অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाईन फ्लू चा सामना करु या !

स्वाईन फ्लू चा सामना करु या !

सध्या महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशामध्ये स्वाईन फ्लू म्हणजे इन्फलूएन्झा एच 1 एन 1 या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. त्यात काही रुग्णांचे मृत्यूसुध्दा झालेले आहेत. हा आजार विषाणूपासून होतो. आजारामध्ये बाधीत व्यक्तीस सर्वसाधारणपणे ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणे व दुखणे तसेच श्वास घेण्यास त्रास होणे व क्वचीत प्रसंगी उलट्या जुलाब इत्यादी लक्षणे दिसून येतात.
या आजाराची लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीने घाबरुन न जाता शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेऊन घरी विश्रांती घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल वापरावा, वारंवार साबणाने व पाण्याने हात स्वच्छ धुवावेत. पौष्टीक आहार तसेच लिंबू, आवळा, मौसंबी व संत्री तसेच हिरव्या पालेभाज्यांचा आहार घ्यावा व भरपूर पाणी प्यावे, त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्यानुसार औषधोपचार घ्यावा. आजपर्यंत स्वाईन फ्लू संशयीत 170 रुग्णांची तपासणी व उपचार वेगवेगळ्या शासकीय दवाखान्यामध्ये झाली आहेत व आतापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात 3 रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत.
स्वाईन फ्लू संशयीत रुग्णांच्या तपासणीसाठी अहमदनगर जिल्ह्यात, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर महानगरपालिका दवाखाना नवीपेठ तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्याची तसेच गरज भासल्यास सदर रुग्णांसाठी मोफत टॅमी फ्लूची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे अत्यवस्थ झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे पाच खाटांचे स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्यात आलेला असून तेथे चार व्हेंटीलेटरची सुविधा पुरविण्यात आलेली आहे. साईबाबा हॉस्पीटल शिर्डी, प्रवरा मेडीकल लोणी या ठिकाणी अत्यवस्था रुग्णांसाठी 4 खाटा व व्हेंटीलेटर्स राखीव ठेवण्यात आलेली आहेत. आनंदऋषी, नोबल, स्वास्थ, सिटीकेअर या खाजगी रुग्णालयांमध्ये सुध्दा अतिदक्षता विभागात सदर आजाराच्या रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. प्रभाकर पवार यांनी सांगितले की, स्वाईन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी पचनशक्ती व प्रतिकार शक्ती चांगली असावी. दिवसातून दोनवेळा सहज पचणारा व मर्यादित आहार घ्यावा तसेच चहामध्ये सुंठ व तुळशीचा वापर करावा. ज्येष्ठ होमिओपथी तज्ज्ञ डॉ. सुभाष मेहरे यांनी होमिओपथीद्वारे प्रतिकार शक्ती वाढविणे व सदर आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्यानुसार औषधे घ्यावी असे सांगितले.
स्वाईन फ्लू उद्रेकासंदर्भात नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात स्वाईन फ्लू आजारासाठीच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक बाबीबद्दल आढावा घेण्यात आला.
जिल्हा रुग्णालय अहमदनगरतर्फे अहमदनगर शहर तसेच जिल्ह्यातील आय.एम.ए. तसेच निमा या डॉक्टरांच्या संघटनेतील वैद्यकीय व्यावसायिकांचे स्वाईन फ्लू संबंधी शासनाच्या सूचनांविषयीचे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच स्वाईन फ्लू उपचारासाठी निर्देशित केलेल्या खाजगी रुग्णालयांना शासनाच्या सूचनांबाबत माहिती देण्यात आली आहे. 

-राजेंद्र सरग 
जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर

माहिती स्रोत: महान्यूज, बुधवार, २५ फेब्रुवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate