा सन्मानाने मराठीमध्ये इंग्रजी, हिन्दी वगैरे भाषांचे शब्द वापरतो. वाक्यप्रयोग वापरतो. आणि हे वापरताना आपण स्वत:ला एक 'इलिट' वर्गातले समजतो. समजायला हरकत नाही. मुळात मराठी भाषेचीच अशी स्वीकृती सहिष्णूतेची घडण आहे. पण मुद्दा असा की जेव्हा आपण हिन्दी किंवा इंग्रजी बोलायचा प्रयत्न करीत असतो आणि त्यावेळी चुकून जरी आपल्या मुखातून मराठी शब्द उच्चारला गेला तरी आपणाला कानकोंडले होते आणि समोरचा माणूस हसू लागतो. म्हणजे काय होते, मराठीत हिन्दी, इंग्रजी चालते मग हिन्दी, इंग्रजीत मराठी का चालू नये? याचा अर्थ असा की आपणच आपल्या भाषेचा व बोलींचा सन्मान करायला शिकू या.

लेखक -

प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदम

 

स्त्रोत : महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=IxH8I/jxNrY=


अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate