অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधता - मधमाश्या

जैवविविधता - मधमाश्या

जगात मधमाश्या नसत्या तर आपण जगूच शकणार नाही! विश्वास बसत नाही ना? मधमाश्या म्हटल्या की आपल्याला फक्त त्यांचा डंख, नाही तर मध आठवतो. पण लक्षात घ्या, जगातील १,३०,००० झाडांना फलोत्पादनासाठी मधमाश्या अनिवार्य आहेत. आपले एकतृतीयांश अन्न हे थेट मधमाश्यांवरच अवलंबून आहे. मधमाश्याच काय, पण नजरेला न दिसणारे मातीतले जीवाणूसुद्धा सुकलेल्या पाल्याचा भुगा करून मातीचा कस वाढवायला मदत करतात, तर अमिबा या जीवाणूंना खातात आणि त्यांच्या जीवनरसातून झाडांना पोषण मिळते. अगदी किडे-मुंग्यासुद्धा काहीतरी उद्दिष्टे घेऊन जन्माला येतात. फक्त आपण त्याचा फारसा विचारच करत नाही. तुम्हाला हे माहीत आहे का? १९८७ पासून रेल्वे अपघातात दीडशे हत्ती मारले गेलेले आहेत आणि यावर अजूनही काही उपाययोजना का होत नाही? जगातील ८० टक्के अर्थव्यवस्था ही निव्वळ जैविक स्रोतांवर अवलंबून आहे. आपल्या जगण्यासाठी तरी हे जैविक धन आपल्याला जतन केले पाहिजे.

संयुक्त राष्ट्र संघटनेने २०१० हे वर्ष आंतरराष्ट्रीय ‘जैवविविधता वर्ष’ म्हणून घोषित केलेले आहे. जैवविविधता ही फक्त जंगलातच नसते तर आपल्या आजूबाजूलासुद्धा अनेक प्राणी व वनस्पती असतात.

अन्नजाळ्यातील एखादी प्राणीजात नष्ट झाली, तर त्याचे परिणाम अतिशय दूरगामी असतात. गेली अब्जावधी वर्षे निसर्गात कितीतरी प्रकारचे जीव राहत आलेले आहेत, पण गेल्या एकाच शतकात कितीतरी प्राण्यांची संख्या घटत चालली आहे.

महाराष्ट्रात निसर्गसंपन्न आहे. घनदाट जंगले असलेले पश्चिम घाट आहेत, तसेच कोकणची किनारपट्टी आहे. निसर्गसंपत्ती हेच तिथले भांडवल आहे. नवीन औद्योगिक प्रकल्प, खाणकामे करताना या संपत्तीची काळजी घेणे अत्यावश्यक असते. यातील प्रत्येक भागांत वेगवेगळे वन्यजीव आणि वृक्षराजी आहेत. त्यांच्या परस्परसंबंधांची वीण अतिशय घट्ट असते. आता गांडुळासारखा किळस येणारा प्राणी हा एक ‘नैसर्गिक नांगर’, ‘खत प्रकल्प’ अन् ‘मातीतील पाणी धरून ठेवणारा बांध’ आहे. शहरातील माणसांपेक्षा खेडय़ात राहणाऱ्या शेतकऱ्यांनाच या गोष्टी ठाऊक असतात.

‘जीवे जीवस्य जीवनम्’ या उक्तीनुसार खरोखरीच एक जीव दुसऱ्या जीवाचे जीवन असते. सबंध जगातील वीस लाख प्राणी व वनस्पतींच्या जाती मानवाला ठाऊक आहेत. प्रत्यक्षात हा आकडा पाच पटीने जास्त असण्याची शक्यता वर्तवली जाते. यातील प्रत्येक जीवाचा दुसऱ्या जीवाशी संबंध असतोच आणि नैसर्गिकरीत्या तो आपोआप सांभाळला जात असतो. जैवविविधता अबाधित राखण्याचे काम केवळ सरकार किंवा हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके शास्त्रज्ञ करू शकत नाहीत. वृत्तपत्रे, रेडिओ, वाहिन्या, शाळा-महाविद्यालयांतील शिक्षक हे जनसामान्यांपर्यंत जैवविविधतेची मूळ संकल्पना कशी नेऊ शकतील, याचा साकल्याने विचार झाला पाहिजे. शहर स्थापताना सृष्टीचा समतोल कसा राखता येईल, रिमोट सेन्सिंग वापरून प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष कसे ठेवता येईल, असे अनेक प्रश्न येथे उभे ठाकतात. पर्यावरणाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथले स्थानिक! प्रत्येक भागातील स्थानिक माणसांपर्यंत ही जाणीव पोहोचवणं सर्वात महत्त्वाचं आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या नात्याने आपण सर्वानीच पृथ्वीवरील सजीव संपत्ती कशी सांभाळता येईल, याकडे लक्ष द्यायला हवे. वर म्हटल्याप्रमाणे अगदी किडे-मुंग्यासुद्धा आपल्या जन्माचे ध्येय जाणून कार्य करत असतात.

स्रोत - लोकसत्ता, रविवार , २१ नोव्हेंबर २०१०

जगात मधमाश्या नसत्या तर. लेखक गौरी दाभोळकर

अंतिम सुधारित : 7/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate