অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विसर्पिका

विसर्पिका

त्वचेच्या सर्वात वरच्या थरात शृंगीभवनाची [शृंगी प्रथिनात(केराटिनात) किंवा त्याने युक्त अशा ऊतकात समान रचना व कार्य असणाऱ्या पेशीसमूहात – रूपांतर होण्याच्या क्रियेची] प्रक्रिया सतत चालू असते. खालच्या थरात तयार झालेल्या कोशिका (पेशी) ज्या गतीने वर येत असतात, त्या गतीस सुसंगत अशा पद्धतीने ही प्रक्रिया कार्यशील असते. या प्रक्रियेत अथवा सुसंगतीस बाधा आल्यामुळे होणाऱ्या त्वचेच्या विकारांपैकी विसर्पिका हा एक चिरकारी (जुनाट) विकार आहे.

अधस्त्वचीय ऊतकाच्या समीप असलेल्या त्वचेच्या खालच्या स्तरामध्ये दीर्घकाल शोथ विकारांचे (दाहयुक्त सुजेच्या विकारांचे) अस्तित्व राहिल्यास विसर्पिकेची निर्मिती होते. अशा शोथामुळे आधारस्तरातील कोशिकांची निर्मिती जास्त वेगाने होते. त्याला प्रचुरोद्‌भवन किंवा प्रचुरजनन म्हणतात. या जलद गतीमुळे उत्पन्न झालेल्या त्वच्या – कोशिकांचे स्तर ज्या त्वरेने अधित्वेच्या क्षेत्रात येत राहतात, त्याच त्वरेने शृंगीभवन होऊ शकत नाही. परिणामतः, पुष्ठभागावर माशाच्या खवल्यासारख्या जाड चकत्या (खपल्या) तयार होऊ लागतात.या खवल्यांचा रंग लालसर असतो., परंतु नखांनी खाजवल्यामुळे त्या रूपेरी दिसतात. वरचेवर असे खाजवल्यास पृष्ठभागाखालील त्वचेच्या अंकुरकांना इजा होऊन त्यातून रक्तस्त्रावाचे सूक्ष्म टिपके दिसू लागतात. विसर्पिकेची विकृतिस्थळे अशा खवल्यांच्या स्वरूपात कोपरे, गुडघे, कंबरेचा मागील भाग व डोके यांवर विशेषत गोऱ्या किंवा पिवळ्या कातडीच्या मानवी वंशांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. कधी कधी काखा, जांघा,जननेंद्रियांच्या आसपासचा भाग या ठिकाणच्या दमट त्वचेवरही लालसर चकाकणारे, व गुळगुळीत खवले दिसतात. केसांच्या वाढीवर विसर्पिकेचा अनिष्ट परिणाम होत नाही. बव्हंशी खवले काही मिलिमीटर इतक्या रूंदीचे (व्यासाचे) असतात, परंतु डोक्यात कधी कधी त्यांचे आकारमान फार लहान असल्यास कोंडा झाला असल्यासारखे दिसू शकते.

विसर्पिकेचे निश्चित कारण माहीत नसले तरी अनेकदा गिलायूंचे (टॉन्सिलचे) संक्रामण, शारीरिक वा मानसिक ताण आणि इजा यांच्याशी तिचा संबध आढळतो. उष्ण कटिबंधीय प्रदेशात सूर्यप्रकाशामधील जंबुपार (दृश्य वर्णपटाच्या जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांमुळे काहीसे संरक्षण मिळून हा विकार सौम्य स्वरूपात दिसतो. विकृतिजनक घटनांच्या उद्‌भवामध्ये विविध आनुवंशिक घटक, प्रतिरक्षीय (रोगप्रतिकारक्षम) टी - कोशिकांच्या हालचाली, ल्यूकोट्राईन एंझाइम व औषधांसारखी बाह्य प्रतिजनक्षम रसायने या सर्वांचा हातभार लागत असावा, असे आता दिसून येत आहे.

विसर्पिकेच्या उपचारासाठी अनेक वर्षे खनिज (दगडी) कोळशापासून मिळणारा टार हा पदार्थ, सॅलिसिलिक अम्ल व अँग्रेलीन यांसारखी द्रव्ये वरून लावली जात. त्यांचा मर्यादित परिणाम दिसून येतो. १९५० नंतर सोरॅलेन व त्यापासून निर्मिलेली संयुगे आणि कॉर्टिसोनसद्दश स्टेरॉइड द्रव्यांचा पोटात घेण्याच्या स्वरूपात वापर सुरू झाला आहे. विसर्पिकेवर नियंत्रण ठेवण्यात ही औषधे बरीच यश्स्वी झाली आहेत. दीर्घतरंगी जंबूपार किरण आधार कोशिकांचे प्रचुरजनन कमी करू शकतात असे आढळल्यावर त्यांचा वापरही औषधांबरोबर होऊ लागला आहे. मुखाने मिथॉक्सी – सोरॅलेन (P) आणि त्वचेवर जंबूपार दीर्घतरंगी (अल्ट्राव्हायोलेट ए) अशी एकत्रित उपचार पद्धती puva या नावाने प्रसिद्ध आहे. प्रचुरजनन कमी करण्यासाठी कर्करोगात वापरतात. त्या प्रकारची, चयापचययोत्पाद (चयापचयात म्हणजे शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक क्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या) पदार्थांशी साम्य असलेली प्रतिचयापचयोत्पाद (प्रतिचयापचयोत्पादांची जागा घेणारी किंवा त्यांच्या वापरास प्रतिबंध करणारी सल्फा औषधासारखी) द्रव्येही विसर्पिकेत उपयोगी पडतील असा विश्वास वाटतो.

 

संदर्भ : 1. Burton, J. L. Essentials of Dermatology, Edinburg, 1990.

2. Pettit, J.H.S. Manual of Practical Dermatology, Edinburg, 1983.

लेखक : दि. श. श्रोत्री

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate