तांदुळजा
तांदुळजा : (चवळाई; हिं. चवराई; गु. तांदुळजो; क. कीरेसोप्पु; सं. तंडुलीय, अल्पमारिष; इं. ॲमरँथ; लॅ. ॲमरँथस पॉलिगॅमस; कुल–ॲमरँटेसी). भारतात सर्वत्र आणि श्रीलंकेतील उष्ण देशांतील शेतांत तणासारखी व पसरट वाढणारी ही एक लहान, वर्षभर जगणारी व अनेक शाखांची ⇨ ओषधी आहे. ती पोकळा, माठ, राजगिरा यांच्या वंशातील (ॲमरँथस ) असल्यामुळे त्यांची अनेक शारीरिक लक्षणे सारखी आहेत.