অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाषा मरत नसते

भाषा मरत नसते

भाषा मरत नसते

सत्तावीस फेब्रुवारीला नुकताच मराठी भाषा दिन संपन्न झाला आणि माध्यमांमधून पुन्हा एकदा मराठीच्या अस्तित्वाबद्दल भल्या-बुऱ्या चर्चा सुरू झाल्या. या सबंध चर्चेत इंग्रजी की मराठी असाच मुद्दा राहिला आहे. यामध्ये साहजिकच इंग्रजी वर्चस्वाचा मुद्दा केंद्रस्थानी येतो. तेव्हा इंग्रजीचा किंवा मराठीचा द्वेष आणि अभिमान बाळगणं नव्हे तर वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. 

पहिली गोष्ट म्हणजे इंग्रजी आज ज्ञानभाषा आणि संपर्कभाषा आहे, हे वास्तव आहे. तेव्हा इंग्रजी आली पाहिजे. ती भाषा शिकली पाहिजे. पण त्याचवेळी मराठीचा दु:स्वास करता कामा नये. एकीकडे मराठीचे अभिजातपण सिद्ध होत असताना, दोन हजार वर्षांचा तिला इतिहास असताना ती मरणाच्या दारी उभी आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. 

मला मान्य आहे की मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यांसारख्या महानगरांमध्ये सामान्य माणूसही मराठी बोलत नाही. गावोगाव इंग्रजी स्कूल्सचे पेव फुटले आहे. नेटवरचा सगळा भाषाव्यवहार इंग्रजी आहे. इंग्रजीशिवाय आपले पान हालत नाही, अशी अवस्था आहे. पण त्याचवेळी थोडा दुसऱ्या बाजूने विचार केला तर महानगरातील माणूस सार्वजनिक जीवनात भलेही मराठी वापरत नसेल पण तो कौटुंबिक जीवनात म्हणजे घरात मराठीचाच वापर करतो आहे. महाराष्ट्रात मुंबई-पुण्यासारखी किती महानगरे आहेत? तिथे राहणाऱ्यांची लोकसंख्या किती आहे? त्या महानगरांपेक्षा ग्रामीण महाराष्ट्र व्यापक असेल आणि तिथे मराठीचाचा वापर होत आहे हे जर खरे असेल तर ती मरणदारी उभी आहे या म्हणण्याला अर्थ नाही. 

माध्यमांचा जरी विचार केला तरी पूर्वी फक्त दूरदर्शन आणि आकाशवाणीच होतं. आता एफ.एम. आणि असंख्य मराठी वाहिन्यांची गर्दी झालेली आपणांस पहावयास मिळेल. इंग्रजीचे महत्त्व वाढले असले तरी एक्सप्रेस, टाइम्स यासारखी चार-दोन अपवाद वगळता फार नवी इंग्रजी वृत्तपत्रे प्रकाशित होत नाहीत. परंतु मराठी वृत्तपत्रांची संख्या दरवर्षी वाढते आहे. त्यांचा खप वाढतोय म्हणजे वाचकांची संख्याही वाढत आहे. जर सव्वा अकरा कोटी लोक मराठी बोलत असतील आणि हेच लोक अटकेपार झेंडे लावीत असतील तर मराठीचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. 

आणखी एक गोष्ट म्हणजे, एखादी दुसरी परकी भाषा शिकणे म्हणजे नेमके काय? भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेचे मूलभूत ज्ञान आणि संस्कार आत्मसात करणे असते. आपण तसे करीत नाही. आपण इंग्रजी शिकतो म्हणजे मुलांना इंग्रजी बोलणारा पोपट बनवीत असतो आणि पोपट कधी विकास करीत नाही. तेव्हा इंग्रजी शिकणं म्हणजे त्या भाषेतील ज्ञान हस्तगत करणं असतं हे आपण मुलांना नीट शिकवत नाही आणि इंग्रजी भाषा शिकताना मराठीला दुय्यम मानण्याचं कारण येत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही तसं मानत नाही. तर उदाहरण देतो. तुम्ही मराठी बोलताना कितीतरी इंग्रजी शब्द मराठीत वापरत असता आणि त्यातून तुम्हाला प्रतिष्ठा वाटत असते. पण जर आपण हिन्दी किंवा इंग्रजी बोलताना मराठी शब्द आला तर आपण त्या व्यक्तीला हसू लागतो. म्हणजे आपणच आपल्या मराठीची टिंगल करू लागतो. तेव्हा मराठीचा सन्मान न होता तिचा तिरस्कार होत असतो, हे आपण लक्षात घेत नाही. म्हणून इंग्रजी-हिंदी मराठीत चालत असेल तर मराठीही इंग्रजी-हिंदीमध्ये चाललं पाहिजे आणि तसा प्रयत्न केला तरच मराठीचा सन्मान होईल आणि हिन्दी-इंग्रजी भाषा आत्मसात करणं सोपं होऊन जाईल. हे आपल्या पिढीने नव्यापिढीला नीट समजावून सांगायला हवं. मराठी वापरण्याचा आग्रह नाही केला तरी चालेल पण तिरस्कार तरी करू नका याची शिकवण नीट द्यायला हवी. 

शेवटी कोणतीही भाषा पोटाशी म्हणजे नोकरीशी बांधलेली नसते. ती आपल्या जगण्याचं, संस्कृतीचं आणि अखिल मानवीजातीचं सारतत्त्व असते. हे मूल्य जर आपण रूजवू शकलो तर कोणत्याही भाषेचा द्वेष कोणी करणार नाही. ज्या-त्या ठिकाणी जी-ती भाषा समृद्ध असते. जसा प्रश्न इंग्रजी शब्दांना मराठी पर्याय देताना येतो तसाच प्रश्न मराठी अस्सल देशी शब्दांना (भाकर, चूल, सौभाग्य, बांगडी वाढणं, कपाळ पांढरं होणं इ. असंख्य) इंग्रजी पर्याय देताना येतो. तेव्हा आपण भाषा सन्मान करून बहुभाषिक होऊ या आणि मराठीचा अभिमान बाळगायला शिकूया. तो बाळगला तरच आपली मराठी संस्कृती टिकेल, अन्यथा ती संपून जाईल. तेव्हा विचार करा. पण एक लक्षात ठेवा तुमच्या करंटेपणामुळे मराठी मरणार नाही. ती अधिक समृद्ध होऊन नव्या रूपांत अवतरेल. ही नवी मराठी तुम्हाला नाही कळाली तर मात्र तुम्ही स्वत: करंटे व्हाल. 

लेखक -

प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदम
विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी
ता.माढा, जि.सोलापूर

 

स्त्रोत : महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=yqkXbrKoZtQ=

अंतिम सुधारित : 5/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate